दक्षिण कोरियातील सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करणारे कर्मचारी संपावर जाण्याच्या बेतात आहेत. उत्पादन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संघटना आणि संस्थेच्या पदाधिकारी यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न दक्षिण कोरिया सरकारने गुरुवारी केला, मात्र हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. जवळपास ४७ हजार कर्मचारी आता नोकरी सोडण्याच्या बेतात आहेत.

कंपनीच्या एकूण कार्यक्षमतेपैकी ४० टक्के कामगार १८ दिवसांच्या संपावर जाण्याच्या बेतात आहेत. यामुळे जगातील सर्वात मोठ्या चिप निर्मिती करणाऱ्या कंपनीचे उत्पादन आता थांबणार आहे. एआयच्या लाटेमुळे कंपनीला खूप नफा होत होता. सॅमसंग अशिया खंडातील दुसरी सर्वात मोठी व्यापारी कंपनी ठरली. कंपनीने जवळपास एक ट्रिलियन डॉलर्सचे (९६.९३ ट्रिलियन रुपयांचा) भांडवल जमवले आहे.

या पार्श्वभूमीवर सॅमसंगच्या कर्मचाऱ्यांना संपावर जाण्याचे कारण तरी काय? आणि जगावर याचे कोणते बरे-वाईट पडसाद उमटणार आहेत?

सॅमसंगचे कर्मचारी संपावर का जात आहेत?

या संपामागील मुख्य कारण कर्मचाऱ्यांना न मिळणारा परफॉर्मन्स बोनस. सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, या संपामागील कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी ही कामगिरीवर आधारित बोनस मिळावा अशी आहे.

अशाप्रकारच्या बोनसची मर्यादा कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या ५० टक्क्यांपर्यंत असते. कर्मचाऱ्यांची मागणी आहे की, कंपनीच्या नफ्याच्या सुमारे १५ टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना बोनस रूपात देण्यात यावी. परफॉर्मन्स बोनस कशाप्रकारे देण्यात यावा याचे स्वरूपही निश्चित करावे अशीही कर्मचाऱ्यांची इच्छा आहे.

कंपनी नफा कर्मचाऱ्यांसह वाटून घेत नाही असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांनी एस के हिनिक्स या मेमरी चीप तयार करणार्‍या कंपनीचे उदाहरण दिले. या कंपनीतील कर्मचाऱ्यांना योग्य तो मोबदला त्यांच्या कामाप्रमाणे त्यांना दिला जातो.

टेक्नॉलॉजी मॅगझिन डॉट कॉमच्या वृत्तानुसार सेमीकंडक्टर तयार करणार्‍या कंपनीने मागच्या वर्षी कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनावरील बोनसची, १० वर्षांची मर्यादा काढून टाकली आहे. तसेच वार्षिक नफ्याच्या सुमारे १० टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना बोनस स्वरूपात देण्याचा निर्णयही घेतला आहे.

सॅमसंगच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, एस के हिनिक्स कंपनीला आमच्यापेक्षा ३ पट जास्त बोनस दिला जातो. सॅमसंग कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी फर्स्टपोस्टला दिलेल्या माहितीनुसार, कंपनी सोडणाऱ्यांचे प्रमाण या कारणामुळे वाढले असून प्रतिस्पर्धी कंपनीत कामाला लागणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. संघटनेचे सध्या ९० हजारहून अधिक सदस्य आहेत, हा आकडा सॅमसंगच्या एकूण कर्मचारीसंख्येच्या ७० टक्क्यांहून अधिक आहेत.

सॅमसंगने मात्र बोनस मर्यादा वाढणार नाही अशी स्पष्टच भूमिका घेतली आहे. कंपनीने या वर्षी बोनस दिलेला असून मेमरी चीप निर्मिती करणाऱ्या एस के हिनिक्स कंपनीतील कर्मचाऱ्यांना जितका बोनस दिला जातो त्याहून अधिक बोनस आपण दिला असल्याचे कंपनीतील अधिकाऱ्यांनी फर्स्टपोस्टला सांगितले की, लॉजिक चीप आणि फाऊंड्री बिझनेसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाच्या ५० ते १०० टक्के जास्त परफॉर्मन्स बोनस मिळणार असल्याचेही सांगितले आहे.  

तज्ज्ञांच्या मते या संपामुळे हजारो लाखो डॉलर्सचे नुक्सान होण्याची शक्यता आहे. नॉर्थ ऑफ साऊथ कॅपिटलचे पोर्टफोलिओ व्यवस्थापक आणि भागीदार कामील डिमिच्च यांनी सीएनबीसीशी संवाद साधताना सांगितले की, “हे आकडे खूप मोठे आहेत; यामुळे सॅमसंगमधील अनेक कर्मचाऱ्यांना संभाव्यतः लाखो डॉलर्सची रक्कम मिळू शकते.”

डिम्मीच पुढे म्हणतात, सॅमसंगने कामगारांपुढे नमते घेतल्यास त्यांच्या नफ्यावर याचा सकारात्मक परिणाम होईल. “सध्या या धंद्यात तेजी आहे. तेजीनंतर पुढे काय? याचा आपण नीट विचार करायला हवा. ही तेजी कायम राहणार नाही. एका विशिष्ट टप्प्यावर, पुरवठा आणि मागणी समान होईल आणि मेमरी चीप्सच्या किमती घसरतील.”

या बातमीमुळे सॅमसंगच्या शेअर्सचे भाव ३ टक्क्यांनी कोसळतील. अशा पद्धतीचा संप २०२४ सालीही झाला होता. त्यावेळी जवळपास ६ हजार उत्पादन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली होती. या नफ्याचा एक निश्चित हिस्सा जर बोनस वाटपासाठी वापरण्यात आला, तर उद्योग क्षेत्रातील मंदीच्या काळातही कंपनीच्या भविष्यातील गुंतवणूकीवर मर्यादा येऊ शकतात. असे सॅमसंगने या महिन्याच्या सुरुवातीला एका निवेदनात म्हटले होते.

सीएनबीसीच्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग आणि पंतप्रधान किम मिन-सेओक यांनी दक्षिण कोरियाच्या अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना दोन्ही बाजूंना सामंजस्य साधण्याचे आवाहन केले आहे. या संपामुळे अर्थव्यवस्थेला किंवा दैनंदिन जीवनाला जर कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार असेल, तर दक्षिण कोरियातील सरकारी कायद्यानुसार आपत्कालीन उपाययोजना वापरून ३० दिवसांसाठी संप थांबविण्यात येईल.

राष्ट्रीय कामगार-संबंधीत आयोगाला (नॅशनल लेबर रिलेशन्स कमिशन) मध्यस्थी करत असताना ३० दिवसांसाठी संपावर बंदी घालावी लागेल. तसेच या कायद्याचा वापर क्वचितच झाला असल्यामुळे कामगार संघटना-स्नेही प्रशासनाने आजवरच्या इतिहासात उचलेले हे एक असाधारण पाऊल ठरणार आहे. कामगार संघटनेने आयोगामार्फत मध्यस्थी करण्यास सहमती दर्शवली आहे, परंतु सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने ती नाकारली आहे.

कर्मचारी संघटनेचे प्रवक्ते चोई सेउंग-हो म्हणाले, “व्यवस्थापनाच्या निर्णय प्रक्रियेतील विलंबामुळे मध्यस्थीनंतरची प्रक्रिया संपुष्टात आणावी लागली, याचे आम्हाला तीव्र दुःख आहे.” असे असतानाही सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने एका निवेदनात म्हटले की, “कर्मचारी संघटनेच्या अवाजवी मागण्या जशा आहेत तशा स्वीकारल्यास कंपनी व्यवस्थापनाच्या मूलभूत तत्त्वांना धक्का बसेल.” याच कारणामुळे वाटाघाटी फिसकटल्या. तसेच, कंपनीने पुढे म्हटले आहे की, “आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत संवाद साधत राहू आणि कोणत्याही परिस्थितीत संप होणार नाही याचा प्रयत्न करू.”

