मान्सून जगभरात ऋतुमानानुसार येतो. काही महिन्यांत अत्यावश्यक पाऊस देतो आणि इतर वेळी ओसरतो. मात्र कोरड्या ते ओलसर हवामानाकडे होणाऱ्या या बदलांची नेमकी कारणे संशोधकांना अनेकदा गूढ वाटत आली आहेत. आता एका नवीन अभ्यासात शास्त्रज्ञांनी उघड केले आहे की वातावरणात ओलावा पूर्वीच्या अपेक्षेपेक्षा अधिक काळ टिकू शकतो, ज्यामुळे या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या हवामान प्रणालींविषयीच्या पारंपरिक समजांना नवे वळण मिळाले आहे. मान्सूनला स्वतःची अशी एक स्मृती असते, असाही एक भन्नाट निष्कर्ष या संशोधनात दिसतो.  

नेमके संशोधन काय?

जर्मनीतील पॉट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्च (PIK) या संस्थेचे शास्त्रज्ञ आन्या कॅट्सेनबर्गर आणि अँडर्स लेव्हरमन यांनी हे संशोधन केले. हा अभ्यास प्रोसीडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस (PNAS) या नियतकालिकात ६ मे २०२५ रोजी प्रकाशित झाला आहे. पाण्याच्या वाफेचा पावसाच्या वेळेवर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास यात प्रामुख्याने करण्यात आला आहे. मान्सूनच्या सुरुवातीला उन्हाळ्यात जमिनीचे उष्ण होणे हे एक मान्सूनमागचे मुख्य कारण मानले जात होते. मात्र, या ताज्या अभ्यासातून असे दिसते की फक्त सूर्यप्रकाशापुरते हे मर्यादित नाही.

ओलाव्याच्या ‘स्मृती’ची भूमिका

या संशोधनानुसार, वातावरणात ‘बायस्टॅबिलिटी’ नावाचा गुणधर्म असतो — ज्यात तापमानाच्या पातळीवर वातावरण कोरड्या किंवा ओलसर अवस्थेत स्थिर राहते. विशिष्ट ओलावा साठल्यावरच ही अवस्था बदलते. ‘पाण्याच्या वाफेच्या स्वरूपात वातावरण आपली पूर्वस्थिती ‘लक्षात ठेवू’ शकते,’ असे कॅट्सेनबर्गर म्हणतात. पुरेसा ओलावा जमला की वातावरणात अचानक पाऊस सुरू होण्याची शक्यता निर्माण होते.

सागराशिवाय पावसाची चाचणी

वातावरणाचे वर्तन स्वतंत्रपणे पाहण्यासाठी शास्त्रज्ञांनी जनरल सर्क्युलेशन मॉडेल नावाचे हवामान मॉडेल वापरले. त्यांनी सागरासारख्या संथ प्रणाली बाजूला ठेवून केवळ हवेवर आधारित परिणाम तपासले. या प्रयोगात असे दिसले की समुद्राचे उष्णता योगदान नसले तरी पाण्याच्या वाफेची पातळी ठराविक मर्यादा ओलांडल्यावर वातावरणात स्थितीबदल होतो. यामुळे वातावरणात स्मृतिसदृश गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले.

मान्सूनच्या वेळेसाठी ओलावा महत्त्वाचा

साधारणतः पाण्याची वाफ लगेच साठवली जाते किंवा विरघळते (ढगांत रूपांतर होऊन थंड हवेद्वारे), असे आपण मानतो. पण या अभ्यासातून असे आढळले की वाफ आठवडाभर साचू शकते आणि मान्सून सुरू झाल्यावर ओलसर स्थिती टिकवून ठेवू शकते. म्हणजेच वातावरण पावसाच्या स्थितीत गेले की, सूर्यप्रकाश कमी झाल्यावरही ही अवस्था काही काळ टिकून राहू शकते. प्रदूषण किंवा तापमान वाढल्यास ही स्थिती बदलण्याची मर्यादा वेगळी होऊ शकते. हे अचानक बदल महत्त्वाचे असतात. उशिरा आलेला पाऊस दुष्काळास कारणीभूत ठरू शकतो, तर लांबलेल्या पावसामुळे पूर येऊन शेती व अर्थव्यवस्था कोलमडू शकते. ‘महासागर किंवा बर्फाच्या पृष्ठभागावर अशी साठवणूक स्मृती असते. पण हवेबाबतही अशी क्षमता असू शकते, हे नव्याने स्पष्ट झाले आहे,’ असे अँडर्स लेव्हरमन म्हणतात, ते या पॉट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्च संस्थेतील कॉम्प्लेक्सिटी सायन्स विभागाचे प्रमुख आहेत.

पावसावर किती लोक अवलंबून?

प्रत्येक वर्षी दक्षिण आशिया, पश्चिम आफ्रिका, अमेरिका आणि पूर्व आशियातील काही भागांत मान्सूनचा पाऊस येतो. दोन अब्जांहून अधिक लोक पिकांना पाणी देण्यासाठी आणि नद्या भरून काढण्यासाठी या पावसावर अवलंबून असतात.

विलंब किंवा अतिवृष्टीची शक्यता

मान्सून सुरू होण्याचा काळ केवळ वैज्ञानिक कुतूहलाचा विषय नाही—तर तो पेरणी, पाणीसाठवणूक आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी फार महत्त्वाचा आहे. काही आठवड्यांचा फरक पिके तरारून आणू शकतो किंवा पार आडवी करू शकतो. भारत आणि आग्नेय आशियातील मान्सूनवर अवलंबून असलेले भाग याआधीच अधिक अनिश्चितता अनुभवत आहेत. हे नवे निष्कर्ष हवामान बदलांमुळे पावसाचा विलंब किंवा अतिवृष्टी अति तीव्र होण्याची शक्यता दर्शवतात.

अचूक भाकितांसाठी प्रयत्न

भविष्यातील संशोधन हवामानाच्या झपाट्याने होणाऱ्या बदलांची अचूक सूचना देणाऱ्या प्रणाली अधिक प्रभावी करू शकते. ओलाव्याची कोणती पातळी बदल घडवते, हे समजल्यास स्थानिक पातळीवर पाणी व्यवस्थापन सुधारता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जगभरातील हवामानशास्त्रज्ञ या अभ्यासाकडे लक्ष ठेवून आहेत. काही संशोधकांना वाटते, की वातावरणातील स्मृती ही संकल्पना इतर हवामान पद्धतींना समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.