अमोल परांजपे

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याला जवळपास सात महिने झाले आहेत. पहिले सहा महिने रशियाच्या सैन्याने जोरदार मुसंडी मारत खारकीव्ह, डोनेस्क प्रांत काबीज केले. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून युद्धाचे चित्र पालटले आहे. युक्रेनच्या फौजांनी रशियाने बळकावलेला प्रदेश मुक्त करण्याचा सपाटा लावला आणि रशियाच्या सैन्याला थेट सीमेपर्यंत ढकलले. या घटनांनंतर आता रशियामध्येही युद्धविरोधी सूर उमटू लागले आहेत.

रशियामध्ये युद्ध थांबवण्याची मागणी कशामुळे वाढली?

रशियाची राजधानी मॉस्को, दुसरे मोठे शहर सेंट पीटर्सबर्गसह किमान ३८ शहरांमध्ये युद्धविरोधी निदर्शने झाली. विशेष म्हणजे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच राखीव सैन्य वापरण्याची घोषणा केली आणि या आंदोलनांना आणखी धार आली. देशभरात १,३००पेक्षा जास्त नागरिकांना ‘बेकायदा मोर्चे काढल्याबद्दल’ अटक करण्यात आल्याचे सरकारी आकडेवारीच सांगते.

बळजबरीने सैन्यात ढकलले जाण्याची भीती?

जनतेमध्ये वाढत्या आक्रोशाची दोन कारणे असू शकतात. एकतर युद्धामुळे आलेल्या निर्बंधांना जनता कंटाळली असेल. दुसरे कारण अधिक महत्त्वाचे आणि राखीव सैन्य वापरण्याच्या घोषणेशी संबंधित आहे. बळजबरीने सैन्यात भरती करून तरुण मुलांना मृत्यूच्या दाढेत ढकलले जाण्याची भीती नागरिकांना सतावते आहे. पुतिन यांच्या घोषणेनंतर देशाबाहेर पळण्याचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

विश्लेषण : दाऊदी बोहरा समाज आणि बहिष्काराची प्रथा! सुप्रीम कोर्ट ५० वर्षांपूर्वीच्या निकालाचा का करणार पुनर्विचार?

रशियातील तरुणांचा तुर्कस्तान, आर्मेनियात ‘पळ’?

पुतिन यांनी ही घोषणा केली आणि त्याच दिवसापासून रशियातील शहरांमधून तुर्कस्तान आणि आर्मेनियाला जाणारी विमानांची तिकिटे संपली. याचे मुख्य कारण या दोन देशांत जाण्यासाठी रशियाच्या नागरिकांना व्हिसा लागत नाही. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या नजरेत न येता देशाबाहेर सटकायचा हा मार्ग तरुणांनी निवडला आहे. त्यामुळे इस्तंबूल (तुर्कस्तान), येरेवान (आर्मेनिया), तुबलिसी (जॉर्जिया) इथे रशियातून जाणाऱ्या विमानांची तिकिटे आ‌ठवडाभरात तिपटीपेक्षा जास्त महागली आहेत.

‘राखीव सैन्यभरती’चे स्वरूप नेमके कसे असेल?

पुतिन यांनी तीन लाख सैनिकांची राखीव फौज सज्ज करण्याची घोषणा केली असली तरी या भरतीमध्ये नेमके कुणाला घेणार, हे अद्याप समजलेले नाही. प्रक्रियेबाबत लवकरच स्पष्टता केली जाईल, असे क्रेमलिनमधून सांगण्यात आले. सध्या तरी केवळ लष्करात कामाचा अनुभव असलेल्यांचीच भरती केली जाईल, असेही अधिकारी सांगत आहेत. मात्र यावर नागरिकांचा विश्वास नसल्याचे तुर्कस्तान, आर्मेनियातील पलायनामुळे दिसते.

विश्लेषण : रशिया-युक्रेन युद्ध थांबवणे का गरजेचे? भारताचा काय फायदा?

रशियातून बाहेर जाणाऱ्या सीमा बंद होणार?

नागरिक घाईघाईने देशाबाहेर जाण्याचे आणखी एक कारण सांगितले जात आहे. एकदा राखीव सैन्यभरती प्रक्रिया सुरू झाली की सरकार देशाबाहेर जाण्यावर निर्बंध आणेल, अशी भीती नागरिकांना आहे. असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे सरकारी अधिकारी आत्ता म्हणत असले तरी त्यावर अर्थातच नागरिकांचा विश्वास नसल्याचे दिसते. त्यामुळे शक्य तितक्या लवकर बाहेर जाण्याची खटपट सुरू झाली आहे.

रशिया एकाकी पडत असल्याचा परिणाम किती?

युक्रेनवर हल्ला केल्यानंतर सुरूवातीच्या काळात काही देश रशियाच्या बाजूने उभे राहिले. अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्रे या आक्रमणाचा जाहीर निषेध करत असताना चीन, भारत आणि आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतील देशांनी रशियाविरोधात स्पष्ट भूमिका घेणे टाळले. मात्र आता चित्र बदलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उझबेकिस्तानमध्ये पुतिन यांना भेटल्यानंतर प्रथमच रशियाविरोधी सूर लावला. चीनदेखील रशियाला बिनशर्त पाठिंब्याच्या भूमिकेवरून काहीसा मागे आलाय. त्यामुळेच रशियाच्या जनतेला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडण्याची भीती सतावत असण्याची शक्यता आहे.

युद्धगुन्ह्यांमुळे सैन्याविरोधात जनता संतापली आहे का?

युक्रेनने खारकीव्हमधील काही शहरे पुन्हा ताब्यात घेतल्यानंतर रोज नवनवी माहिती समोर येत आहे. इझूम शहराजवळ सापडलेल्या सामूहिक दफनभूमीत युक्रेनच्या सैनिकांबरोबरच नागरिकांचे मृतदेह आढळले आहेत. यातील काही मृतदेहांवर छळाच्या खुणा असल्याचा दावा युक्रेनने केला तर त्याला संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षकांनी दुजोरा दिला. काही जणांना सोव्हिएट काळातील यंत्रे वापरून विजेचे धक्के दिल्याचा आरोपही झाला. “थेट युद्ध चालेल, पण नागरिकांवर हल्ले, कैद्यांचा छळ करणे योग्य नाही” या भूमिकेत असलेले नागरिक आता युद्धाविरोधात आवाज बुलंद करू लागले आहेत.

जनतेच्या वाढत्या दबावापुढे पुतिन झुकणार?

सहा-सात महिन्यांमध्ये प्रथमच रशियामध्ये युद्धाविरोधात अधिक तीव्रतेने भूमिका मांडली जाऊ लागली आहे. दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनंतर युद्ध थांबवण्यासाठी जागतिक मत तयार होऊ लागले. तर प्रत्यक्ष रणांगणातही रशियाचे सैन्य तुलनेने युक्रेनसमोर कच खात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सर्व स्तरांवर असलेल्या या दबावांपुढे रशियाचे सर्वेसर्वा पुतिन झुकतात की आपली युद्धखोर भूमिका कायम ठेवतात याविषयी नेमके आडाखे बांधता येत नाहीत.