घनदाट जंगलात आपापली हद्द सांभाळत वावरणारे वाघ, बिबट्या आणि चित्ता हे तीन प्रमुख शिकारी एकाच वेळी एकाच परिसरात दिसणे हा केवळ योगायोग नसून, जंगलातील अधिवास, अन्नसाखळी आणि प्राण्यांच्या हालचालीतील बदल यांचा संकेत मानला जात आहे. राजस्थानमधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील ही घटना वन्यजीव अभ्यासकांसाठी अभ्यासाचा महत्त्वाचा विषय ठरत आहे.

तीन शिकारी एकत्र येणे विलक्षण कसे?

वन्यजीव परिसंस्थेत वाघ, बिबट्या आणि चित्ता हे ‘टॉप प्रीडेटर’ अर्थात अन्नसाखळीतील सर्वोच्च शिकारी मानले जातात. या तिन्ही प्राण्यांमध्ये शिकार करण्याच्या पद्धती, अधिवास निवड आणि हालचालींचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर वेगळे असते. वाघ हा अत्यंत शक्तिशाली आणि स्पष्टपणे आपली हद्द राखणारा प्राणी आहे. या हद्दीत इतर मोठ्या शिकाऱ्यांची उपस्थिती तो सहसा सहन करत नाही. त्यामुळे त्याच्या मुख्य क्षेत्रात इतर शिकाऱ्यांचे दीर्घकाळ अस्तित्व टिकणे कठीण असते. बिबट्या हा अत्यंत लवचीक प्राणी मानला जातो.

वाघांच्या उपस्थितीत तो सहसा थेट संघर्ष टाळतो आणि अधिक दाट जंगल, खडकाळ भाग किंवा मानवी वस्तीच्या सीमेजवळील प्रदेश निवडतो. वाघ असलेल्या भागात बिबट्या प्रामुख्याने रात्री अधिक सक्रिय होतो, जेणेकरून थेट सामना टाळता येईल. चित्त्यांची परिस्थिती याहून वेगळी आहे. ते प्रामुख्याने मोकळ्या गवताळ प्रदेशात राहणे पसंत करतात. त्यांची शिकार पद्धत वेगावर आधारित असल्याने त्यांना मोकळे क्षेत्र आवश्यक असते. त्यामुळे वाघांचे वर्चस्व असलेल्या दाट जंगलात चित्त्यांची उपस्थिती सहसा कमी आढळते. याच कारणामुळे या तिन्ही शिकाऱ्यांचे एकाच वेळी एका मर्यादित परिसरात दर्शन होणे हे अत्यंत दुर्मीळ मानले जाते.

चित्त्यांसाठी या घटनेचे महत्त्व काय?

भारतामध्ये चित्ते पुन्हा स्थापित करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पामुळे मध्य प्रदेशातील शोपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यान हे केंद्रबिंदू ठरले आहे. आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांना येथे सोडण्यात आले असून, त्यांची हालचाल आणि वर्तन यांचा सातत्याने अभ्यास सुरू आहे. त्यातीलच ‘केपी-२’ या चित्त्याने राजस्थानमध्ये प्रवेश केल्याची बाब विशेष लक्षवेधी आहे. चित्त्यांच्या नैसर्गिक वर्तनानुसार तरुण चित्ते नवीन प्रदेश शोधण्यासाठी मोठ्या अंतरावर भटकंती करतात. ही प्रक्रिया त्यांच्या स्थिर अधिवास निवडीचा एक भाग असते. अशा हालचालींमुळे दोन महत्त्वाच्या बाबी समोर येतात त्या म्हणजे, चित्त्यांची प्रसारक्षमता व नवीन प्रदेशांशी जुळवून घेण्याची क्षमता. जर चित्ते नियमितपणे अशा प्रकारे नवीन भागात प्रवेश करू लागले, तर भविष्यात त्यांचे अधिवास विस्ताराचे नवे नमुने दिसू शकतात.

शिकार उपलब्धतेचे काय?

