प्रायमेट्समध्ये (माकडे, वानर, लेमर्स) समलिंगी लैंगिक वर्तन मोठ्या प्रमाणावर आढळते. हे केवळ अपवादात्मक नसून ५० हून अधिक प्रजातींमध्ये, विशेषतः मादी-मादी आणि नर-नर जोड्यांमध्ये हे वर्तन दिसून येते. म्हणजे मनुष्यप्राण्याप्रमाणेच ही सामान्य बाब आहे. याचे नेमके कारण काय, याचा हा आढावा.
प्रायमेट्स समलिंगी वर्तनाबाबत संशोधन
लंडनमधील इम्पिरियल महाविद्यालयात प्रायमेट्सच्या वर्तनाबाबतचे संशोधन करून त्या संदर्भातील शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला. या शोधनिबंधाचे सह-लेखक प्रोफेसर व्हिन्सेंट सॅव्होलेनन यांनी सांगितले, की प्रायमेट्सचे समलिंगी लैंगिक वर्तन हे पर्यावरणीय किंवा सामाजिक आव्हानांना तोंड देताना आपल्या समूहाला एकत्र ठेवण्यासाठी एक मार्ग म्हणून त्यांनी स्वीकारलेले असू शकते. तसेच सुरुवातीच्या मानवी प्रजातींना कदाचित अशाच प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागला असेल, ज्यामुळे त्यांनीही असे वर्तन दाखवले असण्याची शक्यता सॅव्होलेनन यांनी व्यक्त केली आहे. सॅव्होलेनन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रायमेट्सच्या समलिंगी लैंगिक वर्तनाचे केलेले विश्लेषण ‘नेचर इकाॅलॉजी अँड इव्होल्यूशन’ या जर्नलमध्ये दिले आहे. यामध्ये त्यांनी चिंपांझी, बार्बरी मकाक आणि माउंटन गोरिला यांसारख्या ५९ प्रजातींमध्ये समलिंगी लैंगिक वर्तन व्यापक असल्याचे नमूद केले आहे.
प्रायमेट्सच्या वर्तनाबाबत यापूर्वीदेखील संशोधन करण्यात आले. त्यातील काही अभ्यासकांनी प्रायमेट्सचे वर्तन हे गटांमधील तणाव कमी करण्यास किंवा बंधन निर्माण करण्याच्या दृष्टीने झाले असावे, अशी शक्यता वर्तवली होती. नवीन अभ्यासात विविध प्रजातींमध्ये त्याचे संभाव्य कारण शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोरड्या वातावरणात राहणाऱ्या, संसाधनांची कमतरता असलेल्या आणि भक्षकांपासून जास्त धोका असलेल्या प्रजातींमध्ये समलिंगी लैंगिक वर्तन होण्याची शक्यता जास्त असल्याचे अभ्यासात दिसून आले. अभ्यासाच्या पहिल्या लेखिका क्लोई कॉक्सशॉल यांनी मागील संशोधनात समलिंगी लैंगिक वर्तनामागे एका आनुवंशिक घटकासह पर्यावरणीय प्रभाव असल्याचे सांगितले. तसेच या पर्यावरणीय प्रभावाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.
समलिंगी लैंगिक वर्तनाचे कारण काय?
सॅव्होलेनन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, समलिंगी लैंगिक वर्तन जास्त काळ जगणाऱ्या प्रजातींमध्ये, तसेच नर आणि मादी यांच्या आकारात फरक असलेल्या प्रजातींमध्ये अधिक आढळले. समलिंगी लैंगिक वर्तनाचे कारण तीव्र स्पर्धेसह मोठ्या सामाजिक गटांशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले. जटिल सामाजिक प्रणाली आणि पदानुक्रम असलेल्या प्रजातींमध्येदेखील हे वर्तन अधिक सामान्य होते, असे या संशोधनात आढळले. समलिंगी लैंगिक वर्तन हे संबंध वाढवण्यासाठी, तणाव आणि आक्रमकता कमी करण्यासाठी होते. तसेच कोणत्याही प्रजातीसाठी तेथील विशिष्ट वातावरणाला आणि विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी एक संलग्न वर्तन असल्याचे दिसून आले आहे, असे सॅव्होलेनन यांनी सांगितले. तसेच प्रायमेट्सच्या जीवनातील वेगवेगळे घटक एकमेकांशी जोडलेले आहेत, पर्यावरणीय परिस्थिती त्यांच्या वैशिष्ट्यांवर परिणाम करतात ज्यामुळे सामाजिक व्यवस्थांवर परिणाम होतो, असेही या अभ्यासकांनी मांडले आहे.
मानवी समलिंगी लैंगिक वर्तनाचा संबंध?
प्रायमेट्सच्या वर्तनाबाबत करण्यात आलेल्या संशोधनातून मिळालेल्या निष्कर्षांचा मानवाच्या संबंधात चुकीचा अर्थ लावण्यात येण्याची शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे. मानवामधील समलिंगी लैंगिक वर्तनाचे कारण प्रायमेट्सप्रमाणे अन्नटंचाई किंवा कठोर सामाजिक पदानुक्रम हे नसून, आधुनिक सामाजिक जीवन पद्धतीचा दबाव हे असू शकते, असे अभ्यासकांनी नोंदवले आहे. प्रायमेट्सच्या वर्तनाबाबत करण्यात आलेल्या संशोधनात सहभागी नसलेल्या डरहम विद्यापीठाच्या प्राध्यापक झन्ना क्ले यांच्या मते समलिंगी वर्तन हे प्रायमेट्सच्या सामाजिकतेचा एक सामान्य आणि महत्त्वाचा भाग असल्याचे स्पष्ट होत असून मानवही त्याचाच एक भाग आहे.
क्ले यांनी हे संशोधन प्राणीवर्गात समलिंगी संबंध किती व्यापक आहेत हे दाखवून समलिंगी वर्तनाच्या उत्पत्तीवरील वादविवादांना नवीन दृष्टिकोन देते. हे विश्लेषण प्राण्यांच्या साम्राज्यातील इतर सदस्यांपर्यंत पोहोचवणे आणि समान गृहितके टिकतात का ते तपासणे मनोरंजक असेल, असेही क्ले यांनी सांगितले. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे जोश डेव्हिस यांच्या मते समलैंगिक वर्तन नैसर्गिक जगात विविध अभिव्यक्तींमध्ये आढळते. त्यामुळे अशा वर्तनांना चालना देणारी कारणे तितकीच भिन्न असण्याची शक्यता आहे. तसेच प्राण्यांच्या वर्तनावर केलेला अभ्यास मानवी वर्तनाशी जुळवणे अस्वस्थ करणारे आहे. माणसे गुंतागुंतीची असतात ज्यामुळे या तुलना वादग्रस्त बनतात, असे डेव्हिस यांनी सांगितले.
dharmesh.shinde@expressindia.com

