Milk Teeth Benefits in Speech: “दुधाचे दात तात्पुरते असतात, मुलांची वाढ होते आहे याचं केवळ ते एक चिन्ह आहे, बाकी काही नाही” हे वाक्य आपण अनेक पालकांकडून ऐकलेलं असतं. दुधाचे दात तात्पुरते असतात हे जरी खरं असलं, तरी ते ‘महत्त्वाचे नाहीत’ असं मानणं चुकीचं आहे. दुधाचे दात केवळ बाळाचं वय वाढण्याचं चिन्ह नसून त्याचं संभाषण, चेहऱ्याची रचना आणि जबड्याच्या वाढीच्या प्रक्रियेत ते महत्त्वाची भूमिका बजावतात. पण, मग बाळाच्या बोलण्याचा आणि दुधाच्या दातांचा परस्पर संबंध काय आहे?
स्वरयंत्राची रचना कशी असते?
भाषाविज्ञानाच्या व्यापक अभ्यासात ‘स्वनविज्ञान’ ही सर्वांत मूलभूत अभ्यासशाखा आहे, ज्यामध्ये मुखावाटे स्वनांची (स्वर) निर्मिती कशी होते याचा अभ्यास केला जातो. या स्वनविज्ञानाचा पुढे तीन विभागांत अभ्यास केला जातो, ज्यामध्ये उच्चारणकेंद्री, संचारणकेंद्री आणि श्रवणकेंद्री असे अभ्यास आहेत. आपल्याला या विश्लेषणासाठी उच्चारणकेंद्री स्वनविज्ञानाच्या अभ्यासावर भर द्यायचा आहे.
स्वननिर्मितीसाठी आपल्या शरीरातील फुप्फुसे, श्वासनलिका, स्वरतंत्री, घसा, पडजीभ, मुखविवर (तोंडातली पोकळी), नासिकाविवर (नाकाची पोकळी), टाळू, दात, ओठ, जीभ अशा विविध अवयवांचा उपयोग केला जातो. या सर्व अवयवांना वाक् इंद्रिय असं म्हणतात.
स्वनांचं उच्चारण कसं होतं, मानवी मुखावाटे वेगवेगळे स्वन कसे उच्चारले जातात, यासाठी स्वरयंत्राची रचना समजून घेणं गरजेचं आहे:

मुखविवरातील मुख्य उच्चारणस्थाने पुढीलप्रमाणे :
- कंठद्वारीय स्वन (Glottal) : स्वरयंत्रातील कंठद्वारातून उच्चारले जाणारे स्वन – ‘ह्’
- मृदूतालव्य (Velar) : जीभेचा मागचा भाग वर उचलून मृदू टाळूजवळ नेला जातो – क्, ख्, ग्, घ् (परंपरेने या स्वनांना कंठ्य म्हणतात, पण काही तज्ज्ञांच्या मते त्यांना उच्चारण अवयवांवरून ओळखलं जाणं अधिक योग्य आहे).
- मूर्धन्य स्वन (Retroflex) : जेव्हा जिभेला उलटं वळवून टाळूच्या मुर्धा (टाळूचा मागचा कठीण भाग) या भागाला स्पर्श केला जातो – ट्, ठ्, ड्, ढ्, ण्. (याला प्रतिवेष्ठित स्वन असंही म्हणतात)
- तालव्य (Palatal) : जिभेचा पुढचा भाग कठीण टाळूला (टाळूच्या मधल्या भागाला) स्पर्श करतो – च्,छ्, ज्, झ्, य्, श.
- दंतमूलीय स्वन (Alveolar) : जिभेचं टोक दंतमूळांना स्पर्श करते – त्, थ्, द्, ध्, न् (काही मतांनुसार ‘स्’ सुद्धा दंतमूलीय आहे असं मानलं जातं).
- दंत्य (Dental) : या स्वनांच्या निर्मितीच्या वेळी दंतमूळांऐवजी वरचे दात हे उच्चारण स्थान असतं, त्यामुळे त्, थ्, द्, ध्, न् या स्वनांचं उच्चारण दंत्य पण करतात.
- ओष्ठ्य स्वन (Bilabial) : ज्या स्वनांचा उच्चार करताना दोन्ही ओठ एकमेकांना स्पर्श करतात, त्या स्वनांना ओष्ठ्य स्वन म्हणतात – प्, फ्, व्, भ्, म्.
- दंत्यौष्ठ्य स्वन (Labiodental) : ‘फ़्’ चा उच्चार नेहमीच ओष्ठ्य होतो असं नाही. इंग्रजीतील ‘फ़्’ चा उच्चार हा मराठीतील ‘फ़्’ चा उच्चार यात फरक आहे. इंग्रजीतील ‘FAR’ हा शब्द उच्चारून पहा आणि मराठीतील ‘फार’ हा शब्द उच्चारून पहा – फरक जाणवतोय? याचं कारण असं – इंग्रजीत ‘फ़्’ चा उच्चार ओष्ठ्य नसतो; इंग्रजीतील उच्चार करताना खालच्या ओठाला वरच्या दातांचा स्पर्श होतो, हवा अडखळली जाते (मुखविवर) आणि मग स्वन उच्चारलं जातं. याउलट मराठीत ‘फ़्’ चा उच्चार करत असताना दोन्ही ओठ एकमेकांना स्पर्श करतात, हवा बाहेर फेकली जाते आणि मग ‘फ़्’ स्वन उच्चारला जातो.

