Sanskrit’s Gen Z Revival: ‘संस्कृत’ म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? मंदिरांमधील मंत्रोच्चार, गुरुकुलातील पाठांतर किंवा जुन्या पोथ्या-पुराणांचे पिवळे पडलेले कागद. पण, आजच्या २१ व्या शतकात हीच प्राचीन ‘देवभाषा’ चक्क सोशल मीडियावरील रील्स, हिप-हॉप रॅप आणि बुलेट रायडर्सच्या संवादातून ऐकू येऊ लागली, तर आश्चर्य वाटेल ना? हजारो वर्षांचा वारसा लाभलेली ही समृद्ध भाषा नव्या युगाच्या रंगात अशी काही रुजते आहे की, तिचं हे रूप पाहून आजची ‘जेन झी’ (Gen Z) पिढीही थक्क झाली आहे.
अडीच हजार वर्षांपूर्वीची ‘अष्टाध्यायी’ कॉम्प्युटरसाठी आदर्श मॉडेल कशी ठरली?
संस्कृत आणि कॉम्प्युटरचं अल्गोरिदम्स वरवर पाहता, एकमेकांपासून मैलोन् मैल दूर वाटू शकतात. पण कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) आणि मशीन ट्रान्सलेशनच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांसाठी संस्कृत ही एक अत्यंत रंजक आणि अचूक भाषा ठरत आहे. संस्कृतचं व्याकरण इतकं काटेकोर, नियमबद्ध आणि वैज्ञानिक आहे की, १९८५ मध्ये ‘नासा’च्या (NASA) एका शोधनिबंधातही संस्कृतला संगणकीय भाषेसाठी एक आदर्श मॉडेल मानलं गेलं होतं. भाषा आणि विज्ञानाचा हा संगम आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी शलातुला (आजच्या पाकिस्तानात असलेलं एक ठिकाण) या जागी पाणिनी यांनी रचलेली ‘अष्टाध्यायी’ ही भाषाशास्त्राची पहिली वैज्ञानिक चौकट मानली जाते. चार हजार नियमांची ही चौकट मानवी भाषेला थेट तर्कशुद्ध गणितासारखं रूप देते.
‘किम्भो रायडर्स’ : चार भिंतींच्या बाहेर पडलेली रोजच्या संवादाची भाषा
मात्र, आजच्या तंत्रयुगात संस्कृतचा प्रवास केवळ वैज्ञानिक लॅब किंवा धर्मग्रंथांपुरता उरलेला नाही. बंगळुरू येथील ‘किम्भो संस्कृत रायडर्स क्लब’ याचं उत्तम उदाहरण आहे. संस्कृतमध्ये ‘किम्भो’ शब्दाचा साधा आणि अनौपचारिक अर्थ होतो, ‘काय चाललंय?’ (जसं मराठीत आपण मित्राला “काय मग, काय विशेष?” विचारतो अगदी तसं). २०२४ मध्ये समष्टी गुब्बी यांनी हा अनोखा ग्रुप सुरू केला. संस्कृतला वर्गाच्या चार भिंतींतून बाहेर काढून दैनंदिन जीवनाचा भाग बनवणं हा त्यांचा उद्देश आहे.
या क्लबचे तरुण सदस्य दर पंधरवड्याला बंगळुरूच्या कब्बन पार्कमध्ये जमतात. तिथे निसर्गभ्रमंती करीत अगदी साध्या खेळांमधून क्रियापदे, आकडे आणि साधी वाक्यरचना शिकतात. एवढंच नाही, तर गोवा क्रूझ, बंजी जंपिंग ते अगदी कॅसिनोच्या सहलींपर्यंत, हे रायडर्स एकमेकांशी फक्त आणि फक्त संस्कृतमध्ये गप्पा मारतात. संस्कृत ही मृत भाषा नसून सहज संवादाचं जिवंत माध्यम आहे हे या प्रकल्पातून सिद्ध होतं. एवढ्यावरच न थांबता, समष्टी गुब्बी आणि त्यांचे सहकारी सध्या ‘मित्रम्’ नावाच्या एका समकालीन, आधुनिक विषयावरील संस्कृत चित्रपटाची निर्मितीही करीत आहेत.
‘ट्राइब संस्कृत’ने तरुणाईला कसं जिंकलं?
सोशल मीडियाच्या जगातही संस्कृतनं आपल्या तालावर सर्वांना नाचवायला सुरुवात केली आहे. कोईम्बतूरची हृद्या सुरेश आणि मंगळुरूचा विनम्र हेर्ले या ‘चिन्मय विश्वविद्यापीठा’तून संस्कृत पदवी घेतलेल्या तरुणांनी ‘ट्राइब संस्कृत’ची (Tribe Sanskrit) स्थापना केली. त्यांनी मल्याळममधील गाजलेलं ‘कांता’ हे गाणं असो वा राजस्थानी लोकसंगीताचा साज असलेलं ‘चौधरी’ गीत, या लोकप्रिय गाण्यांना थेट संस्कृतचे बोल दिले. त्यांच्या ‘चौधरी’ गाण्याच्या संस्कृत आवृत्तीनं तर मूळ गायक मामे खान यांचंही मन जिंकलं. ‘धुरंधर’ गाण्याचं संस्कृत रॅप व्हर्जन बनवून त्यांनी तरुणाईमध्ये एक वेगळीच क्रेझ निर्माण केली आहे. आजची पिढी आपल्या मुळांशी जोडली जाण्यासाठी आसुसलेली आहे, फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची पद्धत आधुनिक असायला हवी, हा त्यांचा विश्वास आज लाखो व्ह्युजमधून खरा ठरताना दिसतो.
चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून जिवंत राहणारा समृद्ध वारसा
संस्कृतला आजच्या टप्प्यावर आणून ठेवण्यात जुन्या पिढीतील निष्ठावंतांनी बजावलेल्या कामगिरीचं श्रेय खचितच विसरता येणार नाही. १९०६ मध्ये स्थापन झालेल्या चेन्नईच्या ‘संस्कृत कॉलेज’नं या भाषेची शैक्षणिक परंपरा अविरत चालू ठेवली. चित्रपटसृष्टीत जी. व्ही. अय्यर यांनी ‘आदि शंकराचार्य’सारखा पहिला संस्कृत चित्रपट बनवून जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवला होता. तीच परंपरा पुढे नेत दिग्दर्शक व रंगकर्मी के. सुचेंद्र प्रसाद यांनी ‘प्रपाथ’, ‘एकचक्रम’ व ‘पद्मगांधी’ यांसारख्या दर्जेदार संस्कृत चित्रपटांची निर्मिती केली.
भारद्वाज ऋषींच्या ‘वैमानिक शास्त्रा’वर आधारित असलेल्या ‘प्रपाथ’ चित्रपटाचा विशेष खेळ ‘इस्रो’ (ISRO) व ‘आयआयएससी’ (IISc)सारख्या सर्वोच्च वैज्ञानिक संस्थांमध्येही आयोजित करण्यात आला होता, जिथे संस्कृतच्या वैज्ञानिक दृष्टिकोनावर प्रदीर्घ चर्चा रंगल्या. सुचेंद्र प्रसाद यांचं ‘पितामह’ हे नाटकही संस्कृत साहित्यातील दिग्गजांचा वारसा नव्या पिढीसमोर अतिशय प्रभावीपणे मांडतं. त्यांच्या मते, संस्कृत हे केवळ भूतकाळाचं स्मरण नसून वर्तमानातील सर्जनशीलतेचं एक प्रवाही माध्यम आहे.
सीमांपलीकडचा सांस्कृतिक सांधा जोडणारी भाषा
संस्कृतचा हा प्रभाव केवळ भारताच्या भौगोलिक सीमांपुरता मर्यादित राहिलेला नाही. थायलंडच्या मंदिरांपासून, इंडोनेशियाच्या प्राचीन साहित्यापर्यंत आणि कंबोडियाच्या ख्मेर संस्कृतीपर्यंत सर्वत्र संस्कृतचा अमीट ठसा उमटलेला दिसतो. शेजारच्या पाकिस्तानातही याचे आश्चर्यकारक पडसाद उमटले आहेत. २०२५ मध्ये एका मुलाखतीदरम्यान प्रसिद्ध अभिनेते अली खान यांनी अगदी सहजतेने शुद्ध उच्चारात ‘सरस्वती वंदना’ म्हणून दाखवली आणि त्याचा मथितार्थ इंग्रजीत सांगितला. तसेच लाहोरच्या ‘फॉर्मन ख्रिश्चन कॉलेज’मधील प्राध्यापक शाहिद रशीद यांनी स्वतः संस्कृतचा सखोल अभ्यास करून, ‘लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’मध्ये (LUMS) संस्कृतचा अभ्यासक्रम सुरू करण्यात पुढाकार घेतला. त्यांच्या मते, “संस्कृत ही संपूर्ण दक्षिण आशियाचा सांस्कृतिक सांधा जोडणारी एक ऐतिहासिक ओळख आहे.”
काळाच्या ओघात अनेक भाषा लोप पावल्या; पण संस्कृतनं स्वतःचं मूळ न सोडता, प्रत्येक युगाशी जुळवून घेण्याची लवचिकता दाखवली. वैदिक ऋचांपासून सुरू झालेला हा प्रवास आज अल्गोरिदम, इन्स्टाग्राम रील्स, रॅप संगीत आणि रायडिंग ग्रुप्सपर्यंत येऊन पोहोचला आहे. जुन्या पाऊलखुणा जपत नव्या वाटा चोखाळण्याची हीच ताकद संस्कृतला आजही तितकीच जिवंत आणि चिरतरुण ठेवते.
– सदर मजकूर ‘द हिंदू’ वृत्तपत्रातील शिल्पा आनंदराज यांच्या मूळ लेखावर आधारित आहे.
