Nikhil Sosale Arrested in Bengaluru Stampede Case : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने (RCB) पंजाब किंग्जचा (PBKS) सहा धावांनी पराभव करून तब्बल १८ वर्षांनंतर विजेतेपद पटकावलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी बंगळुरूमध्ये आरसीबीच्या संघाची विजयी रॅली निघाली. मात्र, यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये जवळपास ११ लोकांना आपला जीव गमवावा लागला, तर या घटनेत ४७ हून अधिक लोक गंभीररित्या जखमी झाले. याप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून निखिल सोसाळे यांच्यासह तिघांना अटक केली आहे. दरम्यान, कोण आहेत निखिल सोसाळे? त्यांना अटक का करण्यात आली? चेंगराचेंगरी प्रकरणात त्यांचा काय संबंध होता? हे जाणून घेऊ…

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी (तारीख ५ जून) या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी शहर पोलीस आयुक्त बी. दयानंद यांच्यासह काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केल्याची माहिती दिली. तसेच या घटनेशी संबंधित असलेल्या चार जणांना अटक केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानाबाहेर चेंगराचेंगरी झाल्यानंतर चप्पल-बुटांचा असा खच पडलेला दिसून आला. (फोटो सौजन्य पीटीआय)
बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी मैदानाबाहेर चेंगराचेंगरी झाल्यानंतर चप्पल व बुटांचा असा खच पडलेला होता. (फोटो सौजन्य पीटीआय)

कोण आहेत निखिल सोसाळे?

  • चेंगराचेंगरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले निखिल सोसाळे हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा मार्केटिंग आणि महसूल विभागाचे प्रमुख आहेत.
  • निखिल सोसाळे यांना क्रीडा आणि पीआर विभागात १५ हून अधिक वर्षांचा अनुभव आहे, असे त्यांच्या लिंक्डइन प्रोफाईलवर नमूद करण्यात आले आहे.
  • सप्टेंबर २०२३ पासून निखिल सोसाळे हे आरसीबीच्या मार्केटिंग आणि महसूल प्रमुखपदी कार्यरत आहेत.
  • बंगळुरू येथे स्थायिक असलेले निखिल हे मागील १३ वर्षांपासून डियाजिओ या कंपनीत काम करतात.
  • निखिल सोसाळे यांनी आरसीबी संघासोबत जवळून काम केल्याची माहिती त्यांच्या प्रोफाईलवर दिलेली आहे.
  • डियाजिओ इंडिया ही युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (USL) ही कंपनी चालवते, जी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची मालक कंपनी आहे.

आयपीएलमधील सर्वाधिक लोकप्रिय संघामध्ये आरसीबीचा समावेश होतो. निखिल सोसाळे हे आरसीबीच्या ब्रँड डिझाईन व धोरणांची जबाबदारी सांभाळत असल्याची माहिती आहे. याआधी ते संघाचा बिझनेझ पार्टनरशिप प्रमुखही राहिलेले आहेत. २००८ ते २०१० दरम्यान निखिल यांनी ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड येथील जेम्स कूक विद्यापीठातून बिझनेस डबल मेजर पदवी प्राप्त केली आहे. दरम्यान, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या आदेशानंतर बंगळुरू पोलिसांनी या चेंगराचेंगरी प्रकरणात आरसीबीचे प्रतिनिधी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे अधिकारी तसेच कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या संबंधित अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

आणखी वाचा : चीनच्या ‘त्या’ धोरणाचा भारताला फटका; सुझुकीने थांबवले स्विफ्ट कारचे उत्पादन, कारण नेमके काय?

निखिलची विराट-अनुष्काशी घनिष्ठ मैत्री

अहवालानुसार, निखिल सोसाळे हे आयपीएल २०२५ मधील आरसीबीच्या प्रत्येक सामन्याला उपस्थित राहत होते. काही वेळा ते विराट कोहलीची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत स्टँडमध्येही दिसले. निखिल यांचे इन्स्टाग्रामवर फक्त ६३७ फॉलोअर्स आहेत आणि त्यांनी हे अकाउंट प्रायव्हेट करून ठेवले आहे. विशेष बाब म्हणजे, विराट आणि त्याची पत्नी अनुष्का हे दोघेही निखिल यांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. निखिल यांच्या पत्नी मालविका नायक या ‘Innoz Technologies Pvt. Ltd’ या कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंट आणि पार्टनरशिप्स विभागाची प्रमुख आहेत.