कोणत्या स्वनांसाठी दात आवश्यक असतात?
दंतमूलीय, दंत्य, दंत्यौष्ठ्य हे तीन उच्चारणकेंद्री स्वनांचे प्रकार उच्चारण्यासाठी दातांचा वापर केला जातो. या स्वनांचे उच्चारण करताना जीभ किंवा ओठ दातांना स्पर्श करतात किंवा त्यांच्या अगदी जवळ येतात. जर पुढचे दात नसतील किंवा त्यांमध्ये मोठी फट असेल, तर हे आवाज अस्पष्ट किंवा वेगळे वाटू शकतात. लहान मुलांमध्ये अशा वेळी थोडासा ‘तोतरेपणा’ किंवा अस्पष्ट उच्चार दिसून येऊ शकतो.
दुधाच्या दातांची गरज कशाला?
साधारणतः बाळाचे दुधाचे दात आणि त्याचं बोलणं जवळपास एकाच वेळी विकसित होत असतात! सहा महिन्यांपासून ते तीन वर्षांपर्यंत, दात एकामागून एक येत राहतात आणि नेमक्या याच काळात बाळ पहिले शब्द बोलायला, वाक्य जोडायला शिकत असतं.
दात आणि जीभ एकत्र कसे काम करतात?
एखादा विशिष्ट आवाज काढताना जीभेला नेमकं कुठे थांबायचं, कुठे टेकायचं हे कळण्यासाठी दात मदत करतात. जर दातच नसतील, तर जीभेला योग्य जागा शोधणं कठीण जातं आणि बाळ नकळत आवाज काढण्याची वेगळी, चुकीची पद्धत अंगीकारू शकतं, जी पुढे सवय बनून राहू शकते.
दातांचं काम केवळ बोलण्यापुरतं?
दात फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाहीत. त्यांचा परिणाम तोंडाच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंवरही होतो. अन्न चावताना जे स्नायू वापरले जातात, तेच स्नायू बोलतानाही कामाला येतात. सतत योग्य पद्धतीने चावण्याने हे स्नायू बळकट होतात आणि त्याचा थेट फायदा स्पष्ट उच्चारासाठी होतो, म्हणजेच तोंडाच्या स्नायूंचा विकास आणि बोलण्याची स्पष्टता यांचा जवळचा संबंध आहे. जे बाळ नीट चावू शकत नाही, त्याच्या तोंडाचे स्नायू तितके सक्षम होत नाहीत आणि याचा परिणाम बोलण्यावरही दिसू शकतो, असे मुंबईस्थित बालरोग दंतचिकित्सक डॉ. करुण बंठिया सांगतात,
“दुधाचे दात महत्त्वाचे नाहीत हा एक मोठा गैरसमज आहे. लोकांना वाटतं की हे दात कायमस्वरूपी नाहीत, त्यामुळे त्यांची काळजी घ्यायची गरज नाही – पण, हा खूप मोठा गैरसमज आहे. दुधाचे दात कायमस्वरूपी दातांचा पाया असतात. ते फक्त खाण्यासाठीच नाही, तर मुलाच्या बोलण्याच्या विकासासाठीही मदत करतात. उदाहरणार्थ, पुढचे दात ‘त’ सारखे उच्चार शिकण्यास मदत करतात. ज्या मुलांचे दात लवकर पडतात, त्यांना स्पष्ट बोलणं शिकण्यात अडचण येते आणि काही मुलं तोतरं बोलायलाही सुरुवात करतात.”
बालरोग दंतचिकित्सक की वाचास्पर्श उपचारतज्ज्ञ : सल्ला कोणाचा घ्यावा?
अनेक पालकांना संभ्रम पडतो – बाळाच्या बोलण्यात अडचण दिसल्यास नेमकं कोणाकडे जावं? दोघांचं काम वेगळं आहे. बालरोग दंतचिकित्सक दातांची तपासणी करतो; दात योग्य वेळी येत आहेत का, किडलेले नाहीत ना, जबडा नीट वाढतोय का हे पाहतो. याउलट, वाचास्पर्श उपचारतज्ज्ञ बाळाचा उच्चार, शब्दसंग्रह आणि भाषेचा वापर तपासतो. अनेकदा दातांची समस्या हे बोलण्यातील अडचणीचं एक कारण असू शकतं, त्यामुळे गरज पडल्यास दोघांचाही सल्ला एकत्र घेणं फायद्याचं ठरतं. दात किडले, तुटले किंवा लवकर पडले तर आधी दंतचिकित्सकाकडे जाणं योग्य; पण उच्चारातील अडचण दातांशी संबंधित नसेल तर स्पीच थेरपिस्टची मदत घ्यावी.
दुधाचे दात “तात्पुरते आहेत म्हणून दुर्लक्ष करण्यासारखे आहेत” हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. हे दात बाळाच्या बोलण्याच्या विकासात, विशिष्ट आवाज स्पष्ट उच्चारण्यात आणि तोंडाच्या स्नायूंच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे बाळाच्या दुधाच्या दातांची काळजी घेणं म्हणजे केवळ दातांची नाही, तर बाळाच्या एकूण बोलण्याच्या आणि भाषेच्या विकासाची काळजी घेणं आहे. पालकांनी वेळोवेळी दातांची तपासणी करून घेणं, स्वच्छतेकडे लक्ष देणं आणि गरज वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं; हे बाळाच्या भविष्यातील स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण बोलण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरतं.
