S Jaishankar On US-Israel Iran War : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह आतापर्यंत शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, तरीही हे युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे संपूर्ण पश्चिम आशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यातच इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याने जागतिक व्यापार ठप्प होण्याच्या मार्गावर असून याचा फटका भारतालाही बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
दरम्यान, अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या या युद्धाबाबत भारताची भूमिका काय? तसेच जागतिक शांततेसाठी भारताची भूमिका काय? याबाबत भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी सोमवारी संसदेत निवेदन सादर केलं आहे. भारत शांततेच्या बाजूने असल्याची ठाम भूमिका परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी संसदेत मांडली आहे. यासह परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी आणखी कोणते मुद्दे संसदेत मांडले? तसेच पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत कोण-कोणत्या देशांशी चर्चा केल्या? याबाबत जाणून घेऊयात.
परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी संसदेत काय भूमिका मांडली?
अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संसदेत भारताची भूमिका मांडताना परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी म्हटलं की, “भारत शांततेच्या बाजूने आहे. संवाद आणि राजनैतिकतेकडे परत येण्याचा आग्रह भारताचा असेल. शांतता, संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरी हा मार्ग आहे. दोन्ही देशांतील तणाव कमी करणं, संयम राखणं आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणं या गोष्टींचं भारत समर्थन करतो. भारत शेजारील प्रदेश आहे आणि पश्चिम आशिया स्थिर राहावा अशी आमची इच्छा आहे. आखाती देशांमध्ये एक कोटी भारतीय राहतात आणि काम करतात. इराणमध्येही काही हजार भारतीय शिक्षण किंवा नोकरीसाठी आहेत. हा प्रदेश आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे. त्यात तेल आणि वायूचे अनेक महत्त्वाचे पुरवठादार आहेत. पुरवठा साखळीतील गंभीर व्यत्यय आणि अस्थिरतेचे वातावरण हे गंभीर मुद्दे आहेत”, असं परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी म्हटलं.
“अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील संघर्ष वाढत गेला आणि या प्रदेशातील सुरक्षा परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिघडली. हा संघर्ष इतर देशांमध्ये पसरला असून विनाश वाढत आहे. येथील सामान्य जीवनावर स्पष्टपणे परिणाम झाला. पश्चिम आशियात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या नेतृत्व पातळीवर इराणशी संपर्क साधणं निश्चितच कठीण आहे. तरीही मी इराणी परराष्ट्रमंत्र्यांशी बोललो आहे. इराणमधील नेतृत्व पातळीवर आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानासह असंख्य जीवितहानी झाली. सरकारने सुरुवातीला २८ फेब्रुवारी रोजी एक निवेदन प्रसिद्ध करून तीव्र चिंता व्यक्त केली होती. तसेच सर्व बाजूंना संयम बाळगण्याचं, तणाव वाढू नये आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं होतं. आमचा विश्वास आहे की तणाव कमी करण्यासाठी आणि मूलभूत समस्या सोडवण्यासाठी संवाद आणि राजनैतिक कूटनीतिचा अवलंब केला पाहिजे. तसेच या प्रदेशातील सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करणं देखील अत्यावश्यक आहे”, अशी भूमिका परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी मांडली आहे.
” या बरोबरच केंद्र सरकारने इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील तेहरानवरील अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांवर लक्ष ठेवून आहेत. भारतीयांची सुरक्षा ही केंद्र सरकारची प्राथमिकता असेल. दूतावासाने यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यास मदत केली. कतार आणि जॉर्डनसारख्या देशांत अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी आणि त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत”, असंही परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी स्पष्ट केलं.
एस.जयशंकर यांनी इराण आणि इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांशी केली होती चर्चा
अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील या संघर्षावर भारताने शांतता राखण्याचं आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचं व संवाद व राजनैतिकतेद्वारे तणाव सोडवण्याचं आवाहन केलेलं आहे. मात्र, तरीही परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इस्रायल आणि इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी थेट फोनद्वारे संवाद साधत दोन्ही देशाला संवाद आणि राजनैतिकतेचं आवाहन केलं. याबाबतची एस जयशंकर यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत दिली होती. “इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला. तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि राजनैतिकचं आवाहन केलं. तसेच इराणचे परराष्ट्रमंत्री मंत्री सय्यद अब्बास अरघची यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली”, अशी माहिती याआधीच मंत्री एस जयशंकर यांनी दिली होती.
इराणमधील युद्धावर पंतप्रधान मोदींनी काय प्रतिक्रिया दिली?
अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील संघर्षावर काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना भाष्य केलं होतं. मोदी म्हणाले होते की, “कायद्याचं राज्य, संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीवर भारत विश्वास ठेवतो. लष्करी संघर्ष हा कोणत्याही समस्येवरचा तोडगा नाही. भारत आणि फिनलंड हे कायद्याचे राज्य, संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीवर विश्वास ठेवतात. केवळ लष्करी संघर्ष कोणताही प्रश्न सोडवू शकत नाही. यावर फिनलंड आणि भारताचं एकमत आहे. मग तो युक्रेनमधील संघर्ष असो किंवा पश्चिम आशियातील (अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील) संघर्ष असो. हा संघर्ष लवकरात लवकर संपून शांतता प्रस्थापित व्हावी अशी आशा आम्ही व्यक्त करतो.”
मोदींनी आतापर्यंत किती देशांशी संपर्क साधला
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे जगात एकच खळबळ उडालेली आहे. या हल्ल्यामुळे पश्चिम आशियात तणाव निर्माण झालेला आहे. दोन्ही देशांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही प्रतिहल्ले सुरू ठेवले असून आखाती देशांना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे अमेरिका, इस्रायल, इराण आणि आखाती देशांत राहणाऱ्या भारतीयांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. या अनुषंगाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत तब्बल आठ देशांशी संपर्क साधला असून भारतीयांची सुरक्षिताता सुनिश्चित केल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
In the last 48 hours, Prime Minister Narendra Modi has spoken to leaders of:
— ANI (@ANI) March 3, 2026
1. UAE
2. Israel
3. Saudi Arabia
4. Jordan
5. Bahrain
6. Oman
7. Kuwait
8. Qatar https://t.co/KRLYvpLvLN
पंतप्रधानांनी कोणत्या देशांशी संपर्क साधला
एएनआयच्या एका वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएई, इस्रायल, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहरीन, ओमान, कुवेत आणि कतारच्या प्रमुखांशी संपर्क साधत चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदींनी या सर्व देशांमधील भारतीय समुदायाची काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे.
