अमली पदार्थांचा (ड्रग) तस्कर सलीम डोला याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर ड्रग तस्करी तात्पुरती थांबली आहे, असा तपास यंत्रणांचा दावा आहे. डोलाच्या अटकेनंतर मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ निर्मितीला आळा बसल्याचेही ते सांगत आहेत. परंतु आता राजस्थानातून अमली पदार्थांची तस्करी मुंबईत होत आहे. त्यामुळे अमली पदार्थ तस्करीला आळा बसणे कठीण आहे, असेच एकूण चित्र दिसत आहे. डोलानंतर या तस्करीची सूत्रे कोणाकडे आहेत, याबाबत हा आढावा.

सलीम डोला कोण? 

ताहिर सलीम डोला दुबई आणि तुर्कीतून भारतात अमली पदार्थांची तस्करी करीत होता. तो दाऊद टोळीचाच हस्तक असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. परंतु स्वत: डोला याने आपला दाऊदशी काहीही संबंध नाही, असा दावा मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीत केला. परंतु तपास यंत्रणा त्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. दुबईत दाऊदच्या पाठिंब्याशिवाय अमली पदार्थांची तस्करी होऊ शकत नाही, असे तपास यंत्रणांचे ठाम म्हणणे आहे. सांगली सातारा येथील अमली पदार्थ निर्मिती कारखान्याशी डोला याचा थेट संबंध आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या माहितीवरूनच इंटरपोलने त्याच्याविरुद्ध रेड कॅार्नर नोटिस जारी केली. अखेर डोला तुर्की (इस्तंबूल) येथे सापडला. त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आले. भारत, संयुक्त अरब अमिराती आणि तुर्कीमध्ये पसरलेल्या दाऊदच्या पाच हजार कोटींहून अधिक किमतीच्या अमली पदार्थ तस्करीचा तो मुख्य सूत्रधार असल्याचे मानले जाते. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊद देशातून पळून गेला, तेव्हा दाऊदने मुंबईसह जगात अन्यत्र पसरवलेले अमली पदार्थांचे जाळे सांभाळणाऱ्यांपैकी तो एक असावा, असा तपास यंत्रणांचा दावा आहे. मूळचा भायखळा येथील सलीम डोला हा सुरुवातीला गुटखा तस्करी करायचा. नंतर तो डोंगरीतच राहू लागला आणि दाऊद टोळीचा म्होरक्या छोटा शकीलच्या संपर्कात आला. त्यानंतर दाऊद टोळीच्या अमली पदार्थ तस्करीत तो स्थिरावला, असा दावा आहे. त्याच्यावर दहाहून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रीय अमली पदार्थ प्रतिबंधक विभागानेही एक लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते. मुंबई पोलिसांनी त्याला फरारी घोषित केले होते. उत्तर प्रदेशमधील अमली पदार्थ तस्कर कैलाश राजपूत याच्या अपहरणे करून त्याला महिनार डांबून ठेवण्याची जबाबदारी छोटा शकीलने डोलावरच सोपविली होती, असे सूत्रांनी सांगितले. 

भारतात का पाठवले? 

मेफेड्रॅान या अमली पदार्थाच्या निर्मितीसाठी डोला याने राज्यात सांगली व सातारा येथे कारखाने उभे केले होते. हे कारखाने चालविण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत डोलाने हवालाच्या माध्यमातून केली. त्याचा मुलगा ताहिर आणि भाचा मुस्तफा कब्बावाला हे दुबईतून संबंधितांना सूचना देत होते. सांगली येथे एमडी बनविणारा कारखानाही उद्ध्वस्त करण्यात आला तेव्हा अधिक चौकशीत सुरत येथील एका बनावट औषध कंपनीचे नाव समोर आले. अशा कारखान्यांना कच्चा माल पुरविणारा ब्रिजेश मोराबिया याला अटक केल्यानंतर डोला याचा मुलगा तसेच भाच्याचे नाव पुढे आलेच. गेली पाच वर्षे हा प्रकार सुरू होता, असेही चौकशीत स्पष्ट झाले. एमडी हा अमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा ब्रोमो-टू हा कच्चा माल मोराबिया पुरवित होता. ताहिर आणि मुस्तफा यांना भारतात प्रत्यार्पित करण्यात आल्यानंतर मोराबियाचा सहभाग स्पष्ट झाला. आपले मामा सलीम डोला याच्या सांगण्यावरून आपण हे केले, अशी कबुली त्याने दिल्यानंतरच डोला याचा प्रत्यक्ष सहभाग स्पष्ट झाला आणि त्याच्याविरुद्ध कारवाई करणे सोपे झाले. 

तस्करी कशी चालते? 

दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेल्या संपर्क जाळ्याद्वारे अमली पदार्थांची तस्करी चालते. हे जाळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानपासून ते पश्चिम आशिया, आफ्रिका आणि युरोपपर्यंत पसरलेले आहे. दाऊद टोळी अफगाण ड्रग्ज माफिया आणि पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने हेरॉईन आणि अफूची तस्करी करते. कराची आणि ग्वादर बंदरांचा वापर करून समुद्रमार्गे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ भारतात आणि इतर देशांत पाठवले जातात. अलीकडच्या काळात ही टोळी केवळ तस्करीवर अवलंबून न राहता भारतात मेफेड्रोनसारख्या सिंथेटिक ड्रग्जची निर्मिती करत आहे. महाराष्ट्र (सांगली) आणि गुजरातमध्ये या टोळीने गुप्त प्रयोगशाळा आणि कारखाने उभारले आहेत. अमली पदार्थांच्या विक्रीतून मिळालेला पैसा ‘हवाला’ मार्गाद्वारे फिरवला जातो. अंमलबजावणी संचालनालय या पैशांचा मागोवा घेत असून अलीकडेच सलीम डोलाच्या संपर्क यंत्रणेवर मुंबईत अनेक ठिकाणी त्यांनी छापे घातले. ही मंडळी एन्क्रिप्टेड ॲप्स, बनावट सिम कार्डाचा वापर करून आपली यंत्रणा चालवतात. सलीम डोलासारखे हस्तक ट्रॅकिंग टाळण्यासाठी अनेकदा मोबाईल न वापरता तिसऱ्या व्यक्तीमार्फत निरोप पोहचवत असत. ड्रग्ज तस्करीतून मिळणाऱ्या नफ्याचा मोठा हिस्सा ‘लष्कर-ए-तैयबा’ आणि ‘जैश-ए-मोहम्मद’सारख्या दहशतवादी संघटनांना दहशतवादी कारवायांसाठी वापरला जातो. 

इक्बाल मिरची कोण? 

मोहम्मद इक्बाल मेमन ऊर्फ इक्बाल मिरची हा अमली पदार्थांच्या जागतिक तस्करीचा सूत्रधार मानला जात होता. दाऊद इब्राहिम याचा विश्वासू सहकारी असलेला मिरची हा दाऊदची अमली पदार्थ तस्करी सांभाळत होता. १९५० मध्ये मुंबईत जन्मलेल्या इक्बालला ‘मिरची’ हे टोपणनाव पडले ते त्याच्या कुटुंबीयांच्या लाल मिरची आणि मसाल्यांचा व्यापारामुळे. मात्र तो अल्पावधीतच अमली पदार्थांचा आंतरराष्ट्रीय तस्कर म्हणून ओळखला जाऊ लागला. मुंबईतील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या इक्बालने सुरुवातीला मसाल्याचा व्यवसाय केला. परंतु त्यात तो रमला नाही. १९६० मध्ये शालेय शिक्षण अर्धवट सोडले आणि टॅक्सी चालवण्यास सुरुवात केली. त्यानंतर, त्याने मुंबईच्या बंदरांवरून परदेशी वस्तू आणि प्रतिबंधित मालाची तस्करी करण्यास सुरुवात केली. तिथे त्याची गाठ तस्करीच्या व्यवसायात अनुभवी असलेल्या आमीरशी पडली. १९८० च्या दशकात आमीरसोबत काम करत असताना इक्बालचा संपर्क दाऊदच्या टोळीशी आला आणि त्याने मसाल्यांचा व्यापारी असल्याचे सोंग घेऊन अमली पदार्थांची तस्करी सुरू केली. आशिया, युरोप व आफ्रिका खंडांमध्ये मेथामफेटामाइन (क्रिस्टल मेथ), हेरॉइन व मॅन्ड्रॅक्स आदी घातक अमली पदार्थांच्या मोठ्या प्रमाणावरील तस्करीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. भारतीय तपास यंत्रणांपासून लपून राहत असताना, १४ ऑगस्ट २०१३ रोजी लंडनमध्ये वयाच्या ६३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतरच सलीम डोलाकडे दाऊदच्या अमली पदार्थ तस्करीचा सूत्रे आली असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. 

तस्करीला आळा का कठीण? 

अफगाणिस्तान, पाकिस्तान वा म्यानमारसारख्या देशांमधून अमली पदार्थांच्या पुरवठ्याद्वारे एक प्रकारचे छुपे युद्ध खेळले जात आहे. त्यामुळेच कधी काश्मीर, पंजाब, गुजरात, मणिपूर तर कधी महाराष्ट्रसारख्या भागात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे साठे सापडतात. गेली दोन-तीन दशके पाकिस्तान ड्रोन, बोटी, सुरुंग, महिलांचा वापर करून भारतात अमली पदार्थ पोहोचवत आहे. हे लक्षात घेऊन अमली पदार्थ विरोधातील ही लढाई भारत-पाकिस्तान वा भारत-अफगाणिस्तानमधील लढाई गांभीर्याने घेण्याखेरीज पर्याय नाही, असा इशारा राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिला आहे. केवळ भारताच्या आजूबाजूच्या नव्हे तर अगदी दक्षिण अमेरिकेमधील काही देशांमध्येही प्रचंड प्रमाणावर अमली पदार्थांच्या निर्मितीसाठी आवश्यक मालाचे उत्पादन होते. हाच माल कंटेनरमध्ये भरून समुद्रमार्गे जगभर पोहोचवला जातो. तसाच तो भारतातही येतो आणि येथून अन्यत्र पोहोचवला जातो. त्यामुळे यावरही काळजीपूर्वक लक्ष ठेवून दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे. छोटे छोटे वाहक पकडून हा प्रश्न सुटणार नाही, याकडे दीक्षित यांनी लक्ष वेधले. 

nishant.sarvankar@expressindia.com