एका मर्यादित परिसरात तीन मोठे शिकारी दिसणे हे त्या परिसरात पुरेशा प्रमाणात भक्ष्य अर्थात शिकारयोग्य प्राणी मुबलक उपलब्ध असण्याची शक्यता दर्शवते. वन्यजीव अभ्यासानुसार, एखाद्या भागात हरीण, सांबर, नीलगाय, रानडुक्कर यांसारख्या शिकारयोग्य प्राण्यांची संख्या अधिक असल्यास अनेक शिकारी एकाच व्यापक परिसरात सहअस्तित्व राखू शकतात. पाणवठे हा या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. चाकल नदीसारख्या जलस्रोताजवळ विविध प्राण्यांची उपस्थिती वाढते, कारण उन्हाळ्यात पाण्याची गरज सर्व प्राण्यांना असते. त्यामुळे पाणवठ्याभोवती शिकाऱ्यांची उपस्थिती वाढणे स्वाभाविक मानले जाते. याशिवाय, विविध प्रकारचा अधिवास जसे की दाट जंगल, मोकळे गवताळ क्षेत्र, खडकाळ प्रदेश असल्यास वेगवेगळ्या प्रजाती एकाच मोठ्या परिसंस्थेत वेगवेगळ्या ‘जागा’ (ज्याला पर्यावरणाच्या भाषेत ‘इकॉलॉजिकल निशेस’ असे म्हणतात) वापरून सहअस्तित्व राखू शकतात.

स्पर्धा आणि सहअस्तित्वाचे काय?

वाघ, बिबट्या आणि चित्ता यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी ‘परिसंस्थेतील अधिवासाचे विभाजन’ ही संकल्पना महत्त्वाची मानली जाते. या प्रक्रियेत वेगवेगळ्या प्रजाती एकाच परिसरात राहूनही वेगवेगळ्या वेळा, वेगवेगळे अधिवास किंवा वेगवेगळ्या प्रकारची शिकार निवडतात. त्यामध्ये वाघ मोठ्या आकाराच्या प्राण्यांची शिकार करतो. बिबट्या मध्यम आकाराच्या शिकारींवर अवलंबून असतो. चित्ते लहान आणि वेगवान प्राण्यांची शिकार करतात. शिकारीसाठी या तीनही प्राण्यांनी केलेल्या या पद्धतीच्या विभाजनामुळे त्यांची आपापसांतील थेट स्पर्धा कमी होते. परिणामी त्यांचे सहअस्तित्व शक्य होते. मात्र, अधिवास मर्यादित असल्यास म्हणजेच जंगलाचे क्षेत्र कमी असल्यास किंवा शिकारीची उपलब्धता कमी झाल्यास अशा वेळी मात्र स्पर्धा तीव्र होऊ शकते. या परिस्थितीत त्यांचे सहअस्तित्व शक्य होत नाही आणि ते यशस्वीदेखील होऊ शकत नाही.

‘दुर्मीळ योगायोग’ की बदलाचा संकेत?

रणथंबोरमध्ये घडलेली ही घटना केवळ रोमांचक ‘वाइल्डलाईफ सायटिंग’ म्हणून मर्यादित न ठेवता, तिच्याकडे परिसंस्थेतील बदल समजून घेण्यासाठी अभ्यासाचा विषय म्हणून पाहणे अधिक आवश्यक आहे. तीन शिकारी एकाच वेळी दिसणे म्हणजे त्या परिसरातील जैवविविधतेची क्षमता, शिकार उपलब्धता आणि अधिवासाची गुणवत्ता यांचे प्रतिबिंब असू शकते. त्याचवेळी, चित्त्यांच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या दीर्घकालीन यशासाठी अशा घटनांमधून मिळणारी माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे रणथंबोरमधील हा ‘दुर्मीळ योगायोग’ केवळ एक रोमांचक प्रसंग नसून, भारतातील मोठ्या मांसाहारी प्राण्यांच्या भविष्यातील सहअस्तित्वाचा दिशादर्शक संकेत ठरू शकतो.

rakhi.chavhan@expressindia.com