Why was the sky red in Hanle? लडाखमधील हान्ले हे ठिकाण म्हणजे आकाशप्रेमींसाठी एक स्वप्नच. रात्री आकाशाकडे पाहिलं की, गडद निळ्या रंगाची पसरलेली चादर, त्यावर चमकणारे तारे आणि दूरवरच्या आकाशगंगा मानवाला आपल्या क्षुद्रतेची जाणीव करून देतात. इथे रात्री इतका अंधार असतो की, प्रकाशप्रदूषणाचा लवलेशही जाणवत नाही. मात्र १९ आणि २० जानेवारीच्या रात्री, या शांत आकाशात काहीतरी अनपेक्षित घडलं. हान्लेच्या आकाशात अचानक लालसर, अगदी रक्तासारख्या लालरंगाचा प्रकाश झळकला. अनेकांना हे ‘नॉर्दर्न लाईट्स’ वाटले. सोशल मीडियावर या दृश्यांचे फोटो झपाट्याने व्हायरल झाले. पण, या सुंदर दृश्यामागे एक गंभीर वैज्ञानिक इशारा दडलेला आहे, त्याविषयी…
नॉर्दर्न लाईट्स म्हणजे काय?
नॉर्दर्न लाईट्स म्हणजे रात्रीच्या आकाशात दिसणारे रंगीबेरंगी नैसर्गिक प्रकाशकिरण या प्रकाश किरणांना शास्त्रीय भाषेत ऑरोरा बोरेलिस असे म्हणतात. सूर्यापासून सतत बाहेर फेकले जाणारे उर्जायुक्त कण पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात अडकतात आणि ते ध्रुवीय भागांकडे वळवले जातात. हे कण जेव्हा पृथ्वीच्या वरच्या वातावरणातील ऑक्सिजन आणि नायट्रोजन वायूंवर आदळतात, तेव्हा त्या धडकेतून ऊर्जा मुक्त होते आणि ती प्रकाशाच्या रूपात आकाशात दिसू लागते. वातावरणातील वायू आणि उंची यानुसार या प्रकाशाचा रंग बदलतो. ऑक्सिजनमुळे हिरवा किंवा लाल, तर नायट्रोजनमुळे निळसर- जांभळा रंग दिसतो. हे प्रकाशकिरण आकाशात पडदे, लाटा किंवा नाचणाऱ्या रेषांसारखे दिसतात आणि त्यालाच नॉर्दर्न लाईट्स म्हणतात. प्रामुख्याने ध्रुवीय प्रदेशात हा अनुभव येतो.
भारतात नॉर्दर्न लाईट्स का दिसत नाहीत?
नॉर्दर्न लाईट्स प्रामुख्याने पृथ्वीच्या ध्रुवीय भागांजवळ दिसतात, कारण पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र सूर्यापासून येणारे उर्जायुक्त कण ध्रुवांकडे वळवतात. भारत हा ध्रुवीय प्रदेशांपासून खूप दूर, म्हणजेच कमी अक्षांशावर असल्यामुळे साधारण परिस्थितीत इथे हे प्रकाशकिरण दिसत नाहीत. मात्र जेव्हा सूर्य फारच तीव्र आणि शक्तिशाली सौर वादळं निर्माण करतो, तेव्हा हे प्रकाशकिरण ध्रुवापलीकडे पसरू शकतात. अशा वेळी भारतासारख्या भागात हिरव्या रंगाऐवजी वरच्या वातावरणात निर्माण होणारा लाल रंगाचा ऑरोरा दिसू शकतो. लडाखमधील हान्ले येथे दिसलेला लाल प्रकाश याच प्रकारचा होता.
हान्ले येथे लाल आकाश नेमकं कशामुळे दिसलं?
