Reasons For Low Sperm Count in Men : २०१२ मध्ये विकी डोनर नावाचा एक हिंदी चित्रपट आला होता. त्यात विकी नावाचे पात्र स्पर्म डोनरच्या भूमिकेत दाखवण्यात आले होते. विकीच्या स्पर्ममुळे अनेक निपुत्रिक जोडप्यांना मुले होतात आणि त्यासाठी चित्रपटातील डॉक्टर त्याला प्रभावशाली सल्ले देत असतात. स्पर्म काऊंट म्हणजेच शुक्राणूंची संख्या हा पुरुषांच्या आरोग्याचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. वंश वाढवायचा असल्यास स्त्रियांच्या आरोग्याबरोबर पुरुषांचे आरोग्यही तितकेच महत्वाचे असते. मात्र, काही दशकांपासून जगभरातल्या पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होत असल्याचे विविध अहवालांतून समोर आले आहे. परिणामी अनेक जोडप्यांना गर्भधारणेसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती नेमकी कशामुळे उद्भवत आहे? त्यामागे नेमक्या कोणत्या सवयी ठरताहेत कारणीभूत? त्याविषयीचा हा आढावा…

पुरुषांची प्रजनन क्षमता का घटतेय?

गेल्या काही दशकांत जगभरातील पुरुषांमधील शुक्राणूंच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे विविध अहवालांतून समोर आले आहे. त्यासाठी कोणतीही ठरावीक बाब कारणीभूत नसून, अनेक घटक जबाबदार असल्याचे सांगितले जाते. जीवशैलीतील बदल, वाढते प्रदूषण, मानसिक तणाव, अयोग्य आहार, लठ्ठपणा, तसेच शरीराला हानिकारक रसायनांचा वाढता संपर्क या कारणांचा त्यामध्ये समावेश होतो. या विषयावर संशोधन सुरू असले तरी आधुनिक जीवनशैलीचा पुरुषांच्या प्रजनन आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येते. तज्ज्ञांच्या मते, वंध्यत्वाच्या एकूण प्रकरणांपैकी जवळजवळ निम्म्या केसेसमध्ये पुरुष त्यासाठी कारणीभूत असतात. वीर्याची निकृष्ट गुणवत्ता हे पुरुषांमधील वंध्यत्वाचे सर्वांत मोठे आणि सामान्य कारण मानले जाते. त्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी किंवा त्यांचा आकार असामान्य असणे यांचा समावेश होतो. यशस्वी गर्भधारणेसाठी शुक्राणूंमध्ये तीन महत्त्वाचे गुण आवश्यक मानले जातात. वीर्यामध्ये निरोगी शुक्राणूंची संख्या पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक असते. शुक्राणूंची संख्या जितकी जास्त, तितकी त्यापैकी एखादा शुक्राणू अंड्यापर्यंत पोहोचून, त्याचे फलन होण्याची शक्यता अधिक असते. शुक्राणूंना स्त्रीच्या प्रजननमार्गातून अंड्यापर्यंत पोहोचावे लागते. त्यामुळे त्यांची हालचाल प्रभावी असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. निरोगी शुक्राणूचा आकार अंडाकृती आणि शेपटी लांब असते. ही रचना त्याला योग्य प्रकारे हालचाल करण्यास आणि अंड्याचे फलन करण्यास मदत करते.

मद्यपान-धूम्रपानाचे शुक्राणूंवर गंभीर परिणाम

धूम्रपान हे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करणाऱ्या प्रमुख कारणांपैकी एक मानले जाते. सिगारेटच्या धुरामध्ये हजारो हानिकारक रसायने असतात आणि ही रसायने शरीरातील निरोगी पेशींना हानी पोहोचवतात. त्याचा थेट परिणाम शुक्राणूंची गुणवत्ता आणि अंड्याचे फलन करण्याची क्षमता यांवर होतो. नियमित धूम्रपान करणाऱ्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होणे, शुक्राणूंची हालचाल कमी होणे, असामान्य आकाराचे शुक्राणू वाढणे, शुक्राणूंमधील डीएनएचे नुकसान होणे यांसारख्या समस्या आढळून येतात. तज्ज्ञांच्या मते, अति मद्यपानाचाही प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम होतो. अधूनमधून मद्यपान केल्याने प्रजनन क्षमतेवर फारसा परिणाम होत नाही. मात्र, दीर्घकाळ किंवा अति प्रमाणात मद्यपान केल्यास पुरुषांमधील हार्मोन्सची शक्ती कमी होऊ शकते. शुक्राणूंची निर्मिती, स्नायूंची वाढ आणि लैंगिक इच्छेसाठी हार्मोन्स महत्त्वाचा मानला जातो. मद्यपानामुळे शुक्राणूंचे उत्पादन घटणे, लैंगिक इच्छा कमी होणे, उत्तेजना टिकवून ठेवण्यात अडचण येणे, वीर्याच्या गुणवत्तेत घट होणे, यांसारख्या समस्या उद्भवतात.

