मध्यप्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यात साल पोखरणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जवळपास दीड लाख सालवृक्ष तोडण्यास मंजुरी देण्यात आली. वारंवार उद्भवणाऱ्या या संकटाच्या मुळाशी जाण्याची आणि वनसंवर्धनाच्या उपाययोजनांची परिणामकारकता तपासण्याची गरज अधोरेखित होत आहे.

सालवृक्षांवर नेमके संकट काय?

हा कीटक सालवृक्षाच्या आतील लाकडाचे नुकसान करतो. त्याचा प्रादुर्भाव तीव्र झाल्यास वृक्ष मरू शकतात. डिंडोरी जिल्ह्यातील पूर्व करंजिया, पश्चिम करंजिया आणि समनापूर या तीन वनपरिक्षेत्रांमध्ये या किडीचा प्रादुर्भाव पसरला आहे. किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक लाख ४६ हजार ७८४ सालवृक्ष तोडले जाणार आहेत. सुमारे ३० हजार हेक्टर वनक्षेत्राला फटका बसल्याने ही मोहीम हाती घेण्यात येत आहे. बाधित वृक्ष तोडल्याने किडीचा पुढील प्रसार रोखता येईल, असा वनविभागाचा दावा आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्याची वेळ येण्यापूर्वी प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या, याची तपासणीही आवश्यक आहे.

किडीचा प्रादुर्भाव पहिल्यांदाच झाला आहे का?

या किडीच्या प्रादुर्भावाचा देशात मोठा इतिहास आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये १९९७ ते २००० या काळात सुमारे तीन लाख हेक्टर सालवन बाधित झाले होते. डिंडोरीलगतच्या मंडला जिल्ह्यालाही त्याचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे हे संकट वनयंत्रणेसाठी पूर्णपणे अनपेक्षित नाही. अशा घटनांची पुनरावृत्ती होत असताना नियमित निरीक्षण, प्रादुर्भावाचे लवकर निदान आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सक्षम यंत्रणा उभी राहिली का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. वनविभाग बाधित वृक्ष तोडण्याबरोबरच प्रौढ भुंगे पकडण्याची मोहीम राबवत आहे.

निवडक वृक्ष तोडून त्यांची साल काढली जाते. त्यातून बाहेर पडणाऱ्या रसाकडे आकर्षित होणारे भुंगे स्थानिक नागरिकांच्या मदतीने पकडले जातात. प्रत्येक भुंग्यामागे दोन रुपये दिले जात असून, एका हंगामात १९ लाखांहून अधिक भुंगे पकडल्याचे सांगितले जात आहे. या मोहिमेतून किडीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न होत असला, तरी प्रादुर्भाव मोठ्या क्षेत्रात पसरण्यापूर्वीच ही यंत्रणा सक्रिय झाली होती का, हा प्रश्न कायम आहे.

प्रादुर्भाव वाढण्यामागे हवामान कारणीभूत आहे का?

डिंडोरी-मंडला परिसरात मागील वर्षी झालेल्या असामान्य पावसामुळे किडीच्या वाढीस पोषक परिस्थिती निर्माण झाली असावी, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र, हवामानाला एकमेव कारण मानून चालणार नाही. वनांची स्थिती, वृक्षांची प्रतिकारक्षमता, वणवे, अतिचराई आणि वनव्यवस्थापनातील त्रुटी यांचाही अभ्यास आवश्यक आहे. प्रादुर्भावाची नेमकी कारणे स्पष्ट झाली नाहीत, तर वृक्षतोडीनंतरही भविष्यात अशाच संकटाची पुनरावृत्ती होण्याचा धोका कायम राहील. किडीचा प्रादुर्भाव झालेला प्रत्येक वृक्ष वाचवता येईलच असे नाही. काही वृक्ष तोडणे अपरिहार्य ठरू शकते. मात्र, त्यासाठी शास्त्रीय निकष, स्वतंत्र मूल्यमापन आणि पारदर्शक निर्णयप्रक्रिया आवश्यक आहे. वर्षभर कीड निरीक्षण, प्रादुर्भावाचे लवकर निदान, भुंगे पकडण्याच्या उपाययोजना, जैविक नियंत्रणाचे पर्याय आणि वृक्षतोडीनंतर वनाचे पुनर्स्थापन यांनाही प्राधान्य द्यावे लागेल.

वृक्षतोडीच्या निर्णयावर आक्षेप का घेतले जात आहेत?

मध्यप्रदेशचे निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक रामप्रसाद यांनी वृक्षतोडीच्या निर्णयापूर्वी स्वतंत्र मूल्यमापन करण्यात आले होते का आणि तज्ज्ञांशी चर्चा झाली होती का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. बाधित क्षेत्रांमध्येच प्रादुर्भाव अधिक तीव्र होण्यामागील कारणांचा अभ्यास करून निष्कर्ष सार्वजनिक करण्याची गरजही त्यांनी मांडली आहे. किडीचा प्रसार रोखणे आवश्यक असले, तरी त्यासाठी निवडलेल्या उपायाचे पर्यावरणीय परिणाम तपासणे तितकेच महत्त्वाचे आहे. किती वृक्ष वाचविता येतील आणि किती वृक्ष तोडणे अपरिहार्य आहे, याचे शास्त्रीय मूल्यमापन निर्णयाचा आधार असायला हवे.

वृक्षतोडीचा जंगलाच्या परिसंस्थेवर काय परिणाम होईल?

सालवन हे केवळ लाकडाचा स्रोत नाही. ते वन्यजीवांना अधिवास पुरवते, मातीची धूप रोखते, पाणी जमिनीत मुरण्यास मदत करते आणि स्थानिक आदिवासी समुदायांच्या उपजीविकेशी जोडलेले आहे. मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे वनाची नैसर्गिक रचना बदलू शकते. लहान वनस्पती आणि झुडपांचे आवरण कमी झाल्यास मातीची धूप वाढण्याचा आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता घटण्याचा धोका असतो. त्यामुळे बाधित वृक्ष हटविण्यापुरती उपाययोजना मर्यादित न ठेवता संपूर्ण परिसंस्थेवरील परिणामांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. संकट उद्भवल्यानंतर किती वृक्ष तोडले, यापेक्षा संकटाचा प्रसार रोखण्यासाठी आधी काय केले आणि त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कोणते उपाय केले जाणार आहेत, हे अधिक महत्त्वाचे आहे. डिंडोरीतील वृक्षतोडीमुळे किडीचा प्रादुर्भाव आटोक्यात आला, तरी वनव्यवस्थापनातील त्रुटी दूर झाल्या नाहीत, तर समस्या पुन्हा उभी राहू शकते. 

rakhi.chavhan@expressindia.com