युक्रेनने रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांना लक्ष्य केल्यामुळे रशियासमोरील इंधनाचे संकट वाढले आहे. युद्ध संपवण्याच्या दृष्टीने हे हल्ले केले जात असल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

युक्रेनचे रशियावरील हल्ले

‘असोसिएटेड प्रेस’च्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्याच्या अखेरीपासून युक्रेनने रशिया आणि क्रिमिया येथील तेल शुद्धीकरण कारखाने, डेपो, टर्मिनल आणि तेल क्षेत्रातील इतर पायाभूत सुविधांवर ५०हून अधिक हल्ले केल्याची नोंद आहे. काही ठिकाणी तर एकापेक्षा अधिक हल्ले करण्यात आले. काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील तुआप्से शहरातील तेल शुद्धीकरण कारखान्यावर तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत चार वेळा हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमुळे किती नुकसान झाले याबाबत तेल शुद्धीकरण प्रकल्प स्पष्ट माहिती देत नाहीत. पण उपलब्ध माहिती आणि तेल उद्योगातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रशियाची सुमारे एक-तृतीयांश तेल शुद्धीकरण क्षमता बंद झाली आहे.

हल्ल्याचां उद्देश

गेल्या काही महिन्यांपासून युक्रेनने रशियावर हल्ले करताना तेल शुद्धीकरण कारखान्यांना विशेष करून लक्ष्य केले. त्यामध्ये या कारखान्यांना आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या. रशियाची लष्करी रसद आणि पुरवठा साखळी कमकुवत करणे, आघाडीवर हल्ले करण्याची क्षमता कमी करणे, यासारख्या मार्गांनी युद्ध संपवण्यासाठी रशियावर दबाव आणण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले जात असल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

जूनमधील दोन मोठे हल्ले

गेल्या काही महिन्यांपासून युक्रेनने केलेल्या हल्ल्यांमुळे तेल शुद्धीकरण कारखान्यांना आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यातही युक्रेनने रशियाच्या दोन मोठ्या शहरांवर केलेले हल्ले क्रेमलिनच्या दृष्टीने लाजिरवाणे ठरले आहेत. सेंट पीटर्सबर्ग या शहरात ३ जूनला युक्रेनने मोठा हल्ला केला. त्यावेळी परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी रशियाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या वार्षिक आर्थिक परिषदेची तयारी सुरू होती. त्यावेळी पाहुण्यांना शहराचे काळवंडलेले आकाश पाहायला मिळाले. यानंतर युक्रेनने दोन आठवड्यांनी, १८ जून रोजी मॉस्कोलगतच्या तेलशुद्धीकरण कारखान्याला लक्ष्य केले. त्यानंतर मॉस्कोत काळसर पाऊस पडला.

हल्ल्यांचा परिणाम

या हल्ल्यांमुळे रशियावर अभूतपूर्व तेलसंकट ओढवले आहे. वास्तविक रशिया हा जगातील तेल पुरवठा करणाऱ्या सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे. आता मात्र, रशियाने जूनमध्ये इंधनावर प्रक्रिया केलेल्या कच्च्या तेलाचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत २५ टक्क्यांनी घटून दररोज ३९.५ लाख बॅरल प्रति दिवस इतके कमी झाले आहे. ही गेल्या दोन दशकांतील नीचांकी पातळी असल्याचे उपलब्ध आकडेवारी सांगते. गेल्या वर्षी रशियात दररोज १०.३ लाख बॅरल पेट्रोलचे उत्पादन केले जात होते, त्यामध्ये १७ टक्क्यांची घसरण झाली आहे. आता हे प्रमाण दररोज ८.५० लाख बॅरल आहे. यामुळे देशांतर्गत बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करणे रशियाला कठीण जात आहे.

जनजीवन विस्कळीत

रशियात पेट्रोल पंपांवर रांगा वाढत आहेत, त्याचबरोबर निराशा आणि अनिश्चितताही वाढत आहे. वाहनचालकांचा इंधनपुरवठा ठप्प झाल्याने अनेक प्रदेशांमध्ये तर इंधन रेशनिंग लागू करण्याची वेळ आली आहे. रस्त्यांच्या कडेला गाड्यांच्या तासनतास लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्याच्या ध्वनिचित्रफीती समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होत आहेत. त्यात रांगा पाहून, रिकामे पेट्रोल पंप आणि वाढत्या किमतींमुळे वैतागलेले चालक सरकारला शिव्याशाप देताना दिसत आहेत. सायबेरियात सर्वात मोठा तेलशुद्धीकरण कारखाना आहे. पण तिथेही इंधनाचे रेशनिंग करण्याची वेळ आली आहे.

शेतीच्या दृष्टीने चिंतेचा विषय

रशियाच्या कृषीव्यवस्थेसाठी कापणीच्या हंगामात इंधनाचा पुरेसा पुरवठा आवश्यक असतो. रशियात आता पिके कापणीला आली आहेत. अशा वेळी इंधनाची मागणी वाढत असतानाच त्याचे रेशनिंग करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रशियातील शेती आणि शेतकरी यांच्या दृष्टीनेही ही चिंतेची बाब असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नागरी सेवांनाही फटका

इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे सैबेरियातील झाबायकाल्ये या भागात, कचरा उचलण्याचे काम थांबवण्यात आले आहे. तर काही ठिकाणी बस सेवांमध्ये कपात करण्यात आल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. यामुळे तेलकपातीचा फटका केवळ व्यवसाय-उद्योग आणि वाहनचालकांना बसत नसून दररोजच्या प्राथमिक सेवांवरही त्याचा विपरित परिणाम होत असल्याचे दिसू लागले आहे.

पुतिन यांची दुर्मीळ कबुली

युक्रेनच्या हल्ल्यांमुळे रशियात तेलसंकट ओढवले आहे, अशी कबुली देण्याचा दुर्मीळ प्रसंग राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर ओढवला. वाहनचालक आणि व्यावसायिक या दोघांसमोरही समस्या कायम असल्याचे त्यांनी मान्य केले. पेट्रोल पंपांवर अजूनही रांगा आहेत, योग्य दर्जाचे पेट्रोल मिळणेही काहीसे कठीण झाले आहे, असे पुतिन यांनी कबूल केले. मात्र, ही तेलटंचाई गंभीर नसून तात्पुरती आहे, हे सांगायला ते विसरले नाहीत.

रशियाचा चुकलेला अंदाज

रशियाने फेब्रुवारी २०२२मध्ये युक्रेनवर हल्ला केला तेव्हा युक्रेनकडून इतका प्रतिकार होईल आणि युद्ध चार वर्षांपेक्षा जास्त काळ लांबेल, याची राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि त्यांचे कार्यालय असलेल्या क्रेमलिनला कल्पना नसेल. या युद्धात युक्रेनचे अर्थातच मोठे नुकसान झाले आहे. पण तरीही ते माघार घ्यायला तयार नाहीत.

nima.patil@expressindia.com