What Caused The Nepal Flood Wave : “जणू काही मोठा भूकंपच झाला असावा, तशी पाण्याची एक प्रचंड भिंतच अचानक कोसळली. त्यासोबत वाहून आलेल्या चिखल आणि दगडांनी क्षणार्धात आसपासच्या परिसराला गिळंकृत केले. लहान मुलांसह अनेक महिला आणि पुरुष आमच्या डोळ्यासमोर पुरात वाहून गेले,” अशा शब्दांत नेपाळी कामगार विवेक कुमाल यांनी आपल्या देशातील भीषण दुर्घटनेचे वर्णन केले. बुधवारी सकाळी तिबेटमधून अचानक आलेल्या पुरामुळे मध्य नेपाळमध्ये प्रचंड हाहाकार उडाला. या दुर्घटनेत आतापर्यंत शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला असून कित्येक जण बेपत्ता असल्याचे समजते. त्यामध्ये काही भारतीयांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. या महाप्रलयामुळे जगभरात मोठी घबराट पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. यादरम्यान नेपाळमध्ये एवढा महाकाय पूर नेमका आला तरी कसा? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे, त्याविषयी…

पुराच्या तडाख्यात लोक कसे वाहून गेले?

नेपाळमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे ८.३० वाजता देशातील ल्हेंडे खोला आणि भोते कोशी नदीच्या परिसरात अचानक भीषण पूर आला. या पुराच्या पाण्यात अनेक भागातील रस्ते, घरे आणि पादचारी पूल वाहून गेले. या पुरामुळे तिबेट आणि नेपाळदरम्यान असलेल्या ग्यिरॉन्ग बंदर परिसरात मोठ्या प्रमाणात चिखलाचा ढिगारा आला. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा आणि दळणवळणाची साधनेही ठप्प झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत १६० जणांचा मृत्यू झाला असून ३४१ परदेशी नागरिकांसह ७५० हून अधिक जण बेपत्ता असल्याचे समजते. या भीषण घटनेची आठवण सांगताना नेपाळमधील ६८ वर्षीय केशव प्रसाद बराल म्हणाले की, चिखलाचा प्रचंड लोट थेट आमच्या दिशेने येत होता. तो जसजसा जवळ येत गेला, तसतसा त्याची उंची वाढत होती. जेव्हा चिखल आमच्या घरात शिरताना दिसला, तेव्हा पत्नीचा हात पकडून मी तिला गच्चीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला; पण दुर्दैवाने ती माझ्या डोळ्यासमोरच चिखलाच्या प्रवाहात वाहून गेली. या पुराच्या पाण्यात अनेक भागातील बहुमजली इमारतींचे खालचे मजले चिखल आणि गाळाखाली गाडले गेले. त्यामुळे बचाव पथकांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात असून, नागरिकांचा शोध घेतला जात आहे.

नेपाळमध्ये महाभयंकर पूर कशामुळे आला?

सुरुवातीला, नेपाळमध्ये ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्यामुळे हा महापूर आल्याचे वृत्त समोर आले होते. नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही तिबेट-नेपाळ सीमेवर भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगत या आपत्तीसाठी भूकंपाची शक्यता वर्तवली होती. मात्र, अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण विभागाने (USGS) भूकंपाचा हा दावा फेटाळून लावला आहे. सुरुवातीला नोंदवली गेलेली भूगर्भीय हालचाल हा भूकंप नसून हिमकड्याचा काही भाग कोसळल्यामुळे झालेले कंपन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तर उपग्रह छायाचित्रांच्या तपासणीनुसार भोटेकोसी नदीत हिमकडा आणि खडकांची प्रचंड दरड कोसळल्याने हा महापूर आला, असे नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाचे भूगर्भशास्त्रज्ञ प्रकाश पोखरेल यांनी सांगितले. कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलगरीचे भूगर्भशास्त्रज्ञ डॅनियल शुगर यांनीही असाच अंदाज वर्तवला. त्यांच्या मते, परिसरातील हिमपर्वताचा मोठा तुकडा थेट भोटेकोसी नदीत कोसळला आणि एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. त्यानंतर पाण्याच्या प्रवाहामुळे हा कठडा एकदाच फुटल्यामुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाली.

