रशिया व युक्रेन यांच्यात मागील चार वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. रशियाने युक्रेनची राजधानी, इतर शहरे, निवासी इमारतींना लक्ष्य केले. या संघर्षात आतापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. गुरूवारी (१८ जून) युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्कोवर ड्रोनने जोरदार हल्ला केला. मॉस्कोवर युक्रेनने जवळपास २०० ड्रोनने हल्ला केला. दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतरचा हा सर्वात मोठा ड्रोन हल्ला मानला जातोय. रशियातील कापोतन्या येथील ऑइल रिफायनरीवर युक्रेनने केलेल्या हल्ल्यात १७ जण जखमी झाल्याची माहिती बीबीसीने दिली आहे. रिफायनरीवरील हल्ल्यानंतर सर्वत्र काळोख पसरला होता. तसेच काळा पाऊस (ब्लॅक रेन) पडल्याचे नागरिकांनी अनुभवले. मागील २४ तासांत १०० हून अधिक ड्रोन्स व चार क्रूझ मिसाइल हवेतच नष्ट केल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. या हल्ल्यानंतर रशियाच्या राजधानीतील चार विमानतळ बंद ठेवण्यात आले होते. तसेच ५०० पेक्षा विमाने रद्द करण्यात आली. युक्रेनच्या हल्ल्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
‘ऑइल डेपो’वर हल्ला झाल्याने मॉस्कोत पडला ‘ब्लॅक रेन’
युक्रेनने केलेल्या हल्ल्यानंतर मॉस्कोच्या आग्नेय भागात काळा पाऊस (ब्लॅक रेन) पडला. कपड्यांवर काळे धब्बे पडल्याचे आढळून आले, तसेच तेलाचा पाऊस (ऑइल रेन) पडला, असे स्थानिक नागरिकांनी वृत्तसंस्थांना सांगितले. दरम्यान, मॉस्को मधील अधिकाऱ्यांनी सुरूवातीला हे दावे फेटाळले होते. परंतु, त्यानंतर मॉस्कोतील अधिकारी व यंत्रणांनी लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले होते. शहराच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलवरून लोकांना संदेश पाठवण्यात आले. ज्या भागात या हल्ल्याचा सर्वाधिक परिणाम जाणवला तिथल्या लोकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली होती. घराच्या खिडक्या बंद ठेवण्यास सांगण्यात आले होते. तसेच दम्याचा त्रास असलेल्यांनी या भागांमधून बाहेर पडावे अशा सूचना देण्यात आल्या.
युक्रेनने ऑइल डेपोवर (तेलाचे साठे) हल्ला केल्यानंतर मोठा स्फोट झाला होता. या स्फोटाचे व्हिडीओ नंतर व्हायरल झाले. धुराचे लोट सर्वत्र पसरल्याने रस्त्यावरील कार दिसत नसल्याचे व्हिडिओत आढळून आले. रशियातील रोस्तोव भागातील एका ऑइल डेपोवर हल्ला झाल्याचे रशियाने मान्य केले आहे. या हल्ल्यात एका रशियन नागरिकाचा मृत्यू झाला आहे. रशियाने मागील आठवड्यात युक्रेनच्या कीव शहरावर हल्ला केला होता. त्या हल्ल्याला हे प्रत्युत्तर आहे, असे युक्रेनचे अध्यक्ष व्लोदोमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
?️?? Dark clouds rolled over Moscow as reports of black rain emerged after a massive Ukrainian drone attack.pic.twitter.com/D2zDBx3JiU
— Huzaifa Shafqat (@HuzaifaJanjua11) June 18, 2026
“आम्हाला हे युद्ध नकोय. पण, जर युक्रेन जळत असेल तर मॉस्कोही जळेल”, असा इशारा झेलेन्स्की यांनी रशियाला दिला आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेइ लाव्हरोव यांनी युक्रेनवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कीव या शहरावरील हल्ल्याची तीव्रता वाढवली जाईल. ते (झेलेन्स्की) काहीही ऐकण्यास तयार नाहीत. त्यांना आता शब्दांनी कमी उत्तर दिले जाईल.
कापोतन्या येथील रिफायनरीवरील हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
आग्नेय मॉस्कोमधील कापोतन्या ऑइल रिफायनरीवर हल्ला झाल्यानंतर मोठा स्फोट झाला. त्यानंतर या भागातील आकाशात काळोख पसरला. सर्वत्र धुराचे लोट पसरले. या हल्ल्यानंतर तेलाच्या टाकीवरील झाकण उंच उडाल्याचे काही व्हिडिओंमध्ये दिसून आले. आजूबाजूच्या इमारतींवर ड्रोन्सचे अवषेश पडले. या भागातील एका शॉपिंग सेंटरला आग लागली. एका उंच इमारतीच्या काचाही फुटल्याचे दिसून आले. तसेच कारवर धुराचा काळा जाड थर जमा झाल्याचे आढळले.
Black rain falls on Moscow after a massive drone attack on its biggest oil refinery. pic.twitter.com/ZUYmqq1mTg
— Kate from Kharkiv (@BohuslavskaKate) June 18, 2026
हल्ल्यानंतर घरातून बाहेर पडलेल्या नागरिकांच्या कपड्यांवर काळ्या थेंबांचे डाग पडले. एक स्थानिक महिला म्हणाली, “ऑइल डेपोवर हल्ल्यानंतर काळ्या तेलाचे थेंब पडत होते. ते माझ्या केसांवरही पडले. ते पेट्रोलियम प्रोडक्ट असल्याने माझे केस गळतील याची मला आता भीती वाटतेय.” रशियात या हल्ल्याचे फोटो व व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. दरम्यान, स्थानिक प्रशासनाने फोटो व व्हिडिओ शेअर करण्यास नागरिकांना मनाई केली आहे.
रशिया – युक्रेन युद्धाची सद्यस्थिती काय?
युक्रेनने रशियातील अनेक शहरांना लक्ष्य केले आहे. मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग या शहरांवरील हल्ल्याने झेलेन्स्की यांनी रशियातील सामान्य नागरिकांना लक्ष्य केल्याचे म्हटले जात आहे. ५०० किमीपेक्षा जास्त दूरपर्यंत मारा करणारे ड्रोन्स युक्रेनने विकसित केले आहेत. मॉस्कोवर या आधी २०२३ मध्ये हल्ला करण्यात आला होता. परंतु, सध्या मॉस्कोवर वारंवार हल्ले होत आहेत. युक्रेनने गुरूवारी केलेल्या हल्ल्यानंतर रशियाच्या एअर डिफेन्स सिस्टिमबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी या हल्ल्यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री अँड्रिय सिबिहा यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, मॉस्कोतील नागरिकांनी सकाळी एक प्रसिद्ध प्रश्न विचारला. तो म्हणजे ‘नेमकं काय चाललंय?’ मी त्यांना उत्तर देऊ शकतो. तुमच्या देशाने आमच्या विरोधात युद्ध सुरू केले आहे. अनेक वर्षांपासून आमच्या नागरिकांना ठार केले जातेय. आता तुम्हाला कळलं असेल नेमकं काय चाललंय. हे सगळं कधी संपवणार आहात याबाबत पुतीन यांना विचारा.
