सांगली संस्थान गणेशाच्या उत्सवमूर्तीची पटवर्धन घराण्यातील मुलीने म्हणजे सिनेअभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन-दासानी यांनी पूजा केल्याने राजघराण्याचे वारसदार कोण हा वादाचा विषय सध्या झाला आहे. श्रीमंत विजयसिहराजे पटवर्धन यांनी राणीसाहेबाच्या भाच्याच्या मुलगा आदित्यराजे यांना द्त्तक घेऊन संस्थानचे अधिकृत वारसदार म्हणून जाहीर केले आहे. भाग्यश्री यांना पतीसह मंदिराच्या गाभार्यात शिरून पूजा करण्याचा हक्कच नसल्याचे विजयसिंहराजे यांनी सांगितल्याने हा केवळ मानपानाचा विषय नसून संपत्तीचा वारसदार कोण हाच मुख्य मुद्दा असावा अशी शंका येत आहे.
गणेश मंदिराचा इतिहास काय आहे?
सांगलीचे अधिपती श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांनी मिरजेपासून अलिप्त होत सांगली संस्थानची स्थापना करून १८४३मध्ये गणेशमुर्तीची स्थापना केली. यानंतर कृष्णाकाठी १८४४मध्ये भव्य दिव्य आणि देखणे मंदिर उभारले. याच मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची बारमाही गर्दी असते. गणेशोत्सवाच्या काळात गणेशदुर्ग म्हणून ओळख असलेल्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना करून पाच दिवस उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.
नेमका वाद काय?
यंदा उत्सवमुर्ती दरबार हॉलमध्ये नेण्यापुर्वीच राजेसाहेबांची विवाहित कन्या भाग्यश्री यांनी मंदिरात जाऊन उत्सवमूर्तीची पूजा आणि आरती केल्याने वाद निर्माण झाला. या पूजेवर संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांनी आक्षेप घेत भाग्यश्रींना पूजेपासून रोखण्याचा प्रयत्न केल्याने हा वाद चव्हाट्यावर आला. यावेळी पूजेचे समर्थन करत असताना राजेसाहेबांची प्रकृती ठीक नसल्याने मुलगी या नात्याने आपण पूजा करत असल्याचे भाग्यश्रीने सांगितले. मात्र, भाग्यश्रीच्या या भूमिकेचे राजेसाहेबांनी खंडन करत पूजेचा मान हा दत्तक पुत्र युवराज आदित्यराजे यांचाच असल्याचे सांगितले. तसेच, मंदिराच्या गाभार्यात ब्राम्हण, चित्पावन यांच्याविना कुणालाही प्रवेश करता येत नसल्याचे सांगितले. तर राणीसाहेबांनी पूजेचा अधिकार केवळ पुरूष वारसदारासच असल्याचे सांगत भाग्यश्रीच्या कृतीवर आक्षेप घेतला.
मुलीकडून उत्सवमूर्तीची पूजा का नको?
गणपती पंचायतन संस्थानच्या उत्सवमूर्तीची पूजा आणि आरती करण्यावरून निर्माण झालेल्या या वादाला आता उत्तराधिकाराच्या मुद्द्याचीही जोड मिळाली आहे. विजयसिंहराजे पटवर्धन यांनी आपण गणपती पंचायतन अॅक्ट १९४० आणि हिंदू वारसा कायद्यानुसार व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांचाच मुलगा असलेल्या आदित्यराजे यांना २०२३-२४ मध्ये कायदेशीररीत्या दत्तक घेतले आहे. संस्थानच्या गादीचा एकमेव वारस आदित्यराजेच असतील, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. गणपती पंचायतन संस्थानचा कारभार संबंधित कायदा तसेच पूर्वजांनी निश्चित केलेले नियम, अटी आणि पटवर्धन घराण्याच्या रूढी-परंपरांनुसार चालतो. युवराज आदित्यराजे यांचा दत्तकविधी नोंदवण्यात आल्याचाही त्यांचा दावा आहे. दरम्यान, गणेश चतुर्थीच्या दिवशी भाग्यश्री पटवर्धन-दासानी यांनी संस्थानमध्ये येऊन उत्सवमूर्तीची पूजा आणि आरती केली. यावर विजयसिंहराजे यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या म्हणण्यानुसार, उत्सवमूर्तीची पूजा एक दिवस आधीच करण्यात आली होती. त्यामुळे दुसर्या दिवशी पुन्हा पूजा आणि आरती करण्याची आवश्यकता नव्हती. भाग्यश्री यांना हा अधिकार कोणी दिला, असा प्रश्नही त्यांनी विचारला. व्यवस्थापक अभ्यंकर यांनी रूढी-परंपरांचा विचार करून पुन्हा आरती करू नये, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्याचे विजयसिंहराजे यांनी सांगितले. मात्र, त्यांच्याशी अपमानास्पद भाषेत बोलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गुरुजींच्या सन्मानाचा मुद्दाही
संस्थानमध्ये धार्मिक विधी पार पाडणार्या गुरुजींना पारंपरिक पद्धतीने आदराचे स्थान असल्याचे विजयसिंहराजे यांनी म्हटले आहे. पूजा-अर्चेनंतर गुरुजींचा सन्मान करण्याची परंपरा असल्याचे सांगत संबंधित घटनेबाबत भाग्यश्री यांनी गुरुजींची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर आपल्या प्रकृतीबाबत चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्यात आल्याचा आरोपही विजयसिंहराजे यांनी केला आहे. त्यामुळे हा वाद केवळ पूजाअर्चेपुरता मर्यादित न राहता संस्थानच्या परंपरा, अधिकार आणि उत्तराधिकाराच्या प्रश्नाभोवती अधिक तीव्र होताना दिसत आहे.
भाग्यश्रींच्या भूमिकेकडे लक्ष
गणपती पंचायतन संस्थानचा वारसाहक्क, उत्सवमूर्तीच्या पूजेचा अधिकार आणि संस्थानच्या परंपरा या तीन मुद्द्यांवरून आता हा कौटुंबिक वाद सार्वजनिक चर्चेचा विषय झाला आहे. उत्सवमूर्तीच्या पूजेपासून सुरू झालेला वाद आता संस्थानच्या वारसाहक्कापर्यंत पोहोचला असून, पुढील काळात या वादाला कायदेशीर अथवा सामाजिक पातळीवर कोणते वळण मिळते, त्यात भाग्यश्री यांची भूमिका काय असेल, हे हे महत्त्वाचे ठरणार आहे.
digambarshinde64@gmail.com
