महाराष्ट्रातील बुलढाणतील लोणार सरोवर आता स्वत:च्याच वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे धोक्यात आले आहे. त्यामुळे तेथील अनेक प्राचीन मंदिरे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली आहे.
लोणार सरोवर किती प्राचीन आहे?
लोणार हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील याच नावाच्या १.८८ किलोमीटर व्यासाच्या विवरातील खार्या पाण्याचे आणि अत्यंत अल्कधर्मी सरोवर आहे. उल्कापिंडाच्या धडकेने तयार झालेल्या या विवराला केंद्र सरकारने ‘नॅशनल जीओ हेरिटेज साइट’ म्हणून घोषित केले आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, हे जगातील सर्वात मोठे बेसॉल्टिक उल्का-विवर आहे. हे एक रामसर स्थळदेखील आहे, हा संवर्धनाचा दर्जा आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ करारानुसार दिला जातो. वेगवेगळ्या संशोधकांनी या विवराचा काळ वेगवेगळा सांगितला आहे. २०१० मध्ये प्रिन्स्टन विद्यापीठाचे ॲडम मालूफ यांच्या नेतृत्वाखालील एका गटाने या हे सरोवर १२ हजार वर्षांपूरर्वीचे असल्याचे सुचवले होते. तर २०११ मध्ये कर्टिन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे फ्रेड जॉर्डन यांच्या चमूने ते ५.७ लाख वर्षे जुने असल्याचा अंदाज वर्तवला होता. कार्बन डेटिंगनुसार ते ५२ हजार वर्षं इतके आहे.
पाणी पातळी वाढीमागे मानवी हस्तक्षेप?
मागील काही वर्षांत या ठिकाणी विवराच्या रीमवर आणि परिसरात उभ्या आणि आडव्या ट्रेचचे काम (खोल) करण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरले. त्यामुळेही सरोवराच्या पाणी पातळीत वाढ झाली. या ठिकाणी असलेली पिसाळ बाभळीची झाडे मुळासकट उपटली गेली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात माती सैल झाली. पावसाच्या पाण्याबरोबर ती सरोवरास जाऊन मिळाली. त्यामुळे खोली कमी होऊन सरोवर उथळ झाले. त्यामुळेही त्याच्या पाणी पातळीत वाढ झाली. लोणार शहरातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात सरोवरात जात आहे. नीरीचा सांडपाणी प्रकल्पहीदेखील गुलदस्त्यात आहे. पर्यटकांसाठी सरोवराच्या काठावर रस्ता तयार करण्यात आला आहे. त्याची माती, मुरूमही सरोवराच्या तळाशी गेले. वन विभागाने वृक्षारोपणासाठी सुबाभळीची झाडे काढून खड्डे खणले. त्यामुळे आतापर्यंत सुबाभळीच्या मुळांनी धरून ठेवलेली माती सरोवरात गेली. त्यामुळे सरोवराची खोली कमी होऊन पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
लोणार सरोवराला अभयारण्य मारक?
लोणार अभयारण्याची स्थापना ३ जून २००० साली झाली. लोणार सरोवर आणि परिसराचे संवर्धन तसेच मानवी हस्तक्षेप नियंत्रित करणे हा त्यामागील उद्देश होता. बर्याच अंशी तो सफलही झाला. २०१८ मध्ये हे अभयारण्य वन्यजीव विभागाच्या ताब्यात आले. तोपर्यंत उच्च न्यायालय व सरकारचेही बर्यापैकी लक्ष या सरोवराकडे वेधले गेले होते. निधीचा ओघही वन विभागाकडे पाझरत गेला. लोणार विवर हे ‘नॅशनल जीओ हेरिटेज साइट’ आहे आणि या ठिकाणी जंगल-वन्यजीव व मानवनिर्मित स्मारके या बाबी दुय्यम ठरतात. उल्कापाताने निर्मित विवराचे संवर्धन की वनविकास असे द्वंद्व उभे राहिले तेव्हा संवर्धनाकडे दुर्लक्ष आणि वनविकासाला प्राधान्य देण्यात आले. हीच बाब या सरोवरासाठी मारक ठरली.
सरोवरात पाणी कधीपासून वाढत आहे?
जून २०१७ मध्ये स्थापन झालेल्या ‘मी लोणारकर’ समूहाने २०२१ मध्येच सरोवराचे पाणी वाढत असल्याचा इशारा दिला होता. जून २०२० मध्ये सरोवराचे पाणीदेखील गुलाबी झाले होते. २०२२ पासून सरोवरातील पाण्याची पातळी सुमारे चार मीटरने वाढली आहे. सरोवर परिसरात सुमारे १४ मंदिरे आहेत. पैकी आठ ते दहा पाण्याखाली आहेत. सर्वाधिक फटका कमळजा देवी मंदिराला बसला आहे. हे मंदिर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत असले तरीही विभागाने या मंदिरांकडे कधीही लक्ष दिलेले नाही.
न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर काय घडले?
जानेवारीच्या अखेरीस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणाची दखल घेतली. आता सरोवरातील वाढत्या पाण्यापासून मंदिरे सुरक्षित ठेवण्यासाठी तात्पुरती खबरदारी म्हणून खडक किंवा काँक्रीटने भरलेल्या, तारांच्या जाळीच्या पिंजर्यांची रचना करून तयार केलेली ‘गॅबियन’ ही संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. या सरोवराला त्याच्या परिसरात असलेल्या अनेक झर्यांमधील पाणी येऊन मिळते. तात्पुरता उपाय म्हणून या झर्यांचे पाणी वळवण्याचा किंवा थांबवण्याचा पर्याय सुचवण्यात आला आहे. येत्या काळात, सरोवराचे भूवैज्ञानिक आणि भू-जलशास्त्रीय सर्वेक्षण करणे आवश्यक असून त्यामुळे खालच्या जलस्तरांची आणि पुनर्भरण क्षेत्राची अधिक माहिती मिळेल. त्या माहितीमुळे त्या भागावर प्रक्रिया आणि सिमेंटिंग करणे शक्य होईल, असेही न्यायालयात सुचवण्यात आले.

