Rare heart conditions in young adults: सगळं सुरळीत सुरू होतं. आपलं तारुण्य मनमुरादपणे जगणं, नवीन जबाबदाऱ्या, अभ्यास आणि करिअरच्या दिशेनं नवी वाटचाल – यातच त्या दोघींचं आयुष्य छान चाललं होतं. पण कोणाला ठाऊक होतं की, त्यांच्या तरुण हृदयांच्या आत असं काहीतरी घडत होतं, जे त्यांचं संपूर्ण आयुष्यच अस्वस्थ करून सोडणार होतं. आपण तारुण्यात इतक्या नवीन गोष्टींना सामोरे जात असतो की, त्या सगळ्याचा ताण आपल्या हृदयासह शरीरावर येत असतो. मग छातीत दुखणं, श्वास लागणं, हृदयाचे ठोके अनियमित होणं अशा त्रासांना सामोरं जावं लागतं. मात्र, हा त्रास इतर बाह्य ताणांमुळेच होत असावा, असा समज आपण करून घेतो आणि या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो.
धावणारे ठोके आणि वाढती अस्वस्थता (Heart health warning signs)
अवघ्या २९ वर्षांची सायानी बॅनर्जी नॅनोटेक्नॉलॉजीमध्ये एम.टेक. करून यूपीएससी परीक्षेची तयारी करत होती. कॉलेज, अभ्यास आणि घर एवढंच तिचं विश्व होतं. सुरुवातीला आरोग्याच्या छोट्या-मोठ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत ती पुढे जात राहिली; पण हळूहळू तिला अचानक डोळ्यांसमोर अंधारी येऊन चक्कर येण्याचे (ब्लॅकआउट्स) प्रकार वाढू लागले. पहिल्यांदा ती आपल्या आई-वडिलांसोबत बाहेर असताना बेशुद्ध पडली, तर दुसऱ्यांदा थेट एका मॉलमध्ये कोसळली. ती अगदी निवांत बसलेली असतानाही तिच्या हृदयाचे ठोके प्रत्येक मिनिटाला ११० ते ११५ पर्यंत असायचे. त्यामुळे तिने थोडी जरी धावपळ केली, तर तिच्या हृदयाचे ठोके १५० च्या पार जायचे. तिच्या स्मार्टवॉचवर सतत चमकणारे हे आकडे आता तिच्या इतके अंगवळणी पडले होते की, त्यात काही धोका असेल, असं तिला वाटणंच बंद झालं होतं. तिच्या छातीत जणू काही विचित्र बुडबुडे फुटत असल्यासारखी धडधड जाणवायची आणि मानेजवळ आवळल्यासारखा त्रास व्हायचा. तिने किमान चार नामांकित हृदयविकार तज्ज्ञांचा सल्ला घेतला; पण ते सर्वच जण या त्रासाला केवळ ‘परीक्षेचा तणाव आणि चिंता’ ठरवून मोकळे झाले. नियमित तपासण्यांमध्ये तिचं हृदय अगदी सामान्य दिसत होतं; मात्र जेव्हा प्रगत इमेजिंग तपासणी करण्यात आली, तेव्हा डॉक्टरांना समजलं की, तिच्या हृदयात एक अशी गाठ लपलेली होती जी साध्या तपासण्यांमध्ये कधी दिसलीच नव्हती.
तिच्या इको-कार्डिओग्रामच्या अहवालात हृदयाची रचना पूर्णपणे सामान्य दिसत होती. हृदयाचे व्हॉल्व्ह व्यवस्थित कार्यरत होते, रक्त खेचण्याची आणि फेकण्याची क्षमता अगदी योग्य होती आणि कुठल्याही प्रकारची गाठ किंवा वाढ नजरेस पडत नव्हती. फक्त ईसीजी (ECG) तपासणीत तिची धडधड सतत वेगाने धावत असल्याचे (टॅचिकार्डिया) दिसत होते. अशा परिस्थितीत, एका विशी-तिशीतल्या तरुणीच्या या त्रासाला केवळ परीक्षेचा ताण किंवा भीती (anxiety) समजणं कोणत्याही डॉक्टरांसाठी स्वाभाविक होतं.
अखेर फोर्टिस रुग्णालय, गुरुग्राम येथील प्रख्यात कार्डिओथोरॅसिक व व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. उद्गीथ धीर यांच्याकडे सायानी पोहोचली आणि या रहस्याचा उलगडा झाला. डॉ. धीर सांगतात, “तिच्या हृदयातील गाठीचं स्थान इतकं विचित्र होतं की, ध्वनिलहरींच्या साह्यानं काम करणाऱ्या साध्या इको-कार्डिओग्राममध्ये ती दिसणं जवळजवळ अशक्य होतं. हृदय तपासण्याचा कोन आणि तपासला जाणारा कप्पा यांवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. काही वेळा गाठ अशा जागी लपलेली असते, जिथे या तंत्रज्ञानाची नजर पोहोचूच शकत नाही.”
