संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या ‘रुद्रम’ क्षेपणास्त्र मालिकेतील रुद्रम २ या क्षेपणास्त्राची नुकतीच झालेली चाचणी यशस्वी ठरली. रुद्रम २ क्षेपणास्त्रामुळे लष्कराची क्षमता आणखी वाढली आहे. ध्वनीच्या वेगाच्या पाचपट अधिक वेग असलेल्या रुद्रम २ या क्षेपणास्त्रासह रुद्रम मालिका, त्याचे भारतीय हवाईदलासाठी असलेले महत्त्व या अनुषंगाने घेतलेला वेध…
‘रुद्रम’ क्षेपणास्त्र मालिका काय आहे?
‘रुद्रम’ हे भारताचे पहिले स्वदेशी अँटिरेडिएशन क्षेपणास्त्र आहे. हे हवेतून जमिनीवर मारा करणारे अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहे. आताच्या तंत्रज्ञानाच्या काळात शत्रूसाठी रडार प्रणाली अत्यंत महत्त्वाची असते. शत्रूच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या विमानांचा माग काढण्यासाठी ही रडार यंत्रणा सातत्याने रेडिओ लहरींचे उत्सर्जन करते. ‘रुद्रम’ क्षेपणास्त्र या उत्सर्जित होणाऱ्या लहरींचा अचूक माग काढून, उलट दिशेने प्रवास करून शत्रूचे रडार किंवा संपर्क केंद्रावर हल्ला करते. एका अर्थाने शत्रूला अंध आणि बधिर करण्याची क्षमता रुद्रम क्षेपणास्त्रामध्ये आहे.
‘रुद्रम-१’ क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये काय होती?
अँटिरेडिएशन क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या तंत्रज्ञानात भारताने रुद्रम १ या क्षेपणास्त्राद्वारे पहिले मोठे यश मिळवले. रुद्रम १ या क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी चाचणी ९ ऑक्टोबर २०२० रोजी ओदिशाच्या बालासोर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून घेण्यात आली. भारतीय वायुसेनेच्या ‘सुखोई-३० एमकेआय’ या लढाऊ विमानावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले होते. रुद्रम १ हे क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा दुप्पट म्हणजेच मॅक २ गतीने प्रवास करू शकते. त्याची मारक क्षमता सुमारे १०० ते १५० किलोमीटरपर्यंतची आहे. त्यामुळे भारतीय वायुदलाची लढाऊ विमाने शत्रूच्या रडारच्या कक्षेबाहेर राहून शत्रूवर परिणामकारकपणे हल्ला करू शकतात. रुद्रम १ या क्षेपणास्त्रामध्ये ‘पॅसिव्ह होमिंग सीकर’ आणि अंतर्भूत नेव्हिगेशन सिस्टीम वापरण्यात आली.
‘रुद्रम-२’ची वैशिष्ट्ये काय?
‘रुद्रम-१’नंतर त्याची घातक आणि प्रगत आवृत्ती डीआरडीओने विकसित केली आहे. या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी २९ मे २०२४ रोजी घेण्यात आली होती. ओदिशाच्या किनारपट्टीवर सुखोई-३० एमकेआय या लढाऊ विमानावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले होते. त्यानंतर २ जून २०२६ रोजी ओदिशातील चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून रुद्रम-२ ची अंतिम चाचणी यशस्वीरित्या घेतली. रुद्रम २ हे रुद्रम १ पेक्षा अधिक वेगवान आहे. रुद्रम २ हे ध्वनीच्या वेगाच्या पाचपट अधिक म्हणजेच मॅक ५ च्या गतीने शत्रूवर हल्ला करू शकते. रुद्रम २च्या मारक पल्ल्यामध्ये वाढ करून १५० ते ३०० किलोमीटर करण्यात आला आहे. रुद्रम २ची प्रगत मेमरी सिस्टीम वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्यावर क्षेपणास्त्र डागले गेल्याचे कळल्यावर शत्रूने रडार बंद केले, तरी रुद्रम-२ मधील प्रगत संगणक रडारच्या शेवटच्या लोकेशनचा माग काढून हल्ला करू शकते. रुद्रम २ क्षेपणास्त्र शत्रूचे केवळ रडारच नाही, तर लष्करी बंकर, विमानांचे हँगर आणि धावपट्ट्या नष्ट करण्यासाठीही सक्षम आहे.
‘रुद्रम-२’ची निर्मिती कशी झाली?
‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’अंतर्गत ‘रुद्रम-२’ची निर्मिती करण्यात आली आहे. या क्षेपणास्त्राचे संपूर्ण आरेखन (डिझाइन) आणि तंत्रज्ञान डीआरडीओच्या डिफेन्स रीसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी, हैदराबाद येथील रीसर्च सेंटर इमारत या प्रयोगशाळांमध्ये करण्यात आले. या क्षेपणास्त्राच्या उत्पादनामध्ये भारत डायनामिक्स (बीडीएल), भारत इलेक्ट्रॉनिक्स (बीईएल) या सरकारी कंपन्यांसह काही खासगी कंपन्यांनी योगदान दिले आहे. सुखोई-३० एमकेआयसारख्या लढाऊ विमानांमधून हे क्षेपणास्त्र यशस्वीरीत्या डागता येण्याच्या दृष्टीने भारतीय वायुदलाचे तांत्रिक पथक आणि डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे काम करून क्षेपणास्त्राचे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर विमानाशी सुसंगत केले आहे.
भारतीय सैन्यदलांची शक्ती कशी वाढली?
सामरिक आणि युद्धनीतीच्या दृष्टीने ‘रुद्रम’ मालिकेचा समावेश भारतीय सैन्यदलांची ताकद अनेक पटींनी वाढवणारा आहे. सप्रेशन ऑफ एनिमी एअर डिफेन्स अर्थात शत्रूचे हवाई संरक्षण दडपण्याची क्षमता रुद्रम क्षेपणास्त्रांमध्ये आहे. या क्षेपणास्त्रांद्वारे भारतीय वायुदल शत्रूची रडार प्रणाली उद्ध्वस्त करून त्यांचे हवाई संरक्षण कवच नष्ट करू शकते. १०० ते ३०० किलोमीटर दूरवरून मारा करण्याची क्षमता असल्याने भारतीय लढाऊ विमानांना शत्रूच्या हद्दीतील विमानांना पाडणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या कक्षेत जाण्याची गरज नाही. त्यामुळे भारतीय विमाने सुरक्षित राहून शत्रूवर दूरवरूनच हल्ला करू शकतील. आतापर्यंत भारताला रशियाच्या ‘केएच ३१’ क्षेपणास्त्रांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, आता स्वदेशी रुद्रम क्षेपणास्त्रांमुळे भारताचे परदेशी अवलंबित्व कमी झाले आहे. डीआरडीओने आतापर्यंत रुद्रम मालिकेत रुद्रम १, रुद्रम २ आणि रुद्रम ३ अशी तीन क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत. त्यांपैकी रुद्रम १ आणि रुद्रम २ या क्षेपणास्त्रांच्या अंतिम चाचण्या यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत.
chinmay.patankar@expressindia.com
