Gold import rules India भारतीय लोकांना सोन्याचे प्रचंड आकर्षण आहे. गुंतवणुकीसाठीही मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. त्यामुळेच सोनं खरेदीत भारतीय लोक आघाडीवर आहेत. आता विदेशातून भारतात सोने आणणाऱ्या नागरिकांसाठी बॅगेज नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत, त्यामुळे विदेशात प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आणि परदेशस्थ भारतीयांसाठी विदेशातून भारतात दागिने आणणे अधिक सोपे झाले आहे. केंद्र सरकारने दागिन्यांवरील मूल्याची मर्यादा (Value Limit) काढून टाकली आहे.
अर्थसंकल्प २०२६ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या आणि २ फेब्रुवारी २०२६ पासून लागू झालेल्या ‘नवीन बॅगेज नियमावली २०२६’ नुसार, सरकारने २०१६ च्या नियमांमधील मूल्याची मर्यादा काढली असून आता केवळ वजनाची मर्यादा कायम ठेवली आहे. ही विशेषतः दुबईतील परदेशस्थ भारतीय आणि प्रवाश्यांसाठी आनंदाची बातमी मानली जात आहे. नवीन बॅगेज नियम काय आहेत? विदेशातून भारतात येताना किती तोळे सोने आणता येणार? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
सरकारने रहिवासी, भारतीय/परदेशी वंशाचे पर्यटक, वैध व्हिसा असलेले परदेशी नागरिक (पर्यटक व्हिसा वगळता) आणि क्रू मेंबर्स यांच्यासाठी ‘ड्युटी-फ्री’ (शुल्कमुक्त) सवलतींच्या नियमांतही सुधारणा केली आहे. हे नवीन नियम आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी, विशेषतः संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधील रहिवासी, परदेशस्थ भारतीय (एनआरआय) आणि भारतात येणाऱ्या भारतीय वंशाच्या पर्यटकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत.
‘बॅगेज नियमावली २०२६’ मधील दागिन्यांशी संबंधित नवीन नियम काय आहेत?
नव्या नियमानुसार केंद्र सरकारने विदेशातून भारतात येत असताना दागिने आणायचे असल्यास लागू करण्यात आलेली जुनी पैशांची मर्यादा हटवली आहे. दागिन्यांसाठीची विशेष सवलत आता केवळ वजनाच्या आधारावर निश्चित करण्यात आली आहे. नियमातील बदलानंतर, पात्र रहिवासी/भारतीय वंशाचे पर्यटक (जे एक वर्षापेक्षा जास्त काळ परदेशात राहिले आहेत) यांना केवळ वजनाच्या आधारावर शुल्कमुक्त दागिने आणण्याची परवानगी आहे. ही मर्यादा खालीलप्रमाणे आहे :
- महिला प्रवासी : ४० ग्रॅमपर्यंत दागिने भारतात आणू शकते.
- इतर प्रवासी किंवा पुरुष : २० ग्रॅमपर्यंत दागिने भारतात आणू शकतात.
- १५ वर्षांखालील मुले : ४० ग्रॅमपर्यंत दागिने भारतात आणू शकतात.
दुबईतील प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी का आहे?
जुने नियम लागू झाल्यापासून सामानाचे मूल्य आणि प्रवासादरम्यानच्या खरेदीचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे, याची सरकारने दखल घेतली असल्याचे नव्या निर्णयावरून स्पष्ट होते. दुबईमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी हे महत्त्वाचे आहे. युएईसारख्या बाजारपेठांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि फॅशन उत्पादनांच्या कमी किमती लक्षात घेता, वाढीव ड्युटी-फ्री मर्यादेमुळे प्रवासी आता स्मार्टफोन, घड्याळे, कपडे आणि ॲक्सेसरीज यांसारख्या गोष्टी भारतीय विमानतळांवर आयात शुल्क न भरता मोठ्या प्रमाणात घरी आणू शकतात.
दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे सोन्याच्या दागिन्यांवरील शुल्क. युएईमधून परतणाऱ्या भारतीय प्रवाशांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सोन्याच्या मूळ किमतीवर भारतात कर आकारला जातो आणि त्यामुळे सोन्याची किंमत वाढते. परंतु, यूएईमध्ये सोन्यावर कर नाही. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होते, त्यामुळे दुबईतील प्रवाश्यांसाठी आणि तिथे राहणाऱ्या परदेशस्थ भारतीयांसाठी ही विशेष आनंदाची बातमी आहे.
