Learn about modern Real Estate Investment strategies including Mutual Funds and Crowdfunding: स्थावर मालमत्तेमधील गुंतवणूक हा वर्षानुवर्षे चालत आलेला विश्वसनीय मार्ग आहे. मात्र, आताच्या डिजिटल युगात थेट जमीन किंवा दुकान खरेदी करण्याऐवजी म्युच्युअल फंड (Mutual Funds) आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) यांसारख्या आधुनिक पर्यायांकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढत आहे. आज कुटुंबांची राहण्याची बदलेली पद्धत, लोकांच्या बदलत्या गरजा आणि झपाट्याने विकसित होत असलेलं डिजिटल तंत्रज्ञान, यामुळे स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याच्या पारंपारिक पद्धतीं बरोबरच त्या गुंतवणुकीसाठी अनेक नवे आणि आधुनिक पर्याय उपलब्ध झाले आहेत.

म्युच्युअल फंड आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड ( ETF)

आजच्या काळात थेट घर, दुकान किंवा जमीन खरेदी करण्याऐवजी म्युच्युअल फंड आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) यांच्या माध्यमातून स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करता येते. स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा हा एक सोपा, सहज आणि सुरक्षित पर्याय मानला जातो. या मुळे कमी भांडवलात आणि मोजक्या कागदपत्रांच्या आधारे गुंतवणूक करता येते. तसेच आपल्या गुंतवणुकीला व्यावसायिक व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळत राहते.

म्युच्युअल फंडद्वारे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक

काही म्युच्युअल फंड थेट किंवा अप्रत्यक्षपणे, रिअल इस्टेट कंपन्या, डेव्हलपर्स, प्रॉपर्टी मॅनेजमेंट कंपन्या आणि REITs मध्ये गुंतवणूक करतात. हे म्युच्युअल फंड त्यांच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन कुशल व व्यावसायिक पद्धतीने करतात. रिअल इस्टेट म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना बाजारात उपलब्ध असलेल्या म्युच्युअल फंडांमधून आपल्या सोयीची गुंतवणूक पद्धती आणि आपल्याला अपेक्षित परतावा देणारा म्युच्युअल फंड निवडावा. या म्युच्युअल फंडांमध्ये सिस्टिमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन (SIP) हा नियमित कालावधीने, म्हणजे मासिक , तिमाही ,सहामाही या कालावधीने गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. तसेच संपूर्ण गुंतवणूक एकाच वेळी, एकरकमी सुद्धा करता येते. आपल्याला दीर्घकाळासाठी सोयीचा ठरेल तो पर्याय निवडावा.

real-estate-investment-marathi-mutual-funds-etf-guide
स्थावर मालमत्ता गुंतवणुकीचे आधुनिक आणि सुरक्षित पर्याय (Photo- ChatGpt)

ETF द्वारे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक

एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ETF) हे शेअर बाजारात शेअर्सप्रमाणे खरेदी -विक्री व्यवहार करणारे गुंतवणूक फंड असतात. अनेक गुंतवणूकदारांकडून जमा झालेली रक्कम एकत्र करून शेअर्स, बाँड्स, किंवा कमोडिटीजमध्ये ते गुंतवणूक करतात. रिअल इस्टेटशी संबंधित ETF हे प्रामुख्याने REITs किंवा रिअल्टी निर्देशांकांचा अभ्यास आणि विश्लेषण करून त्यामध्ये निधी गुंतवतात .

ETF मध्ये गुंतवणूक कारणांसाठी आपले डिमॅट अकाउंट असणे आवश्यक असते .

रिअल इस्टेट फंड/ ETF मध्ये गुंतवणुकीचे फायदे

  • अ. थेट मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलापेक्षा कितीतरी कमी भांडवलात गुंतवणूक करता येते.
  • ब. पैशाची गरज पडल्यास आपल्या गुंतवणुकीची विक्री करून सहजतेने आणि वेळेवर पैसे उभे करता येतात.
  • क. आपली गुंतवणूक अनुभवी आणि तज्ज्ञ व्यवस्थापकांकडून हाताळली जाते.
  • ड. व्यवस्थापक आपला निधी विविध प्रकल्पात गुंतवतात त्यामुळे आपले पैसे सुरक्षित राहण्याची आणि आपल्याला अधिक परतावा मिळण्याची शक्यता वाढते.
  • इ. गुंतवणुकीतून नियमित उत्पन्न मिळू शकते.
  • फ. मालमत्तेची देखभाल, दुरुस्ती , मालमत्ता कर यांचा खर्च वाचतो. मालमत्तेची कागदपत्र बनवणे आणि सांभाळणे हे काहीसे जिकिरीचे काम टळते .

