scorecardresearch

विश्लेषण: रकेल वेल्च या अभिनेत्रीला हॉलिवूडची सेक्स सिम्बॉल असं का म्हटलं जायचं?

रकेल वेल्च या हॉलिवूड अभिनेत्रीचं नुकतंच निधन झालं. या अभिनेत्रीचं आयुष्य कसं होतं? जाणून घ्या

Remembering Raquel Welch
रकेल वेल्चला सेक्स सिम्बॉल का म्हटलं जायचं?

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि इंटरनॅशनल सेक्स सिम्बॉल अशी ओळख असलेल्या रकेल वेल्चचं नुकतंच निधन झालं. ती ८२ वर्षांची होती. Raquel Welch ने १६ फेब्रुवारीला या जगाचा निरोप घेतला. ३० चित्रपट आणि ५० टीव्ही मालिका करणाऱ्या रकेल वेल्चने आपल्या अभिनयाने तर लोकांना वेडं केलं होतंच. पण तिचं मादक सौंदर्य हे तिला सेक्स सिम्बॉल हे बिरूद लावणारं ठरलं. १९६० आणि १९७० च्या दशकात रकेलच्या या मादकतेची भुरळ हॉलिवूडमध्ये जवळपास प्रत्येकाला पडली होती. तिचे चाहते फक्त अमेरिकेत नाही तर जगभरात झाले होते.

सेक्स सिम्बॉल ही ओळख रकेलला कशी मिळाली?

१९६० च्या दशकात Raquel Welch ने आपल्या सिनेमा करिअरला सुरूवात केली. याच दशकात तिचे दोन चित्रपट आले. फँटास्टिक वोयाज आणि वन मिलियन इयर्स बी.सी. अशा दोन सिनेमांमधून तिने अभिनय आणि मादक सौंदर्य याची ती जादू दाखवली की त्यामुळे प्रत्येकजण तिला ओळखू लागला. यानंतर तिला चित्रपटांच्या अनेक ऑफर्स येऊ लागल्या. १९७३ मध्ये आलेल्या थ्री मस्किटियर्स या सिनेमासाठी तिला गोल्डन ग्लोब या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. हॉलिवूडचा सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा हा पुरस्कार रकेलला मिळाला होता.

‘One Million Years B.C.’ या चित्रपटात रकेलने फिगर फ्लाँट करण्याचा ट्रेंड सुरु केला होता. यावरुनच तिला सेक्स सिम्बल आणि सेक्स बॉम्ब अशी टोपण नावं पडली होती. पुढेही तिने अनेक चित्रपटात बोल्ड सीन दिले. चित्रपटाच्या पडद्यावर बोल्डनेसचा तडका देणारी रकेलचं व्यक्तिगत आयुष्य मात्र पूर्णपणे वेगळं होतं.

बिकीनीवरचं ते पोस्टर लोकांच्या कायमचं स्मरणात

फँटास्टिक व्होएज या सिनेमातून तिने पदार्पण केलं असलं तरीही लोकांच्या लक्षात राहिलं ते तिचं बिकिनीवरचं पोस्टर. तिचं हे पोस्टर पाहून ही अभिनेत्री आहे तरी कोण? आणि ती सिनेमात कसं काम करते हे पाहण्यासाठी या सिनेमावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या होत्या. सेक्स सिम्बॉल ही उपाधी तिला लागली ती कायमचीच. एका मुलाखतीत रकेलने हेदेखील सांगितलं होतं की मला माझ्या संपूर्ण आयुष्यात सेक्स सिम्बॉल ही ओळख पुसण्यासाठी बरेच कष्ट करावे लागले. मी आकर्षक दिसत असल्याने लोक माझ्याकडे पाहतात तरीही मी फक्त सेक्स सिम्बॉल म्हणूनच ओळखली जाऊ नये ही माझी इच्छा होती असंही तिने म्हटलं होतं.

रकेल वेल्चला म्हटलं जायचं रॉकी

रकेल वेल्चचा जन्म १९४० मध्ये झाला होता. शिकामोमध्ये तिचं शिक्षण झालं. तिचं पूर्ण नाव रकेल तेजादा वेल्च असं होतं. तिला तिच्या शाळेतले अनेक लोक रॉकी या नावाने हाक मारायचे कारण रकेल हे नाव उच्चारणं त्यांना कठीण जात असेल. त्यामुळे मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत असताना ते तिला अनेकदा रॉकी याच नावाने हाक मारायचे.

वेट्रेस म्हणूनही केलं काम

रकेलने अभिनेत्री होण्याआधी वेट्रेस म्हणूनही काम केलं आहे. लास वेगास येथील वुमन म्युझिकल अॅक्टमध्ये काम करण्याआधी रकेल एक कॉकटेल वेट्रेस म्हणूनही काम करत होती. पार्ट टाइम मॉडेलिंगही ती करत होती. ६० च्या दशकात तिला मोठा ब्रेक मिळाला. ज्यानंतर रकेल वेल्च हे नाव कुणीही विसरू शकलं नाही.

१०० हून अधिक मासिकांच्या मुखपृष्ठांवर झळकली आहे रकेल

रकेलची लोकप्रियता इतकी वाढली होती की तिची एक छबी पाहण्यासाठी लोक वेडे व्हायचे. त्यामुळे तिचा फोटो आत्तापर्यंत १०० हून अधिक मासिकांवर मुखपृष्ठ म्हणून छापून आला आहे. कॉस्मोपॉलिटिन, वोग, प्लेबॉय, पीपल, लाइफ, हार्पर यांसारख्या मोठमोठ्या मासिकांचं मुखपृष्ठ होता आलं ते तिला मिळालेल्या अमाप प्रसिद्धीमुळेच. IMDB च्या १०० सेक्सिएस्ट अॅक्ट्रेस एव्हर या यादीत रकेल ३४ व्या स्थानावर आहे.

सिंगल मदर होती रकेल

रकेलने वन मिलियन इयर्स बीसी मध्ये केलेल्या कामाचं आणि तिच्या मादक सौंदर्याचं खूप कौतुक झालं होतं आणि तेवढीच चर्चाही झाली होती. पुढेही रकेलने अनेक बोल्ड भूमिका साकारल्या. १९६४ मध्ये तिने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सिंगल मदर बनत तिने आपल्या दोन मुलांची जबाबदारी स्वीकारली.

समीक्षकांची टीका सहन केली

पहिल्याच सिनेमापासून सेक्स सिम्बॉल ही ओळख तयार झालेली रकेल ही पुढे आपल्याला चांगली भूमिका मिळेल आणि त्या भूमिकेसाठी आपण ओळखले जाऊ ही इच्छा बाळगून होती. तीन ओळींची सुपरस्टार असं तिला उपरोधाने म्हटलं जात होतं. ही ओळख पुसण्यासाठी रकेलने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. मात्र टीकाकारांची तोंडं तेव्हा बंद झाली जेव्हा रकेलला थ्री मस्केटियर्ससाठी गोल्डन ग्लोब मिळाला. अशा रितीने एक झगमगतं आणि तेवढंच संघर्षाचं आयुष्य जगलेल्या या अभिनेत्रीचा शेवट झाला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 20:38 IST