Sanjay Raut Diagnosed with Stomach Cancer: शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी ABP माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांना पोटाचा कॅन्सर असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पोटाचा कॅन्सर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. एकूणच सध्या भारतात कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यातही इतर कॅन्सरच्या तुलनेत पोटाच्या कॅन्सरकडे अनेकदा दुर्लक्ष करण्यात येते. मात्र, गेल्या काही वर्षांत हा आजार गंभीर ठरतो आहे. भारतात दरवर्षी ६०,००० पेक्षा अधिक पोटाच्या (गॅस्ट्रिक) कॅन्सरची नवीन प्रकरणे समोर येत आहेत, हा आकडा चिंताजनक असल्याचे तज्ज्ञ मानतात. याउलट, जागतिक पातळीवर गॅस्ट्रिक कॅन्सरचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे भारतात या प्रश्नाकडे अधिक लक्ष देण्याची गरज अधिरेखित झाली आहे.
पोटाच्या कॅन्सरचा प्रसार (Prevalence):
आतड्याच्या आतल्या भिंतीत पेशींची वाढ अनियंत्रित पद्धतीने होऊ लागल्यावर पोटाचा किंवा गॅस्ट्रिक कॅन्सर होतो. हा कॅन्सर जगभरात सर्वाधिक आढळणाऱ्या कॅन्सरमध्ये सध्या पाचव्या क्रमांकावर आहे, तर कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमुख कारणांमध्ये त्याचा तिसरा क्रमांक लागतो. भारताचा विचार केला असता, दरवर्षी निदान होणाऱ्या एकूण कॅन्सर प्रकरणांपैकी सुमारे ८ टक्के प्रकरणे ही पोटाच्या कॅन्सरची असतात.
ईशान्स भारतात सर्वाधिक प्रमाण
ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हेटरीच्या माहितीनुसार, भारतामध्ये पोटाचा कॅन्सर हा सर्वाधिक आढळणाऱ्या कॅन्सरपैकी पहिल्या दहामध्ये (Top 10) आहे. या कॅन्सरची सर्वाधिक प्रकरणे ईशान्य भारतातील मिझोराम, सिक्कीम आणि नागालँड या राज्यांमध्ये नोंदवली जातात. या प्रादेशिक फरकांमागे आहारातील भिन्नता, आनुवंशिक (genetic) प्रवृत्ती आणि सामाजिक-आर्थिक परिस्थिती ही प्रमुख कारणे आहेत. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये पोटाच्या कॅन्सरचा धोका लक्षणीयरीत्या अधिक असून, पुरुषांना हा कॅन्सर होण्याची शक्यता महिलांपेक्षा सुमारे तीन पट जास्त आहे.
पोटाच्या कॅन्सरचे निदान: भारतासमोरील आव्हान
भारतामध्ये पोटाच्या कॅन्सरविरोधातील लढ्यामध्ये सर्वात मोठे आव्हान म्हणजे या आजाराचे उशिरा होणारे निदान. अनेक रुग्णांमध्ये कॅन्सर प्रगत (advanced) टप्प्यात पोहोचल्यानंतरच त्याचे निदान होते. यामागील प्रमुख कारणे म्हणजे जनजागृतीचा अभाव तसेच कॅन्सरची लवकर तपासणी व निदानासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसणे.
वेळीच सखोल तपासणी आवश्यक
उशिरा निदान झाल्यामुळे जगण्याचा दर (survival rate) मोठ्या प्रमाणात घटतो. कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात आढळल्यास निदान झाल्यानंतर किमान पाच वर्षे जिवंत राहणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सुमारे ७५% असते; मात्र कॅन्सर शरीरात पसरल्यानंतर निदान झाल्यास हे प्रमाण केवळ ७% पर्यंत घसरते. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे पोटाच्या कॅन्सरची लक्षणे अनेकदा अस्पष्ट आणि सर्वसाधारण स्वरूपाची असतात. तरीही सततचे अपचन, कारण न समजता वजन कमी होणे, मळमळ व उलटी (विशेषतः उलटीत रक्त येणे), भूक न लागणे, तसेच दीर्घकाळ थकवा जाणवणे आणि कारण न समजणारा अॅनिमिया (रक्ताची कमतरता) ही लक्षणे आढळल्यास, लवकर निदानासाठी सखोल तपासणी करणे अत्यावश्यक ठरते.

भारतामध्ये पोटाच्या कॅन्सरची प्रकरणे का वाढत आहेत?
