-भक्ती बिसुरे 
रशियन पत्रकार दिमित्री मुरातोव यांनी आपल्या नोबेल पारितोषिकाचा लिलाव केला असून या लिलावातून १०.३५ कोटी अमेरिकन डॉलर एवढी विक्रमी रक्कम उभी राहिली आहे. ही रक्कम युक्रेनी निर्वासित मुलांसाठी वापरली जाणार आहे. यापूर्वी ज्या नोबेल पारितोषिकाचा लिलाव करण्यात आला त्या लिलावात ४७.६ लाख अमेरिकन डॉलर एवढी रक्कम उभा राहिली होती. दिमित्री मुरातोव हे कोण आहेत, त्यांना नोबेल पारितोषिक कशासाठी मिळाले आणि त्यांनी आत्ताच त्याचा लिलाव का केला याबाबत माहिती सांगणारे हे विश्लेषण. 

दिमित्री मुरातोव कोण आहेत?

दिमित्री मुरातोव हे रशियन पत्रकार, वृत्तपत्र संपादक आणि वृत्त निवेदक आहेत. २०२१ मध्ये ‘लोकशाही टिकवण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणाची गरज ओळखून त्यासाठी दिलेल्या योगदाना’साठी आणखी एक पत्रकार फिलिपिन्सच्या मारिया रेसा यांच्या बरोबरीने दिमित्री यांना शांतेच्या नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आले. ‘नोवाया गाजेटा’ हे मुरातोव यांचे वृत्तपत्र सरकारी कारभारातील भ्रष्टाचार, मानवी हक्कांचे उल्लंघन, निवडणुकांतील गैरव्यवहार आणि तत्सम सत्तेतून मिळणाऱ्या अधिकाराचा गैरवापर याबाबत संवेदनशील वार्तांकनासाठी ज्ञात आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या सरकारचा गैरकारभार उजेडात आणणाऱ्या ॲना पोलित्कोव्स्काया यांचे लेखनही याच वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत होते. रशियातील एकमेव निष्पक्ष आणि परखड वर्तमानपत्र म्हणून कमिटी टू प्रोटेक्स जर्नालिस्ट्स या गटाने या वर्तमानपत्राची निवडही केली होती. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. त्यानंतर रशियन माध्यमे ही केवळ रशियन सरकारचीच बाजू लावून धरतील आणि तेवढीच प्रसिद्ध करतील. आपले वर्तमानपत्र मात्र त्याला अपवाद असेल असे म्हणत मुरातोव यांनी रशियन आणि युक्रेनी अशा दोन भाषांमध्ये आपल्या वर्तमानपत्राची आवृत्ती छापण्यास सुरुवात केली. मार्च २०२२ मध्ये फेडरल सर्विस फॉर सुपरव्हिजन ऑफ कम्युनिकेशन, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ॲण्ड मास मिडियाच्या धमक्यांना कंटाळून त्यांनी लॅटव्हियाची राजधानी रीगा येथून आपली परदेशी आवृत्ती छापण्यास सुरुवात केली आणि रशियन सेन्सॉरशिपचे जोखड झुगारून दिले. 

नोबेल पारितोषिक कशासाठी?

लोकशाही आणि शांतता टिकवण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणाची गरज ओळखून त्यासाठी दिलेल्या योगदानासाठी फिलिपिन्सच्या मारिया रेसा यांच्याबरोबर विभागून दिमित्री यांना शांततेच्या नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले. हे पारितोषिक देताना नोबेल पुरस्कार समितीने नोवाया गाजेटा या मुरातोव यांच्या वर्तमानपत्राच्या वार्तांकनाची प्रशंसा केली. रशियाच्या अंतर्गत भागात तसेच बाहेर रशियन सैन्यदलांचा केला जाणारा वापर यावरील मुरातोव यांच्या वार्तांकनाची विशेष दखल हे पारितोषिक देताना घेण्यात आली. मुरातोव यांची नोबेल पारितोषिकासाठी निवड केल्याबाबत रशियात तीव्र पडसाद उमटले. या पारितोषिकाचे श्रेय मुरातोव यांनी त्यांच्याबरोबर पत्रकारिता करताना हत्या झालेल्या पत्रकार सहकाऱ्यांना दिले. 

लिलावाचा निर्णय का?

नोबेल पारितोषिकाची रक्कम म्हणून मिळालेले पाच लाख अमेरिकन डॉलर धर्मादाय कार्यासाठी दान करतानाच आपल्या पारितोषिकाचा लिलाव करण्याचा मनोदय मुरातोव यांनी बोलून दाखवला होता. युक्रेनमध्ये युद्धामुळे विस्थापित झालेल्या मुलांना मदत करण्यासाठी आपल्या नोबेल पारितोषिकाचा लिलाव करण्याचा निर्णय मुरातोव यांनी घेतला. १ जून या आंतरराष्ट्रीय बालदिनाचे औचित्य साधून या लिलावासाठी बोली लावण्यास सुरुवात झाली. प्रामुख्याने दूरध्वनी आणि ऑनलाईनद्वारे या बोली लावण्यात आल्या. बोली लावण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्वरित युनिसेफने ही रक्कम आपल्याला प्राप्त झाल्याचे स्पष्ट केले. आतापर्यंत झालेल्या नोबेल पारितोषिकांच्या लिलावाचे सर्व विक्रम मोडून मुरातोव यांच्या पारितोषिकाला १०.३५ कोटी अमेरिकन डॉलरची किंमत प्राप्त झाली आहे. हा प्रतिसाद मुरातोव यांच्या पत्रकारितेतील योगदान आणि संवेदनशीलतेला असल्याचे हेरिटेज अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. मुरातोव आणि त्यांच्या पारितोषिकातील भागीदार मारिया रेसा या दोघांनीही जिवावरचे संकट, हल्ले आणि जिवे मारण्याच्या धमक्या यांवर मात करून केलेल्या पत्रकारितेसाठी नोबेल शांतता पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे. मुरातोव यांचे पदक १७५ ग्रॅम २३ कॅरेट सोन्यापासून बनवण्यात आले असून ते वितळवल्यास त्याची किंमत १० हजार अमेरिकन डॉलर एवढी भरते. 

मुरातोव रशियाचे टीकाकार का? 

दिमित्री मुरातोव हे रशियाचे कडवे टीकाकार मानले जातात. २०१४ मध्ये रशियाने क्रीमिया बळजबरीने ताब्यात. २०२२ मध्ये युक्रेनविरुद्ध रशियाने छेडलेल्या अमानुष युद्धामुळे युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वांत मोठे मानवतावादी संकट निर्माण झाले आहे. या सगळ्या घटनांबाबत मुरातोव यांनी वेळोवेळी रशियावर टीका केली आहे. ब्लादिमीर पुतीन सत्तेत आल्यानंतर सुमारे दोन डझन पत्रकारांच्या निर्घृण हत्या करण्यात आल्या आहेत. त्यांपैकी काही जण मुरातोव यांच्या वर्तमानपत्रात काम करत होते. नुकताच एप्रिलमध्ये एका प्रवासात मुरातोव यांच्यावरही हल्ला झाला आहे. नोबेल पारितोषिक देण्यास १९०१ मध्ये सुरुवात झाली. त्यानंतर विविध क्षेत्रातील १००० व्यक्तींना या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. मुरातोव रशियन सरकारच्या विरोधात उभे राहून पत्रकारितेत देत असलेल्या योगदानासाठी त्यांची या पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे.