Rosy Starling murmuration: दिवेलागणीची वेळ झाली. सूर्य मावळत असताना आभाळ केशरी-गुलाबी रंगाने रंगलंय. तेवढ्यात क्षितिजावर एक काळसर ढग दिसतो. आकाशात पाहताना हा परतीचा पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे आभाळ भरून आलं असावं असा आपला भ्रम होतो. मात्र, तो पावसाचा ढग नसतो – तो वळतो, पसरतो, आकुंचन पावतो, क्षणात नागमोडी वळण घेतो आणि पुढच्याच क्षणी गोल फिरतो. निरखून पाहिलंत तर लक्षात येतं की तो ढग नसून हजारो पक्ष्यांचा थवा आहे. त्यांचं नाव गुलाबी मैना.
हिवाळ्याचे पाहुणे
गुलाबी मैना म्हणजेच Rosy Starling दिसायला अतिशय देखणा पक्षी आहे. त्याचं डोकं आणि पंख काळे असतात, तर पाठ आणि पोट गुलाबी असतं. पळस फुलला की त्याच्या लालसर-गुलाबी फुलांत हा पक्षी मिसळून जातो, म्हणून काही ठिकाणी त्याला ‘पळस मैना’ म्हणतात.
हा पक्षी मूळचा आपला नाही. तो मध्य आशिया, पूर्व युरोप आणि कझाकिस्तानच्या भागातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतात येतो. साधारण जुलै-ऑगस्टपासून त्याचं आगमन सुरू होतं आणि मार्च-एप्रिलपर्यंत तो इथे मुक्काम करतो. गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यांत त्याचे मोठे थवे दिसतात.
हा पक्षी जणू शेतकऱ्यांचा मित्र! तो फळं, धान्य आणि फुलांतला मध खातो, पण टोळ आणि इतर कीटकही मोठ्या प्रमाणात फस्त करतो. एका थव्यातले पक्षी एका दिवसात किती कीटक संपवत असतील याची कल्पना करा! त्यामुळे पिकांना होणारा उपद्रव कमी होतो.
एवढी सुंदर कसरत कशासाठी?
दिवसभर चारा शोधल्यानंतर संध्याकाळी हे पक्षी झाडांवर किंवा पाणथळीच्या जागी झोपायला जमतात. त्याआधी ते आकाशात एक आकर्षक खेळ सादर करतात. यालाच इंग्रजीत ‘Murmuration’ म्हणतात. हजारो पक्षी एकमेकांना न धडकता, त्यांच्या ठराविक पद्धतीने, एका लयीत उडतात.
हे सादरीकरण नेमकं कशासाठी?
शास्त्रज्ञांसमोर मुख्यतः दोन सिद्धांत होते –
- पहिला म्हणजे ‘एकत्र राहू, उबदार राहू’; थंडीच्या दिवसांत हे पक्षी आकाशात गर्दी करून इतर पक्ष्यांना सांगतात की इथे झोपायला चांगली जागा आहे. जितके जास्त पक्षी, तितकी रात्र उबदार.
- दुसरा सिद्धांत असा – ‘एकत्र राहू, सुरक्षित राहू’; मोठ्या थव्यात एका पक्ष्याला पकडणं शिकाऱ्याला कठीण जातं.
या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ब्रिटनमधल्या संशोधकांनी एक वेगळीच युक्ती वापरली. त्यांनी सर्वसामान्य निसर्गप्रेमींनाच संशोधनात सामील केलं. लोकांनी आपल्या भागातल्या पक्ष्यांच्या कसरतींची नोंद पाठवली. त्यात थव्याचा आकार, वेळ, तापमान आणि आसपासचे शिकारी पक्षी अशी माहिती होती. जगभरातून तीन हजारांहून अधिक नोंदी जमा झाल्या. त्यातल्या थव्यांची सरासरी संख्या सुमारे तीस हजार पक्षी होती आणि सर्वांत मोठ्या थव्यात तब्बल साडेसात लाख पक्षी होते.
निकाल रंजक होता. सुमारे तीसपैकी एका घटनेत, म्हणजे जवळपास ३० टक्के नोंदींत आसपास शिकारी पक्षी होते. शिकारी दिसला की थवा एकत्रितपणे खाली उतरून झोपायच्या जागी शिरत असे. तापमानाचा थव्याच्या आकारावर तसा प्रभाव दिसला नाही. म्हणजेच ही कसरत उबदारपणासाठी कमी आणि जीव वाचवण्यासाठी जास्त होती. हा अभ्यास युरोपातल्या स्टर्लिंग पक्ष्यांचा होता, पण त्याने एक महत्त्वाची दिशा दाखवली.
