Sanjay-Maneka Gandhi love story: कदाचित ही गोष्ट वाचल्यानंतर प्रेम असतं, या गोष्टीवर विश्वास बसल्यास आश्चर्य वाटायला नको. राजकारणाच्या धुमश्चक्रीत एका सुंदर प्रेमकथेचा करुण अंत झाला. या प्रेमकथेचा नायक हा भारतातील प्रचंड प्रभावशाली गांधी घराण्यातील, तर नायिका ही सैनिकी पार्श्वभूमी असलेल्या सामान्य कुटुंबातील होती. एखाद्या सिनेमातील कथानकाप्रमाणे प्रेमातील गुलाबी क्षण आणि त्यानंतर विरह अशी एक कथा भारतीय राजकारणाच्या पटलावर गुंफली गेली.

‘त्या’ने तिला एका लग्नात पाहिले आणि पाहता क्षणीच तो तिच्या प्रेमात पडला. भारतीय राजकारणाच्या इतिहासात त्याची प्रतिमा काहीही असली तरी त्याचं तिच्यावर खरं प्रेम होतं. ही कथा दिवंगत संजय गांधी यांची आहे. संजय गांधी कोण? अशी वेगळी ओळख इथे करून द्यायला नको. भारतीय राजकरणात गांधी-नेहरू कुटुंबातील कोणतीही घटना नेहमीच लक्षवेधी ठरते. असचं काहीसं संजय आणि मनेका गांधी यांच्या बाबतीत आहे. त्यांची प्रेमकथा एखाद्या बॉलिवूड चित्रपटापेक्षाही अधिक रोचक आहे.

संजय गांधी हे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींचे धाकटे चिरंजीव होते. आईची ओळख जगभरात आयर्न लेडी म्हणून. तर, संजय गांधी स्वतः राजकरणात सक्रिय होते. किंबहुना इंदिरा गांधीचा वारस म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जात होते. मनेका गांधी आज भारतीय राजकारणातील प्रसिद्ध चेहरा असल्या तरी त्यावेळी त्या एका सामान्य कुटुंबातील तरुणी होत्या. लेडी श्रीराम कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना मॉडेलिंगही करत होत्या. त्यांना ‘मिस लेडी श्रीराम’ हा किताबही मिळाला होता.

संजय आणि मनेका यांची पहिली भेट

संजय आणि मनेका यांची पहिली भेट १९७३ साली मनेका यांच्या चुलत बहिणीच्या लग्नात झाली. मनेका यांची चुलत बहीण संजय गांधी यांची वर्गमैत्रीणही होती. सिमी गरेवाल यांच्या Rendezvous With Simi Garewal या कार्यक्रमात दिलेल्या एका मुलाखतीत मनेका गांधी यांनी सांगितले की, संजय आणि त्यांची पहिली भेट ही खर्‍या अर्थाने पहिली भेट नव्हती. त्यांच्या बहिणीच्या लग्नात अचानक संजय त्यांच्याकडे आले आणि तुमच्या प्लेट मधले काही पदार्थ घेवू का असे विचारले, कारण जेवणासाठी रांग बरीच आहे. त्यावर त्यांनी प्रश्न विचारला होता, लग्नात येण्याचा खरा उद्देश जेवण तर नाही ना?

हिच्याशीच विवाह करायचा!

मनेका यांच्या चुलत बहिणीचे आणि संजयच्या मैत्रिणीचे लग्न त्यांच्या प्रेमकथेतील क्युपिड ठरले. संजयने मनेका यांना प्रथम या लग्नात पाहिले आणि त्याच दिवशी ठरवले हिच्याशीच विवाह करायचा. त्यांनी हीच गोष्ट आपल्या मैत्रिणीशी बोलताना सांगितली होती. नंतर संजय मनेका यांच्या घरी गेले आणि त्यांच्या आईला विचारले की, तो मनेकाला बाहेर घेऊन जाऊ शकतो का आणि तिची आपल्या कुटुंबाशी ओळख करून देऊ शकतो का? परंतु, मनेका यांच्या आईने नकार दिला होता, ती खूप लहान आहे, असे सांगितले होते.