लठ्ठपणामुळे बिघडते हार्मोन्सचे संतुलन

लठ्ठपणा केवळ मधुमेह किंवा हृदयविकाराचा धोका वाढवत नाही, तर तो प्रजनन क्षमतेवरही परिणाम करतो. शरीरातील अतिरिक्त चरबी टेस्टोस्टेरॉनचे इस्ट्रोजेनमध्ये रूपांतर करते. त्यामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊन इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढते आणि शुक्राणूंच्या निर्मितीवर परिणाम होतो. लठ्ठपणामुळे शुक्राणूंची गुणवत्ता कमी होणे, लैंगिक इच्छा कमी होणे, शरीरातील दाह वाढणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. निरोगी शुक्राणू तयार होण्यासाठी शरीराला विविध जीवनसत्त्वांची आवश्यकता असते. प्रक्रिया केलेले अन्न, साखरयुक्त पेये, तसेच तळलेल्या पदार्थांचे अधिक सेवन केल्यास शरीरातील दाह वाढून शुक्राणूंची गुणवत्ता कमी होऊ शकते. त्याउलट फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, सुका मेवा, बिया, मासे आणि कमी चरबीयुक्त प्रथिनांचा समावेश असलेला संतुलित आहार शुक्राणूंच्या निर्मितीसाठी पोषक मानला जातो. काही विशिष्ट जीवनसत्त्वे प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

तणावाचा प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम

आजच्या धावपळीच्या जीवनात कामाचा ताण, आर्थिक चिंता आणि विविध जबाबदाऱ्यांमुळे अनेक पुरुष दीर्घकालीन तणावाचा सामना करीत असल्याचे दिसून येते. सतत तणावाखाली राहिल्यास शरीरात ‘कॉर्टिसोल’ नावाच्या संप्रेरकाचे प्रमाण वाढते आणि त्याचा शुक्राणूंच्या निर्मितीवर परिणाम होऊ शकतो. झोपेच्या काळात शरीर स्वतःची दुरुस्ती करते आणि हार्मोन्सचे संतुलन राखते. दररोज नियमितपणे सहा तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होण्याबरोबरच शुक्राणूंची गुणवत्ता घसरण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या मते, चांगल्या प्रजनन क्षमतेसाठी पुरुष आणि महिलांनी दररोज सात ते नऊ तासांची दर्जेदार झोप घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय नियमित व्यायाम केल्यास शरीरातील हार्मोन्सचे संतुलन टिकवून ठेवण्यास मदत होते. मात्र, व्यायामाचा अभाव आणि अति व्यायाम हे दोन्हीही प्रजनन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. आधुनिक जीवनशैलीमध्ये प्लास्टिक, कीटकनाशके, औद्योगिक प्रदूषके, तसेच काही सौंदर्यप्रसाधनांमध्ये रसायनांचा सर्रास वापर केला जातो. या हानिकारक रसायनांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास पुरुषांच्या प्रजनन आरोग्यावर त्यांचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असे विविध संशोधनांमध्ये समोर आले आहे.

पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारता येते का?

अनेक प्रकरणांमध्ये याचे उत्तर ‘होय’ असे आहे. शुक्राणू पूर्णपणे तयार होण्यासाठी साधारणतः ७० ते ९० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारल्यास काही महिन्यांत शुक्राणूंच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल दिसून येऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, पुरुषांनी धूम्रपान पूर्णपणे सोडावे, मद्यपान मर्यादित ठेवावे, पोषक आणि संतुलित आहार घ्यावा, वजन नियंत्रणात ठेवावे, नियमित व्यायाम करावा, दररोज सात ते नऊ तासांची दर्जेदार झोप घ्यावी, तणावाचे प्रभावी व्यवस्थापन करावे आणि गर्भधारणेस विलंब होत असल्यास वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रत्येक प्रजनन समस्या केवळ जीवनशैलीत बदल करून दूर होईलच, असे नाही. काही पुरुषांना मूळ वैद्यकीय आजारांवर उपचार, औषधोपचार किंवा गरजेनुसार सहायक प्रजनन तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागू शकते. पुरुषांची प्रजनन क्षमता केवळ वय किंवा लैंगिक क्षमतेवर अवलंबून नसते. एखादा पुरुष पूर्णपणे निरोगी दिसत असला तरी त्याच्या शुक्राणूंची गुणवत्ता कमी असू शकते. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे प्रजनन क्षमतेवर परिणाम करणाऱ्या अनेक दैनंदिन सवयी नियंत्रणात आणता येऊ शकतात. सातत्याने केलेले छोटे छोटे सकारात्मक बदलही प्रजनन आरोग्यात लक्षणीय सुधारणा घडवू शकतात.

हस्तमैथुन केल्याने शुक्राणूंची संख्या कमी होते का?

हस्तमैथुन केल्याने शुक्राणूंची संख्या घटते का, असा प्रश्नही अनेकांकडून विचारला जातो. तज्ज्ञांच्या मते, हस्तमैथुनामुळे ना वीर्य कमी होते ना शुक्राणूंची संख्या घटते. त्यामुळे हा भ्रम मनातून काढून टाकायला हवा. पुरुषांच्या शरीरात दररोज वीर्य निर्माण होत असते. वीर्याची कमतरता दूर करण्यासाठी कोणी हस्तमैथुन करणे सोडले तरीही त्याच्या शरीरात विविध कारणांमुळे शुक्राणूंची कमतरता भासू शकते. प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेनुसार दररोज शरीरात वीर्य तयार होत असते. हस्तमैथुनाशिवायही काहींच्या शरीरातून लघवीद्वारे किंवा रात्रीच्या वेळी आपोआप वीर्य बाहेर पडू शकते. त्यामुळे हस्तमैथुनामुळे वीर्य कमी होण्याचा थेट संबंध नाही. मात्र, अति प्रमाणात हस्तमैथुन केल्याने शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.