Microsoft Layoffs AI Impact Indian IT Sector : जगभरातील आघाडीच्या कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करत असतानाच मायक्रोसॉफ्टने आपल्या ४,८०० कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एआय जर कंपन्यांचा नफा वाढवत असेल, तर हजारो कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमावण्याची वेळ नेमकी कशामुळे येत आहे? असा प्रश्न पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला. त्यामागील ठोस कारणांचा घेतलेला हा सविस्तर आढावा…
मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना कामावरून का काढले?
कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून काढून टाकण्याचे कारण हे एआय नसल्याचे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या संख्येत करण्यात आलेली कपात ही एका संघटनात्मक पुनर्रचनेचा भाग असल्याचे मायक्रोसॉफ्टच्या निवेदनात नमूद आहे. या निर्णयाचा परिणाम कंपनीच्या एक्सबॉक्स आणि गेमिंग स्टुडिओ विभागावर होणार आहे. आकडेवारीनुसार, या दोन्ही विभागात गुंतवणूक केलेल्या प्रत्येकी १ डॉलरमागे कंपनीला सरासरी ६४ सेंट्सचे नुकसान सहन करावे लागत होते. यावर्षीच्या सुरुवातीलाच मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समध्येही लक्षणीय घसरण झाली होती. पहिल्या सहा महिन्यांत, कंपनीचे शेअर्स जवळपास २३ टक्क्यांनी घसरला होता. यापूर्वी कंपनीने अमेरिकेतील आपल्या सुमारे ९,००० कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव दिला होता. यादरम्यान कंपनीच्या नोकरकपातीचा विभागांवर परिणाम होणार असून हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे. सद्यस्थितीला १,६०० कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल आणि २०२७ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस पुन्हा १६०० कर्मचारी कमी केले जातील, असे कंपनीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. एकीकडे नोकरकपात केली जात असतानाच दुसरीकडे मायक्रोसॉफ्टने आपल्या ‘कोपायलट’ आणि ‘ओपनएआय’ सोबतच्या भागीदारीला बळ देण्यासाठी कोट्यवधींची गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत कंपनीचा भांडवली खर्च सुमारे १९० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या गुंतवणुकीचा मोठा हिस्सा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सेंटर्ससाठी खर्च केला जाणार आहे.
एआय आणि नोकरकपातीबाबत तज्ज्ञांचे मत काय?
एआय अँड बियॉन्डचे सह संस्थापक जसप्रीत बिंद्रा यांच्या मते, जगभरातील अनेक कंपन्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास सुरुवात केली असली तरी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या संख्येत फारशी कपात केल्याचे दिसून येत नाही. आधीच एआय विकसित करण्यासाठी अत्याधुनिक चिप्स, संगणकीय क्षमता, डेटा आणि संशोधनावर कंपन्यांना प्रचंड खर्च करावा लागत आहे. त्यामुळे विक्री, प्रशासन आणि पारंपरिक सॉफ्टवेअर विभागांतील खर्च कमी करण्याची काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यास त्याला एआयमुळे करण्यात आलेली कपात म्हणता येणार नाही. सध्या आघाडीच्या कंपन्यांनी कर्मचारी कपातीला केलेली सुरुवात एका मोठ्या विरोधाभासाचा भाग असल्याचेही बिंद्रा यांनी स्पष्ट केले आहे. मायक्रोसॉफ्टसह मेटा, अॅमेझॉन आणि गुगल यांसारख्या कंपन्या एआय चिप्स, विशेष प्रोसेसर, क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर आणि विशाल डेटा सेंटर्स उभारण्यासाठी विक्रमी गुंतवणूक करत आहेत. येत्या दशकातील संगणकीय तंत्रज्ञानाचा पाया हीच गुंतवणूक ठरेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
AI खरोखरच नोकऱ्या हिरावून घेत आहे का?