म्युच्युअल फंड व ETF मधील गुंतवणुकीमधील जोखीम

  • अ. गुंतवणुकी वरील परतावा हा पूर्णतः शेअर बाजारातील चढ-उतारांवर अवलंबून असतो.
  • ब. व्याजदर वाढल्यास रिअल इस्टेट कंपन्याच्या नफ्यात घट होऊन त्यामुळे आपल्याला मिळणारा परतावा कमी होऊ शकतो .
  • क. रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी आल्यास गुंतवणुकीमध्ये तोटा होण्याची शक्यता असते.
  • ड. सरकारी नियम, धोरणे किंवा करप्रणाली या मध्ये नकारात्मक बदल झाल्यास परतावा कमी होऊ शकतो .
  • इ. परताव्याची हमी नसते . तो बाजारातील चढ उतार आणि इतर बाह्य घटकांवर अवलंबून असतो .

या सर्वांमुळे, म्युच्युअल फंड आणि ETF ही स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याची आधुनिक, पारदर्शक आणि लवचिक साधने आहेत. थेट मालमत्ता खरेदीची मोठी गुंतवणूक व त्रास टाळून, दीर्घकालीन संपत्ती निर्मिती वा नियमित उत्पन्नासाठी हे पर्याय उपयुक्त ठरू शकतात. मात्र या मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःची जोखीम क्षमता, गुंतवणूक कालावधी आणि आर्थिक उद्दिष्टे यांचा योग्य पडताळा घेणे आवश्यक आहे.

स्थावर मालमत्ता समूह निधी किंवा क्राउड फंडिंग

जेव्हा एखाद्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला निधी अनेक लोकांकडून पैसे घेऊन उभा केला जातो तेव्हा त्या निधीला समूहनिधी किंवा क्राउड फंडिंग म्हणतात . हा निधी बहुतेक वेळेस इंटरनेटच्या माध्यमातून उभारला जातो. भारतामध्ये आता रिअल इस्टेट उद्योगामध्ये क्राऊडफंडिंग लोकप्रिय होऊ लागले आहे. क्राऊडफंडींगमुळे, सामान्य गुंतवणूकदाराला सुद्धा, रिअल इस्टेटमधील मोठ्या आणि महत्वाच्या प्रकल्पांमध्येआपली स्वतःची लहान – मोठी गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध होते.

फायदे

  • अ . मालमत्तेच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये पूर्वी फक्त मोठे गुंतवणूकदार गुंतवणूक करु शकत . क्राउडफंडिंगमुळे आता माध्यम किंवा लहान गुंतवणूकदाराला सुद्धा अशा प्रकल्पात गुंतवणूक करता येते
  • ब . मालमत्तेच्या, पायभूत सुविधांसारख्या महाकाय प्रकल्पांपासून औद्योगिक संकुल आणि निवासी इमारतीं सारख्या विविध प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करून आपल्या गुंतवणुकीमध्ये वैविध्य आणण्याची संधी उपलब्ध होते.
  • क. गुंतवणुक डिजिटल पद्धतीने होत असल्याने ती सहजतेने करता येते.
  • ड. योग्य प्रकल्प निवडल्यास अल्प गुंतववणुकीतून सुद्धा मोठा परतावा मिळतो .

जोखीम

  • अ . प्रकल्पातून मिळणारा फायदा हा पूर्णपणे त्या प्रकल्पाचं व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीच्या क्षमता आणि कौशल्यावर अवलंबून असतो . कंपनीच्या एखाद्या चुकीमुळे प्रकल्प तोट्यात जाऊ शकतो . त्याचे परिणाम सर्वच लहान -मोठ्या गुंतवणूकदारांना भोगावे लागतात .
  • ब . प्रकल्प रखडल्यास किंवा पूर्ण न झाल्यास परताव्याचे प्रमाण कमी होते किंवा मोठे नुकसानसुद्धा होऊ शकते .
  • क. भारतांमध्ये क्राउड फंडींगच्या नियमांची चौकट अजून निश्चित झालेली नाही. त्याचा फटका गुंवणूकदारांना बसूशकतो
  • ड . आपला हिस्सा विकायचा असेल तर त्याला ग्राहक मिळण्यासाठी वेळ लागतो . त्यामुळे पैशाची गरज असल्यास या गुंतवणुकीमधून वेळेवर पैसे उभे करणे अवघड असते.
  • इ . प्रकल्पाचं व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता असतेच असं नाही . त्यामुळे गुंतवणूक काही प्रमाणात धोक्यामध्ये येऊ शकते.

सारांश सांगायचा तर , भारतात स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक केल्यास नियमित उत्पन्न, मालमत्तेची किंमत वाढ आणि करांमध्ये फायदे यासारखे महत्त्वाचे लाभ मिळू शकतात. तथापि, संभाव्य गुंतवणूकदारांनी बाजारातील चढ-उतार, प्रारंभीची मोठ्या भांडवलाची आवश्यकता आणि व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या सारख्या जोखमींचा देखील विचार करणे आवश्यकआहे. योग्य अभ्यास करून, विचारपूर्वक गुंतवणूक धोरण अंगीकारल्यास या जोखमी कमी करता येऊ शकतात.

शहाणपणाने खरेदी केलेली आणि योग्य प्रकारे सांभाळलेली स्थावर मालमत्ता ही, जगभरात, सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते !