Oreshnik missile hypersonic features and Russia Ukraine war latest update in Marathi: रशिया- युक्रेन युद्धाने आता भीषण वळण घेतले असून, रशियाने पुन्हा एकदा सर्वात घातक ‘ओरेश्निक’ (Oreshnik) हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर कीव्हवर केला. या हल्ल्यामुळे संपूर्ण युरोपमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, रशियाचे हे अस्त्र नेमके किती शक्तिशाली आहे, याची चर्चा जगभर सुरू झाली आहे. रविवारी २४ मे रोजी रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये किमान चार जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. रशियाने पुन्हा एकदा ‘ओरेश्निक’ (Oreshnik) या अण्वस्त्रवाहू हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर केला.

सामरिक उत्सुकता

युक्रेन-रशिया युद्धाचे हे चौथे वर्ष आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन Vladimir Putin यांनी “जगातील विद्यमान संरक्षण व्यवस्थांना रोखता न येणारे क्षेपणास्र” असा या क्षेपणास्त्राचा उल्लेख केला होता. त्यामुळे या क्षेपणास्त्राभोवती केवळ लष्करीच नव्हे तर सामरिक आणि भू-राजकीय उत्सुकताही वाढली आहे.

कीव्हवरचा हल्ला आणि त्यामागील संदेश

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की Volodymyr Zelenskyy यांनी कीव्ह हेच या हल्ल्याचे प्रमुख लक्ष्य होते, असे म्हटले आहे. राजधानीसह इतर भागांवरही प्रहार झाले. दुसरीकडे, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने हा हल्ला रशियातील नागरी पायाभूत सुविधांवर झालेल्या कथित युक्रेनी कारवायांना उत्तर असल्याचा दावा केला. रशियाने या मोहिमेत ओरेश्निक, Iskander missile system, Kh-47M2 Kinzhal आणि 3M22 Zircon यांसारख्या विविध क्षेपणास्त्र प्रणालींचाही वापर केल्याचे सांगितले. यापूर्वी नोव्हेंबर २०२४ मध्ये युक्रेनमधील निप्रो Dnipro येथे आणि त्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये ल्विव Lviv परिसरात ओरेश्निकचा वापर झाल्याचे सांगण्यात आले होते. आता तिसऱ्यांदा रशियाने या क्षेपणास्त्राचा वापर कीव्हवरील हल्ल्यासाठी केला.

Russia Ukraine war Kyiv attack
रशियाचा युक्रेनवर भीषण हल्ला; हल्ल्यात ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्राचा वापर, जगात खळबळ, (फोटो-एक्स व्हिडीओ स्क्रिनशॉट)

ओरेश्निक म्हणजे नेमके काय?

‘ओरेश्निक’ हे रशियाचे मध्यम पल्ल्याचे (Intermediate-Range) हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. ‘ओरेश्निक’ हा शब्द रशियन भाषेतील ‘हेझल’ वृक्षावरून आलेला आहे. रशियाच्या दाव्यानुसार हे क्षेपणास्त्र ३,००० ते ५,५०० किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांवर मारा करू शकते. त्यामुळे युरोपातील अनेक भाग त्याच्या परिघात येतात. संरक्षणतज्ज्ञांच्या मते, हे क्षेपणास्त्र रशियाच्या RS-26 Rubezh या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानावर आधारित आहे. RS-26 स्वतः RS-24 Yars या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या लहान स्वरूपातील आवृत्ती मानले जाते. ओरेश्निकची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ते परंपरागत स्फोटके आणि अण्वस्त्रवाहू वॉरहेड दोन्ही प्रकार वाहून नेऊ शकते.

‘हायपरसॉनिक’ म्हणजे किती वेगवान?

ओरेश्निकला सर्वाधिक प्रसिद्धी मिळवून देणारा मुद्दा म्हणजे त्याचा वेग.
रशियाच्या दाव्यानुसार हे क्षेपणास्त्र मॅक १०, म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या सुमारे दहापट वेगाने प्रवास करू शकते.
याचा अर्थ असा की हे क्षेपणास्त्र अंदाजे १२,००० किमी प्रतितास यापेक्षा अधिक वेगाने जाऊ शकते.
इतका वेग असल्यास पारंपरिक हवाई संरक्षण प्रणालींना लक्ष्य शोधणे, त्याचा मार्ग ताडणे आणि ते अडवणे अत्यंत कठीण ठरते.

ओरेश्निक इतके धोकादायक का मानले जाते?

ओरेश्निकच्या संदर्भात संरक्षणतज्ज्ञ तीन प्रमुख वैशिष्ट्ये सांगतात:

१. अनेक वॉरहेड्स वाहून नेण्याची क्षमता (MIRV)

  • हे क्षेपणास्त्र एकाच वेळी अनेक स्वतंत्र वॉरहेड्स वेगवेगळ्या लक्ष्यांकडे पाठवू शकते.
  • याला Multiple Independently Targetable Reentry Vehicle (MIRV) क्षमता म्हटले जाते.
  • म्हणजे एकच क्षेपणास्त्र सोडले तरी अनेक ठिकाणी एकाच वेळी प्रहार करण्याची शक्यता.

२. अतिवेग आणि उष्णता

हायपरसॉनिक वेगामुळे लक्ष्यावर आदळताना प्रचंड गतिज ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे काही वेळा स्फोटक क्षमताही तुलनेने कमी असली तरी नुकसान मोठे होऊ शकते.

३. संरक्षित लक्ष्यांवर परिणाम

भूगर्भातील बंकर, संरक्षित लष्करी सुविधा किंवा मजबूत संरक्षण असलेल्या लक्ष्यांवर प्रहार करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रणाली विकसित केल्या जातात.

कीव्हमध्ये किती नुकसान झाले?

युक्रेनच्या आपत्कालीन सेवांच्या माहितीनुसार या हल्ल्यात कीव्हमधील ५० हून अधिक ठिकाणांचे नुकसान झाले. यामध्ये पुढील ठिकाणांचा समावेश आहे.

  • निवासी इमारती
  • शाळा
  • व्यापारी संकुले
  • पोलिसांच्या इमारती

कीव्हच्या शेव्हचेंको जिल्ह्यातील एका पाच मजली इमारतीवर झालेल्या हल्ल्यात किमान एका व्यक्तीचा मृत्यू झाला. कीव्हचे महापौर Vitali Klitschko यांनी एका शाळेचेही बरेच नुकसान झाल्याचे सांगितले. काही नागरिक या ठिकाणी आश्रयास होते.

हल्ल्याची तीव्रता

  • २२ वर्षे बाजारात काम करणाऱ्या स्वितलाना ओनोफ्रिचुक यांनी सांगितले की, “युद्ध सुरू झाल्यापासून अशी रात्र कधीच अनुभवली नव्हती.”
  • तर ७४ वर्षीय येव्हहेन झोसिन यांनी स्फोटानंतर स्वतः घरच्या पाळीव कुत्र्याला उचलून बाहेर धाव घेतल्याचे सांगितले. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या धक्क्याने दोघेही फेकले गेले आणि त्यांचे घर उद्ध्वस्त झाले.

रशियाचे दावे

युक्रेनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यापूर्वी असा दावा केला होता की, २०२४ मध्ये वापरलेल्या ओरेश्निकमध्ये प्रत्यक्ष स्फोटकांऐवजी ‘डमी’ वॉरहेड बसवण्यात आली होती. त्यामुळे नुकसान मर्यादित होते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे या क्षेपणास्त्राची खरी क्षमता, त्याचा अचूक लक्ष्यभेद आणि प्रत्यक्ष अडवण्याची शक्यता याबाबत स्वतंत्र पडताळणी अद्याप मर्यादितच आहे.

युद्धाचा पुढचा टप्पा?

  • ओरेश्निक हे फक्त एक क्षेपणास्त्र नाही; तर ते अत्याधुनिक युद्धाच्या बदलत्या स्वरूपाचे प्रतीक आहे.
  • ड्रोन, हायपरसॉनिक प्रणाली, इलेक्ट्रॉनिक युद्ध, अचूक लक्ष्यभेद आणि अण्वस्त्र प्रतिरोध यांचा एकत्रित वापर आता पारंपरिक रणांगणाच्या संकल्पनाच बदलणारा आहे.

अण्वस्त्रयुगातील मानसिक दबाव?

रशियाने कीव्हवरील अलीकडच्या हल्ल्यात वापरल्याचा दावा केलेले ओरेश्निक क्षेपणास्त्र केवळ त्याच्या विध्वंसक क्षमतेमुळे चर्चेत नाही; तर ते आधुनिक युद्धातील एका नव्या प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करते. वेग, अचूकता, मनोवैज्ञानिक परिणाम यांचे अनोखे मिश्रण म्हणजे ओरेश्निक. रशियाने या हल्ल्यात ९० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि सुमारे ६०० ड्रोन्स वापरल्याची माहिती युक्रेनने अधिकृतरित्या दिली. युद्धतज्ज्ञांच्या मते, ओरेश्निकची खरी ताकद केवळ त्याच्या स्फोटक क्षमतेत नाही; तर शत्रूला “तुमची संरक्षण यंत्रणा अपुरी पडू शकते” हा संदेश देण्यात आहे.

‘अडवता येणार नाही’ हा दावा; किती वास्तव, किती अवास्तव?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी यापूर्वी अनेकदा दावा केला आहे की, ओरेश्निकला सध्याच्या अमेरिकन किंवा युरोपीय क्षेपणास्त्रविरोधी प्रणाली अडवू शकत नाहीत. परंतु संरक्षण विश्लेषक या दाव्याकडे अधिक सावध नजरेने पाहतात. कारण प्रत्यक्षात कोणतेही क्षेपणास्त्र पूर्णपणे ‘अडवता येत नाही’ असे सिद्ध झालेले नाही. युद्धात लक्ष्य, प्रक्षेपणाचा कोन, उंची, तैनात संरक्षण प्रणाली, पूर्वसूचना आदी अनेक घटकांवर क्षेपणास्राचा परिणाम अवलंबून असतो. मात्र इतके निश्चित आहे की हायपरसॉनिक शस्त्रे पारंपरिक संरक्षण संकल्पनांना आव्हान देतात. कारण लक्ष्य शोधणे, निर्णय घेणे आणि प्रत्युत्तर देणे यासाठी उपलब्ध वेळ अवघ्या काही मिनिटांवर येतो.

अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता हीच सर्वात मोठी चिंता

ओरेश्निकबाबतची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय चिंता म्हणजे ते अण्वस्त्र तसेच पारंपरिक वॉरहेड दोन्ही एकाच वेळेस वाहून नेऊ शकते. यामुळे प्रत्यक्ष प्रहार होण्याआधीच शत्रूपक्षाचा गोंधळ उडू शकतो. उदाहरणार्थ, एखादे क्षेपणास्त्र प्रक्षेपित झाले तर समोरच्या देशाला त्यात पारंपरिक स्फोटके आहेत की अण्वस्त्र हे लगेच कळण्याची शक्यता कमी असेल. अशा परिस्थितीत चुकीच्या आकलनातून मोठा संघर्ष निर्माण होऊ शकतो.
शीतयुद्धानंतरच्या काळात युरोपमध्ये पुन्हा मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चर्चा वाढण्यामागे हेच कारण आहे.

युद्धातील उपयोग की राजकीय संदेश?

शिवाय संरक्षणतज्ज्ञांना पडलेला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रशिया ओरेश्निकचा मर्यादित वापर का करत आहे?
आतापर्यंतच्या माहितीनुसार या युद्धात ओरेश्निक तिसऱ्यांदा वापरण्यात आले. काही संरक्षण विश्लेषकांचे मत असे आहे की, अशा प्रकारची महागडी आणि तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीची शस्त्रे मोठ्या प्रमाणावर वापरण्यापेक्षा धोरणात्मक इशारा म्हणून वापरली जातात. त्यामुळे विध्वंसापेक्षाही अधिक महत्त्व अशी विध्वंसक क्षेपणास्त्रे आपल्याकडे आहेत, हे जगाला ओरडून सांगणे.

भीती आणि सामरिक संदेश

एक भीतिदायक गोष्ट म्हणजे, आधुनिक युद्धात रणांगण आणि शहर यांच्यातील सीमारेषा अधिक धूसर होत चालली आहे. ड्रोनचे थवे, हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित लक्ष्यनियोजन आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध या सर्वांचा एकत्रित वापर भविष्यातील संघर्षाचे स्वरूप ठरवू लागला आहे. ओरेश्निक हा त्या बदलाचा केवळ एक नमुना आहे. ते खरोखरच किती घातक हे इतिहासच नंतर ठरवेल; पण त्याने निर्माण केलेली भीती आणि सामरिक संदेश मात्र हे युद्ध संपल्यानंतरही दीर्घकाळ चर्चेत त राहू शकतात.