Solar Panel Subsidy Benefit : भारतीय ग्राहक हे वस्तू किंवा सेवेचा लाभ घेण्याआधी त्याच्या किंमतीबाबत अत्यंत संवेदनशील असतात. घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती करणारे पॅनेल लावण्याआधी देखील ग्राहकाने खर्च व त्यातून मिळणारा फायदा यांचा विचार केलेला असतो. एकदाच खर्च करायचा, तो खर्च पुढील काही वर्षांत वसूल करायचा आणि नंतर कमी वीज बिलाचा आनंद घ्यायचा, असा विचार करून सौर ऊर्जेचे पॅनल घराच्या छतावर लावले जाते. वीजेचे वाढत जाणारे दर आणि सरकारकडून दिले जाणारे अनुदान यांमुळे सौर ऊर्जेचे पॅनल बसवून घेण्याकडे कल वाढला आहे. पण, असे केल्याने शहरी भागात राहणाऱ्या मध्यमवर्गीयांचे खरोखर पैसे वाचतात का? वीज बिलाची बचत होते का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

सौर पॅनेलचा सुरूवातीचा खर्च किती वर्षांत होतो वसूल?

सोलारस्क्वेअर कंपनीच्या सीईओ आणि सह-संस्थापक श्रेया मिश्रा यांनी सौर पॅनेल व बचत याबद्दल माहिती दिली आहे. घराच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यासाठी लागणारा खर्च साधारणपणे ३ ते ५ वर्षांत वसूल होतो. सौर पॅनेलमधून पुढील २५ ते २७ वर्षे वीज निर्मिती होते. “सुरूवातीला केलेला खर्च वसूल झाल्यानंतरही पुढील २० ते २२ वर्ष सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती होते”, असे मिश्रा म्हणाल्या.

किती किलोवॅटचे सौर पॅनेल बसवावे?

सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या सौर पॅनेलचे आर्थिक गणित मुख्यत: चार घटकांवर अवलंबून असते. सुरुवातीचा इन्स्टॉलेशन खर्च, सरकारी अनुदान, महिन्याचा वीज वापर आणि स्थानिक वीज दर हे चार महत्त्वाचे घटक आहेत. सौर ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, दरमहा ३००-५०० युनिट वीज वापरणाऱ्या शहरी कुटुंबासाठी साधारणपणे ३ किलोवॅट (kW) ते ५ किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनेल पुरेसे असते. ‘सोलारस्क्वेअर’च्या आकडेवारीनुसार, भारतात सरासरी १ किलोवॅट क्षमतेचा सौर पॅनेल वर्षाला सुमारे १,४००-१,४५० युनिट वीज निर्मिती करतो.

या प्रमाणे ३ किलोवॅटचा सौर पॅनेल वर्षाला अंदाजे ४,२००-४,३५० युनिट्स वीज तयार करू शकतो. तर ५ किलोवॅटचा सौर पॅनेल वर्षाला अंदाजे ७,०००-७,२५० युनिट्स वीज तयार करू शकतो. ज्या कुटुंबांना विजेसाठी प्रति युनिट ७ ते १० रुपये मोजावे लागतात, त्यांच्यासाठी ही वार्षिक बचत खूप मोठी असते. दरमहा सुमारे ४०० युनिट वापरणाऱ्या कुटुंबाचा वार्षिक वीज खर्च ४० हजार ते ५० हजार रुपये असू शकतो. विजेचे दर सतत वाढत राहिल्यास, पुढील २५ वर्षांत हे बिल १० लाख रुपयांच्या पुढे जाऊ शकते. या खर्चाचा मोठा भाग हा सौर पॅनेल बसवल्याने वाचू शकतो, असा सोलर कंपन्यांचा दावा आहे.

सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदान किती?

सौर पॅनेल बसवण्यात सुरुवातीला लागणारी गुंतवणूक हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अडथळा होता, पण आता सरकारी अनुदानामुळे हे चित्र बदलत आहे. ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजने’अंतर्गत केंद्र सरकार घरगुती सौर पॅनेल उभारण्यासाठी ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान देत आहे. काही राज्ये अतिरिक्त सवलतीही देत आहेत. ‘सोलारस्क्वेअर’च्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात ३० हजार, दिल्लीत ३० हजार, तर आसाममध्ये ४५ हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त अनुदान ग्राहकांना दिले जाते. अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी यामुळे सौर बसवण्याचा प्रत्यक्ष खर्च कमी झाला आहे. जॅक्सन ग्रुपचे सह-व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ गगन चडाणा यांच्या मते, सौर पॅनेल आणि इतर उपकरणांच्या किमती कमी झाल्यामुळे ते आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहे.”

