What happened When Heart Beats While Resting : एका २३ वर्षीय तरुणाच्या विश्रांतीच्या वेळी स्मार्टवॉचवर अचानक प्रतिमिनिटाला हृदयाचे १२० ठोके पडू लागले. विशेष म्हणजे, त्यावेळी तो ना व्यायाम करत होता, ना आजारी होता; तरीही हृदयाच्या ठोक्यांची गती वाढली होती. ही घड्याळाची चूक असेल किंवा काही वेळेपुरता हृदय धडधडत आहे असे त्याला वाटू शकले असते. पण, त्याने याकडे दुर्लक्ष न करता थेट रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. गेल्या साडेतीन महिन्यांपासून अधूनमधून त्याचे हृदय जोरात धडधडत होते. काही वेळा तर त्याला चक्कर आल्यासारखे वाटत होते. मात्र, या त्रासांचा हृदयाच्या लयींशी संबंध आहे हे त्याला समजले नाही.
पुढील तपासणीत त्याच्या या लक्षणांमागील कारण स्पष्ट झाले. तपासणीत आढळून आले की, त्याला Atrioventricular Nodal Re-entry Tachycardia (AVNRT) हा हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढवणारा विकार आहे. या विकारामुळे हृदय अचानक वेगाने धडधडू शकतं.
हृदयाचे ठोके वेगाने का पडत आहेत हे शोधण्यासाठी डॉक्टरांनी त्या तरुणाची इलेक्ट्रोफिजिओलॉजी स्टडी म्हणजेच हृदयाच्या विद्युत क्रियांची तपासणी केली. या तपासणीत हृदयाच्या कोणत्या भागात हा अनियमित विद्युत संदेश तयार होत आहे हे शोधण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी रेडिओफ्रिक्वेन्सी ॲब्लेशन म्हणजेच हृदयात अनियमित ठोके निर्माण करणारा भाग उष्णतेच्या मदतीने निष्क्रिय करण्याची प्रक्रिया केली. या प्रक्रियेत रक्तवाहिनीतून एक बारीक कॅथेटर हृदयापर्यंत नेला जातो. हृदयाचे लय बिघडवणाऱ्या छोट्या भागाची ओळख पटवून त्याला नियंत्रित उष्णता दिली जाते, त्यामुळे हृदयाची अनियंत्रित धडधड थांबवता येते.
नवी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सचे कार्डिओथोरॅसिक आणि व्हॅस्क्युलर सर्जरी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. वरुण बन्सल सांगतात की, हृदयाशी संबंधित समस्या नेहमी छातीत दुखण्यापासून किंवा एखाद्या गंभीर लक्षणापासूनच सुरू होते असे नाही. कधी कधी हृदयाच्या ठोक्यांची गती अचानक वाढणे किंवा कमी होणे हा पहिला संकेत असू शकतो. यासोबत नेहमीची काही दुर्लक्षित लक्षणे दिसत असतील तर त्याकडे गांभीर्याने पाहणे महत्त्वाचे आहे.
खरी समस्या काय असते?
हृदयाची गती नेहमी एकसारखी किंवा निश्चित नसते. व्यायाम, चिंता, ताण, ताप किंवा शरीरातील पाण्याची कमतरता यामुळे हृदयाचे ठोके काही काळासाठी वाढू शकतात. चहा-कॉफीमधील कॅफिन किंवा काही औषधांमुळेही हृदयाचे ठोके तात्पुरते वाढू शकतात. मात्र, व्यक्ती विश्रांती करत असतानाही हृदयाच्या ठोक्यांची गती सतत वाढत असेल आणि त्यामागील कारण समजत नसेल, तेव्हा परिस्थिती चिंतेची ठरू शकते. हृदयांच्या ठोक्यांची गती वाढली तर छातीत धडधडणे, ठोके चुकल्यासारखे वाटणे किंवा छातीत लय बिघडल्याची जाणीव होऊ शकते. यासोबतच काही लोकांना खालीलप्रमाणे लक्षणे दिसू शकतात.
