Understanding the link between Body Pain and Fatigue to improve daily energy levels: आपल्या शरीरात मज्जासंस्था (Nervous System) ही एक अत्यंत संवेदनशील यंत्रणा असते, जी सतत शरीराच्या ऊर्जेचा आणि ताणाचा आढावा घेत असते. जेव्हा आपण “दिवसभर काही न करताही थकलोय” असे म्हणतो, तेव्हा तो केवळ शारीरिक थकवा नसून मेंदूने दिलेला संरक्षणात्मक प्रतिसाद असतो.
एकाच सिस्टिमचे भाग
“दिवसभर काही खास काम केलं नाही, तरी थकल्यासारखं वाटतं… आणि मान, पाठ किंवा कंबरही दुखते.”
अनेकांना हा अनुभव वारंवार येतो. काहीजण याला ‘अशक्तपणा’ समजतात, तर काहीजण वेदना आणि थकवा या दोन वेगळ्या समस्या म्हणून पाहतात. पण प्रत्यक्षात वेदना आणि थकवा हे अनेकदा एकाच सिस्टीमचे भाग असतात.
शरीराची ‘अलार्म सिस्टीम’
आपल्या शरीरात मज्जासंस्था (nervous system) ही एक अत्यंत संवेदनशील यंत्रणा असते. ती सतत शरीराची स्थिती, हालचाल, ताण आणि ऊर्जा यांचा आढावा घेत असते. जेव्हा शरीरावर जास्त ताण येतो किंवा धोका जाणवतो, तेव्हा ही सिस्टीम आपल्याला ‘अलार्म’ देते.
- वेदनेद्वारे शरीर आपल्याला हे सांगते की : इथे काहीतरी गडबड आहे.
- थकवा आपल्याला हे सांगतो की: शरीरातील ऊर्जा कमी झाली आहे, आपल्याला थोडं थांबण्याची गरज आहे.
या दोन्हींचा उद्देश मात्र एकच असतो ते म्हणजे शरीराचं संरक्षण.

थकवा फक्त स्नायूंमध्ये तयार होत नाही
आपल्याला वाटतं की, थकवा म्हणजे स्नायू दमले. पण प्रत्यक्षात थकवा हा मेंदू आणि शरीर यांच्यातील संवादाचा परिणाम असतो. मेंदू शरीराची ऊर्जा, झोप, ताण आणि कामाचा भार यांचा विचार करून ‘थकवा’ ही भावना निर्माण करतो. म्हणूनच, कधी कधी शारीरिक काम कमी असतानाही थकवा जाणवतो. याला ‘central fatigue’ म्हणतात. म्हणजेच थकवा हा केवळ शरीराचा नाही, तर मज्जासंस्थेचा प्रतिसाद आहे.
वेदना नेहमी इजेमुळेच होते का?
तसंच, वेदनादेखील नेहमी इजेमुळेच होते असं नाही. काही वेळा कोणतीही स्पष्ट इजा नसतानाही वेदना जाणवते. यामागे मज्जासंस्थेची वाढलेली संवेदनशीलता हे कारण असू शकते. याला ‘सेन्सेटायझेशन’ ‘sensitization’ म्हणतात. म्हणजेच, वेदना आणि थकवा दोन्हीही मेंदू आणि मज्जासंस्थेच्या प्रतिसादाशी जोडलेले आहेत.
वेदना आणि थकवा एकत्र का जाणवतात?
१. ताण आणि विश्रांतीचा असमतोल
आपण जितका ताण घेतो, तितकीच विश्रांती आवश्यक असते. जर शरीराला पुरेशी विश्रांती मिळाली नाही, तर ते वेदना आणि थकवा या दोन्ही स्वरूपात प्रतिक्रिया देतं.
२. कमी हालचाल (Inactivity)
दीर्घकाळ बसून राहिल्यामुळे स्नायू निष्क्रिय होतात. यामुळे stiffness वाढतो आणि हलकी हालचालही थकवणारी वाटते. परिणामी वेदना वाढते.