पूर्वी प्रवाशांना वजन आणि मूल्य (महिलांसाठी १,००,००० आणि पुरुषांसाठी ५०,०००) या मर्यादा होत्या. गेल्या काही वर्षांत सोन्याचे दर गगनाला भिडल्यामुळे यात खूप गोंधळ निर्माण झाला. सुधारित नियमामुळे ही गुंतागूंत दूर झाली आहे आणि सीमा शुल्क विभागाशी होणारे वादही कमी होण्याची शक्यता आहे. यूएईमधील भारतीय ही मागणी अनेक काळापासून करत होते. नवीन नियमांमुळे प्रवाशांना होणारा त्रास कमी होईल, असे सांगितले जात आहे.
दागिन्यांचे कोणते जुने नियम बदलले आहेत?
‘लक्ष्मीकुमारन अँड श्रीधरन अटर्नीज’चे एक्झिक्युटिव्ह पार्टनर रचित जैन यांनी सांगितले की, “यापूर्वी, एक वर्षापेक्षा जास्त काळ विदेशात राहणाऱ्या प्रवाशाला ठराविक वजन आणि मूल्य या दोन्ही मर्यादांचे पालन केल्यास शुल्कमुक्त दागिने आणण्याची परवानगी होती. पुरुषांसाठी २० ग्रॅम (५०,००० पर्यंत) आणि महिला प्रवाशांसाठी ४० ग्रॅम (१,००,००० पर्यंत) अशी ही मर्यादा होती.” बंगळुरूमधील आंतरराष्ट्रीय कर आणि सीमा शुल्क सल्लागार संस्था ‘श्री टॅक्स चेंबर्स’चे संस्थापक आणि सीईओ प्रभाकर के. एस. म्हणतात की, “जुन्या नियमांनुसार दागिन्यांचे थोडे प्रमाण जरी जास्त असले, तरी ते सीमा शुल्क विभागाकडून जप्त केले जात असे.” नवीन नियमांमुळे क्लिअरन्सच्या समस्या सुटतील, प्रक्रिया सोपी होईल, पारदर्शकता वाढेल आणि प्रवाशांना आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळेल अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले.
या मर्यादा केवळ सोन्याच्या दागिन्यांवर लागू आहेत का?
अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत केवळ सोन्याच्या दागिन्यांचा उल्लेख केलेला नाही. नवीन नियम सर्व प्रकारच्या दागिन्यांसाठी आहेत. मात्र, मूल्याची मर्यादा हटवल्याने सर्वाधिक फायदा सोने आणणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. २०१६ मध्ये जेव्हा जुने नियम तयार करण्यात आले होते तेव्हा सोन्याचा भाव ३०,००० च्या आसपास होता. तेव्हा सर्व प्रकारच्या दागिन्यांची (सोन्यासह) मर्यादा १ लाख किंवा ४० ग्रॅमपर्यंत होती.
तेव्हापासून भारतात आणि परदेशात सोन्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. १ एप्रिल २०१६ रोजी ‘मल्टी कमोडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया’ (MCX) वर १० ग्रॅम सोन्याची किंमत २९,०८० होती. २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ही किंमत १,४३,९२६ वर पोहोचली आहे, म्हणजेच १० वर्षांपेक्षा कमी काळात सोन्याच्या दरात ३९३.९३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
सामानाचे इतर नवीन नियम
सुधारित नियमांनी प्रवाशांच्या विविध श्रेणींसाठी सवलती दिल्या आहेत.
- रहिवासी : शुल्कमुक्त सवलत ५०,००० वरून ७५,००० करण्यात आली आहे.
- भारतीय वंशाचे पर्यटक : ७५,०००
- वैध व्हिसा असलेले परदेशी नागरिक (पर्यटक व्हिसा सोडून) : ७५,०००
- परदेशी वंशाचे पर्यटक : २५,०००
- क्रू मेंबर्स : २,५००
जैन सांगतात की, पूर्वीचे नियम प्रवासी कोणत्या देशातून येत आहेत यावर अवलंबून होते (उदा. नेपाळ, भूतान आणि म्यानमारमधून येणाऱ्यांसाठी मर्यादा कमी होती), परंतु आता त्यामध्ये बदल करण्यात आले आहेत.
