India Nepal Dispute: नेपाळमध्ये नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. त्यात रॅपर बालेन शाह यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे. ३५ वर्षीय बालेन शाह हे नेपाळचे पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. नेपाळमधील प्रस्थापित पक्षांचा व नेत्यांचा बालेन शाह यांच्या पक्षाने पराभव केला. चार वेळा नेपाळचे पंतप्रधान राहिलेल्या के.पी. शर्मा ओली यांचा बालेन शाह यांनी झापा मतदारसंघात ५० हजारांहून अधिक मताधिक्याने पराभव केला. बालेन शाह हे राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या युवकांच्या आंदोलनानंतर के.पी.ओली शर्मा यांचे सरकार पडले होते. त्यानंतर पहिल्यांदाच नेपाळमध्ये निवडणुका पार पडल्या. नेपाळ हा भारताचा महत्वाचा शेजारी देश आहे. बालेन शाह यांच्या विजयाचे भारतासाठी महत्व काय? ते जाणून घेऊयात.
भारत-नेपाळ संबंध
भारत व नेपाळ या दोन्ही देशांमध्ये १८०० किलोमीटर लांब सीमा रेषा आहे. दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक आणि मैत्रीचे संबंध आहेत. नेपाळच्या विकासात तसेच संरक्षण क्षेत्रात भारताने नेपाळला वेळोवेळी मदत पुरवलेली आहे. व्यापार व गुंतवणुकीच्या बाबतीत नेपाळसाठी भारत हा सर्वात मोठा देश आहे. नेपाळवर नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती आल्यास वेळोवेळी भारताने मदत केली आहे. दोन्ही देशांतील नागरिकांमध्ये परस्पर चांगले संबंध असल्याचे दिसून येते. दरम्यान, मागील काही वर्षांपासून नेपाळवर चीनचा प्रभाव वाढत आहे. तसेच भारत व नेपाळमधील सीमावाद चव्हाट्यावर आला आहे.
भारत-नेपाळमधील सीमावाद
भारतातील उत्तराखंड या राज्याचा भाग असलेल्या लिंपियाधुरा, कालापानी आणि लिपुलेखवर नेपाळने दावा केला आहे. २०२० मध्ये नेपाळने त्यांच्या देशाचा एक नकाशा जारी केला होता. त्यात भारताच्या हद्दीतील हे तिन्ही भाग नेपाळमध्ये दाखवण्यात आले होते. दरम्यान, मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात भारत-चीन व्यापार हा लिपुलेख मार्गे होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यावर नेपाळने आक्षेप घेतला होता. लिपुलेख हा नेपाळचा भाग असल्याचे म्हणत नेपाळने भारताला चीनबरोबर व्यापार करण्यास मज्जाव केला होता. त्यावेळी नेपाळकडून होत असलेले एकतर्फी दावे स्वीकार केले जाणार नाहीत, अशी भूमिका भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मांडली होती.
नेपाळी चलनावर भारताच्या हद्दीतील भाग
नोव्हेंबर २०२५ मध्ये नेपाळने १०० रूपयांची नोट जारी केली होती. त्या नोटेवर नेपाळचा नकाशा छापण्यात आला होता. त्यात भारताच्या हद्दीतील भूभाग नेपाळमध्ये असल्याचे दाखवण्यात आले होते. त्यावर देखील भारताने आक्षेप घेतला होता. नेपाळचे हे ‘एकतर्फी कृत्य’ असून त्यामुळे ‘जमिनीवरील वास्तविकता बदलणार नाही’ अशी भूमिका भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मांडली होती. भारत हा नेपाळच्या बाबतीत मोठ्या भावाच्या भूमिकेत असतो, तसेच तो नेपाळच्या अंतर्गत घडामोडींमध्ये हस्तक्षेप करतो, असा आरोप नेपाळमधील काही नेते करतात.
नेपाळची अर्थव्यवस्था का झाली होती डळमळीत?