तिच्या हृदयात एक मोठी गाठ होती, जिला वैद्यकीय भाषेत ‘कार्डिअॅक लायपोमा’ (Cardiac Lipoma) म्हणतात. तपासणीत या गाठीचा आकार चक्क नऊ सेंटिमीटर असल्याचे आढळले. लायपोमा ही परिपक्व चरबीच्या पेशींपासून बनलेली एक निरुपद्रवी (harmless) गाठ असते खरी; पण ती थेट हृदयात तयार होणं ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे. मुळात हृदयाच्या गाठी अतिशय विरळ असतात आणि त्यातही लायपोमाचं प्रमाण केवळ आठ टक्के असतं.
ती जीवन-मरणाची रात्र
हृदय हा आकारानं एक आटोपशीर (compact) अवयव आहे. तिथे अशा नको असलेल्या गाठीसाठी तिळमात्रही जागा नसते. ही गाठ हृदयाच्या स्नायूंच्या कामात अडथळा आणू शकते किंवा त्याच्या यंत्रणेचा तोल बिघडवू शकते. सायानीच्या बाबतीत नेमकं हेच घडत होतं. ही गाठ थेट हृदयाजवळ होती आणि त्यामुळेच तिचे ठोके अनियंत्रित वेगाने पडत होते.
सायानीने सांगितलं, “डॉक्टरांनी जेव्हा मला पहिल्यांदा सांगितलं की, माझ्या हृदयात लायपोमा आहे, तेव्हा खरं सांगू तर माझ्या मनात कसलीच भीती किंवा भावना उमटली नाही. मला वाटलं की, यावर काहीतरी सहज उपाय निघेल.” मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती अधिक गंभीर होती. शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी अचानक तिची प्रकृती खालावली. डोळ्यांसमोर अंधारी येणं पुन्हा सुरू झालं, हृदयाचे ठोके अनियंत्रितपणे वाढू लागले आणि संध्याकाळपर्यंत तिला तातडीनं आयसीयूमध्ये (ICU) दाखल करावं लागलं.
आता ओपन-हार्ट सर्जरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. डॉ. धीर यांनी तिला ‘हार्ट-लंग बायपास मशीन’वर ठेवलं, जेणेकरून शरीराचा प्राणवायूयुक्त रक्तपुरवठा अखंड सुरू ठेवून शस्त्रक्रियेपुरतं हृदय सुरक्षितपणे थांबवता येईल. त्या ऑपरेशन थिएटरमध्ये वेगापेक्षा ‘अचूकता’ हीच जीवन आणि मृत्यूमधील सीमारेषा होती. जर गाठ पूर्णपणे काढली नसती, तर ती पुन्हा वाढून हृदयाचा समतोल बिघडवण्याचा धोका होता आणि जर शस्त्रक्रिया करताना जराही जास्त खोल छेद गेला असता, तर हृदयाची धडधड नियंत्रित करणारी नैसर्गिक यंत्रणा कायमची निकामी झाली असती. डॉक्टरांनी अत्यंत कौशल्यानं आजूबाजूच्या नाजूक पेशी आणि रक्तवाहिन्यांना जपत ती गाठ यशस्वीरीत्या बाहेर काढली. शस्त्रक्रियेच्या तीन महिन्यांनंतर सायानीचे हृदय पुन्हा एकदा पूर्णपणे सामान्य गतीनं धडधडू लागलं.
या अनुभवाने सायानीच्या जगण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. ती म्हणते, “मला जाणीव झाली की आयुष्य म्हणजे केवळ अभ्यास, आपली महत्त्वाकांक्षा किंवा करिअर एवढंच नसतं; आयुष्यात त्यापलीकडेही खूप काही जगण्यासारखं असतं.” तिला ‘आनंद’ चित्रपटातील राजेश खन्नांचा तो प्रसिद्ध संवाद आठवतो: “जिंदगी बडी होनी चाहिये; लंबी नही!”
एका मोकळ्या श्वासासाठी १३ वर्षांची तगमग (Cor Triatriatum in Adults)
दुसऱ्या बाजूला होती २१ वर्षांची रीमा. तिची तब्बल १३ वर्षांपूर्वीपासून तिच्या हृदयाशी झुंज सुरू होती. ती अवघ्या आठ वर्षांची असताना तिच्या हृदयातील छिद्र बुजवण्यासाठी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेनंतर सगळं काही पूर्ववत होईल, असं वाटलं होतं; मात्र थोडं जरी चाललं किंवा श्रम झाले तरी तिला दम लागायचा. पुढची तब्बल १३ वर्षं ती याच श्वास कोंडणाऱ्या त्रासात जगत राहिली.
