scorecardresearch

Premium

वॅग्नर ग्रुपच्या धमकीनंतर रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये बंदोबस्त वाढविला; भाडोत्री सैनिकांबाबत राष्ट्राध्यक्ष पुतिन काय म्हणाले?

वॅग्नर ग्रुपच्या अतिमहत्त्वकांक्षी भूमिकेतून त्यांनी देशद्रोहाचा मार्ग निवडला असून देशाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा आरोप रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी केला.

Russia wagner group what putin says
वॅग्नर ग्रुप एकेकाळी रशियाच्या इशाऱ्यावर हल्ले करत होता, आज त्याच भाडोत्री सैनिकांच्या ग्रुपने रशियावर चालून जाण्याची भाषा केली आहे. (Photo – Reuters / Loksatta Graphics Team)

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांची सशस्त्र बंडखोरी मोडून काढण्याची शपथ घेतली आहे. रशियाच्या दक्षिणेकडील रोस्तोव्ह शहराचा ताबा घेतल्याचा दावा वॅग्नर आर्मीने केल्यानंतर पुतिन यांनी देशाला संबोधित करताना वॅग्नर ग्रुपची बंडखोरी मोडून काढू असा इशारा दिला. युक्रेन युद्ध सुरू केल्यापासून पुतिन हे पहिल्यांदाच एका मोठ्या अडचणीत सापडले असल्याचे बोलले जात आहे. मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात विशेष लष्करी कवायत, असे नाव देऊन त्यांनी युक्रेनवर हल्ला चढविला होता. वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी रशियाच्या लष्करावर आरोप केला असून त्यांच्या ऑडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्या आहेत. रशियन सैनिकांनी वॅग्नरच्या छावण्यावर हल्ला केला असून अनेक सैनिकांना मारले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच आपण २५ हजार सैनिकांसह न्यायाच्या दिशेने चाललो असल्याचेही प्रिगोझिन म्हणाले आहेत.

पुतिन यांनी आपल्या भाषणात काय सांगितले?

वॅग्नर ग्रुपच्या धमकीबाबत बोलत असताना पुतिन म्हणाले, “अति महत्वाकांक्षा आणि स्वार्थी वृत्तीमुळे ते देशद्रोह बनले आहेत. त्यांनी केलेली कृती ही पाठीत खंजीर खुपसण्यासारखी आहे. रशियासाठी आणि रशियातील लोकांसाठी हा मोठा धक्का आहे. अशा धोक्यापासून देशाचे रक्षण करण्यासाठी आम्ही कठोर कृती करू”

Is Ukraines Counteroffensive Succeeding
विश्लेषण: रशिया-युक्रेन युद्ध कोणत्या वळणावर आहे? युक्रेनचा प्रतिहल्ला यशस्वी ठरतोय का?
s jayshanakr canada answer
हे भारताचे धोरण नाही!; कॅनडाच्या आरोपांना जयशंकर यांचे प्रथमच जाहीर उत्तर
saudi mohammed al narendra modi g20 delhi
अन्वयार्थ : सौदी मैत्रीचे बदलते रंग..
kim jong un meet putin
किम-रशिया यांच्यात लष्करी देवाणघेवाणीची शक्यता

हे वाचा >> विश्लेषण: ‘वॅग्नर ग्रुप’चा भस्मासुर रशियावरच उलटणार? भाडोत्री लष्कराचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ!

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांनी प्रिगोझिन यांचे नाव न घेता त्यांना देशद्रोही ठरविले. पुतिन पुढे म्हणाले की, रशियाच्या दक्षिणेकडील रोस्तोव्ह शहरातील परिस्थिती स्थिर करण्यासाठी रशियाकडून निर्णायक कृती करण्यात येईल. तसेच रोस्तोव्ह शहरातील सद्यस्थिती कठीण असल्याचेही त्यांनी मान्य केले. त्यांनी पुढे असेही सांगितले की, रोस्तोव्ह शहरातील लष्करी आणि नागरी संस्थाचे कामकाज बंद करण्यात आले आहे.

आपल्या पाच मिनिटांच्या भाषणात पुतिन यांनी इतिहासाचे दाखले दिले. रशियन साम्राज्य पहिल्या विश्वयुद्धात लढा देत असताना १९१७ साली जी रशियन क्रांती झाली, त्याचा इतिहास सांगत पुतिन म्हणाले, मी माझ्या देशाला वाचविण्यासाठी हरऐकप्रकारे प्रयत्न करेन.

“ज्यांनी जाणीवपूर्वक विश्वासघाताच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी सशस्त्र बंडाची हाक दिली, ज्यांनी दहशतवाद्यांसारखा मार्ग निवडून धमक्या देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कठोर कारवाई करून दंडीत केले जाईल. ते लोक कायदा आणि जनतेला उत्तरदायी आहेत”, असेही पुतिन यांनी म्हटले.

हे ही वाचा >> रशियात धुमश्चक्री, वॅग्नर ग्रुपच्या बंडामुळे पुतिन संकटात; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणतात, “आता तिथे एवढा गोंधळ झालाय की…!”

रशियामध्ये सध्या काय सुरू आहे?

रशियन सुरक्षा दलाने रॉयटर्स वृत्तसंस्थेला माहिती देताना शनिवारी सांगितले की, वॅग्नरच्या भाडोत्री सैनिकांनी व्होरोनेझ शहरातील लष्कराच्या सुविधांचा ताबा घेतला आहे. हे ठिकाण राजधानी मॉस्कोच्या दक्षिणेला ५०० किमी अंतरावर आहे. काही काळापूर्वी प्रिगोझिन यांनी दावा केला होता की, त्यांच्या भाडोत्री सैनिकांनी रोस्तोव्ह शहरातील रशियन लष्कराच्या मुख्यालयाचा ताबा घेतला असून या शहरातील लष्करी तळावर आता वॅग्नरचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत. त्यानंतर प्रिगोझिन यांनी एक व्हिडिओ प्रसारीत करून रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू आणि वरिष्ठ जनरल वलेरी गेरासिमव यांनी रोस्तोव्ह शहरात येऊन त्यांची भेट घ्यावी.

दरम्यान अल जझीरा या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, वॅग्नर ग्रुपच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी मॉस्को आणि आसपासच्या शहरात दहशतवादविरोधी आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे. शुक्रवार रात्रीपासून सरकारी इमारती, दळणवळणाची ठिकाणे आणि राजधानीतील इतर महत्त्वाच्या इमारतींमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे, अशी माहिती टास (TASS) या वृत्तसंस्थेने सुरक्षा दलाच्या हवाल्याने दिली. बीबीसीने दिलेल्या बातमीनुसार, इंटरनेट सुविधा प्रतिबंधित करण्यात आली आहे आणि मॉस्कोच्या रस्त्यांवर लष्कराचे ट्रक दिसू लागले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Russia and wagner group lock horns key takeaways from president putins speech on the situation kvg

First published on: 24-06-2023 at 19:22 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×