Lifestyle Cancers Are Rising Among Urban Women : देशभरात कर्करोगाचे उच्चाटन करण्यासाठी सरकारी पातळीवर विविध योजना राबविल्या जात असल्या तरी महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. पूर्वी उतारवयात होणारा कर्करोग आता साधारण तिशीतील महिलांना विळखा घालत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात राहणाऱ्या महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर कोलकाता येथील अपोलो कॅन्सर रुग्णालयाचे वरिष्ठ तज्ज्ञ डॉ. संदीप गांगुली यांनी महिलांना होणाऱ्या कर्करोगाविषयीची कारणे सांगितली आहेत. त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…
कर्करोगाचा विळखा कसा वाढतोय?
बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दरवर्षी जगभरात एक कोटीहून अधिक लोकांचा कर्करोगाने मृत्यू होत असल्याची बाब उघड झाली आहे. भारतातही या जीवघेण्या आजाराचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. २०२५ च्या अखेरीस प्रत्येकी पाचपैकी एका पुरुषाला आणि सहापैकी एका महिलेला कर्करोगाची लागण होणार असल्याचा अंदाज ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ या संस्थेने वर्तवला होता. त्यांचा हा अंदाज खरा ठरला असून, कित्येकांना कर्करोगाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. महिलांमध्ये वाढत्या कॅन्सरच्या घटनांमुळे आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्याची गरज अधोरेखित होत आहे. जीवनशैलीत योग्य ते बदल करून हा धोका काही प्रमाणात कमी करता येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
महिलांमध्ये कर्करोगाचं प्रमाण का वाढलंय?
डॉ. गांगुली यांच्या मते, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, वाढता ताण, झोपेची कमतरता आणि स्थूलता यांसारखे घटक महिलांमध्ये कर्करोगाचा धोका वाढवण्यास कारणीभूत ठरत आहेत. केवळ आनुवंशिकता नाही, तर दैनंदिन सवयींमधील बदलांमुळेही महिलांना कमी वयात या जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. कर्करोग हा गंभीर आजार मानला जात असला तरीही त्याचे लवकर निदान झाल्याने त्यावर प्रभावी उपचार केले जाऊ शकतात. त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता, वेळोवेळी त्यासंबंधित तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
आणखी वाचा : तासन् तास स्क्रीनसमोर बसताय? ‘डिजिटल थकवा’ शरीराला पोखरतोय; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय
‘लाइफस्टाईल कॅन्सर’ म्हणजे काय?
कर्करोग हा केवळ आनुवांशिक नसून, आपल्या दैनंदिन सवयींशीही तो निगडित आहे. ज्या कर्करोगांचा धोका पर्यावरणातील बदलांमुळे वाढतो, त्यांना ‘लाईफस्टाईल कॅन्सर’, असे संबोधले जाते. डॉ. संदीप गांगुली यांच्या मते, शहरी महिलांमध्ये कर्करोग वाढण्यामागे चुकीचा आहार, दीर्घकालीन ताण आणि प्रतिबंधात्मक तपासणीतील कमतरता (स्क्रीनिंगचा अभाव) ही तीन प्रमुख कारणे आहेत. आधुनिक जीवनशैलीच्या धावपळीत शहरी महिलांच्या आहार पद्धतीच्या गुणवत्तेत लक्षणीय घसरण दिसून येत आहे. अनेक महिला वेळेअभावी जेवण टाळतात किंवा अत्याधिक प्रक्रिया केलेल्या अन्नावर अवलंबून राहतात. या अन्नपदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स आणि अॅडेटीव्ह्ज जास्त असतात; तर आवश्यक पोषक तत्त्वांची मात्र कमतरता असते. अशा आहारामुळे शरीरात ‘क्रॉनिक इन्फ्लेमेशन’ निर्माण होते, जे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस पोषक ठरते.