‘पेबॅक पिरियड’ संपल्यानंतर वीज मिळते मोफत?

“सौर ऊर्जेकडे वळण्याची यापेक्षा चांगली संधी कुटुंबांना यापूर्वी कधीच नव्हती”, असे गगन चडाणा म्हणाले. सौर पॅनेलबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘पेबॅक पिरियड’ ही आहे. वीज बिलातील बचतीद्वारे तुमची सुरुवातीची गुंतवणूक वसूल करण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे ‘पेबॅक पिरियड’ आहे. अंदाजानुसार, बहुतांश घरांसाठी हा कालावधी साधारणपणे ४ ते ५ वर्षांचा असतो. (पेबॅक पिरियड = सुरुवातीचा सोलर खर्च भागीले वार्षिक वीज बिल बचत} हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सौर पॅनेलसाठी किरकोळ देखभाल खर्च येतो. तर हा खर्च वगळल्यास त्याद्वारे मिळणारी वीज ही पूर्णपणे मोफत मिळते. घरातील इतर उपकरणांचे मूल्य काळानुसार कमी होते आणि त्यातून कोणतीही बचत होत नाही. याउलट सोलर पॅनेल पुढील वीस वर्षांहून अधिक काळ दरमहा तुमचे वीज बिल कमी करत राहतात.

सौर पॅनेल बसवण्याआधी १ वर्षाच्या वीज बिलांचे मुल्यांकन का आवश्यक?

सौर क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, कमी गुणवत्तेचे सौर पॅनेल बसवल्यास त्यातून आर्थिक नफा मिळेलच, असे नाही. सौर पॅनेल निवडताना ग्राहकांनी गुणवत्ता, विक्रीनंतर मिळणारी सेवा यांवर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. खरेदीदारांनी सोलर मॉड्यूल्स हे ALMM या सरकारच्या मंजूर यादीतील आहेत का याची खात्री करावी आणि पॅनेलच्या कार्यक्षमतेत होणारी दीर्घकालीन घट समजून घ्यावी. सौर प्रणालीचा आकार देखील महत्त्वाचा असतो. प्रमाणापेक्षा मोठी प्रणाली बसवल्यास अनावश्यक खर्च वाढतो, तर गरजेपेक्षा लहान प्रणालीमुळे बचतीची क्षमता कमी होते. तज्ज्ञांनी सौर पॅनेल निवडण्यापूर्वी किमान एक वर्षाच्या वीज बिलांचे मूल्यांकन करण्याचा सल्ला दिला आहे.

पावसाळ्यात सौर पॅनेल आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते का?

ढगाळ हवामानामुळे सौर ऊर्जेचे आर्थिक गणित बिघडते का? असा प्रश्न अनेक ग्राहकांना पडलेला असतो. तज्ज्ञांच्या मते, वार्षिक सौर ऊर्जा निर्मितीच्या हिशोबात पावसाळ्याचा विचार आधीच केलेला असतो. पावसाळ्यात वीज निर्मिती कमी होत असली, तरी उन्हाळ्यातील जोमदार उत्पादन वर्षभराची सरासरी भरून काढते. पावसाळ्यातील कमी वीज उत्पादनाचा विचार करूनही ‘पेबॅक पिरियड’चे गणित बहुतांश अंशी कायम राहते. विजेचे दर काळानुसार वाढतच जातात. परंतु, एकदा ‘रुफटॉप सौर सिस्टीम’ बसवली की, घरातील वीज निर्मितीचा मोठा हिस्सा स्थिर खर्च बनतो. त्यामुळे दीर्घकालीन आर्थिक फायदा होतो. विजेचे दर वर्षानुवर्षे वाढत जातात, तशी सौर पॅनेलमुळे होणारी बचतही आपोआप वाढत जाते. त्यामुळे याकडे एक ‘आर्थिक मालमत्ता’ म्हणून पाहिले जाऊ शकते. सौर पॅनेल बसवण्यासाठी लागलेली सुरुवातीची गुंतवणूक वसूल झाल्यानंतर दोन दशकांहून अधिक काळ आर्थिक बचत होऊ शकते.