Women Suicide Bombers In Baloch Militancy पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कर आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमुळे हा संघर्ष आणखीनच चिघळल्याचे चित्र आहे. या कारवाईला उत्तर म्हणून दहशतवाद्यांनी केलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानात विध्वंसाचे चित्र आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अलीकडच्या काळात बलुचिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी ४० तासांच्या कालावधीत १४५ अतिरेक्यांना ठार मारल्याचा दावा केला आहे.

शनिवारी पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये झालेल्या गोळीबारात आणि अनेक आत्मघाती बॉम्बस्फोटांत किमान ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी लष्कराने सांगितले की, त्यांच्या दलाने या हिंसाचाराला प्रत्युत्तर दिले असून त्यात ९२ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ‘द गार्डियन’मधील वृत्तानुसार, बलुच बंडखोरांनी नागरिक, उच्च-सुरक्षा कारागृह, पोलीस स्थानक आणि निमलष्करी तळांना लक्ष्य केले. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये १८ नागरिक, १५ सुरक्षा कर्मचारी आणि ९२ बंडखोरांचा समावेश आहे. बलोच बंडखोरांकडून ‘सुसाईड बॉम्बर’ म्हणून महिलांचा वापर का केला जातोय? त्यामागील उद्देश काय? जाणून घेऊयात….

बलुचिस्तान पाकिस्तानसाठी महत्त्वाचे का?

क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत असलेला बलुचिस्तान दीर्घकाळापासून बंडखोरीच्या गर्तेत सापडला आहे. पाकिस्तानातील चिनी हितसंबंध हे ‘बीएलए’चे म्हणजेच बलुच लिबरेशन आर्मीचे मुख्य लक्ष्य राहिले आहेत. चीन बलुचिस्तानमधील संसाधनांचे शोषण करण्यात पाकिस्तानला मदत करीत असल्याचा आरोप या गटाकडून करण्यात आला आहे. बलुचिस्तान हा चीनच्या ६५ अब्ज डॉलर्सच्या ‘चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर’ (सीपीईसी) प्रकल्पाचा कणा आहे.

बलुचिस्तानमध्ये ग्वादरसारखे खोल पाण्याचे बंदर आणि रेको डिकसारखे जगातील सोने व तांब्याचे सर्वांत मोठे साठे आहेत. मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संपत्ती असूनही, बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वांत गरीब प्रांत आहे. राजकीय प्रतिनिधित्व, संसाधनांचे वाटप व सुरक्षा दलांकडून होणारे अत्याचार यांमुळे या भागातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. सशस्त्र बलुच गटांचे म्हणणे आहे की, त्यांचा लढा राजकीय उपेक्षा, आर्थिक दुर्लक्ष आणि त्यांच्या संसाधनांच्या शोषणाविरुद्ध आहे. काही वर्षांपासून, महिलादेखील आत्मघाती बॉम्बस्फोटांसह लढाऊ भूमिका घेताना दिसत आहेत.

बलुच लिबरेशन आर्मीचे ओपरेशन हेरॉफ

बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि बलुच लिबरेशन फ्रंट (बीएलएफ) सारखे गट पाकिस्तानवर संसाधनांची लूट आणि राजकीय उपेक्षेचा आरोप करतात. पाकिस्तान या गटांना दहशतवादी संघटना मानतो आणि त्यांच्या कारवायांसाठी इतर देश व गुन्हेगारी नेटवर्कला जबाबदार धरतो. बीएलएचे ‘ऑपरेशन हेरॉफ फेज २’ ही खारन, मस्तुंग, तुर्बत, पास्नी, क्वेटा आणि नोश्कीमध्ये राबवलेली ४० तासांची आक्रमक मोहीम होती. या गटाने असा दावा केला आहे की त्यांनी पाकिस्तानी दलांना मागे हटवले असून त्यात २०० हून अधिक सुरक्षा कर्मचारी मारले गेले आणि १७ जणांना ओलीस ठेवले.

बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी १७ सुरक्षा रक्षक आणि ३१ नागरिकांच्या मृत्यूची नोंद केली आहे. यामध्ये महिला ‘फिदायीन’ (आत्मघाती हल्लेखोर) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे बलुच बंडखोरांनी सांगितले. मारल्या गेलेल्या १८ बीएलए फायटर्सपैकी ११ महिला होत्या. त्यात नोश्कीमधील आयएसआय मुख्यालयावर हल्ला करणारी असिफा मेंगल आणि ग्वादारमधील हावा बलुच यांचा समावेश होता. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, किमान दोन हल्ल्यांमध्ये महिलांचा सहभाग होता.

