Covid 19 Vaccine and Stroke Relation : गिटारच्या तारांवर सहजपणे फिरणारी बोटं अचानक साथ देईनाशी झाली, वर्षानुवर्षे संगीताच्या तालावर रंगमंच गाजवणाऱ्या संगीतकार रेमो फर्नांडिस यांनी लाइव्ह परफॉर्मन्समधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामागे त्यांच्या आरोग्याची मोठी अडचण असल्याचे त्यांनी सांगितले. तिसरी कोविड लस घेतल्यानंतर आपल्याला सौम्य स्वरूपाचा स्ट्रोक आल्याचा दावा रेमो यांनी केला आहे. या स्ट्रोकचा परिणाम त्यांच्या बोटांच्या हालचालींवर झाला आहे आणि त्यामुळे पूर्वीप्रमाणे गिटार व बासरी वाजवणे त्यांच्यासाठी कठीण झाले आहे.
रेमो यांच्या या वक्तव्यानंतर कोविड लसीमुळे स्ट्रोकचा धोका वाढतो का, असा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, मेंदू आणि मज्जासंस्थेच्या तज्ज्ञांच्या मते (न्यूरोलॉजिस्ट) लस घेतल्यानंतर स्ट्रोक आला म्हणून तो लसीमुळेच आला, असा निष्कर्ष काढता येत नाही. दोन घटना एकामागोमाग घडल्या म्हणजे त्यांच्यात कारण-परिणामाचा संबंध आहे, असे सिद्ध होत नाही.
स्ट्रोकचे कारण शोधण्यासाठी संबंधित व्यक्तीचे वय, रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, हृदयविकार आणि इतर आरोग्यविषयक जोखमीचे घटक तपासावे लागतात. उपलब्ध वैज्ञानिक पुराव्यांनुसार, कोविड लसीकरणानंतर बूस्टर डोस घेतल्यानंतरही एकूणच स्ट्रोकचा धोका वाढतो, असे सिद्ध झालेले नाही, असेही तज्ज्ञांनी नमूद केले.
कोविडची लस घेतलेल्या मोठ्या लोकसंख्येचा अभ्यास केला असता, असे आढळून आले की, कोविड लसीकरण आणि स्ट्रोक यांच्यात थेट संबंध असल्याचे ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे लसीकरणानंतर स्ट्रोकची घटना घडली असली तरी त्यासाठी ती विशिष्ट लसच जबाबदार ठरली, हे वैज्ञानिकदृष्ट्या तथ्य होऊ शकत नाही, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
तज्ज्ञांच्या मते, काही लसी घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी (Blood Clots) तयार होण्याच्या अत्यंत दुर्मीळ घटना समोर आल्या आहेत. त्यामध्ये अॅडेनोव्हायरल-व्हेक्टर तंत्रज्ञानावर आधारित काही लसींमुळे रक्ताच्या गाठी झाल्याचे समोर आले. मात्र, अशी प्रकरणं फार कमी प्रमाणात आढळतात.
मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयातील न्यूरोइंटरव्हेन्शनल सर्जरी विभागाचे संचालक डॉ. विपुल गुप्ता यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, एखादी घटना लस घेतल्यानंतर घडली म्हणजे ती लसीमुळेच घडली, असे मानता येत नाही. ती घटना घडण्याची वेळ आणि त्यामागील कारण यांतील परस्पर संबंध समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्याच वेळी कोविडच्या संसर्गामुळेही रक्ताच्या गाठी होण्याचे प्रमाण आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. कोविडमुळे शरीरात दाह वाढतो आणि रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतही बदल होऊ शकतात. विशेषतः कोविडमधून बरे झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात हा धोका अधिक असू शकतो, असेही डॉ. गुप्ता यांनी नमूद केले.
मात्र, कोविडची लागण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला स्ट्रोकचा धोका असतो, असेही नाही. दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयातील न्यूरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विनीत सुरी यांच्या मते, “कोविडचा संसर्ग झाल्यानंतर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती विषाणूशी लढण्यासाठी सक्रिय होते. काही व्यक्तींमध्ये ही प्रतिक्रिया गरजेपेक्षा जास्त तीव्र होऊ शकते. त्यामुळे संपूर्ण शरीरात मोठ्या प्रमाणात दाह निर्माण होऊ शकतो. ही स्थिती वेळीच नियंत्रणात न आल्यास हा दाह स्ट्रोकसाठी एक जोखमीचा घटक ठरू शकतो.”
स्ट्रोक कसा येतो?
मेंदूच्या एखाद्या भागाला रक्तपुरवठा थांबला की, स्ट्रोक येतो. रक्तासोबत मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन आणि पोषक घटक मिळत असतात. त्यामुळे रक्तपुरवठा बंद झाला की, मेंदूच्या पेशी काही मिनिटांतच खराब होऊ लागतात. स्ट्रोक मुख्यतः दोन प्रकारे होतो. रक्तवाहिनीत रक्ताची गाठ तयार होऊन रक्तपुरवठा बंद होणे याला ‘इस्केमिक स्ट्रोक’, असे म्हणतात; तर मेंदूतील रक्तवाहिनी फुटून रक्तस्राव होणे याला ‘हेमोरेजिक स्ट्रोक’, असे म्हणतात.