निखिल सोसाळे यांना अटक कशामुळे झाली?

पोलिसांच्या माहितीनुसार, आरसीबीच्या विजयी परेडचे नियोजन आणि संघाचे प्रमोशन करून गर्दी जमावल्याच्या आरोपाखाली निखिल यांना अटक करण्यात आली. विशेष बाब म्हणजे, या कार्यक्रमाला स्थानिक प्रशासनाने व पोलिसांनी परवानगी नाकारली होती, तरीही निखिल यांनी गर्दी जमवली आणि सोशल मीडियावर मोफत तिकीटवाटपाची माहिती दिली, असा आरोप करण्यात येत आहे. ‘News18’च्या अहवालानुसार, निखिल यांनी सोशल मीडियावर असे सांगितले होते की, बुधवारी दुपारी १ वाजता चिन्नास्वामी मैदानाच्या गेट क्रमांक ९ आणि १० वर क्रिकेटप्रेमींना मोफत तिकिटांचे वितरण केले जाईल. दुपारी तीन वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होईल, असंही आरसीबीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर नमूद करण्यात आले होते. त्यामुळे मैदानाबाहेरील परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आणि चेंगराचेंगरीची घटना घडली.

Nikhil Sosale anushka sharma rcb photo
विराट कोहलीची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत स्टँडमधून सामना बघताना निखिल सोसाळे (फोटो सौजन्य पीटीआय)

बंगळुरूत चेंगराचेंगरीची घटना कशामुळे घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानाबाहेर सुमारे तीन लाख लोक जमले होते, त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही अपुरा होता. निखिलवर असेही आरोप करण्यात आले की, इव्हेंट मॅनेजमेंटच्या टीमने त्याच्या सूचनांनुसार काम केले. मैदानाच्या एकूण २१ प्रवेशद्वारांपैकी फक्त ३ गेट उघडण्यात आली, ज्यामुळे अधिकच गर्दी झाली आणि चेंगराचेंगरीच्या घटनेला खतपाणी मिळाले. या घटनेप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या इव्हेंट मॅनेजमेंट टीमला मुख्य आरोपी करण्यात आले आहे. तर डीएनए एंटरटेनमेंटला दुसरा आरोपी म्हणून नमदू करण्यात आलं आहे. याशिवाय कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (KSCA) यांचा उल्लेख तिसरा आरोपी म्हणून करण्यात आला आहे.

हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प व एलॉन मस्क यांच्यातील संघर्षाचा जगावर काय होणार परिणाम?

आरसीबीने सर्व नियम बसविले ढाब्यावर?

‘India Today’ च्या अहवालानुसार, या एफआयआरमध्ये आयोजकांवर असा आरोप आहे की, त्यांनी मैदानाच्या आत आणि बाहेर योग्य बॅरिकेड्स व गर्दी नियंत्रणाच्या कोणत्याही उपाययोजना केलेल्या नव्हत्या, त्यामुळे अनेक प्रवेशद्वारांवर एकाच वेळी लोकांचा लोंढा आला आणि शेवटी चेंगराचेंगरीची घटना घडली. यासंदर्भातील तक्रार कब्बन पार्क पोलीस ठाण्याचे निरीक्षक गिरीश ए. के. यांनी दाखल केली आहे. त्यांनी ५ जून रोजी सकाळी ११:१५ वाजता ही एफआयआर नोंदवली आहे. यासंदर्भात माहिती देताना गिरीष म्हणाले की, आयोजकांनी सार्वजनिक सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले, ज्याचे निष्पापांना गंभीर परिणाम भोगावे लागले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्नाटक सरकारकडून घटनेची गंभीर दखल

एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे की, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना, डीएनए एंटरटेनमेंट आणि आरसीबीच्या मॅनेजमेंटने विजयोत्सवाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यास नकार दिला होता. त्यांनी पोलिसांचा सल्लाही मान्य केला नाही. दरम्यान, कर्नाटक सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, “या घटनेची चौकशी करण्यासाठी निवृत्त उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मायकल डी’कुन्हा यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय आयोग नेमण्यात आला आहे. याशिवाय, या प्रकरणाची दंडाधिकारीस्तरावर चौकशी सुरू करण्यात आली आहे आणि गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) तपास सोपवण्यात आला आहे.” दुसरीकडे आरसीबीच्या संघाकडून चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या ११ जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.