बांगलादेशच्या पदच्युत माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कन्या सायमा वाजेद यांनी बुधवारी (९ सप्टेंबर) जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक संचालक पदाचा राजीनामा दिला. संयुक्त राष्ट्रसंघाची आरोग्य संस्था आणि बांगलादेशी अधिकाऱ्यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. २०२४ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशिया विभागाची सूत्रे हाती घेणाऱ्या सायमा यांना २०२५ मध्ये विनावेतन सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. शेख हसीना यांचे सरकार उलथून टाकल्यानंतर स्थापन झालेल्या तत्कालीन अंतरिम सरकारच्या काळात बांगलादेशच्या भ्रष्टाचारविरोधी आयोगाने त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केल्यानंतर आरोग्य संघटनेने ही कारवाई केली होती. या पार्श्वभूमीवर कोण आहेत सायम वाजेद? त्यांच्यावर नेमके काय आरोप झालेत? त्याविषयीचा हा आढावा…
सायमा वाजेद कोण आहेत?
साइमा वाजेद यांनी १ फेब्रुवारी २०२४ रोजी पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) दक्षिण-पूर्व आशिया विभागाच्या प्रादेशिक संचालकपदाची सूत्रे स्वीकारली होती. या महत्त्वाच्या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या बांगलादेशी आणि जगातील दुसऱ्या महिला ठरल्या होत्या. या निवडणुकीत सायमा यांना १० पैकी तब्बल ८ देशांची मते मिळाली होती. त्यावेळी भारतानेही त्यांच्याच बाजूने मतदान केले होते. ही जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी सायमा यांनी बांगलादेशातील ढाका येथील बंगबंधू शेख मुजीब मेडिकल महाविद्यालयात ‘व्हिजिटिंग स्पेशालिस्ट’ या पदावर काम केले होते. २०२२ ते २०२५ या कालावधीत त्यांच्याकडे ढाका विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि समुपदेशन मानसशास्त्र विभागात महत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच २०१८ ते २०२५ या काळात त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड हॉस्पिटलमध्येही ‘व्हिजिटिंग स्पेशालिस्ट’ पदावर काम केले होते. त्याशिवाय २०२२ ते २०२४ या कालावधीत त्यांनी अमेरिकेतील बॅरी युनिव्हर्सिटीमध्ये मानद प्राध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. १९९५ ते १९९७ दरम्यान सायमा यांनी बॅरी विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात बॅचलर ऑफ सायन्स पदवी मिळवली आणि त्यानंतर क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
सायमा यांच्यावरील आरोप काय?
सायमा वाजेद यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक संचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावरील आरोपांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. बांगलादेशी तपास यंत्रणा आणि जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्यावर प्रवास खर्च, शैक्षणिक पात्रता आणि बांगलादेशातील एका भूखंडाच्या खरेदीबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्याचवेळी सायमा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. आरोग्य संघटनेने त्यांच्यावर चीन दौऱ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवला आहे. याबाबत सायमा यांच्या वकिलांनी बाजू मांडताना सांगितले की, हा वाद केवळ ९०१ डॉलर्सच्या (सुमारे ८५,९६४ रुपये) परताव्याशी संबंधित आहे. दैनंदिन प्रवासाचे दावे सांभाळणाऱ्या एका सहाय्यकाकडून झालेल्या प्रशासकीय चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सायमा यांनी काय बाजू मांडली?
शैक्षणिक पात्रतेची चुकीची माहिती सादर केल्याचा आरोपही सायमा यांनी फेटाळून लावला आहे. आपल्या नावापुढील ‘डॉक्टरेट’ ही केवळ मानद पदवी असल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते, असा दावा सायमा यांच्या वकिलांनी केला आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस यांना तशी कल्पनाही दिली होती, असे त्यांनी नमूद केले आहे. यादरम्यान घेब्रेयसस यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात सायमा यांनी बांगलादेशातील जमीन खरेदीवर उपस्थित केलेल्या प्रश्नांचाही उल्लेख केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेत पदभार स्वीकारण्यापूर्वीच आपण ती जमीन खरेदी केली होती. बांगलादेशच्या स्वातंत्र्यसंग्रामातील नेते शेख मुजीबुर रहमान यांच्या कुटुंबीयांना लागू असलेल्या बांगलादेशी कायद्यानुसार ही मालमत्ता मिळवण्याचा आपल्याला अधिकार होता, असा दावाही त्यांनी केला आहे.
राजीनामा पत्रात सायमा काय म्हणाल्या?
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गेब्रेयिसस यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात सायमा यांनी नमूद केले की, माझ्या विभागातील देशांची सेवा करण्यासाठी प्रादेशिक संचालकपदासाठी माझी निवड झाली होती आणि मी हे काम प्रामाणिकपणे केले. मात्र, माझी कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्यापासून तुम्ही मला सातत्याने रोखत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाबाबत माझा विश्वास पूर्णपणे उडाला आहे. तसेच मला विनावेतन रजेवर पाठवण्याच्या तुमच्या निर्णयामुळे गेल्या वर्षभरात माझी आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. या परिस्थितीत मी स्वत:हून पदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेत आहे.
छळ आणि सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप
महासंचालक ग्रेबेयिसस यांच्याकडून आपला सातत्याने छळ करण्यात आल्याचा आरोप सायना यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना केला. त्यांच्या या वर्तवणुकीची आणि संपूर्ण तपास प्रक्रियेची मी स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली होती; पण ती जाणीवपूर्वक धुडकावून लावण्यात आली आणि मला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यांच्याकडून होणारा हा मानसिक आणि आर्थिक छळ सहन करणे आता माझ्यासाठी अशक्य झाले होते, असेही त्या म्हणाल्या. गेल्या आठ महिन्यांत मी याविरोधात वारंवार आवाज उठवला. कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करताच माझ्यावर कारवाई करण्यात आली. बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन अंतरिम सरकारच्या दबावाखालीच ही कारवाई करण्यात आल्याचा दावाही सायमा यांनी केला.
हसीना कुटुंबातील आणखी कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप?
केवळ सायमा वाजेदच नव्हे, तर शेख हसीना यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांवरही भ्रष्टाचाराचा आरोप झाला आहे. जानेवारी २०२५ मध्ये हसीना यांच्या भाची तुलिप सिद्धीक यांनी ब्रिटनमधील ‘आर्थिक सेवा आणि भ्रष्टाचारविरोधी’ मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. बांगलादेशच्या माजी पंतप्रधानांशी असलेल्या आर्थिक संबंधांची चौकशी सुरू झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. मात्र, मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी त्या अजूनही ब्रिटनच्या खासदार म्हणून कार्यरत आहेत. यादरम्यान बांगलादेशातील एका न्यायालयाने तुलिप यांच्या अनुपस्थितीत त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यावर प्रतिक्रिया देताना तुलिप यांनी ही न्यायालयीन प्रक्रिया दोषपूर्ण असल्याचे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