फक्त प्रेम नाही विलक्षण काहीतरी

खूप विनंतीनंतर, मनेका यांना आठवड्यातून फक्त दोन वेळा संजयला भेटण्याची परवानगी मिळाली. बहुतेक वेळा संजय गांधी त्यांना घरीच भेटत असत. एका मुलाखतीत मनेका यांनी सांगितले होते की, त्यांचे प्रेम हे चित्रपटांमध्ये दाखवतात तसे धडधडणारे हृदय, फुलणारी फुले तसे नव्हते. त्यांनी मुलाखतीत म्हटले होते की, “मला ठाऊक नाही की, ते प्रेम होते का, मला वाटते ते त्याहूनही काहीतरी विलक्षण होते. जणू मी माझ्या घरी परत आले होते. जणू मला माझा दुसरा अर्धा भाग, अर्धनारीश्वर सापडला होता आणि त्यालाही तसेच वाटत होते.”

इंदिरा गांधी आणि मनेका गांधी यांची पहिली भेट

सुमारे चार महिन्यांनंतर संजय गांधी यांनी आपल्या आई, पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत मनेका यांची ओळख करून देण्याचा निर्णय घेतला. आपल्या जोडीदाराच्या आईला भेटताना कोणत्याही मुलीला वाटेल तशी मनेकाही भीती वाटली होती. पण तिची परिस्थिती थोडी वेगळी होती, कारण ती भारताच्या आयर्न लेडीला भेटणार होती. सिमी गरेवाल यांच्याशी बोलताना मनेका यांनी सांगितले की, ती खोलीबाहेर जाण्यास अजिबात तयार नव्हती, त्यामुळे तिला अक्षरशः बाहेर ओढून नेले गेले. मनेका आणि संजय दोघेही इतके घाबरले होते की, त्यांना काही बोलताच येत नव्हते आणि संजय तर तिची ओळख करून देण्यासही विसरला. त्या दिवसाची आठवण काढताना त्या सांगतात, “सुमारे दहा मिनिटांनी माझ्या सासूबाईंनी म्हटले, ‘बरं, संजय आपली ओळख करून देणार नाही असे दिसते. तूच मला तुमचे नाव सांगशील का?’

संजय गांधी आणि मनेका यांचा विवाह

२९ जुलै १९७४ रोजी पंतप्रधानांच्या १ सफदरजंग रोड येथील निवासस्थानी एका खाजगी समारंभात संजय आणि मनेका यांचा साखरपुडा झाला. त्यानंतर २३ सप्टेंबर १९७४ रोजी मोहम्मद युनूस यांच्या घरी नागरी विवाह पद्धतीने त्यांचा विवाह झाला.

घरातील इतर सदस्यांच्या तुलनेत संजय आणि मनेका दोघेही अतिशय साधे होते. मनेका यांच्या मते, संजय अधिक भारतीय स्वभावाचा होता आणि संजय गांधींच्या गुणवैशिष्ट्यांमुळे त्याही बदलल्या. संजय आणि मनेका यांचे नाते भौतिक गोष्टींपलीकडे गेले होते. संजय गांधींच्या निधनाच्या एक आठवडा आधीचा एक प्रसंग मनेका गांधी सांगतात, एका ठिकाणी गेलो होतो. सर्व मीटिंग्स वगैरे आटोपल्यावर मला कळले की, माझ्याकडे दुसऱ्या दिवसासाठी घालायला कपडे नव्हते. त्यामुळे हेच कपडे वापरावे लागणार होते. सकाळी उठले तेव्हा पाहिले की, त्याने माझे कपडे धुतले आणि शेजारच्या आगीजवळ तो ते कपडे वाळवत होता. त्यासाठी तो पहाटे साडेचार वाजता उठला होता.”

