Renault Duster 2025 India Launch Update: रेनॉल्ट या कार उत्पादक कंपनीकडून डस्टर या कारचे थर्ड जनरेशन लवकरच भारतात लाँच केले जाणार आहे. डस्टर कारच्या पहिल्या जनरेशनचे उत्पादन कंपनीने तीन वर्षांपूर्वी बंद केले होते. त्यानंतर आता पुन्हा भारतात डस्टर कारचे SUV व्हर्जन रेनॉल्ट कंपनी आणत आहे. दरम्यान, भारतात रेनॉल्टने डस्टर कारच्या समोरील भागात एक बदल केला आहे. तो बदल फक्त भारतात विकल्या जाणाऱ्या कारमध्येच करण्यात आला आहे. कारच्या समोरील बाजूस मध्यभागी कंपनीचे नाव किंवा लोगो असतो. त्या ठिकाणी रेनॉल्टने ठळक, सुस्पष्ट अक्षरात ‘DUSTER’ (डस्टर) लिहिले आहे. रेनॉल्टपेक्षा डस्टर या नावालाच भारतीय बाजारपेठेत अधिक ओळखले जात असल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. रेनॉल्टने असे का केले ते जाणून घेऊयात.

लोगो न लावण्याचा ट्रेंड आला आहे का?

कार उत्पादक कंपन्या त्यांचे ब्रँडिग कारच्या नावाने करत असल्याचा ट्रेंड सध्या पाहायला मिळत आहे. मुख्यत: इलेक्ट्रिक कारमध्ये हे अधिक पाहायला मिळते. काही कंपन्या त्यांच्या नावाच्या ब्रँडिंगवर कमी भर देत आहेत. कारच्या समोरील बाजूस मध्यभागी काही इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपन्या त्यांचा लोगोही लावत नसल्याचे दिसून येते. कारच्या समोरील भागावर लोगो न ठेवता तो सपाट, स्वच्छ ठेवण्यावर काही कंपन्या भर देत आहेत. त्याचेच उदाहरण म्हणजे ह्युंदाई आयओनिक ५ ( Hyundai Ioniq 5) या कारच्या समोरील बाजूस ह्युंदाईचा लोगो लावण्यात आलेला नाही. त्याऐवजी कारच्या आतमध्ये ब्रँडिंग करण्यात आले आहे. या कारच्या स्टेअरिंगवरील ह्युंदाई लोगोही हटवण्यात आला असून त्याजागी फक्त चार ‘डॉट्स’ देण्यात आले आहेत. लोगो तसेच ब्रँडिंग कारच्या आत केले जात असल्याचे दिसून येत आहे.

या कार मोडेलची नावे झाली कंपनीच्या नावापेक्षा मोठी?

मोडेलचे नाव हे कंपनीच्या नावापेक्षा प्रसिद्ध झाल्याचे वाहन उत्पादक कंपन्यांच्या बाबतीत अनेकदा घडले आहे. टोयोटा कंपनीच्या कोरोला कारचे जगभरात पाच कोटींहून अधिक युनिट्स विकले गेले आहेत. तसेच फोर्ड कंपनीच्या एफ सीरिज पिक अप ट्रकचा अमेरिकेत ४० वर्ष बोलबाला होता. निस्सान कंपनीची जीटी-आर कार ही तिच्या कंपनीच्या नावापेक्षा अधिक लोकप्रिय झाल्याचे दिसून आले होते. पोर्शे कंपनीच्या बाबतीतही 911 या मोडेलबाबत असेच घडले.

Renault पेक्षा DUSTER नाव मोठे झाले?

रेनॉल्ट या फ्रेंच कंपनीने डस्टर कार भारतात पहिल्यांदा २०१२ मध्ये लाँच केली होती. मिडसाईज SUV सेगमेंटमधील या कारचे मोडर्न डिझाईन, १.३ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन व ५ स्टार सेफ्टी यांमुळे ही कार लोकप्रिय झाली होती. डस्टर कारने स्वत:ची कंपनीच्या ब्रँडपेक्षा वेगळी ओळख निर्माण केली होती. गावखेड्यांमध्ये असलेल्या अवघड भूभागावर देखील ही कार व्यवस्थितपणे चालेल अशी रचना करण्यात आली होती. त्यामुळे फर्स्ट जनरेशनमधील २ लाख डस्टर कार या अल्पावधीतच विकल्या गेल्या होत्या. डस्टर कारच्या लोकप्रियतेसमोर उत्पादक कंपनी रेनॉल्टचे नाव झाकले गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे कंपनीने रेनॉल्ट या ब्रँडपेक्षा डस्टरलाच ब्रँड करत भारतात लाँच करण्याची तयारी केली आहे.

नवीन डस्टरची किंमत किती? कधी लाँच होणार?

फ्रेंच कंपनी रेनॉल्ट भारतात डस्टर मोडेलचे थर्ड व्हर्जन लाँच करणार आहे. याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात डस्टर कारचे हायब्रिड व्हर्जन लाँच केले जाणार आहे. २०२६ साठी या कारची बुकिंग पूर्ण झाली आहे. त्यामुळे ही कार बुक केल्यानंतर मिळण्यासाठी ग्राहकांना काही महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे. या कारच्या किंमतीची रेंज १०.४९ लाख ते १८.४९ लाख (एक्स शोरूम) रूपये दरम्यान असेल. रेनॉल्ट कंपनीने अद्याप फक्त टरबो-पेट्रोल व्हेरियंटच्याच किंमती सांगितल्या आहेत. डस्टरच्या फर्स्ट जनरेशनला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा भारतात रेनॉल्ट डस्टरला काही बदलांसह लाँच करत आहे.

ब्रँडिंगसाठी डिजिटल लोगोचा वापर?

कारवर लोगो लावण्यापेक्षा कंपन्यांनी कारमध्ये असलेल्या डिजिटल स्क्रिनवर लोगो देण्यास व ब्रँडिंग करण्यास सुरूवात केली आहे. अनेक कंपन्या त्यांच्या लोगोचे रिडिझाइनिंग करत आहेत. लोगोला साधे व सोपे बनवले जात आहे. व्होल्क्सवॅगन, बीएमडब्ल्यू, किया, निस्सान व इतर काही कंपन्यांनी त्यांच्या लोगोला थ्री डायमेन्शनमधून टू डायमेन्शन केले आहे. डिजिटल युगात कंपन्या त्यांच्या लोगोलाही डिजिटल स्वरूपातच ब्रँडिंगसाठी अधिक वापरत आहेत.

कार कंपन्यांची मॅन्युफॅक्चरर्स पेक्षा टेक्नॉलॉजी कंपनी म्हणून ओळख वाढतेय का?

कारमध्ये असलेल्या स्क्रिनचे महत्व वाढत आहे. त्यामुळे कारचे लोगोही स्क्रिनवर दाखवले जातात. कार कंपन्या ब्रँडिंगसाठी डिजिटल सर्फेसेसचा वापर करत आहेत. स्मार्टफोन अॅप, इन्फोटेनमेंट सिस्टिम, वेबसाइट, सोशल मिडिया प्रोफाइल यांवर लोगोचा अत्याधिक वापर केला जातो. कार उत्पादक कंपन्या या स्वत:ला कार उत्पादक म्हणवून घेण्यापेक्षा तंत्रज्ञानाशी संबंधिक कंपन्या म्हणवून घेण्यावर भर देत आहेत. गुगल व अॅपल या कंपन्यांनी देखील साधा, सरळ लोगो किंवा ओळख असलेले चिन्ह वापरणे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोईस्कर असल्याचे अनेकदा सांगितले आहे.