नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाद्वारे नागपूरवरून समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टोकाला अर्थात भिवंडीजवळ आमणेपर्यंत येणाऱ्या वाहनांना या परिसरातील वाहतूक कोंडीत अडकावे लागते. दक्षिण मुंबईत वा पश्चिम-पूर्व उपनगरात पोहोचण्यासाठी आणखी दोन ते अडीच तास घालवावे लागतात. पण लवकरच आमणेवरून दक्षिण मुंबईत वा पूर्व-पश्चिम उपनगरात अतिजलद पोहोचता येणार आहे. यासाठी दोन यंत्रणांकडून दोन महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ते प्रकल्प नेमके कोणते आणि त्यामुळे समृद्धीवरून दक्षिण मुंबईत वा पूर्व-पश्चिम उपनगरात पोहोचणे कसे सोपे होणार, याचा हा आढावा…

नागपूर ते मुंबई प्रवास समृद्धीमुळे सुकर?

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर ते मुंबई प्रवास सुकर आणि अतिजलद करण्यासाठी नागपूर ते मुंबई असा ७०१ किमीचा समृद्धी द्रुतगती महामार्ग बांधला आहे. २०१८ मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन करून कामास सुरुवात करण्यात आली आणि टप्प्याटप्प्याने हा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला.

६० हजार कोटींहून अधिक खर्चाच्या आणि आठ पदरी या महामार्गामुळे आता नागपूर ते आमणे, भिवंडी (ठाणे) हे अंतर केवळ आठ तासांत पार करता येत आहे. १० जिल्ह्यांतून जाणाऱ्या या महामार्गावर २५ अंतरबदल मार्ग असल्याने १० जिल्ह्यांतील अनेक शहरांत पोहोचणे सोपे झाले आहे. मात्र समृद्धीवरील अतिजलद प्रवासासाठी पथकर मोजावा लागतो. तसेच समृद्धीवरून अतिजलद येणाऱ्या वाहनांना आमणेवरून पुढे ठाणे, मुंबईत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

आमणेवरून मुंबईत जाणे कसरतीचे?

मुंबईवरून समृद्धीवर जाण्यासाठी वा नागपूरसह इतर जिल्ह्यांतून समृद्धीमार्गे मुंबई, ठाण्यात पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. समृद्धी महामार्गावरील आमणे अंतरबदल मार्गावर आल्यानंतर नाशिक-मुंबई महामार्गावरून पुढे जावे लागते. या महामार्गाच्या सुधारकामाचे काम अद्याप सुरू असल्याने येथे मोठी वाहतूक कोंडी होते. वाहनांना वाहतूक कोंडीत अडकावे लागते. त्यामुळे आमणेवरून दक्षिण मुंबई, पूर्व-पश्चिम उपनगरात जाण्यासाठी दोन तास वा गर्दीच्या वेळेस यापेक्षाही अधिक वेळ लागतो.

परिणामी समृद्धी महामार्गावरून अतिजलद येणाऱ्या वाहनांना आमणे येथे ‘ब्रेक’ लागतो. यावर काहीतरी तोडगा काढण्याची मागणी वाहनचालक व प्रवाशांकडून होत होती. ही मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने समृद्धीला थेट मुंबईशी जोडणारे दोन रस्ते बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

आमणे ते साकेत उन्नत मार्गे थेट नरीमन पॉइंटला?

समृद्धीला मुंबईशी जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आमणे ते साकेत असा २१.३ किमीचा रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. १६ फेब्रुवारीला एमएमआरडीएच्या प्राधिकरण बैठकीत या प्रकल्पाच्या आराखड्यास आणि प्रकल्प खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

६,२०२ कोटी रुपयांच्या या महामार्गाला मान्यता मिळाल्याने पुढील कार्यवाही करून प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. हा उन्नत रस्ता पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल झाल्यास आमणेवरून थेट दक्षिण मुंबईत वा पूर्व-पश्चिम उपनगरात पोहोचता येणार आहे.

हेही वाचा

आमणेवरून येणारी वाहने आमणे ते साकेत उन्नत रस्त्यावरून छेडानगर उड्डाणपुलावरून उपनगरात अतिजलद पोहोचू शकतील. त्यानंतर छेडानगरवरून पुढे पूर्व मुक्त मार्गाने आणि त्यानंतर ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगद्याद्वारे नरीमन पॉइंटला पोहोचता येईल. आमणे ते दक्षिण मुंबई असा दोन तासांचा प्रवास भविष्यात केवळ एका तासात पूर्ण करता येणार आहे. मात्र यासाठी वाहनधारकांना पथकर मोजावा लागणार आहे.

भिवंडीत १८ किमीची ‘मिसिंग लिंक’?

समृद्धीला मुंबईशी जोडण्यासाठी आमणे ते साकेत उन्नत रस्ता एमएमआरडीएकडून बांधण्यात येणार आहे. दुसरीकडे राज्य सरकारने भिवंडीत १८ किमी लांबीचा मार्गिका रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा रस्ता नेमका कसा असेल, कुठून जाईल यासंदर्भातील अभ्यास सुरू आहे. हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकल्पाची सविस्तर माहिती समोर येणार आहे.

मात्र ही ‘मिसिंग लिंक’ ठरणार असून या रस्त्यामुळे आमणेवरून नरीमन पॉइंटला पोहोचता येणार आहे. या रस्त्यावरून उत्तन-विरार सागरी सेतूला, पुढे मिरा-भाईंदर सागरी किनारा मार्गावर पोहोचता येईल. त्यानंतर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूने आणि पुढे सागरी किनारा मार्गाद्वारे दक्षिण मुंबईत पोहोचता येणार आहे. या रस्त्यामुळेही दक्षिण मुंबईत एका तासात पोहोचता येईल. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अंदाजे २ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या बांधणीची जबाबदारी एमएसआरडीसीकडे दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमणे ते साकेत उन्नत रस्ता आणि १८ किमीच्या ‘मिसिंग लिंक’मुळे भविष्यात समृद्धीवरून थेट दक्षिण मुंबईत अतिजलद पोहोचता येणार आहे.