तज्ज्ञांच्या मते, या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ असे दोन्ही आहे. बहुतेक कंपन्या कर्मचाऱ्यांची जागा थेट एआय घेत असल्याचे जाहीरपणे मान्य करणे टाळतात. त्याऐवजी ते कर्मचारी कपातीमागे वेगवेगळी कारणे देतात. प्रत्यक्षात मात्र या कंपन्यांकडून एआयच्या मदतीने दररोजची कामे अधिक वेगाने केली जात आहे. उदाहरणार्थ ग्राहक सेवा विभागात सामान्य प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एआय चॅटबॉट्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. एआय-आधारित कोडिंग सहाय्यकांचा वापर करून कोड तयार करणे, त्रुटी शोधणे आणि दस्तऐवजीकरण करणे ही कामे जलदगतीने केली जात आहे. त्याशिवाय मार्केटिंग विभागात कंटेंट तयार करण्याचे काम स्वयंचलित होत आहे, तर मानव संसाधन विभागात उमेदवारांची निवड आणि अंतर्गत पत्रव्यवहार करण्यासाठी एआय साधनांचा वापर वाढत आहे. त्यामुळे पूर्वी या कामांसाठी जितक्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती, त्यापेक्षा कमी कर्मचाऱ्यांवरच तेवढेच काम पूर्ण करणे कंपन्यांना शक्य झाले आहे. जसप्रीत बिंद्रा यांच्या मते, कंपन्यांमध्ये होणाऱ्या कर्मचारी भरतीचे निकषही एआयमुळे बदलत आहे. सर्वच विभागांमध्ये कर्मचारी संख्या वाढविण्याऐवजी कौशल्य असलेल्या काही मोजक्याच कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रात कर्मचारी कपातीची मोठी लाट
मायक्रोसॉफ्टमधील कर्मचाऱ्यांची कपात ही केवळ एका कंपनीपुरती मर्यादित नसून संपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्रात सुरू असलेल्या व्यापक प्रवाहाचा भाग आहे. याआधी मेटाने एआय मॉडेल्स आणि संगणकीय सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करत असल्याचे कारण देत अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. यावर्षी कंपनीने सुमारे ८,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. अॅमेझॉननेही आपल्या किरकोळ विक्री आणि व्यवसायातील अनेक प्रक्रियांसाठी एआयचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. गुगल आपल्या Gemini AI आणि एआय-आधारित सर्च सेवांमध्ये मोठी गुंतवणूक करत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व कंपन्यांमध्ये एक समान प्रवृत्ती स्पष्टपणे दिसून येते. ती म्हणजे एआय पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक विक्रमी पातळीवर वाढत असताना नवीन कर्मचाऱ्यांची भरती अधिक सावधपणे केली जात आहे.
भारतीय आयटी क्षेत्रावर काय परिणाम होणार?
भारतातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र जागतिक तंत्रज्ञान क्षेत्राशी घट्ट जोडलेले आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, आयटी सेवा, एंटरप्राइझ सपोर्ट आणि क्लाऊड इंजिनिअरिंग या क्षेत्रांमध्ये भारताची महत्त्वाची भूमिका आहे. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएलटेक आणि टेक महिंद्रा यांसारख्या आघाडीच्या कंपन्या सध्या एआय केंद्रित पुनर्रचना करणाऱ्या जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांसोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे जागतिक कंपन्या रोजची पारंपारिक कामे स्वयंचलित करत असल्यामुळे बाजारातील मागणी बदलू लागली आहे. पारंपारिक सॉफ्टवेअर टेस्टिंग, मॅन्युअल कोडिंग, टेक्निकल सपोर्ट आणि बॅक-ऑफिस प्रोसेसिंग या कामांची जागा आता ‘एआय-सक्षम सेवा’ घेत आहेत. भविष्यातील नोकरभरती ही केवळ एकाच पद्धतीची पारंपारिक कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांऐवजी एआय केंद्रित क्षेत्रांवर असेल, असे संकेत भारतातील अनेक आयटी कंपन्यांनी आधीच संकेत दिले आहेत. अलीकडील संशोधनानुसार, एआयमुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण होण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्याऐवजी नोकऱ्यांच्या स्वरूपातच मोठे बदल होतील. म्हणजेच, कर्मचाऱ्यांना एआयशी स्पर्धा करण्याऐवजी त्यासोबत जुळून घेऊन काम करावे लागेल.