आत्मघाती हल्लेखोर म्हणून महिलांचा वापर

सुरुवातीच्या काळात बलुच बंडखोरीमध्ये पुरुषांचे वर्चस्व होते. त्यावेळी आत्मघाती हल्ले दुर्मिळ होते आणि यावर टीकाही केली जात असे. मात्र, २०२२ पासून बलुच गटांनी आत्मघाती मोहिमांचा स्वीकार केला आहे आणि यात महिलांची संख्या अधिक असल्याचे चित्र आहे. परंपरेने, बलुच महिला राजकीय संदेश पसरवणे, निधी गोळा करणे, लढवय्यांच्या कुटुंबांना आधार देणे किंवा आंदोलनांमध्ये भाग घेणे अशा भूमिका निभावत असत. एप्रिल २०२२ मध्ये, बीएलएने बलुच बंडखोरीतील पहिल्या महिला आत्मघाती बॉम्बस्फोटाची माहिती दिली आणि त्यानंतर पुढील तीन वर्षांत अशा प्रकरणांमध्ये वाढ झाली.

आत्मघाती हल्ल्याची काही उदाहरणे

शारी बलुच (एप्रिल २०२२): शारी बलुच ही बलुच दहशतवादातील पहिली महिला आत्मघाती हल्लेखोर. तिने कराची विद्यापीठातील कन्फ्यूशियस इन्स्टिट्यूटवर हल्ला केला, ज्यात अनेक चिनी शिक्षक आणि एका पाकिस्तानी ड्रायव्हरचा मृत्यू झाला. ती तुर्बत येथील शालेय शिक्षिका आणि दोन मुलांची आई होती. तिचे वय ३० वर्षे होते. तिने प्राणिशास्त्रात एम.एस्सी. केले होते आणि ती एम.फिल. करत होती.

सुमय्या कलंद्राणी बलुच (जून २०२३): तिने तुर्बतमध्ये लष्करी ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला. यापूर्वी तिने बीएलएच्या मीडिया शाखेत काम केले होते.

महाल बलुच (ऑगस्ट २०२४): मिळालेल्या माहितीनुसार, तिने बेला येथील एफसी कॅम्पच्या गेटवर कार-बॉम्बने हल्ला केला.

महिकन बलुच (मार्च २०२५): कलतमध्ये निमलष्करी ताफ्याला लक्ष्य करून आत्मघाती हल्ला केला.

हे चारही हल्लेखोर बीएलएशी संबंधित होते आणि बहुतेक सुशिक्षित, मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतील होते.

नोकुंडी येथील पहिला आत्मघातकी हल्ला

नोव्हेंबर २०२५ मध्ये जरीना रफीक हिने चाघी जिल्ह्यातील नोकुंडी येथील फ्रंटियर कोअरच्या मुख्यालयात स्फोटकांनी भरलेले वाहन घुसवले. बीएलएफने तिची ओळख त्यांच्या नवनिर्मित ‘सादो ऑपरेशनल बटालियन’ची सदस्य म्हणून केली. बीएलएफकडून महिला आत्मघाती हल्लेखोराचा वापर करण्याचा हा पहिलाच प्रकार होता. यामुळे प्रतिस्पर्धी बीएलए गटांनंतर ही रणनीती अवलंबणारा बीएलएफ हा तिसरा मोठा बलुच गट ठरला.

दहशतवादी गट महिलांचा वापर का करत आहेत?

बलुचिस्तानच्या पितृसत्ताक समाजात, महिला आत्मघाती हल्ला करतात तेव्हा त्यातून एक विशिष्ट संदेश दिला जातो. दहशतवादी गट याकडे असा पुरावा म्हणून पाहतात की, दडपशाहीने महिलांनाही टोकाचा हिंसाचार करण्यास भाग पाडले आहे. तसेच, पुरुषांना बंडखोरीत सामील होण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठीदेखील महिलांच्या सहभागाचा वापर केला जातो.

ही रणनीती आता सर्वच प्रतिस्पर्धी बलुच गटांमध्ये वापरली जात आहे. २०१८ मध्ये, बीएलए-जीयंद प्रमुख अस्लम बलुच यांनी त्यांचा मुलगा रेहान बलुच याला चिनी अभियंत्यांना लक्ष्य करण्यासाठी आत्मघाती हल्ल्यात पाठवले होते. सुरुवातीला त्यावर बीएलए-आझादने टीका केली होती. मात्र, सहा वर्षांनंतर बीएलए-आझादने स्वतः महिकन बलुचचा अशाच एका मोहिमेसाठी वापर केला.