- चक्कर येणे किंवा डोळ्यांसमोर अंधारी येणे
- श्वास घेण्यास त्रास होणे
- अचानक प्रचंड अशक्तपणा जाणवणे
- छातीत अस्वस्थता किंवा दडपण येणे
- काही प्रसंगी चक्कर येऊन खाली पडणे
तर काही लोकांमध्ये, विशेषतः दोन झटक्यांच्या मधल्या काळात वरीलप्रमाणे काही लक्षणे जाणवू शकतात. या २३ वर्षीय तरुणाच्या बाबतीतही सुरुवातीला अशीच स्थिती होती. हातावरील स्मार्टवॉचवर एखाद्या वेळेस हृदयाचे ठोके जास्त दिसले म्हणून हृदयात काहीतरी बिघाड आहे असा निष्कर्ष काढू नये. मात्र, हा बदल जर वारंवार होत असेल किंवा बराच वेळ टिकून राहिल्याचे जाणवले, तर ते कोणत्या परिस्थितीत घडत आहे आणि त्यासोबत कोणती लक्षणे दिसून येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
हृदयाच्या या बदलत्या लयीकडे वेळेवर लक्ष देणे गरजेचे आहे. हृदयरोग तज्ज्ञांच्या (Cardiologist) सल्ल्याने पुढील उपचार घेणेही अत्यंत गरजेचे आहे. यामुळे हृदयाच्या लयीशी (Heart Rhythm) संबंधित मूळ समस्येचे वेळेत निदान होते आणि पुढील संभाव्य धोके किंवा गुंतागुंत टळू शकते.
हृदयाची समस्या वयानुसार उद्भवते का?
हृदयाच्या आरोग्याविषयी चर्चा करताना आपण अनेकदा वयोवृद्ध लोकांचाच विचार करतो. उच्च रक्तदाब (High BP), मधुमेह (Diabetes), अतिरिक्त चरबीचे प्रमाण, धूम्रपान आणिे आनुवंशिकता ही हृदयविकाराची प्रमुख कारणे मानली जातात. पण, ‘माझे वय अजून लहान आहे, मला काय होणार?’ हा गैरसमज घातक ठरू शकतो.
कमी वय आहे याचा अर्थ असा होत नाही की, हृदयाच्या ठोक्यांमधील अनियमितता किंवा सतत होणारे बदल दुर्लक्षित करावेत. ‘AVNRT’ सारखे हृदयाच्या लयीशी संबंधित विकार तरुण वयातही उद्भवू शकतात, ज्यामध्ये अचानक हृदयाची ठोक्यांची गती वाढू शकते.
स्मार्टवॉच काय सांगू शकते आणि काय नाही?
डॉ. वरुण बन्सल म्हणाले की, आजकाल स्मार्टवॉच आणि फिटनेस बँडमुळे हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवणे खूप सोपे झाले आहे. ही उपकरणे दिवसभरातील ठोक्यांची नोंद ठेवतात आणि ठोके आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी झाल्यास त्वरित अलर्टदेखील देतात. पण, स्क्रीनवर दिसणारा तो आकडा तुमच्या हृदयाच्या समस्येचं निदान नव्हे, तर ती फक्त एक सुरुवात आहे.
लक्षात ठेवा, स्मार्टवॉच हे वैद्यकीय उपकरणांचा किंवा डॉक्टरांच्या तपासणीचा पर्याय असू शकत नाही. हृदयाचे ठोके नक्की का वाढले किंवा का कमी झाले याचे अचूक कारण स्मार्टवॉच स्वतः सांगू शकत नाही. तसेच, तुम्ही घड्याळ हातावर कसे बांधले आहे, तुमची शारीरिक हालचाल कशी आहे किंवा इतर काही तांत्रिक कारणांमुळेही स्मार्टवॉचच्या आकड्यांमध्ये बदल होऊ शकतो, त्यामुळे स्मार्टवॉच तुम्हाला सतर्क राहण्याचा इशारा नक्कीच देऊ शकते, पण त्या हृदयातील नेमक्या समस्येचे योग्य निदान करण्यासाठी हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असेही डॉ. बन्सल यांनी नमूद केले आहे.