३. मानसिक ताण
ताण, चिंता आणि कामाचा दबाव यांचा मज्जासंस्थेवर थेट परिणाम होतो. त्यामुळे वेदना आणि थकवा दोन्ही वाढू शकतात.
४. झोपेचा अभाव
पुरेशी आणि दर्जेदार झोप न मिळाल्यास शरीराची पुनर्बांधणी (recovery) नीट होत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अंगात जडपणा आणि वेदना जाणवतात.
५. दीर्घकाळचा ओव्हरलोड
सतत एकाच प्रकारचा ताण (जसं की बसून काम) शरीरावर येत राहिल्यास थकवा साचत जातो आणि वेदना निर्माण होतात.
“मी काही केलं नाही, तरी थकल्यासारखं का वाटतं?”
हा प्रश्न खूप सामान्य आहे. यामागे काही कारणं असू शकतात:
- • स्क्रीनसमोर जास्त वेळ
- • कमी हालचाल
- • मानसिक थकवा
- • झोपेची कमतरता
- • अनियमित दिनचर्या
याला ‘इनॅक्टिव फटीग’ (inactive fatigue) म्हणतात, म्हणजे हालचाल नसतानाही येणारा थकवा.
उपाय काय?
१. पूर्ण विश्रांती हा उपाय नाही
जास्त विश्रांती घेतल्यास stiffness वाढू शकतो. त्यामुळे संतुलित हालचाल आवश्यक आहे.
२. नियमित हालचाल
दररोज चालणं, हलका व्यायाम किंवा स्ट्रेचिंग केल्याने शरीर सक्रिय राहतं आणि ऊर्जा वाढते.
३. लोड मॅनेजमेंट
शरीरावरचा ताण हळूहळू वाढवणं आणि योग्य वेळी विश्रांती घेणं महत्त्वाचं आहे.
४. झोपेत सुधारणा
नियमित वेळेत झोपणं आणि उठणं, स्क्रीनचा वापर कमी करणं यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.
५. मानसिक विश्रांती
ताण कमी करण्यासाठी श्वसन तंत्र, ध्यान किंवा थोडा डिजिटल ब्रेक घेणं उपयोगी ठरतं.
फिजिओथेरेपीची भूमिका
- फिजिओथेरेपीमध्ये वेदना आणि थकवा यांना वेगळं न पाहता एकत्रितपणे समजलं जातं. उद्देश फक्त वेदना कमी करणं नसून, शरीराची क्षमता आणि सहनशक्ती वाढवणं असतो. फिजिओथेरेपिस्ट:
- • योग्य हालचाली शिकवतात
- • स्नायू बळकट करतात
- • थकवा व्यवस्थापन शिकवतात
- • दैनंदिन सवयी सुधारायला मदत करतात
- यामुळे रुग्ण अधिक सक्रिय आणि आत्मविश्वासपूर्ण बनतो.
एक महत्त्वाची जाणीव
वेदना आणि थकवा हे शत्रू नाहीत. ते शरीराचे संकेत आहेत. त्यांना पूर्णपणे टाळण्याऐवजी त्यांचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे.
शरीराचे संकेत समजून घ्या
वेदना आणि थकवा हे वेगळे अनुभव वाटले, तरी ते अनेकदा एकाच मज्जासंस्थेच्या प्रतिसादाचा भाग असतात. असंतुलित जीवनशैली, जास्त ताण आणि कमी विश्रांती यामुळे हे दोन्ही एकत्र जाणवतात.
लक्षात ठेवा:
• थकवा आणि वेदना हे शरीराचे संकेत आहेत, हे ऐकले आणि त्यांना योग्य प्रतिसाद दिला तर आपण अर्थपूर्ण आयुष्य जगू शकतो.
• योग्य हालचाल आणि विश्रांती यांचा समतोल आवश्यक आहे.
