Mohan Bhagwat Can Address Gen Z Discontent? : बेरोजगारी, पेपरफुटीच्या घटना आणि मतदार यादीतील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेली आंदोलनांमुळे देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. तरुणांचे हे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रयत्न सुरु आहेत. येत्या २ ते ४ नोव्हेंबरदरम्यान इंदूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत प्रामुख्याने या मुद्द्यांवर भर दिला जाणार असल्याचे सूत्रांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले आहे.
तरुणांचे प्रश्न आणि त्यांच्या आंदोलनांमागची कारणं समजून घेण्याबरोबरच, या परदेशी शक्तींकडून आंदोलनांचा फायदा घेतला जात आहे का या मुद्द्यावर देखील बैठकीत चर्चा होऊ शकते. आजच्या तरुणांची राजकीय मतं आणि आंदोलन करण्याच्या पद्धतींनी पारंपरिक चौकटी भेदल्या आहेत. त्यामुळे पक्षांनाही या तरुणांशी संवाद साधताना वेगळा विचार करावा लागत आहे.
“तरुणांमधील चिंता खऱ्या आहेत आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनीही ते मान्य केले आहेत. विजयादशमीच्या भाषणात सरसंघचालकांनी आंदोलनांमागे परदेशी शक्तींचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, त्याचा अर्थ संघ तरुणांच्या खऱ्या प्रश्नांवरील आमची भूमिका बदलत आहे, असा घेऊ नये. हे दोन स्वतंत्र मुद्दे आहेत,” असं संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.
संघाने जाहीर केलेल्या बैठकीच्या विषयांमध्ये नवीन माध्यम मंचांवरील आशय, अंमली पदार्थांचे व्यसन, भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये बाह्य शक्तींचा हस्तक्षेप आणि जागतिक परिस्थिती यांचा समावेश आहे. या मुद्द्यांवर संघाच्या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे.
तरुणांशी संवाद वाढवण्यावर संघाचा भर
तरुणांमधील नाराजी दूर करुन त्यांना सामावून घेण्यासाठी संघाने संवादाचा मार्ग स्वीकारल्याचे दिसून येते. संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नमूद केले की, “जगातील प्रत्येक देशात वेगवेगळ्या काळात तरुणांमध्ये असंतोष निर्माण होत असतो, याची इतिहास साक्ष देतो. अशा वेळी त्यांचं म्हणणं ऐकून घेणं, आपली भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांच्याशी सतत संपर्कात राहणं, हेच आपण करू शकतो. त्यांना एखादी गोष्ट पटवून देण्याचा अट्टहास करण्यात अर्थ नाही,”
संघाच्या शाखांमध्ये तरुणांचा सहभाग पूर्वीपासूनच अधिक असल्याचा दावाही या पदाधिकाऱ्याने केला. संघाच्या देशभरातील ८८ हजारांहून अधिक शाखांमध्ये आजही तरुणांची सुमारे ६० टक्के उपस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तरुणांशी संवाद साधण्याचे काम आधीपासूनच सुरू असल्याचे संघाचे म्हणणे आहे.
दरम्यान, ऑगस्टमध्ये पार पडलेल्या संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीतही तरुणांच्या प्रश्नांवर चर्चा झाली होती. त्यात परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. इंदूरमधील आगामी बैठकीत संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच, विजयादशमीच्या भाषणात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर आतापर्यंत काय कार्यवाही झाली, याचाही आढावा घेतला जाणार आहे.
नीट पेपरफुटीसारख्या घटनांमुळे परीक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत असताना, तरुणांचा व्यवस्थेवरील विश्वास टिकवणं हे संघासमोरचं मोठं आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर, तरुणांसमोर केवळ आपली मतं मांडून किंवा त्यांना उपदेश करून भागणार नाही, तर त्यांच्या नाराजीमागची कारणं समजून घ्यावी लागतील, अशी भूमिका संघाने घेतली आहे. परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याबरोबरच तरुणांशी संवाद वाढवण्याची गरजही संघाने मान्य केली आहे.
संघाने यंदा आयोजित केलेल्या युवा संमेलनांमध्ये तब्बल ३९.२५ लाख तरुण सहभागी झाल्याची माहिती सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमी भाषणातून दिली होती. मात्र, या मोठ्या सहगाभाचं तरुणांसोबतच्या प्रत्यक्ष संवादात कसं रुपांतर होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
CJP आंदोलनादरम्यानचा भागवतांचा हस्तक्षेप काय सांगतो?
परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमिततेविरोधात कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) आंदोलनाच्या निमित्ताने लाखो तरुण रस्त्यावर उतरले. तरुणांमधील प्रश्नांबाबत संघाने जाहीरपणे भूमिका मांडली. ६ ऑगस्ट रोजी मोहन भागवत यांनी मुंबईत Gen Z आणि Gen Alpha मधील जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तरुणांनी मांडलेल्या समस्या रास्त असल्याचे म्हटले होते. आंदोलन करणे हा संवादाचाच एक मार्ग असून, त्यातून एकमत घडवून आणता येते, असे त्यांनी नमूद केले. तर आंदोलनात सहभागी होणाऱ्या तरुणांना ‘देशद्रोही’ ठरवण्यावरुन त्यांनी टीका केली होती.
