Sam Altman House Attack: ओपनएआयचे सीईओ सॅम अल्टमन यांच्या सॅन फ्रान्सिस्कोमधील घरावर एका व्यक्तीने मोलोतोव्ह कॉकटेल म्हणजेच ‘पेट्रोल बॉम्ब’ फेकल्याची घटना शनिवारी सकाळी घडली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. जाळपोळ करण्यासाठी पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सॅन फ्रान्सिस्को पोलिसांनी २० वर्षीय तरूणाला अटक केली आहे. याच तरूणावर ओपन एआयच्या मुख्यालयाबाहेर धमक्या दिल्याचा आरोप आहे. एआयचा प्रभाव सर्व क्षेत्रात वाढत आहे. एआयचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम दिसून येत आहेत. एआयमुळे अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. त्यामुळे एआयच्या विरोधात असलेला रोष वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

एआयमुळे नोकऱ्या संकटात, म्हणून हल्ला ?

एआयला विकसित करणाऱ्या कंपन्यांची जागतिक पातळीवर चर्चा होत असताना ओपनएआयचे सीईओ सॅम अल्टमन यांच्या घरावर २० वर्षीय तरूणाने हल्ला केला. हल्लेखोर तरूणाचे नाव डॅनियल मॉरेनो-गामा असे आहे. या तरूणाने एआय आणि एआय कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा वारंवार विरोध केला आहे. एआयमुळे मानवतेला धोका आहे, असे हल्लेखोराने म्हटले आहे. पोलिसांना त्याच्याजवळ काही कागदपत्रे मिळाली आहेत. त्यात एआय कंपन्यांची नावे, अधिकाऱ्यांची नावे व घरांचे पत्ते नमूद आहेत. तसेच एआय कंपन्यांमधील गुंतवणूकदारांची नावेही आहेत. डॅनियल मॉरेनो-गामावर हत्येचा प्रयत्न केल्याचा तसेच जाळपोळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सॅम अल्टमन यांच्या घरावर शनिवारी हल्ला केल्यानंतर सोमवारी मॉरेनो गामाने ओपनएआयच्या मुख्यालयाच्या काचेच्या दारावर खुर्चीने हल्ला केला होता. मुख्यालयातील सर्वांना संपवणार असल्याची धमकी त्याने दिली होती. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी रात्री एफबीआयने त्याला अटक केली. तेव्हा अल्टमन यांच्या घरावरही त्यानेच हल्ला केल्याचे निष्पन्न झाले होते.

एआयमुळे नोकऱ्या जातील का? सॅम अल्टमन ‘एक्सप्रेस अड्डा’त काय म्हणाले होते?

एआयमुळे खरंच हजारो नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत का? एआयचा फटका तरुणांच्या नोकऱ्यांवर होणार का? की एआयमुळे नव्या संधी निर्माण होणार? तसेच चॅटजीपीटी किती सुरक्षित आहे? अशा विविध प्रश्नांवर ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सॅम अल्टमन यांनी इंडियन एक्सप्रेसच्या ‘एक्सप्रेस अड्डा’ या कार्यक्रमात बोलताना मोठं भाष्य केलं आहे. एआयचा खरंच नोकऱ्यांवर परिणाम होणार का? यावर बोलताना सॅम अल्टमन यांनी म्हटलं की, “नोकऱ्यांवर एआयचा परिणाम होईल की नाही? याचा अंदाज आत्ता लावणं कठीण आहे. पण मला तंत्रज्ञानाचा इतिहास वाचायला आवडतं. औद्योगिक क्रांतीच्या काळात देखील लोक नोकऱ्यांच्या मुद्यांवरून घाबरले होते. पण ते पुढे चुकीचे सिद्ध झाले. आता समाजातील काही लोक वेगवेगळे भाकीत करतात, मला वाटत नाही की एवढा जलद बदल होईल. परंतु अखेरीस लोकांना नवीन नवीन गोष्टी सापडतील”, असं सॅम अल्टमन यांनी म्हटलं.

एआय तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले होणार?

हल्ल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत लोकांचे मत काय आहे, त्याचे जागतिक पातळीवर कसे परिणाम होत आहेत याबाबत विचार करण्याची वेळ माझ्यावर आली आहे, असे सॅम अल्टमन म्हणाले. दरम्यान, सॅम अल्टमन यांच्या घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. हा पेट्रोल बॉम्ब घरात न फुटल्याने मोठा अनर्थ टळला. सॅम अल्टमन म्हणाले, एआय उद्योग व माझ्यामुळे धोका निर्माण झाल्याची भावना लोकांमध्ये आहे. शब्दांच्या शक्तीला मी कमी समजलो. एआयमुळे लोकांच्या मनात असलेली भीती समर्थनीय आहे. तंत्रज्ञान फक्त काही कंपन्यांपुरतेच मर्यादीत राहायला नको, त्याचा वापर सगळ्यांसाठी खुला होणे गरजेचे आहे, असे सॅम अल्टमन म्हणाले.

सॅम अल्टमन यांच्या घरावर हल्ला कसा झाला?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅम अल्टमन यांच्या घरावर २० वर्षीय डॅनियल मॉरेनो-गामा नावाच्या तरूणाने ज्वलनशील रसायनाने भरलेली एक बाटली फेकली. त्यामुळे घराच्या बाहेरील भागाचे नुकसान झाले. हल्ल्यानंतर लागलेली आग तातडीने विझवण्यात आली. त्यामुळे नुकसान टळले. तपास करणारे अधिकारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासत आहेत. एकाच व्यक्तीने हल्ला केला की इतर कोणी हल्ल्यात सहभागी होते, याबाबत तपास केला जात आहे.

सॅम अल्टमन यांच्या घरावर २० वर्षीय डॅनियल मॉरेनो-गामा नावाच्या तरूणाने ज्वलनशील रसायनाने भरलेली एक बाटली फेकली.

“तंत्रज्ञान विरोधी भावनांबद्दल मला सहानुभूती” – सॅम अल्टमन

“आमच्या उद्योगावर होणारी टीका समर्थनीय आहे. तंत्रज्ञान विकसित झाल्याने त्याचे परिणाम दिसत आहेत. यावर चर्चा आणि टीकांचे आम्ही स्वागत करतो. तंत्रज्ञानाच्या विरोधात जो राग आहे त्याबाबत मला सहानुभूती आहे. तंत्रज्ञान हे नेहमी प्रत्येकासाठी चांगलेच असते, असे नाही. आपण या विषयावर चर्चा करताना आपला रोष कमी ठेवायला हवा”, असे अल्टमन म्हणाले. एआयमुळे त्रास होणाऱ्यांनी संयम ठेवून चर्चा अथवा टीका करावी, आक्रमकपणा टाळावा असे आवाहन अल्टमन यांनी केले.

सोमवारी मॉरेनो गामाने ओपनएआयच्या मुख्यालयाच्या काचेच्या दारावर खुर्चीने हल्ला केला होता.

टेक कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धोका?

तंत्रज्ञानाशी संबंधित उद्योजकांना धमक्या येण्याचे प्रमाण मागील काही वर्षांमध्ये वाढले आहे. २०२४ च्या अखेर न्यूयॉर्कमध्ये युनायटेड हेल्थ केअरचे सीईओ ब्रायन थॉम्प्सन यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तंत्रज्ञानाशी संबंधित उद्योजकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे, असे तपास अधिकारी म्हणाले होते. या घटनेने अमेरिकेतील कॉर्पोरेट जगतात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कंपन्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आरोग्य, तंत्रज्ञान आणि फायनान्स क्षेत्रातील उद्योजकांच्या जीविताला धोका असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले होते.