सूर्य मावळला की नैसर्गिक प्रकाश लोपतो. पण कॅलिफोर्नियातील एका स्टार्टअप कंपनीला सूर्य मावळतीला गेल्यानंतरही त्याचा प्रकाश पृथ्वीच्या त्या अंधाऱ्या प्रदेशावर आणायचा आहे. कंपनीची ही कल्पना अतिशयोक्त वाटावी, पण त्यावर काम सुरू आहे. याचे मानवाच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतात असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

पृथ्वी ‘रात्री प्रकाशमान’ करण्याची योजना

रिफ्लेक्ट ऑर्बिटल नावाची अमेरिकेतील स्टार्टअप कंपनी एका वेगळ्यात प्रयोगावर काम करत आहे. सूर्य पृथ्वीच्या एका भागात मावळत असला तरी दुसरीकडे उगवत असतो. त्यामुळे पृथ्वीच्या कक्षेतला हा सूर्यप्रकाश मोठे आरसे लावून परावर्तित करायचा आणि हव्या त्या परिसराला तिथे रात्र असली तरी प्रकाशमान करायचे, अशी ही संकल्पना आहे. यासाठी पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत (लो अर्थ ऑर्बिटमध्ये) उपग्रहांची संख्या दहा लाखांपर्यंत वाढवून त्या उपग्रहांवर परावर्तित आरसे बसविण्याची या कंपनीची योजना असल्याचे वृत्त ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने दिले आहे. या उपग्रहांवरील आरशांमुळे होणाऱ्या परावर्तित सूर्यप्रकाशाद्वारे पृथ्वीवरील किमान पाच ते सहा किलोमीटरचा परिसर ‘गरजेनुसार’ प्रकाशमान करण्याचा कंपनीचा मानस आहे. यामुळे सौरऊर्जा उत्पादन संध्याकाळपर्यंत वाढवता येईल, तसेच बांधकाम, आपत्ती व्यवस्थापन आणि शेतीसाठी प्रकाश उपलब्ध होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.

कंपनी यासाठी स्पेसएक्स या इलॉन मस्कच्या कंपनीची मदत घेणार आहे. रिफ्लेक्टर ऑर्बिट कंपनीचा संस्थापक आणि सीईओ बेन नोवॉक हा पूर्वी स्पेसएक्समध्येच अभियंता होता. कॅलिफोर्निया स्थित कंपनीच्या या योजनेअंतर्गत पृथ्वीच्या कक्षेत सौरऊर्जेवर चालणारे प्रचंड संगणकीय जाळे उभारण्यासाठी १० लाखांपर्यंत उपग्रह प्रक्षेपित करण्याचा प्रस्ताव स्पेसएक्स या कंपनीने दिला आहे. वर्षभरापूर्वी हा प्रकल्प चर्चेत आला. २०२५ च्या अखेरपर्यंत तो पूर्ण होण्याचा कंपनीचा मानस होता. आता तो अखेरच्या टप्प्यात आहे असे म्हटले जात आहे. मात्र तो फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन या नियामक संस्थेच्या परवानगीच्या टप्प्यावर आहे.

योजना नेमकी कशी?

या योजनेनुसार, सुमारे ६० फूट रुंदीचा आरसा असलेला एक नमुना उपग्रह तयार केला जाणार आहे. नियामकांनी परवानगी दिल्यास, हा चाचणी उपग्रह याच उन्हाळ्यात कक्षेत पोहोचू शकतो. पृथ्वीपासून सुमारे ४०० मैल उंचीवरून तो सुमारे ३ मैल व्यासाच्या गोलाकार भागावर सूर्यकिरण परावर्तित करेल. जमिनीवरून पाहिल्यास, आकाशात पूर्ण चंद्राइतका तेजस्वी एक बिंदू दिसेल. हा प्रकल्प मंजूर झाल्यास, कंपनीचे दीर्घकालीन उद्दिष्ट २०२८ पर्यंत १,००० उपग्रह, २०३० पर्यंत ५,००० आणि अखेरीस २०३५ पर्यंत ५०,००० उपग्रह आरशांचे जाळे उभारण्याचे आहे.

कंपनीच्या महत्त्वाकांक्षेनुसार काही उपग्रहांचा आकार १८० फुटांपर्यंतदेखील वाढू शकतो. या खटाटोपाचा उद्देश असा ग्राहकवर्ग तयार करणे आहे, जो ‘गरजेनुसार सूर्यप्रकाश’ खरेदी करू शकेल. या कृत्रिम प्रकाशाची सुरुवातीची किंमत सुमारे ५,००० डॉलर प्रति तास असेल! यासाठी रिफ्लेक्ट ऑर्बिटल कंपनीने एक अॅप तयार केले आहे. मात्र या प्रकल्पाला खूप विरोध होत आहे.

या योजनेला विरोधाचे कारण काय?

जगभरातील ३० हून अधिक देशांतील सुमारे २,५०० संशोधकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चार आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संस्थांच्या अध्यक्षांनी या प्रयोगाला आक्षेप घेतला आहे. त्यांनी फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनला पत्र लिहून चिंता व्यक्त केली. फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) ही अमेरिकी सरकारी संस्था रेडिओ, टेलिव्हिजन, वायर, उपग्रह आणि केबलद्वारे होणाऱ्या आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय संवादांचे नियमन करते. तसेच स्पर्धा आणि संपर्क यंत्रणेचे नियमन करते.

