रविवारी (दि. २८ मे) दिल्लीमध्ये एका बाजूला नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उदघाटन झाले, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटूंना रस्त्यावरून फरफटत नेत ताब्यात घेण्यात आले आणि संध्याकाळी दिल्लीच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या शाहबाद डेअरी भागात एका १६ वर्षीय मुलीचा निर्घृणपणे खून करण्यात आला. माथेफिरू आरोपी साहिल खान याने अल्पवयीन मुलीवर वीस वेळा धारदार शस्त्राने वार केले. एवढ्यावर न थांबता रस्त्यावर पडलेला सिमेंट ब्लॉक तिच्या डोक्यात घातला. या वेळी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या कुणीही आरोपीला रोखले नाही. दिल्ली पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथून अटक केली आहे. फर्स्टपोस्ट या वेबसाइटने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटचा सविस्तर आढावा घेऊन आरोपीच्या मानसिकतेचा मागोवा घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पीडित मुलगी मैत्रिणीच्या घरी जात असताना साहिलने तिला अडवले आणि चाकूने तिच्यावर वार करून तिची हत्या केली. त्यानंतर रस्त्यावर पडलेला सिमेंट ब्लॉक पाचवेळा तिच्या डोक्यावर आदळला. शाहबाद परिसरात मुलीचा मृतदेह पडला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत्युमुखी पडलेली पीडित तरुणी आणि आरोपी साहिल गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. मात्र काही कारणास्तव दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्याचाच राग मनात धरून साहिल खानने तिची हत्या केली. हे वाचा >> Video: दिल्लीत अल्पवयीन मुलीला २० वेळा भोसकणारा साहिल निर्ढावलेलाच; पोलीस तपासात म्हणतो, “अजिबात पश्चात्ताप नाही!” पीडित तरुणी ज्या मैत्रिणीच्या घरी जाणार होती, त्या नितून नावाच्या मुलीने 'टाइम्स नाऊ'शी बोलताना सांगितले की, माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त ती माझ्या घरी येणार होती. माझ्या मुलीसाठी कपडे आणि भेटवस्तूही तिने खरेदी केल्या होत्या. एका मित्राच्या घरी जाऊन ती आमच्याकडे येणार होती. पण ती परतलीच नाही. हत्या केल्यानंतर साहिल खान याने तातडीने आपला मोबाइल स्विच ऑफ करून बुलंदशहर येथे पळ काढला. आरोपीची पार्श्वभूमी आरोपी साहिल खान हा दिल्ली येथे एसी दुरुस्त करणारा मेकॅनिक म्हणून काम करत होता. तो इन्स्टाग्रामवर सक्रिय होता. त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील बायोमध्ये "लव्ह यू डार्क लाइफ… दारू लव्हर… यारों की यारी, सब पे भारी… ५ जुलै… लव्ह यू मॉम", अशी स्वतःबद्दलची माहिती टाकली आहे. या अकाऊंटवर काही व्हिडीओ आणि फोटो साहिलने पोस्ट केलेले आहेत. हुक्का ओढताना, मित्रांबरोबर जेवण आणि बाहेर फिरत असतानाचे व्हिडीओ आहेत. एका व्हिडीओमध्ये साहिल आणि त्याचे मित्र हुक्का ओढताना दिसत असून दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या 'सेल्फमेड' या गाण्यावर धिंगाणा करताना दिसत आहेत. या इन्स्टाग्राम हॅण्डलवरील अनेक पोस्ट तपासल्या असता साहिल आणि त्याचे मित्र सिद्ध मुसेवालाचे चाहते असल्याचे लक्षात येते. काही व्हिडीओमध्ये साहिल स्वतःही गाणे गाताना दिसत आहे. मागच्या वर्षी सिद्धू मुसेवालाची हत्या झाल्यानंतर RIP Paaji या कॅप्शनसह त्याने एक पोस्ट टाकलेली आहे. आणखी एका रीलमध्ये साहिल खान अटक झालेल्या आपल्या एका मित्राची स्तुती करताना दिसत आहे. पोलिसांनी साहिलला अटक कशी केली? खून केल्यानंतर साहिल खान बुलंदशहरमध्ये नातेवाईकांकडे लपून बसला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिलने त्याचा फोन स्विच ऑफ केला होता. पण मध्येच त्याने वडिलांना फोन करण्यासाठी फोन चालू केला आणि पोलिसांना त्याचे लोकेशन कळले. त्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवून अटक केली, अशी माहिती 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलत असताना पोलिसांनी माहिती दिली. कबुलीजबाब पोलिसांनी केलेल्या चौकशीत साहिल खानने आपला गुन्हा मान्य केला. तो म्हणाला की, पीडित मुलीने त्याच्याबरोबरचे संबंध तोडले होते. तसेच साहिल तिच्यापासून लांब राहिला नाही, तर पोलिसांत तक्रार देऊ अशी धमकीही तिने दिली होती, या रागातून आपण तिची हत्या केली असल्याचे त्याने सांगितले. साहिलने पोलिसांना माहिती देताना पुढे सांगितले की, पीडित मुलीने तिच्या जुन्या मित्राशी पुन्हा जवळीक वाढवली असल्याचा संशय साहिलला आला होता. त्यामुळेच राग अनावर होऊन साहिलने तिला संपविले आणि याबाबत त्याला कोणताही पश्चात्ताप वाटत नाही. हे वाचा >> Delhi Murder Case : … म्हणून साहिलने केली ‘तिची’ हत्या, मारेकऱ्याच्या कबुलीनाम्यातून धक्कादायक माहिती उघड पीडित मुलीचा खून करण्याचा विचार साहिलने आधीच करून ठेवला होता. यासाठी हत्येच्या वीस दिवसांआधी त्याने हरिद्वार, उत्तराखंड येथून एक चाकू खरेदी केला होता. ज्याचा वापर गुन्ह्यासाठी केला गेला. दरम्यान, पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीला कठोरातले कठोर शासन व्हावे, अशी मागणी केली आहे. तसेच मुलीचे आणि साहिलचे काहीच संबंध नव्हते, असेही त्यांनी सांगितले. मुलीच्या आईने सांगितले की, साहिलला फासावर लटकवावे. तसेच वडिलांचेही असेच म्हणणे होते. "माझ्या मुलीवर अनेकदा वार केले गेले. दगडाने ठेचून तिचे डोके फोडले. आरोपीला अतिशय कठोर शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी आहे," अशी प्रतिक्रिया वडिलांनी माध्यमांशी बोलताना दिली.