स्ट्रोक ही मेडिकल इमर्जन्सी आहे. त्यामुळे त्याची लक्षणे दिसताच रुग्णाला त्वरित रुग्णालयात नेणे महत्त्वाचे आहे.
कोविडचा मेंदूवर कसा परिणाम होऊ शकतो?
कोविडच्या संसर्गामुळे शरीरातील दाह वाढू शकतो. तसेच, रक्तवाहिन्यांच्या आतील भागाचेही नुकसान होऊ शकते. त्यामुळे रक्ताच्या गाठी तयार होण्याची शक्यता वाढू शकते. त्यापैकी एखादी गाठ मेंदूकडे रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडकली, तर ‘इस्केमिक स्ट्रोक’ येऊ शकतो, असे डॉ. विनीत सुरी यांनी स्पष्ट केले.
कोविडनंतर कोणाला स्ट्रोकचा धोका जास्त?
कोविडनंतर प्रत्येकालाच स्ट्रोकचा धोका असतो, असे नाही. मात्र, आधीपासून काही आरोग्य समस्या असलेल्या व्यक्तींमध्ये हा धोका तुलनेने जास्त असू शकतो. त्यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, लठ्ठपणा, धूम्रपानाची सवय, तसेच यापूर्वी स्ट्रोक आला असेल किंवा रक्ताच्या गाठी झाल्या असतील, तर त्या व्यक्तींना धोका असतो.
तसेच, कोविडमुळे प्रकृती गंभीर झालेल्या व्यक्तींमध्ये स्ट्रोकशी संबंधित गुंतागुंत वाढू शकते, असे डॉ. विनीत सुरी सांगतात.
डॉ. विपुल गुप्ता यांच्या मते, “कोविडमध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, बराच वेळ हालचाल न करणे, रक्तदाबात बदल होणे आणि रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत बदल होणे यांमुळे हृदय व रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये कोविडमुळे हृदयावर परिणाम झाल्यास रक्ताची गाठ तयार होऊन, ती मेंदूपर्यंत पोहोचण्याचा धोकाही वाढू शकतो.
कोविड झालेल्या प्रत्येक व्यक्तीला स्ट्रोकचा धोका असतो का?
नाही. कोविड झालेल्या बहुतांश व्यक्तींना, विशेषतः सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना स्ट्रोक येत नाही.
अभ्यासात असे आढळून आले की, कोविडच्या संसर्गामुळे काही काळ स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. मात्र, स्ट्रोकची घटना अजूनही तुलनेने दुर्मीळ आहे. हा धोका प्रामुख्याने कोविडच्या सक्रिय संसर्गादरम्यान आणि त्यातून बरे झाल्यानंतरच्या काही आठवड्यांत अधिक असू शकतो. आधीपासून आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींमध्ये हा धोका तुलनेने जास्त असतो.
कोणती लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नये?
स्ट्रोकची लक्षणे अनेकदा अचानक दिसतात. त्यामुळे अशी लक्षणे जाणवली, तर वेळ न दवडता तातडीने उपचार घेणे गरजेचे ठरते
चेहरा, हात किंवा पायाच्या एका बाजूला अचानक अशक्तपणा किंवा मुंग्या येणे
बोलताना अडखळणे किंवा समोरचे बोलणे समजण्यात अडचण येणे
एका किंवा दोन्ही डोळ्यांनी अचानक दिसणे कमी होणे
चालताना तोल जाणे किंवा शरीराचा समन्वय बिघडणे
अचानक तीव्र डोकेदुखी होणे
डॉ. विनीत सुरी यांच्या मते, स्ट्रोकची लक्षणे दिसताच तातडीने उपचार घेतल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढते आणि दीर्घकाळ राहणारे अपंगत्व टाळण्यास मदत होऊ शकते.
स्ट्रोकचा धोका कमी करता येतो का?
प्रत्येक स्ट्रोक टाळता येईलच, असे नाही. मात्र, रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलवर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवलं, तर धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. त्यासाठी नियमित व्यायाम करणे, तंबाखूसेवन टाळणे, संतुलित आहार घेणे आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधे नियमित घेणे महत्त्वाचे आहे.
कोविडमधून बरे होत असताना अचानक हात-पाय कमजोर होणे, बोलताना अडखळणे किंवा तोल जाणे, अशी नवीन लक्षणे दिसली, तर त्याकडे पोस्ट-कोविडचा परिणाम म्हणून दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय तपासणी करून घेणे गरजेचे आहे, असा सल्ला डॉ. सुरी यांनी दिला आहे.