युरोपियन बायोलॉजिकल रिदम्स सोसायटी (ईबीआरएस), सोसायटी फॉर रिसर्च ऑन बायोलॉजिकल रिदम्स, जपानी सोसायटी फॉर क्रोनोबायोलॉजी आणि कॅनेडियन सोसायटी फॉर क्रोनोबायोलॉजी या चार संस्थांच्या अध्यक्षांचा आक्षेप असा की, या प्रमाणात कक्षेत उपग्रह तैनात केल्यास नैसर्गिक रात्रीच्या प्रकाशाच्या वातावरणात जागतिक पातळीवर मोठा बदल होईल. प्रकाश-अंधाराच्या नैसर्गिक चक्रात बदल केल्यास माणूस आणि प्राण्यांमधील झोप व हार्मोन्स नियंत्रित करणारी जैविक घड्याळे, रात्री सक्रिय असलेल्या प्रजातींचे स्थलांतर, वनस्पतींचे ऋतूचक्र आणि समुद्रातील अन्नसाखळीचा पाया असलेल्या फाइटोप्लँक्टनचे चक्र यावर परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर त्यांनी नियामकांना संपूर्ण पर्यावरणीय आढावा घेण्याचे आणि उपग्रहांच्या परावर्तनक्षमतेवर तसेच रात्रीच्या आकाशातील एकूण प्रकाशमानतेवर मर्यादा घालण्याचे आवाहन केले आहे. लेस्टर विद्यापीठातील जनुकीय तज्ज्ञ आणि ईबीआरएसचे अध्यक्ष प्रा. चारालाम्बोस कायरियाकू यांनी म्हटले आहे की याचे अन्नसुरक्षेसारख्या बाबींवर जागतिक परिणाम होऊ शकतात.

वनस्पती, प्राण्यांना रात्रीची गरज असते; ती आपण संपवू शकत नाही. या योजनेला खगोल अभ्यासकांचादेखील विरोध आहे. रात्रीच्या आकाशाची दृश्यमानता वाढणे, हे त्यामागील प्रमुख कारण. डार्कस्काय इंटरनॅशनल या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रस्किन हार्टली यांच्या मते, आधीच सध्याच्या उपग्रहांमुळे रात्रीचे आकाश उजळण्याचे प्रमाण १० टक्क्यांनी वाढले आहे. त्यात असले प्रयोग भर घालतील. स्लोव्हाक अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे डॉ. मिरोस्लाव कोसिफाय यांनी सांगितले की, उपग्रहांचा रात्रीच्या आकाशावर दोन प्रकारे परिणाम होतो – एक म्हणजे दुर्बिणीच्या प्रतिमांमध्ये रेषा दिसणे आणि दुसरे म्हणजे उपग्रह व अवशेषांवरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे आकाश उजळणे. त्यांच्या मॉडेलिंगनुसार, सध्या हे घटक रात्रीच्या आकाशाच्या प्रकाशमानतेत ३ ते ८ मायक्रोकॅंडेला प्रति चौ. मीटर इतकी भर घालतात. २०३५ पर्यंत ही वाढ ५ ते १९ मायक्रोकॅंडेला होऊ शकते, जी नैसर्गिक अंधार जपण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांनी ठरवलेल्या मर्यादेजवळ पोहोचेल. अशा प्रवृत्तीला खतपाणी घातले तर भविष्यात हे प्रकार आणखी वाढतील, अशी भीतीही कोसिफाय यांनी व्यक्त केली.

यापूर्वी असे प्रयोग झाले होते का?

सूर्यप्रकाश परावर्तित करण्याचे दोन प्रयोग यापूर्वीही झाले आहेत. त्यामुळे हे तंत्रज्ञान नवे नाही. पूर्वीच्या सोव्हिएत महासंघाच्या व्लादिमिर सिरोमित्निकोव्ह या वैज्ञानिकाने हा प्रयोग केला होता. २७ ऑक्टोबर १९९२ रोजी तो कार्यान्वितही झाला. यामागचे उद्दिष्ट कामगारांची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी कृत्रिम प्रकाश पुरविणे हे होते. पण पुढे निधीअभावी हा प्रकल्प गुंडाळला गेला. चीनदेखील महागड्या पथदिव्यांवरील खर्च कमी करण्यासाठी याच प्रकारच्या योजनेवर काम करत आहे. अमेरिकन कंपनीच्या या योजनेच्या यशस्वीतेबद्दलही अनेकांना शंका आहे. इतका खटाटोप करून मिळणारा प्रकाश जर सूर्यप्रकाशाऐवजी चंद्राच्या चांदण्यासारखा असेल, म्हणजे लख्ख नव्हे पण कामापुरता तर काय उपयोग, असे म्हणणारेही टीकाकार आहेत. पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत असला तरी अंतराच्या मर्यादा असल्याने या प्रयोगाच्या यशस्वीतेवर अनेकांना शंका आहे.

फायदे कोणते?

हा प्रकल्प पूर्णपणे चुकीचा नाही. त्याचे काही फायदेही असू शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी रात्री भूकंप झाला किंवा अन्य कोणती आपत्ती आली तर बचावकार्यासाठी अशा कृत्रिम प्रकाशाचा उपयोग होऊ शकतो, मात्र यासाठी निसर्गाचे चक्र बदलण्याची जोखीम माणसाला परवडणारी आहे का हा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.

manisha.devne@expressindia.com