आता भारतात उलगडलेलं कोडं
आता आपल्या गुलाबी मैनांची गोष्ट. अहमदाबाद विद्यापीठातील जितेश झावर आणि वेणू दिविन यांनी गुजरातमध्ये या पक्ष्यांचा अभ्यास केला. जामनगरजवळच्या लाखोटा तलावासारख्या ठिकाणी त्यांनी थव्यांचं ड्रोन-कॅमेऱ्यांसारख्या साधनांनी चित्रीकरण केलं आणि निरीक्षण केलं. त्यांनी एकूण ३,०२३ थव्यांची नोंद केली. थव्याचा आकार, त्याची संख्या, उडण्याची दिशा आणि शिकारी पक्षी जवळ आल्यावर होणारे बदल त्यांनी टिपले.
त्यातून त्यांना १२ वेगवेगळे आकार आढळले. कधी थवा वर्तुळाकार होतो, कधी सर्पाकृती, कधी अंडाकृती, कधी विळ्यासारखा तर कधी बांगडीसारखा किंवा सरळ रस्त्यासारखा. सर्वांत रंजक निरीक्षण असं की, शिकारी पक्षी जवळ आला की थवा पसरट आकार सोडून अरुंद, रस्त्यासारखा होतो. अशा आकारात थव्याचा वेग आणि चपळाई वाढते.
नोंदवलेल्या थव्यांपैकी ७१ टक्के थवे शिकारी पक्षी आसपास असताना अरुंद आकारात दिसले. १८१ वेळा शिकारी थव्यापासून अवघ्या दहा मीटर अंतरावर आला, तरीही आकार बदलल्यामुळे त्याला शिकार करता आली नाही. ज्या वेळी थव्याने आकार बदलला नाही, तेव्हा शिकाऱ्याची गाठ पडली. ही कसरत रोज संध्याकाळी काही मिनिटंच चालते आणि तेवढ्याच वेळात शिकाऱ्याला चकवण्याचं सगळं नाट्य घडतं. हे संशोधन ‘ईंटेग्रेटिव्ह अँड कॉम्पेरेटिव्ह बायोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे.
कोणीही नेता नाही, तरी सगळे एकत्र कसे?
यातलं सर्वांत मोठं आश्चर्य म्हणजे या थव्याला कुणीही नेता नसतो. कुणी आदेश देत नाही, कुणी शिट्टी वाजवत नाही. प्रत्येक पक्षी फक्त आपल्या आसपासच्या सहा-सात पक्ष्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवतो. एखाद्याने दिशा बदलली, तर शेजारी तशीच बदलतात, त्यांचे शेजारी त्यांच्यासारखे आणि काही क्षणांतच ही लहर हजारो पक्ष्यांमधून लाटेसारखी पसरते, म्हणूनच संपूर्ण थवा एकाच शरीरासारखा हलताना दिसतो. शिकारी पक्षी बहुधा थव्यातला एकच पक्षी हेरतो आणि त्याच्यामागे लागतो. पण थवा इतक्या वेगाने आकार, दिशा आणि घनता बदलतो की नेमका एक पक्षी नजरेत ठेवणंच अशक्य होतं. डोळ्यांसमोर हजारो हलणारे ठिपके आणि गोंधळलेला शिकारी!
पुढच्या वेळी आकाशाकडे पाहताना…
आपण अनेकदा ही दृश्यं फक्त ‘सुंदर’ म्हणून पाहतो. फोटो काढतो, आनंद घेतो आणि पुढे जातो. पण, त्यामागे लाखो वर्षांच्या उत्क्रांतीने घडवलेली एक जगण्याची कला आहे. ही कसरत नृत्यासारखी दिसते, पण त्यामागचा हेतू सुरक्षिततेचा आहे. आज शहरीकरणामुळे तलाव आटत आहेत, मोठी झाडं तोडली जात आहेत आणि पाणथळ जागांवर इमारती उभ्या राहत आहेत. पक्ष्यांना झोपायला सुरक्षित जागाच मिळाली नाही, तर हे दृश्य कायमचं हरवू शकतं; म्हणूनच अशा जागांचं रक्षण करणं ही फक्त पर्यावरणप्रेमींची नाही, तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तर पुढच्या हिवाळ्यात, संध्याकाळी जर तुम्हाला आकाशात असा नाचणारा काळा ढग दिसला तर थोडं थांबा आणि निरखून पाहा. तो ढग नाही, तो हजारो जीवांचा एकमेकांवरचा विश्वास आहे.
