रायगड जिल्ह्यातील काशिद समुद्र किनाऱ्यावर बुडू लागलेल्या डोंबिवली येथील रोबोटिक वॉटरक्राफ्टच्या मदतीने वाचविण्यात आले. राज्यात पहिल्यांदाच रोबोटिक वॉटरक्राफ्टच्या मदतीने हे मदत व बचाव कार्य राबविण्यात आले. कोकणकिनारपट्टीवर समुद्र किनाऱ्यांवर बुडणाऱ्या पर्यटकांना मदत व बचाव कार्यात या रोबोटिक वॉटरक्राफ्ट उपयुक्त ठरतील का, याचा थोडक्यात आढावा….

काशिदला काय घडले?

डोंबिवली येथे राहणारे फुरकन शेख आणि कैफ शेख हे दोघे तरुण आपल्या सहकाऱ्यांसमवेत रायगड जिल्ह्यातील काशिद समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आले होते. जेवण करून सर्वजण समुद्रस्नानासाठी उतरले. किनारपट्टीवरील भागात वारे वाहात होते. त्यामुळे समुद्र काहीसा खळवलेला होता. दोघेही स्थानिकांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून खोल समुद्राच्या दिशेने जाऊ लागले. पाण्याचा अंदाज न आल्याने नंतर गटांगळ्या खाऊ लागले. मदतीसाठी याचना करू लागले. दोन पर्यटक बुडत असल्याची माहिती किनाऱ्यावरील जीवरक्षक आणि पोलिसांना मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रोबोटिक वॉटरक्राफ्ट पाण्यात उतरवली. बुडणाऱ्या फुरकन आणि कैफ यांच्या दिशेने पाठवली. काही क्षणात लाटांचा मारा चुकवत ही क्राफ्ट दोघांपर्यंत पोहोचली. रोबोटिक वॉटरक्राफ्टने दोघांनाही सुखरूप बाहेर काढले. अतिशय कमी वेळात मदत मिळाल्याने दोघांचाही जीव वाचला.

रोबोटिक वॉटरक्राफ्ट म्हणजे काय?

रोबोटिक वॉटरक्राफ्ट म्हणजे समुद्रात अथवा पाण्यात बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविण्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे. ते रिमोट कन्ट्रोल अथवा स्वयंचलित पद्धतीने काम करू शकते. अत्याधुनिक लाईफ सेव्हिंग यंत्र म्हणून हे ओळखले जाते. स्थिर अथवा वाहत्या पाण्यात हे अतिशय जलद पद्धतीने काम करू शकते. मानवी जीवरक्षकांच्या मदतीसाठी हे अत्यंत उपयुक्त उपकरण म्हणून ओळखले जाते. आपत्कालिन परिस्थितीत जलद प्रतिसादासाठी हे उपकरण तयार करण्यात आले आहे. फ्लोटींग बॉयला पर्याय म्हणून या रोबोटिक वॉटरक्राफ्टचा वापर केला जाऊ शकतो. याची किंमत पाच ते दहा लाखांपर्यत असू शकते.

कशी काम करते रोबोटिक वॉटरक्राफ्ट?

रोबोटिक वॉटरक्राफ्ट ही स्वयंचलित पद्धतीने अथवा रिमोट कन्ट्रोलच्या साह्याने वापरता येऊ शकते. पाण्यात अडकलेल्या व्यक्तीपर्यंत अत्यंत वेगाने पोहोचण्याची क्षमता यामध्ये असते. एका वेळी दोन व्यक्तींचे जीव रोबोटिक वॉटरक्राफ्ट वाचवू शकते. जवळपास २०० किलो वजन वाहून आणण्याची क्षमता या वॉटरक्राफ्टमध्ये असते. समुद्र किनाऱ्यावर भरती आणि ओहोटी अशा दोन्ही वेळी वॉटरक्राफ्ट वापरता येऊ शकते. भारतीय सुरक्षा यंत्रणांनीही या रोबोटिक वॉटरक्राफ्टच्या कार्यक्षमतेची पडताळणी केली आहे. समुद्रात कोणी बुडताना दिसल्यास या जीवरक्षक रोबोला पाण्यात सोडतात. काही क्षणात रोबोटिक क्राफ्ट बुडणाऱ्या व्यक्ती पर्यंतपोहोचते. ती व्यक्ती रोबोटिक क्राफ्टला पकडते, आणि नंतर रोबोटिक क्राफ्ट त्या व्यक्तीला सुरक्षीतपणे किनाऱ्यावर घेऊन येतो.

कोकणात कुठे तैनात?

रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रथमच कोकण किनारपट्टीवर रोबोटिक वॉटरक्राफ्ट पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध करून दिले आहेत. रायगड जिल्ह्यातील नागाव, काशिद आणि हरिहरेश्वर या तीन समुद्र किनाऱ्यांवर हे उपकरण सध्या उपलब्ध करून देण्यात आले आहे. ते कसे वापरावे याचे प्रशिक्षण स्थानिक बचाव पथकांना देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी येत्या काही काळात जिल्ह्यातील सर्व समुद्र किनाऱ्यांवर ज्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात तिथे रोबोटिक वॉटरक्राफ्ट तैनात करण्याची घोषणा केली आहे.

मदत व बचाव कार्यासाठी किती उपयुक्त?

कोकण किनारपट्टीवर दरवर्षी जवळपास ८० ते १०० पर्यटकांचा बुडून मृत्यू होतो. कोकणातील समुद्र किनारे, खाड्या, नद्या आणि पावसाळ्यात धबधबे, आणि धरण क्षेत्रात दरवर्षी लाखो पर्यटक दाखल होत असतात. स्थानिक परिस्थितीची त्यांना जाणीव नसते. भरती, ओहोटीचा अंदाज नसतो. काही वेळा मद्य प्राशन करून पर्यटक पाण्यात उतरतात, उत्साहाच्या भरात ते खोल समुद्राच्या दिशेने जातात. नंतर पाण्याचा अंदाज न आल्याने बुडतात. गेल्या काही वर्षात मुरुड, हरिहरेश्वर, काशीद, दिवेआगर, गणपतीपुळे, गुहागर येथे पर्यटक बुडण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यातील काही घटनांमध्ये पर्यटकांचे मृत्यूदेखील झाले आहेत. मानवी जीव रक्षकांच्या मदतीला मर्यादा आहेत. अशा वेळी रोबोटिक वॉटरक्राफ्ट मदत व बचाव कार्यासाठी उपयुक्त ठरू शकते हे काशीद येथील घटनेमुळे सिद्ध झाले आहे. बरेचदा मदतीसाठी गेलेल्या जीव रक्षकाना बुडणारे पर्यटक घट्ट पकडून धरतात त्यामुळे त्यांचे जीवही धोक्यात येतात. अशा परिस्थितीत रोबोटिक वॉटरक्राफ्ट उपयोग महत्त्वाचा ठरू शकतो. कोकणात दरवर्षी महाड, नागोठणे, रोहा, खेड, चिपळूण, राजापूर आणि संगमेश्वर परिसराला पूरस्थितीला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत अडकून पडलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी या वॉटरक्राफ्टचा वापर केला जाऊ शकतो.

harshad.kashalkar@expressindia.com