या आठवड्याच्या सुरुवातीला न्यायालयाने सॅमसंगची विनंती अंशतः मंजूर केली आणि असा निर्णय दिला की, कोणत्याही औद्योगिक कारवाईदरम्यान काही उत्पादन केंद्रांमध्ये आवश्यक कर्मचारी संख्या ही निश्चित असायला हवी. कंपनीने संघटनेला कळवले आहे की, संपादरम्यान ७,०८७ कामगारांना कामावर हजर राहावे लागेल. कंपनीचे दक्षिण कोरियातील चिप कारखाने, जसे की प्योंगटेक आणि ह्वासोंग, येथे तीन शिफ्टमध्ये २४ तास काम सुरू असते त्यामुळे सर्वांनाच गैरहजर राहून चालणार नाही.

जागतिक स्तरावर काय पडसाद उमटणार आहेत?


द वीकच्या बातमीनुसार, या दरम्यानच्या काळात तरी सॅमसंगच्या वस्तू महागणार नाहीत, ही बातमी चांगली आहे. याचे कारण काय तर, सॅमसंगसारख्या टेक कंपन्यांनी अशा प्रसंगाची पूर्वतयारी आधीच करून ठेवलेली असते. त्यांच्याकडे बफर वस्तूंचा साठा यासाठीच उपलब्ध असतो.  

असे जरी असले, तरी एक वाईट बातमीदेखील आहे. या संपाचा फटका मेमरी चिप्सच्या पुरवठ्याला नक्कीच बसणार आहे. डी-रॅम चिप्स तयार करणारी सॅमसंग ही जगातली सर्वांत मोठी कंपनी आहे. ट्रेन्डफोर्सच्या बातमीनुसार मागच्या वर्षी जगाच्या एकूण चिप उत्पादनात ३६ टक्के उत्पादनाचा वाटा एकट्या सॅमसंगने उचलला होता. एआय डेटा केंद्र उभारण्यासाठी स्मार्टफोन्स आणि लॅपटॉप्सची नितांत गरज आहे. आणि या उपकरणांमध्ये डेटा साठवण्यासाठी गरजेची असते ती मेमरी चिप. त्यामुळे मेमरी चीप्सच्या तुटवड्यामुळे उपकरणांच्या किमतीवर मोठा परिणाम होऊ शकतो.

या १८ दिवसांच्या संपाचा जागतिक पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे डी-रॅम मेमरी चिपचे भाव ३ ते ४ टक्क्यांनी तर एनएएनडी मेमरी चिपचे भाव २ ते ३ टक्क्यांनी वाढणार असल्याची माहिती केबी सेक्युरीटीजचे विश्लेषक जेफ किम यांनी दिली. यामुळे फोन आणि संगणकाचे भावदेखील आपोआप वाढतील असा एक अंदाजही किम यांनी वर्तवला.

कोरियाच्या एकूण निर्यातीपैकी एक चतुर्थांश निर्यात ही सॅमसंग कंपनी एकटी करते. दक्षिण कोरियाच्या मध्यवर्ती बॅंकेचे अधिकारी सांगतात, या संपाचे पडसाद दक्षिण कोरियाच्या अर्थकारणावर उमटण्याचीही शक्यता आहे. सर्वांत वाईट परिस्थिती अशी उद्भवेल की, या वर्षी दक्षिण कोरियाची अर्थव्यवस्था अंदाजे २.० टक्के विस्तारून ०.५ टक्क्यांनी कमी होईल. यासाठीच दक्षिण कोरियाच्या सरकारी अधिकाऱ्यांनी देशाला आधीच या संपाविषयीची सूचना आधीच देऊन ठेवली आहे.

याचाच अर्थ असा की, सरासरी १९.९ बिलियन डॉलर्सचे (१.९३ ट्रिलियन रुपये) चिप उत्पादन थांबेल आणि चिप उत्पादन सुरू होण्याकरीता आणखी काही आठवडे थांबावे लागेल, असेही त्या अधिकाऱ्यांनी सांगितले.