भारत व नेपाळ संबंधांमध्ये २०१५ मध्ये कटुता आली होती. भारताने साडेचार महिने नेपाळची आर्थिक नाकेबंदी केली, असा आरोप त्यावेळी नेपाळने केला होता. भारतीय वंशाच्या मधेशी नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी भारताने नेपाळला होणारा पुरवठा तसेच निर्यात रोखल्याचा आरोप नेपाळकडून झाला होता. दरम्यान, त्यावेळी नेपाळची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नेपाळचे आरोप फेटाळून लावले होते. नेपाळमधील जनतेनेच नेपाळला संकटात टाकल्याचे, स्वराज म्हणाल्या होत्या.
बालेन शाह नेपाळचे पंतप्रधान होणे भारताच्या हिताचे ठरेल का?
बालेन शाह व त्यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने नेपाळमधील प्रस्थापित नेते व पक्षांचा पराभव केला आहे. त्यामुळे बालेन शाह या युवा नेतृत्वाबरोबर भारताला संबंध प्रस्थापित करावे लागणार आहेत. बालेन शाह यांनी नव मतदारांना प्रभावित करण्यासाठी ‘नेपाळ प्रथम’ (Nepal First) चा नारा दिला होता. नेपाळचे सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यावर बालेन यांचा भर आहे. दरम्यान, बालेन शाह यांचे समर्थक बालेन यांना भारत विरोधी मानतात. २०२३ मध्ये बालेन यांनी ‘ग्रेटर नेपाळ’चा एक नकाशा जारी केला होता. त्यात त्यांनी भारताच्या हद्दीतील काही भाग नेपाळमध्ये असल्याचे दाखवले होते. ‘अखंड भारत’ भूमिकेला विरोध करण्यासाठी बालेन यांनी तो नकाशा जारी केला होता.
बॉलिवूड चित्रपटावर बालेन यांचा आक्षेप
रामायणाच्या कथेवर आधारित असलेला आदिपुरुष हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी बालेन शाह यांनी या चित्रपटातील काही संवादांवर आक्षेप घेतला होता. हे संवाद तातडीने हटविण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली होती. इतकंच नाही, तर नेपाळ आणि काठमांडूमध्ये कोणताही भारतीय सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा धमकीवजा इशाराही त्यांनी भारताला दिला होता. सीतेचा उल्लेख ‘भारताची कन्या’ असा करण्यात आल्याबाबत हा आक्षेप होता. त्यानंतर या चित्रपटावर काठमांडू व पोखरामध्ये बंदी घालण्यात आली. विशेष म्हणजे कुठलाही हिंदी चित्रपट प्रदर्शित केला जाणार नाही हे निश्चित करण्यासाठी काठमांडूतील १७ चित्रपटगृहांमध्ये पोलीस तैनात करण्यात आले होते.
बालेन शाह यांची भारत व चीनबाबत भूमिका काय?
बालेन शाह हे भारत अथवा चीन या दोन्ही देशांचे समर्थन करत नाहीत. नेपाळची स्वतंत्र भूमिका असावी, असा त्यांचा आग्रह आहे. नेपाळ मध्ये होऊ घातलेला चीनचा ‘दमक औद्योगिक प्रकल्प’ बालेन यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारातील जाहीरनाम्यातून वगळला होता. नेपाळमध्ये याआधी सत्तेवर असलेले नेते भारत अथवा चीनधार्जिणे होते. परंतु, भारत व चीनचा नेपाळच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल, याकडे बालेन यांचा जोर आहे. नेपाळबरोबर असलेले संबंध सुधारण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. बालेन शाह यांना नेपाळमध्ये मोठे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे ते महत्वाचे निर्णय सहजपणे घेऊ शकतात. भारत व नेपाळमध्ये असलेले वाद सोडवण्यासाठी बालेन यांच्या मताधिक्याचा वापर होतो की नाही, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