भारतामध्ये पोटाच्या कॅन्सरची प्रकरणे वाढण्यामागे अनेक कारणे जबाबदार आहेत. त्यापैकी आहार आणि जीवनशैली ही महत्त्वाची कारणे आहेत. जास्त प्रमाणात खारट, स्मोक्ड (धुरात सुकवलेले) तसेच प्रक्रिया केलेले मांस (processed meat) यांचा आहारात समावेश असल्यास पोटाच्या कॅन्सरचा धोका वाढतो, असे संशोधनातून लक्षात आले आहे. यासोबतच ताजी फळे आणि भाज्यांचा अभाव यामुळे हा धोका आणखी वाढतो. अशा प्रकारच्या आहारपद्धती काही विशिष्ट प्रदेशांमध्ये आणि सामाजिक-आर्थिक गटांमध्ये अधिक प्रमाणात आढळतात.
खारवलेले पदार्थ, लोणची, तिखट पदार्थ कारणीभूत
फायनान्शियल एक्स्प्रेस डॉट कॉमशी बोलताना डॉ. कनक यांनी सांगितले की, “तिखट पदार्थ, लोणची तसेच स्मोक्ड किंवा खारवलेली मासळी यांचे जास्त प्रमाणात सेवन (विशेषतः ईशान्य भारतासारख्या भागांमध्ये) पोटाच्या कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणाशी संबंधित आढळले आहे. या पदार्थांमध्ये अनेकदा नायट्रेट्स आणि नायट्राइट्स असतात, जी पोटात कॅन्सरकारक संयुगे तयार करू शकतात.”
दीर्घकालीन पचनविकार
याशिवाय, अनियमित जेवणाच्या वेळा, अतिमद्यपान, धूम्रपान आणि ताणतणावांनी भरलेली आधुनिक जीवनशैली पचनसंस्थेच्या तक्रारी अधिक वाढवते. प्रक्रिया केलेले अन्न आणि साखरयुक्त पेये सहज उपलब्ध असल्याने ही समस्या आणखी वाढते. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे दीर्घकालीन पचनविकार, जे पुढे जाऊन गंभीर आजारांमध्ये (पोटाच्या कॅन्सरसह) रूपांतरित होऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वारंवार गॅस होत असेल तर… सावधान
भारतामध्ये पोटाच्या कॅन्सरची प्रकरणे वाढत असून, यामागील मूळ कारणे केवळ आहार आणि आनुवंशिकतेपुरती मर्यादित नाहीत. अनेक वर्षांपासून ‘गॅस’ किंवा अपचनाला एक किरकोळ पचनसंस्थेचा त्रास म्हणून पाहिले जाते. मात्र हीच सर्वसाधारण वाटणारी लक्षणे कधी कधी पोटाच्या कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा इशारा देत असतात. गॅस ही पचनप्रक्रियेतील एक सामान्य आणि निरुपद्रवी बाब मानली जाते. मात्र, सतत होणारा गॅस, त्यासोबत वारंवार अपचन, पोट फुगणे किंवा पोटदुखी जाणवत असल्यास, त्यामागे एखादा गंभीर आजार दडलेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दीर्घकाळ चालणारी गॅस्ट्रायटिस, पोटातील व्रण (अल्सर) किंवा Helicobacter pylori (H. pylori) जंतुसंसर्ग हे पोटाच्या कॅन्सरपूर्व अवस्थांचे (precursors) ठोस उदाहरणे आहेत.

स्वच्छतेचा अभाव महत्त्वाचे कारण
पोटाच्या कॅन्सरशी निकटचा संबंध असलेले आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे Helicobacter pylori (H. pylori) हा जंतुसंसर्ग. भारतातील अनेक भागांमध्ये स्वच्छतेचा अभाव आणि गर्दीची ठिकाणे यामुळे H. pylori संसर्गाचा धोका वाढतो. हा संसर्ग दीर्घकाळ राहिल्यास पोटाच्या कॅन्सरची शक्यता वाढते आणि त्यामुळे भारतातील पोटाच्या कॅन्सरच्या वाढत्या प्रकरणांमध्ये आणखी भर पडते. मणिपाल हॉस्पिटल, हेब्बळ येथील सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागातील सल्लागार डॉ. राहुल एस. कनक यांनी संगितले की, H. pylori हा जंतू पोटात आढळणारा सामान्य जीवाणू असून, भारतातील लाखो लोकांना त्याचा संसर्ग झालेला आहे. अनेक प्रकरणांमध्ये हा संसर्ग कोणतीही लक्षणे न दाखवता राहतो; मात्र काही रुग्णांमध्ये तो पोटाच्या आवरणात दीर्घकालीन सूज निर्माण करतो. ही सूज पुढे अॅट्रॉफिक गॅस्ट्रायटिसमध्ये बदलू शकते आणि कालांतराने पोटाच्या कॅन्सरपर्यंत पोहोचू शकते.