संजय आणि मनेका गांधी यांचा मुलगा

सहा वर्षांच्या सुखी वैवाहिक आयुष्याच्या नंतर, १३ मार्च १९८० रोजी संजय आणि मनेका यांच्या घरी फिरोज वरुण गांधीचा जन्म झाला आणि त्यांच्या कुटुंबाची सुरूवात झाली. वरुण गांधी आणि त्यांच्या आईमधील नाते अतिशय दृढ आहे. वरुणच्या जन्मानंतरच संजय गांधींचे निधन झाले. त्यामुळे वरुणला आपल्या वडिलांसोबत वेळ घालवण्याची संधी कधीच मिळाली नाही. त्यांच्या गर्भारपणातील सर्वात हृदयस्पर्शी गोष्ट म्हणजे मनेका यांनी डॉक्टरकडून प्रसूती करवून घ्यायला नकार दिल्यामुळे, त्यांचा मुलगा वरुण यांचा जन्म संजय गांधींनी स्वतःच करवून घेतला.

संजय आणि मनेका यांच्या प्रेमकथेचा शेवट

संजयने मनेकाला कदाचित भौतिक भेटवस्तू दिल्या नसतील, पण तिला भरभरून प्रेम आणि आपुलकी दिली होती. त्यांचे नाते प्रेम, ऊब आणि समाधानाने भरलेले होते. मात्र, हे सर्व फार काळ टिकले नाही. २३ जून १९८० रोजी संजय गांधी एका विमानप्रवासाला निघाले आणि त्याच उड्डाणाने त्यांच्या प्रेमकथेचा दुर्दैवी शेवट झाला. दिल्लीतील विमान अपघातात संजय गांधींचे निधन झाल्यानंतर, केवळ २३ वर्षांची मनेका जगाच्या कठोर वास्तवाला सामोरी जाण्यासाठी एकटी पडली.

तरुण विधवेप्रमाणे मनेकासोबत कुटुंबात वेगळे वर्तन केले जाऊ लागले. तिला कुटुंबासोबत एकाच टेबलावर बसून जेवण्याचीही परवानगी नव्हती. संजयच्या मृत्यूनंतर इंदिरा गांधींच्या मनात मनेकाबद्दल द्वेष निर्माण झाला. खुशवंत सिंग यांच्या Love, Truth and a Little Malice या पुस्तकातील एका उताऱ्यात असे म्हटले आहे, “त्यांना (इंदिरा गांधींना) मनेकाबद्दल कधीच विशेष प्रेम नव्हते. संजयच्या मृत्यूनंतर ही भावना उघड वैरात रूपांतरित होण्यास फार वेळ लागला नाही. मनेकाची उपस्थिती त्यांना अधिकाधिक त्रास देऊ लागली आणि ती जे काही करायची त्यात त्यांना दोष दिसू लागायचा.”

शेवटची भेट

संजयच्या मृत्यूच्या दिवशी मनेकाने आपल्या सासूबाईंना विनंती केली होती की, त्यांनी संजयला त्या विमानाने उड्डाण करण्यापासून थांबवावे. त्या क्षणी ती त्यांना रोखू शकली नाही आणि तीच त्यांची शेवटची भेट ठरली. संजयच्या मृत्यूने मनेका इतकी खचून गेली की, जवळजवळ दोन वर्षे तिने स्वतःला पूर्णपणे बाहेरच्या जगापासून वेगळे ठेवले. शेवटी, नाते पूर्णपणे बिघडल्यामुळे मनेका गांधी आणि वरुण यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींचे घर सोडले.

लग्नाने संजय आणि मनेकाला एकत्र आणले

संजय आणि मनेका गांधी यांची प्रेमकथा सुंदर आणि तितकीच हृदयस्पर्शी आहे. ते भेटले, प्रेमात पडले आणि शेवटी नियतीमुळे एकमेकांपासून दूर गेले!