या घटनेमागचं मुख्य कारण म्हणजे सूर्यावरील प्रचंड सौर वादळं. १८ जानेवारी रोजी सूर्याच्या पृष्ठभागावर अत्यंत शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटातून सूर्याने मोठ्या प्रमाणात उर्जायुक्त कण अवकाशात फेकले. हे कण सुमारे १,७०० किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने पृथ्वीच्या दिशेने आले. फक्त २५ तासांतच हे कण पृथ्वीच्या चुंबकीय कवचावर आदळले. त्यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात मोठा व्यत्यय निर्माण झाला. यालाच भू-चुंबकीय वादळं म्हणतात. या वादळामुळे पृथ्वीच्या वरच्या वातावरणातील ऑक्सिजन कण सक्रिय झाले. त्यातून प्रकाश निर्माण झाला आणि तो प्रकाश हान्लेच्या आकाशात लाल रंगात दिसू लागला. ध्रुवीय प्रदेशात असे प्रकाश सहसा हिरव्या रंगाचे दिसतात, पण भारतासारख्या कमी अक्षांशाच्या भागात ते लाल दिसतात.
सुंदर दृश्यामागचा धोका…
हे दृश्य पाहायला जितकं मोहक होतं, तितकंच ते धोकादायकही होतं. अशा तीव्र सौर वादळांचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावर होऊ शकतो.
- उपग्रहांचे कामकाज बिघडू शकते
- GPS, मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा विस्कळीत होऊ शकतात
- वीजेच्या नेटवर्कवर म्हणजेच Power Grid वर ताण येऊन मोठ्या प्रमाणावर वीजखंडित होण्याचा धोका निर्माण होतो
या वेळी तर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर असलेल्या अंतराळवीरांनाही वाढलेल्या किरणोत्सर्गामुळे सुरक्षित आश्रय घ्यावा लागला. यावरून या घटनेची तीव्रता लक्षात येते. आज भारत वेगाने डिजिटल होत आहे. ऑनलाइन बँकिंग, UPI, GPS, उपग्रह-आधारित सेवा यांवर आपलं दैनंदिन जीवन अवलंबून आहे. त्यामुळे असे अवकाशीय वादळ हे केवळ वैज्ञानिक कुतूहल न राहता राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न ठरते.
अशा संकटांसाठी भारत किती सज्ज आहे?
अशा घटनांपासून बचाव करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळीच मिळणारा इशारा.
जर सूर्यावरील हालचाली आधीच ओळखता आल्या तर….
- उपग्रह सुरक्षित स्थितीत ठेवता येतात
- पॉवर ग्रीडवरील ताण कमी करता येतो
- मोठ्या तांत्रिक अपघातांचा धोका टाळता येतो
म्हणूनच अवकाशीय हवामानाचा अभ्यास आणि निरीक्षण प्रणाली अधिक मजबूत करणं अत्यावश्यक आहे.
हान्लेचा अंधार जपणं का गरजेचं आहे?
हान्ले हे केवळ पर्यटनस्थळ नाही. ते भारताचं एक महत्त्वाचं वैज्ञानिक केंद्र आहे. इथला नैसर्गिक अंधार आपल्याला अवकाशातील सूक्ष्म बदल अचूकपणे टिपण्याची संधी देतो. पण वाढतं पर्यटन आणि कृत्रिम प्रकाश यामुळे प्रकाशप्रदूषणाचा धोका वाढतो आहे. हान्लेचा अंधार आपण गमावला, तर भविष्यात अशा अवकाशीय धोक्यांचे संकेत वेळेवर ओळखणं कठीण होईल.
लाल आकाश: सौंदर्य नव्हे, सावधानतेचा इशाचा
हान्लेच्या आकाशात दिसलेला लाल रंग फक्त पाहायला सुंदर नव्हता, तर तो एक महत्त्वाचा इशाराही होता. याचा अर्थ सूर्य सध्या जास्त सक्रिय होत आहे. आपलं दैनंदिन जीवन ज्या मोबाईल, इंटरनेट, उपग्रह आणि वीज यांसारख्या प्रणालींवर चालतं, त्या आपण समजतो तितक्या मजबूत नाहीत. त्यामुळे त्या लाल आकाशाकडे पाहताना फक्त सौंदर्य म्हणून न पाहता त्यामागचा संदेशही लक्षात ठेवायला हवा. कारण हा इशारा थेट आपल्या उद्याशी, भविष्याशी जोडलेला आहे.