महाप्रलयावर तज्ज्ञांचे धक्कादायक खुलासे

स्कॉटलंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ डंडीचे तज्ज्ञ सायमन कुक यांनीही नेपाळमधील घटना हिमस्खलनाचीच असल्याचे सांगितले. ‘न्यूयॉर्क टाइम्स’शी बोलताना ते म्हणाले की, पर्वताच्या उंच भागात मोठ्या प्रमाणात बर्फ साठलेला असतो आणि त्यामध्ये प्रचंड संभाव्य ऊर्जा असते. एखाद्या वेळी बर्फाचा हा मोठा भाग तुटून खाली कोसळल्यास तो धोकादायक आणि वेगाने वाहणाऱ्या पाण्यात रुपांतरीत होते. उपग्रहांच्या छायाचित्रानुसार नेपाळमध्ये याच कारणामुळे भोटेकोसी नदीला महापूर आल्याचे स्पष्ट होते. दुसरीकडे काही तज्ज्ञांनी हिमपर्वत कोसळण्यामागे हवामान बदलाचे कारण सांगितले आहे. मात्र, या विशिष्ट घटनेत त्याचा नेमका किती वाटा आहे हे सांगणे घाईचे ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. नेपाळच्या ‘नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट ऑथॉरिटी’ने माहितीनुसार, लेंडे खोला नदीला पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याचा प्रवाह भोटे कोशी नदीतून त्रिशुली नदीमध्ये शिरला. बेपत्ता लोकांमध्ये नेपाळ लष्कराच्या ४४ जवानांसह ८० सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे, अशी माहिती नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांनी तेथील संसदेत दिली.

नेपाळमध्ये आणखी मोठ्या नुकसानीचा धोका?

नेपाळवरील संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही. हिमालयीन भागात आणखी एका मोठ्या आपत्तीची शक्यता असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. नेपाळ-चीन सीमेच्या जवळ भोटेकोसी नदीच्या वरच्या प्रवाहात मलब्याचा अडथळा अद्याप कायम असल्याचे सांगितले जात आहे. हा अडथळा फुटल्यास पुराच्या पाण्याची दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच नेपाळला लागून असलेल्या भारतातील बिहार आणि उत्तर प्रदेशमध्येही पुराचा इशारा देण्यात आला आहे. हिमालयातून वाहणाऱ्या अनेक नद्या या दोन्ही राज्यांच्या मैदानी भागात येत असल्याने तेथील नागरिकांनाही सतर्कचे आवाहन करण्यात आले आहे. नेपाळ सरकारने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ९५ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अजूनही जवळपास ५०० जण बेपत्ता आहेत. तर, चीनमधील सरकारी वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, तिबेटमध्ये तीन मृतदेह सापडले असून २६५ लोक बेपत्ता आहेत. दुसरीकडे, निरनिराळ्या ठिकाणी पुरात अडकलेल्या सुमारे १०० लोकांची सुटका करण्यात आली, असे अधिकार्‍यांनी सांगितले. त्यापैकी ३० जणांवर काठमांडूच्या त्रिभुवन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जागतिक पातळीवरून नेपाळला मदतीचा हात

संकटाच्या या काळात जगभरातील अनेक देश नेपाळच्या मदतीला पुढे सरसावले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बचावकार्य सर्वतोपरी प्रयत्नांनी राबवण्याचे आवाहन केले. तसेच भविष्यातील संभाव्य परिणाम टाळण्यासाठी अधिक प्रभावी निरीक्षण आणि पूर्वसूचना यंत्रणा उभारण्याचे आश्वासन दिले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेतील मृतांबद्दल शोक व्यक्त केला. तसेच नेपाळचे पंतप्रधान यांना भारताकडून सर्वतोपरी मदत करण्याची तयारी असल्याचे सांगितले. भारतीय हवाई दलाच्या (IAF) सी-१३० जे (C-130J) विमानाद्वारे तातडीची मानवीय मदत आणि अत्यावश्यक औषधांची पहिली खेप नेपाळला रवाना झाली आहे. अमेरिकेनेही नेपाळला पाच लाख डॉलर (सुमारे ४.७७ कोटी रुपये) आपत्कालीन मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. बचावकार्याला मदत करण्यासाठी अमेरिका या भागात आपत्ती व्यवस्थापनाची एक तुकडी पाठवण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.