-अनिश पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. पत्रा चाळीतील रहिवाशांना १४ वर्षानंतरही घराचा ताबा मिळालेला नाही. हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गैरव्यवहार नेमका काय आहे, त्याचा विश्लेषणात्मक आढावा…

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)

पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्प काय आहे? 

मुंबईतील पूर्व उपनगरात सिद्धार्थ नगरमधील हा प्रकल्प आहे. सिद्धार्थ नगरला पत्रा चाळ हे नाव प्रचलित आहे. या परिसराच्या पुनर्विकासाचे काम २००८मध्ये ‘म्हाडा’ने हाती घेतले. त्यासाठी मेसर्स गुरू आशिष कन्स्ट्रक्शनवर ६७२ भाडेकरूंच्या पुनर्वसनासाठी पत्रा चाळ प्रकल्पाच्या विकासाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. संबंधित काळात राकेश कुमार वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत हे मेसर्स गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक होते. सोसायटी, म्हाडा आणि विकासक यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला होता. या करारानुसार ६७२ भाडेकरूंना सदनिका देण्यात येईल आणि म्हाडासाठी विकास काम करण्यात येईल आणि त्यानंतर उर्वरित क्षेत्र विकासक विकेल, असे करारात नमुद करण्यात आले होते. पण १४ वर्षानंतर प्रकल्प पूर्ण झालाच नाही. या चाळीतील बहुतांश रहिवासी मध्यमवर्गीय मराठी भाषक आहेत. प्रकल्प अद्याप अपूर्ण असल्यामुळे अनेक रहिवाशांना आता भाडे तत्त्वावर इतरत्र रहावे लागत आहे.

मूळ गैरव्यवहार कसा झाला? 

मेसर्स गुरू आशिष कन्स्ट्रक्शन्सच्या संचालकांनी म्हाडाची दिशाभूल करून ९ विकासकांना चटई क्षेत्र परस्पर विकून सुमारे ९०१ कोटी ७९ लाख रुपये रक्कम वसूल केली. या चाळीतील ६७२ रहिवाशांना मूळ करारानुसार प्रत्येकी ७६७ चौ.फू घर प्रत्यक्षात बांधून देण्यात आलेले नाहीच. याशिवाय म्हाडाला करारानुसार दोन लाख २८ हजार ९६१ चौ.मी. जागा बांधून दिलेली नाही. या प्रकल्पात २०११मध्ये गैरव्यवहार झाल्याचे उघड होताच म्हाडाने त्यावर कारवाई सुरू केली. मेसर्स गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडने मीडोज नावाचा एक प्रकल्प सुरू केला आणि सदनिका विक्रीच्या नावाखाली सुमारे १३८ कोटी रुपये स्वीकारले. या कंपनीच्या संचालकांनी बेकायदेशीर कृत्यांमधून एकूण १०३९ कोटी ७९ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. 

सर्वप्रथम गुन्हा कधी दाखल झाला?

म्हाडाच्या तक्रारीवरून २०१८मध्ये एचडीआयएलशी संबंधित गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे तत्कालीन संचालक राकेश वाधवान, सारंग वाधवान व इतर आरोपींविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या कंपनीने २००६मध्ये पत्रा चाळीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला होता. परंतु दिलेल्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. या चाळीतील ६७२ रहिवाशांना वाऱ्यावर सोडून विकासकाने म्हाडासाठीचे अतिरिक्त गाळेही दिले नाहीत. या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचे २०११ मध्ये उघड होताच म्हाडाने त्यावर कारवाई सुरू केली. त्यावेळी २०१८ मध्ये गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. यांना त्यांच्याविरोधातील आरोपांबाबत त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ देण्यात आला होता. पण त्यांच्याकडून ठोस उत्तर न मिळाल्यामुळे अखेर म्हाडाच्या तक्रारीनंतर याप्रकरणी भादंवि कलम १२० (ब) (कट रचणे), ४०९ (विश्वासघाताबद्दत फौजदारी गुन्हा) आणि ४२० (फसवणूक) या अंतर्गत मार्च २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांच्या आधारावर ईडीनेही गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणी प्रवीण राऊतसह इतर आरोपींनाही आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यात सारंग वाधवान यांचाही समावेश होता. सध्या झालेल्या १०३४ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची व्याप्ती प्रत्यक्षात मोठी असल्यााच दावा पोलिसांकडून करण्यात आला होता.

ईडीचा सुरुवातीचा तपास कसा झाला?

आर्थिक गुन्हे शाखेतील माहितीच्या आधारे ईडीने या प्रकरणी तपासाला सुरुवात केली. ईडीने गैरव्यवहाराच्या रकमेचा माग काढला असता एचडीआयएलकडून प्रवीण राऊतच्या खात्यात सुमारे १०० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्याबाबत आणखी माहिती घेतली असता, ही रक्कम पुढे प्रवीण राऊत यांनी त्यांचे जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य, त्यांच्या व्यावसायिक संस्था इत्यादींच्या विविध खात्यांमध्ये वळती केल्याचे आढळून आले. त्यानंतर हा तपास शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा व त्यानंतर संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचला. 

संजय राऊत यांच्यावरील आरोप काय?

गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेपैकी ८३ लाख रुपये प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी प्रवीण राऊत यांच्याकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना २०१० ते २०१२च्या दरम्यान १ कोटी ६ लाख रुपये मिळाल्याचे उघड झाले आहे. ही रक्कम वर्षा राऊत यांनी दादर येथे सदनिका खरेदीसाठी वापरली, असा आरोप आहे. याशिवाय अलिबाग येथील किहीम समुद्रकिनारी ८ भूखंडदेखील संजय राऊत यांचे एकेकाळचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर व संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या नावे खरेदी करण्यात आले. या जमिनीच्या व्यवहारात नोंदणीकृत मूल्याव्यतिरिक्त विक्रेत्याला रोख रक्कम देण्यात आली होती. ही संपत्ती आणि प्रवीण राऊत यांच्या इतर मालमत्तेची ओळख पटल्यानंतर प्रवीण राऊत आणि इतरांच्या मालमत्तांवर टाच आणण्यात आली होती. याशिवाय रविवारी ईडीने राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री बंगल्यावर छापा टाकला. त्यावेळी घरातून साडे अकरा लाखांची रोख जप्त करण्यात आली. त्यामुळे सदनिका, किहिम येथील भूखंड व रोख रक्कम याबाबत राऊत यांची ईडीने चौकशी केली.