सुरुवातीची लक्षणे: दुर्लक्ष करू नका
- सतत अपचन किंवा छातीत जळजळ होणे
- वारंवार पोट फुगणे किंवा पोटात अस्वस्थता जाणवणे
- भूक न लागणे आणि कारण न समजणारे वजन कमी होणे
- शौचेत रक्त दिसणे किंवा काळे, डांबरासारखे शौच होणे
- मळमळ किंवा उलटी होणे, कधी कधी उलटीत रक्त येणे
जीवनशैलीशी संबंधित सवयी
तंबाखूचे वाढते सेवन आणि मद्यपान यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित सवयी या पोटाच्या कॅन्सरसाठी जोखीमेचा घटक ठरतात. यासोबतच लठ्ठपणा (obesity) हा देखील पोटाच्या कॅन्सरसह अनेक प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढवतो, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. अशा सवयी विविध समुदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने एकूण कॅन्सरचा धोका अधिक वाढतो. याव्यतिरिक्त, आनुवंशिक घटक देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. कुटुंबामध्ये पोटाच्या कॅन्सरचा इतिहास असल्यास संबंधित व्यक्तीला हा आजार होण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये विशेष काळजी आणि लवकर तपासणी करणे आवश्यक ठरते.

भारतामध्ये पोटाच्या कॅन्सरची वाढती प्रकरणे तातडीने ठोस उपाययोजनांची गरज अधोरेखित करतात. यासाठी प्रभावी जनजागृती मोहिमा राबवणे आणि दर्जेदार आरोग्यसेवा सुविधांपर्यंत सर्वसामान्यांना सहज प्रवेश मिळवून देणे अत्यावश्यक आहे. फळे आणि भाज्यांनी समृद्ध असा संतुलित आहार घेण्याचे महत्त्व अधोरेखित करणे, H. pylori सारख्या संसर्गांवर वेळेवर उपचार करणे आणि आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहन देणे.. हे सर्व उपाय एकत्रितपणे पोटाच्या कॅन्सरची वाढ रोखण्यास मदत करू शकतात. या कॅन्सरचा परिणाम कमी करण्यासाठी प्रतिबंध, लवकर निदान आणि पुराव्यावर आधारित सर्वंकष उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत.
प्रतिबंध आणि लवकर निदान
इतर कोणत्याही कॅन्सरप्रमाणेच, पोटाच्या कॅन्सरमध्येही योग्य वेळी तज्ज्ञ ऑन्कोलॉजिस्टकडून उपचार सुरू केल्यास रुग्णांचे जगण्याचे प्रमाण वाढू शकते. महत्त्वाची बाब म्हणजे, पोटाचा कॅन्सर लवकर ओळखल्यास टाळता येऊ शकतो आणि यशस्वीपणे उपचार करता येतात. धोका कमी करण्यासाठी खालील उपाय महत्त्वाचे ठरतात:
- तपासणी आणि निदान:
नियमित आरोग्य तपासण्या करणे अत्यावश्यक आहे, विशेषतः ज्यांच्या कुटुंबात पोटाच्या कॅन्सरचा इतिहास आहे किंवा ज्यांना दीर्घकाळ पचनाच्या तक्रारी आहेत. H. pylori साठीच्या नॉन-इनव्हेसिव्ह तपासण्या आणि एंडोस्कोपीद्वारे संभाव्य समस्या सुरुवातीलाच हेरता येतात. - आरोग्यदायी आहार:
फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांनी समृद्ध असा आहार पोटातील हानिकारक आम्लांचा परिणाम कमी करतो आणि सूज (inflammation) आटोक्यात ठेवतो. यासोबतच अतिखारट, लोणच्याचे आणि स्मोक्ड पदार्थ टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. - मद्यपान आणि तंबाखूचे सेवन मर्यादित करा:
मद्य आणि तंबाखू पोटाच्या आतल्या आवरणाला त्रास देतात आणि कॅन्सरचा धोका लक्षणीयरीत्या वाढवतात. - सक्रिय राहा:
नियमित व्यायाम करणे आणि निरोगी वजन राखणे यामुळे पचनसंस्था सुधारते आणि एकूण आरोग्य चांगले राहते. - ताणतणाव नियंत्रित ठेवा:
ताणतणावामुळे पचनसंस्थेची लक्षणे अधिक बळावू शकतात. त्यामुळे योग, ध्यान किंवा इतर रिलॅक्सेशन तंत्रांचा अवलंब करणे फायदेशीर ठरू शकते.