कर्करोगासाठी जीवनशैली ठरतेय कारणीभूत
बदलत्या जीवनशैलीमुळे वाढलेला लठ्ठपणा थेट स्तन, कोलन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाशी संबंधित आहे. तसेच महिलांमध्ये मद्यपान आणि तंबाखूच्या वाढत्या वापरामुळे ही समस्या अधिक जटिल होत आहे. आधुनिक शहरी जीवनशैलीत महिलांवर प्रचंड ताण असतो. करिअर, घरगुती जबाबदाऱ्या, सामाजिक अपेक्षा व अपुरी झोप यांमुळे मानसिक ताण वाढतो. त्याशिवाय सततच्या तणावामुळे शरीरात कॉर्टिसॉल आणि इस्ट्रोजेन या संप्रेरकांचे प्रमाणही वाढत आहे. डॉ. गांगुली यांच्या मते, या सर्व प्रक्रियेमुळे शरीरातील दाह वाढतो आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. परिणामी, शरीरात ट्यूमर (गाठ) वाढण्यास पोषक वातावरण मिळते. विशेषतः इस्ट्रोजेनची वाढलेली पातळी स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगासाठी अत्यंत घातक ठरते. अनेक महिला लक्षणे दिसत असूनही किंवा वयोमानानुसार आवश्यक असणारी नियमित तपासणी करत नाहीत. त्यामुळे कॅन्सरचे वेळेत निदान न झाल्याने त्यावर उपचार करणे कठीण होते.
नियमित आरोग्य तपासणीचा अभाव
कर्करोगाच्या वाढत्या धोक्यामागे ‘स्क्रीनिंग’ किंवा प्रतिबंधात्मक तपासणीचा अभाव हे एक सर्वांत मोठे आणि चिंताजनक कारण आहे. अनेक महिला जोपर्यंत आजाराची लक्षणे दिसत नाहीत, तोपर्यंत वैद्यकीय चाचण्या करत नाहीत. मात्र, डॉ. गांगुली यांच्या मते, ‘स्क्रीनिंग’ ही प्रक्रिया मुळात लक्षणे नसलेल्या लोकांसाठीच असते, जेणेकरून आजाराचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान होईल. शहरी भागातील बहुतांश महिलांनी पॅप स्मीअर, मॅमोग्राम किंवा कोलोनोस्कोपी यांसारख्या मूलभूत चाचण्या कधीच केलेल्या नसतात. व्यग्र जीवनशैली किंवा मला हा आजार होणार नाही हा चुकीचा समज यांमुळे या चाचण्या टाळल्या जातात. नियमित ‘पॅप स्मीअर’ चाचणीने गर्भाशयमुखाचा कर्करोगावर पूर्णपणे मात करता येऊ शकते; तर पहिल्या टप्प्यात निदान झाल्यास स्तनाचा कर्करोग बरा होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक वाढते. तसेच, नियमित कोलोनोस्कोपीमुळे कर्करोग होण्याआधीच त्याची चिन्हे ओळखता येतात.
हेही वाचा : करोना लसीमुळे ६० हजार जणांचा मृत्यू? इलॉन मस्क यांच्या दाव्याने खळबळ; काय आहे यामागचं सत्य?
कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी महिलांनी काय करावे?
डॉ. संदीप गांगुली कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी शहरी महिलांना काही महत्वाचे सल्ले दिले आहेत. आहारात फायबरयुक्त (तंतुमय) पदार्थांचा समावेश करा, प्रक्रिया केलेले अन्न आणि मद्यपान टाळा, योगासने, शारीरिक व्यायाम आणि किमान सात-आठ तासांची शांत झोप घेण्याची सवय लावा, जेणेकरून हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होईल. कर्करोगाच्या लक्षणांची वाट पाहू नका. वयानुसार नियमित आरोग्य तपासणी आणि स्क्रीनिंग टेस्ट करून घ्या. जर कुटुंबात कोणाला कर्करोग असेल, तर तुमच्या आनुवांशिक जोखमीबद्दल डॉक्टरांशी मोकळेपणाने चर्चा करा. कर्करोग भेदभाव करीत नाही, तर तो फक्त तुमच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतो. आजच्या शहरी महिलांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे, आता आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष थांबवून, स्वतःच्या संरक्षणाला प्राधान्य देणे काळाची गरज असल्याचे डॉ. गांगुली यांनी स्पष्ट केले आहे.