मात्र, विजयादशमीच्या भाषणात भागवत यांनी तरुणांचे खरे प्रश्न आणि त्यांचा गैरफायदा घेण्याचे प्रयत्न यांतील फरक स्पष्ट केला. व्यवस्थेतील त्रुटींमुळे आंदोलनं होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी मान्य केले; पण भारतात अस्थिरता निर्माण करू पाहणाऱ्या शक्ती या आंदोलनांचा गैरवापर करू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला. एसआयआर आंदोलनाचा थेट उल्लेख न करता त्यांनी काही ‘बाह्य शक्ती’ समाजातील मतभेद वाढवत असल्याचा आरोप केला. लोकांमध्ये अन्याय सहन करत असल्याची भावना निर्माण करणं, संस्थांवरील विश्वास कमी करणं आणि समाजात असंतोष व अराजकता पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचे भागवत यांनी नमूद केले.
आंदोलनांमध्ये परकीय हस्तक्षेप असल्याच्या आरोपाबद्दल संघाच्या पदाधिकाऱ्याला विचारले असता, त्यांनी मेटाचा दाखला दिला आहे. “एखाद्या देशात जनआंदोलनं सुरू असताना त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न परकीय शक्ती करतात. सध्याच्या आंदोलनांमध्येही हे सिद्ध झालं आहे. मेटाने याप्रकरणी माफीही मागितली आहे,” असे या पदाधिकाऱ्याने म्हटले.
मात्र, एसआयआर आंदोलनात परदेशी शक्तींचा सहभाग असल्याचे मेटाने मान्य केल्याचा कोणताही सार्वजनिक पुरावा उपलब्ध नाही. ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक पोस्ट फेसबुकवर काही काळासाठी मर्यादित करण्यात आली होती. याप्रकरणी मेटाने केंद्र सरकारची माफी मागत तांत्रिक प्रक्रियेतील त्रुटीमुळे ही चूक झाल्याचे स्पष्ट केले होते. या घटनेचा एसआयआर आंदोलनातील कथित परकीय हस्तक्षेपाशी थेट संबंध असल्याचे सिद्ध झालेले नाही.
दरम्यान, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर वापरकर्त्यांना दाखवल्या जाणाऱ्या कंटेटबाबत केंद्र सरकारने मेटाकडे चिंता व्यक्त केली आहे. १० ऑक्टोबर रोजी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सूचना जारी करत म्हटले की, वापरकर्त्यांना एकाच किंवा मोजक्याच दृष्टिकोनांचा मजकूर अधिक प्रमाणात दिसणार नाही, याची मेटाने काळजी घ्यावी. दिशाभूल करणारा किंवा संदर्भापासून वेगळा केलेला मजकूर रोखण्यासाठी अधिक तपासणी करण्याची गरजही मंत्रालयाने अधोरेखित केली होती.
सोशल मीडियावरील उपस्थितीतीचे आव्हान
तरुणांमधील रोष केवळ रस्त्यावरील आंदोलनांपुरता मर्यादित राहिलेला नाही. इन्स्टाग्रामवरील मीम्स, शॉर्ट व्हिडीओ, उपरोधिक पोस्ट आणि ऑनलाइन गेम्सच्या माध्यमातूनही तरुण आपली नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर कसा करायचा, हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपासमोरचा नवा प्रश्न बनला आहे. संघाच्या आगामी बैठकीत नव्या माध्यमांवरील मजकुरावर चर्चा होणार असल्याने या मुद्द्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
भाजपाने फेसबुक, एक्स आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून प्रभावी राजकीय संवादयंत्रणा उभी केली. मात्र, इन्स्टाग्राम आणि छोट्या व्हिडीओंच्या माध्यमातून व्यक्त होणारी तरुणांची भाषा आत्मसात करणं पक्षासाठी तितकं सोपं ठरलेलं नाही. सुरुवातीला सोशल मीडियावर उपरोधिक पोस्ट, विनोद आणि लोकप्रिय संस्कृतीतील संदर्भ वापरून बेरोजगारी व परीक्षांमधील गैरप्रकारांविरोधातील नाराजी व्यक्त केली गेली. पुढे याच असंतोषाचं रस्त्यांवरील आंदोलनात रूपांतर झालं.
या आंदोलनांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपानेही उभ्या फॉरमॅटधील व्हिडीओ, अधिक अनौपचारिक सादरीकरण आणि तरुणांना भावतील अशा नव्या पद्धतींचा वापर वाढवला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एनडीएतील काही तरुण खासदारांनीही ‘डिलुलु’, ‘फोमो’ आणि ‘क्लॉक्ड इट’ यांसारखे तरुणांमध्ये वापरले जाणारे शब्द वापरले.
मात्र, आव्हान केवळ एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्यावर जाण्यापुरतं नाही. इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांवर विनोद, उपरोध, उत्स्फूर्त प्रतिक्रिया आणि वैयक्तिक कंटेंट तयार करणाऱ्यांना अधिक महत्त्व मिळतं. भाजपने जुन्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यशस्वीपणे वापरलेली केंद्रीकृत आणि नियोजनबद्ध संदेशपद्धती यापेक्षा वेगळी आहे. एसआयआर विरोधातील आंदोलनांमध्येही मीम्स, व्हिडीओ, उपरोधिक पोस्ट आणि पोलिसांच्या कारवाईवर आधारित ऑनलाइन गेम्सचा वापर झाला. त्यामुळे तरुणांशी संवाद साधताना त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या माध्यमांवर व्यक्त होणं, हे संघ परिवारासाठी महत्त्वाचे आव्हान ठरत आहे.
