राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांतील पदवी प्रवेशांसाठी महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (एमएचटी-सीईटी) ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते. यंदा या परीक्षेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ५ मे रोजी अखेरच्या सत्राची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे.
सीईटी महत्त्वाची का?
अभियांत्रिकी प्रवेशांसाठी महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. यावर्षी एमएचटी सीईटीसाठी जवळपास सात लाख ६४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी पीसीएम गटाचे सुमारे पावणेपाच लाख विद्यार्थी आहेत. देशातील प्रमुख इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षांमध्ये एमएचटी-सीईटीचा (पीसीएम) समावेश होतो. देशभरातील आयआयटी, एनआयटी आणि ट्रिपल आयटीतील प्रवेशाचे स्वप्न भंगते असे लाखो विद्यार्थी मुंबई, पुण्यातील नामवंत अभियांत्रिकी प्रवेशांसाठी महाराष्ट्रातील सीईटी परीक्षेवर अवलंबून असतात.
पुनर्परीक्षेचे कारण काय?
एमएचटी सीईटीच्या पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) गटाची परीक्षा १९ ते २७ एप्रिल (२४ एप्रिल वगळून) या कालावधीत घेण्यात आली. अखेरच्या दिवशी २७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेतील गणिताच्या प्रश्नपत्रिकेत २० ते २५ प्रश्नांचे पर्याय चुकीचे असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. या संदर्भात विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाकडे ई-मेलद्वारे तसेच प्रत्यक्ष जाऊन तक्रार केली होती. याची दखल घेत सीईटी कक्षाने प्रश्नपत्रिका तयार केलेल्या तज्ज्ञांकडून पुन्हा तपासणी केली. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या आरोपामध्ये तथ्य असल्याचे आढळून आले.
सीईटी कक्षाचे म्हणणे काय?
हे चुकीचे प्रश्न इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिकेत होते. मराठीतून इंग्रजीमध्ये प्रश्नांच्या भाषांतरातील त्रुटींमुळे ही समस्या उद्भवली. भाषांतरातील त्रुटींव्यतिरिक्त, उत्तरांचे पर्याय गोंधळून टाकणारे होते, ज्यामुळे या प्रश्नांसाठी दिलेल्या चार पर्यायांमध्ये एकही बरोबर उत्तर मिळाले नाही. याची दखल घेत, या सत्राच्या उमेदवारांची पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रश्नांचे इंग्रजीत भाषांतर करताना पेपर सेट करणाऱ्या तज्ज्ञांकडून चूक झाल्याने प्रश्नपत्रिकेत २१ प्रश्नांचे पर्याय चुकले. मात्र मराठी आणि उर्दू प्रश्नपत्रिकेत कोणतीही चूक झाली नाही, असे सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले.
प्रतिप्रश्न १ हजार रुपयांचा भुर्दंड का?
गणिताच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेले प्रश्न चुकीचे असल्याचे बहुतेक इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. अनेक विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांवर या विषयाला वाचा फोडली. मात्र विद्यार्थ्यांना नियमानुसार प्रत्येक प्रश्नाला आव्हान द्यावे लागेल, अशी भूमिका सीईटी कक्षाने सुरुवातीला घेतली होती. नियमानुसार, म्हणजे संपूर्ण परीक्षा संपल्यानंतर सीईटी कक्षाकडून उत्तरतालिका जाहीर करण्यात येते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या उत्तरांना आव्हान देण्यासाठी ठरावीक दिवसांचा अवधी असतो. मात्र विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रतिप्रश्न एक हजार रुपये इतके शुल्क भरावे लागते. पण इतक्या मोठ्या संख्येने प्रश्न चुकीचे असताना प्रतिप्रश्न एक हजार रुपये आकारणे अन्याय्य असल्याचे सांगत विद्यार्थी-पालकांनी त्यास विरोध केला आणि कक्षाला ई-मेल पाठवले. अखेर मोठ्या प्रमाणावर आलेल्या या ईमेल्सची कक्षाला दखल घ्यावी लागली.
किती विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा?
२७ एप्रिल रोजी अखेरच्या सत्रासाठी राज्यभरातून ३१ हजार २० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात २७ हजार ८३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या २७,८३७ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ५ मे रोजी होणार आहे. यापैकी २४७४४ विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून, २,८७५ विद्यार्थ्यांनी मराठीतून आणि २१८ विद्यार्थ्यांनी उर्दू भाषेतून परीक्षा देण्याचा पर्याय निवडला होता. परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचीच पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. गैरहजर विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळणार नाही.
परीक्षेच्या आयोजनाविषयी कोणते भान हवे?
आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांसाठी होणारी जेईई-मेन परीक्षा, वैद्यकीय प्रवेशांसाठी होणारी नीट परीक्षा आणि याच धर्तीवर राज्याराज्यांच्या होणाऱ्या प्रवेश परीक्षांचे आयोजन खरे तर अत्यंत शिस्तबद्ध होते. यातील प्रश्नांची काठिण्य पातळीही खूप अधिक असते. कारण त्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षा असतात. बहुतांश विद्यार्थी दहावीनंतर दोन वर्ष या परीक्षेची झटून तयारी करत असतात. जेईईसाठी विद्यार्थ्यांना दोन संधी मिळतात. मात्र सीईटीसाठी दोन वर्षांच्या परिश्रमांची परीक्षा केवळ तीन तासांतील कामगिरीवर होणार असते. याचे भान एरव्ही आयोजकांना असते. मात्र गेल्या काही वर्षांत ते सुटत चालले आहे का अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे.
गोंधळ आणि अव्यवस्था
नीट परीक्षेतील गोंधळ गेल्या वर्षी देशाने पाहिला. त्यानंतर आता सीईटीसारख्या परीक्षेत ५० पैकी २१ प्रश्न भाषांतराचे कारण देऊन चुकवणे हे गंभीर आहे. सीईटी परीक्षेच्या केंद्रांच्या दुरवस्थेचेही अनेक प्रकार यावर्षी विद्यार्थ्यांना त्रासाचे ठरले. परीक्षेचा ताण एकीकडे असतानाच समोरचा संगणक हँग तर होणार नाही ना याचा वेगळा ताण विद्यार्थी आणि केंद्राबाहेर बसलेल्या पालकांना सतावत होता. अनेक केंद्रे लहानच्या कोचिंग क्लाससारख्या जागांमध्ये होती. या परीक्षांचे निकाल पर्सेंटाइल पद्धतीने लागतात. त्या ठरावीक सत्रातील संपूर्ण बॅचच्या कामगिरीवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होत असते. शिवाय विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी परीक्षेची एकमेव संधी मिळते. त्यामुळे तरी किमान प्रत्येक विद्यार्थ्याला या संगणकाधारित परीक्षेची चांगली सोय उपलब्ध करून देणे आणि अधिक काटेकोर पद्धतीने परीक्षेचे आयोजन करणे ही जबाबदारी सीईटी कक्षाने नेटाने पार पाडायला हवी.