सफदरजंग रुग्णालयाच्या कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. अनुभव गुप्ता सांगतात, “ती २१ वर्षांची असताना आमच्याकडे आली. आम्ही जेव्हा तिची बारकाईनं तपासणी केली, तेव्हा तिच्या हृदयात एक दुर्मीळ जन्मजात दोष आढळला, ज्यामध्ये एका असामान्य तंतुमय पडद्यानं तिच्या डाव्या कर्णिकेचे (left atrium) दोन कप्प्यांत विभाजन केले होते.” या स्थितीला वैद्यकीय भाषेत कॉर ट्रायअट्रिअॅटम’ (cor triatriatum) म्हणतात. त्यामध्ये एका असामान्य पडद्यामुळे हृदयाच्या डाव्या अलिंदाचे (left atrium) दोन कप्पे झाले होते, ज्यामुळे फुप्फुसातून शुद्ध रक्त घेऊन येणाऱ्या प्रवाहात अडथळा निर्माण होत होता. फुप्फुसातून येणाऱ्या रक्ताला त्या पडद्यातील एका बारीकशा फटीतून वाट काढत हृदयाच्या डाव्या निलयात (left ventricle) शिरावं लागत होतं. ते छिद्र अतिशय अरुंद असल्यानं रक्ताचा प्रवाह अडवला जात होता आणि त्या अडथळ्यामुळे थेट फुप्फुसावर प्रचंड दाब निर्माण होत होता. याच कारणामुळे रीमाला सतत दम लागायचा, प्रचंड थकवा जाणवत होता.
इमेजिंग तपासण्यांनंतर रीमावरही सायानीप्रमाणेच ओपन-हार्ट सर्जरी करण्यात आली आणि तिच्या हृदयातील तो अडथळा ठरणारा पडदा काढून टाकण्यात आला. आता तिच्या रक्ताभिसरणात आणि श्वास घेण्यात कसलीही अडचण उरलेली नव्हती. डॉ. गुप्ता सांगतात की, हा पडदा पुन्हा कधीही वाढत नाही आणि रीमा आता ती एक सामान्य, सक्षम आयुष्य जगू शकते. कारण- तिच्या हालचाली किंवा दैनंदिन जगण्यावर आता कोणतीही बंधने उरलेली नाहीत
विशी आणि तिशीतील महिलांनी हृदयाशी संबंधित कोणत्या धोक्यांकडे दुर्लक्ष करू नये?
जीवनशैली आणि लठ्ठपणा: उच्च रक्तदाब, वाढलेलं कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि विशेषतः पोटाभोवती वाढणारी चरबी हा तारुण्यातील मोठा धोक्याचा इशारा आहे.
गरोदरपणातील अनियमितता: गरोदरपणात उद्भवणारा उच्च रक्तदाब (प्री-एक्लॅम्प्सिया), गर्भावस्थेतील मधुमेह किंवा मुदतपूर्व प्रसूती यांमुळे भविष्यातील हृदयविकाराचा धोका वाढतो.
असामान्य लक्षणे: केवळ छातीत दुखणं नव्हे, तर सततचा थकवा, धाप लागणं, चक्कर येणं, मळमळणं, छातीत धडधडणं किंवा मान, जबडा व पाठीत होणाऱ्या वेदना यांकडे केवळ ‘ताण’ म्हणून दुर्लक्ष करू नये.
कमी वयाचा गैरसमज: ‘आपलं वय कमी आहे म्हणजे हृदयविकार होणारच नाही’, असा विचार करणं चुकीचं ठरू शकतं.
नियमित तपासणी: डॉ. राजीव नारंग यांच्या मते, वयाच्या २५ वर्षांनंतर प्रत्येकाने रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची प्राथमिक तपासणी नक्की करून घ्यावी.
हृदयाने शिकवलेला धडा
आपल्या आयुष्यात अनेकदा अशा काही अनपेक्षित गोष्टी घडतात, ज्यामुळे जगण्याला एक वेगळंच वळण मिळतं. उद्या आपल्यावर कोणती परिस्थिती ओढवेल किंवा पुढचा दिवस पाहायला मिळेल की नाही, याची काहीच खात्री नसते. म्हणूनच या अनुभवाने सायानीला वर्तमानात जगण्याचा एक मोठा धडा शिकवला. ती म्हणते, “जर मला एखाद्या व्यक्तीला सांगायचं असेल की माझं तिच्यावर प्रेम आहे, तर मी आता उद्याची वाट पाहणार नाही; मी ते आज आणि आत्ताच सांगेन.”
तर दुसरीकडे रीमाने या संपूर्ण प्रवासातून एक अत्यंत मोलाचा संदेश दिला आहे: “शरीराने दिलेल्या किंवा छातीत जाणवणाऱ्या कोणत्याही अस्वस्थतेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका; कारण काहीही झालं, तरी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हृदयाची हाक ऐकावीच लागते.”
आज सायानी आणि रीमा दोघीही ठणठणीत बऱ्या आहेत आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण स्वच्छंद आणि मोकळेपणानं जगत आहेत!
