Superhero rat who detected 100 landmines जगभरात भूसुरुंग शोधण्याच्या कामात तरबेज असलेल्या एका उंदराची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. कारण- भूसुरुंग शोधून या उंदराने नवा विक्रम रचला आहे. कंबोडियात १०० हून अधिक भूसुरुंग शोधून काढणाऱ्या रोनिन नावाच्या एका आफ्रिकन उंदराचे ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदवण्यात आले आहे. रोनिनने मगावा नावाच्या उंदराने केलेला मागील विक्रमही मोडला. कंबोडियामध्ये अजूनही लाखो भूसुरुंग आणि युद्धसाठे आहेत, ज्यांचा शोध उंदरांच्या मदतीने लावला जात आहे. मात्र, चर्चेत असलेल्या या उंदराने भूसुरुंगांचा शोध कसा लावला? उंदरांना याचे प्रशिक्षण कसे दिले जाते? एका उंदराचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये कसे नोंदवले गेले? त्याविषयी जाणून घेऊ…
उंदरांना प्रशिक्षण कसे दिले जाते?
‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार, २०२१ पासून रोनिनने १०९ भूसुरुंग आणि १५ न फुटलेल्या तोफा शोधून काढल्या आहेत. बेल्जियमच्या एका संस्थेने या उंदराला भूसुरुंग शोधण्यासाठी प्रशिक्षित केले आहे. अशा तब्बल १०४ उंदरांना या संस्थेने प्रशिक्षित केले आहे, त्यापैकी रोनिन एक आहे. या उंदरांना ‘हीरो रॅट्स’ असे नाव देण्यात आले आहे. ही संस्था अनेक दशकांपासून उंदरांना विशिष्ट कामासाठी प्रशिक्षण देत आहे, ज्याचा मोठ्या प्रमाणात भूसुरुंग शोधण्यासाठी फायदा झाला आहे. ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, रोनिन पाच वर्षांचा आहे. रोनिन आणि इतर उंदरांना ग्रिड पॅटर्नमध्ये काम करायला शिकवले जाते. ते जमिनीवर नखे मारतात आणि भूसुरुंग कोणत्या दिशेने आहे, हे निर्देशित करतात.

‘हीरो रॅट्स’ सहसा दररोज अर्धा तास काम करतात. ‘हीरो रॅट्स’ला भूसुरुंग आणि इतर स्फोटकांसारख्या शस्त्रांमधील रसायने कशी शोधायची याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्याकडून भूसुरुंगांचा स्फोट होणे अशक्य असते. कारण- ते आकाराने खूप लहान आहेत. उंदीर केवळ अर्ध्या तासाच्या कालावधीत टेनिस कोर्टच्या आकाराचा परिसर शोधून काढू शकतात, असे ‘बीबीसी’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. त्या तुलनेत माणसांना मेटल डिटेक्टर वापरून त्याच भागात शोध घ्यायचा असल्यास, चार दिवसांचा कालावधी लागतो.
उंदरांकडून एका विशिष्ट वयापर्यंत काम करून घेतले जाते. त्यानंतर त्यांना निवृत्ती दिली जाते आणि आपोपो ही संस्था त्यांची काळजी घेते. रोनिनचे सहकारी मित्र त्याचा उल्लेख कष्टाळू आणि मैत्रीपूर्ण, असा करतात. ‘बीबीसी’च्या वृत्तानुसार, रोनिनने मगावा या उंदराचा विक्रम मोडला आहे. मगावा या उंदराने ७१ भूसुरुंग शोधून काढले आणि त्याबद्दल २०२० मध्ये सुवर्णपदक देऊन, त्याचा सन्मान करण्यात आला होता. २०२१ साली मगावा सेवेतून निवृत्त झाला आणि २०२२ मध्ये त्याचे निधन झाले. रोनिन हा अपोपोच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी माइन डिटेक्शन रॅटपैकी (एमडीआर) एक आहे.

भूसुरुंग शोधण्यात रोनिनची मदत
“रोनिनमध्ये अतिशय एकाग्रता आणि काम करण्याची उत्सुकता आहे. त्यामुळे त्याला हे यश मिळाले आहे. त्याची बुद्धिमत्ता आणि त्याच्यातील उत्सुकता त्याला कामातील एकाग्रता वाढवण्यास मदत करते. भूसुरुंग शोधणे त्याच्यासाठी एका गमतीशीर खेळासारखे आहे,” असे अपोपो या संस्थेच्या प्रवक्त्या लिली शालोम यांनी सांगितले. “रोनिनचे हे यश उंदरांच्या असामान्य क्षमतांचा पुरावा आहे. तो आमच्यासाठी केवळ एक प्राणी नसून एक सहकारी आहे,” असे त्याचे हँडलर फॅनी यांचे सांगणे आहे. त्याच्या अविश्वसनीय कामगिरीमुळे त्याला उंदरांनी शोधलेल्या सर्वाधिक भूसुरुंगांसाठी ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’चा किताब मिळाला आहे. त्यामुळे माणसांच्या आयुष्यात हीरो रॅट्सचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे, असे अपोपो या संस्थेने ‘एबीसी’ या वृत्तसंस्थेला सांगितले.
१९६० च्या दशकात कंबोडियामध्ये युद्धाला सुरुवात झाली होती. हे गृहयुद्ध ३० वर्षांहून अधिक काळ चालले. त्या युद्धातील खाणी, दारूगोळे आणि इतर शस्त्रे आजही अस्तित्वात आहेत, ज्याचा धोका कंबोडियातील अनेक नागरिकांना आहे. कंबोडिया हा देश जगातील सर्वांत जास्त भूसुरुंग असणाऱ्या देशांपैकी एक आहे. एका अहवालात ही धक्कादायक बाब उघड झाली होती. ‘सीबीएस’ने लँडमाइन मॉनिटरच्या २०२४ च्या अहवालाची माहिती देत म्हटले होते की, कंबोडियामध्ये सहा दशलक्षांपर्यंत स्फोट न झालेले भूसुरुंग असू शकतात. खाणी आणि न फुटलेल्या शस्त्रांमुळे कंबोडियामध्ये होणारे मृत्यू सामान्य आहेत. १९७९ पासून सुमारे २०,००० मृत्यू आणि ४५,००० जण जखमी झाले आहेत.
फेब्रुवारीमध्ये रीप प्रांतात देशाच्या गृहयुद्धानंतर जमिनीत पुरण्यात आलेल्या ग्रेनेडच्या स्फोटात दोन कंबोडियन बालकांचा मृत्यू झाला होता. कंबोडियाने २०२५ पर्यंत या सर्व खाणींचा शोध घेत त्यांच्यापासून मुक्त होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, निधीच्या कमतरतेमुळे, तसेच थायलंडच्या सीमेवर नवीन भूसुरुंग क्षेत्रे आढळल्यामुळे सरकारने हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणखी पाच वर्षांचा कालावधी लागेल, असे सांगितले आहे.