स्नायूंचा कमकुवतपणा तसेच हाडांची झीज या समस्यांचा सामना आयुष्यात उशीरा करावा लागू शकतो, असा अनेकांचा समज असतो. पण, अनेकांना या समस्येचा सामना खूप कमी वयात करावा लागतो. मुंबईतील अस्थिरोग शल्यचिकित्सक (ओर्थोपेडिक सर्जन) डॉ. मनन वोरा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून याबाबत माहिती दिली. शरीरातील स्नायूंचा, मांसपेशींचा क्षय होतो, या आजाराला सारकोपेनिया म्हणतात. भारतात सारकोपेनियाचा प्रभाव वाढला आहे. “वयाच्या तिशीनंतर स्नायू कमकुवत होण्यास तसेच हाडांची झीज होण्यास हळूहळू सुरूवात होते. या समस्येकडे दुर्लक्ष केले तर तुमचे शरीर अशक्त, कमजोर होते”, असे डॉ. मनन वोरा म्हणाले.
सारकोपेनियामुळे स्नायू कमकुवत होतात?
व्हिडिओत डॉ. मनन वोरा म्हणाले, “चांगला आहार सेवन करा व चांगली झोप घ्या असे सगळेच डॉक्टर तुम्हाला सांगतील. पण, सारकोपेनियाबाबत कोणी सांगणार नाही. वयाच्या तिशीनंतर तुमच्या शरीरातील स्नायू कमकुवत होण्यास सुरूवात होते. ही प्रक्रिया शरीराच्या आता सुरू असते तेव्हा तुम्हाला काहीही जाणवत नाही. त्याला सारकोपेनिया असे म्हणतात. हा आजाराकडे भारतात खूप दुर्लक्ष केले जाते. हा आजार तुमच्या चयापचय क्रियेवर परिणाम करतो. सारकोपेनियामुळे तुम्ही नेहमी जे अन्न सेवन करता, तेच अन्न शरीर वेगळ्या प्रकारे साठवून ठेवते. त्यामुळे तुमचे वजन वाढते. पण, हे स्नायूंच्या कमकुवत होण्याचे लक्षण आहे, हे कोणी सांगत नाही.”
किरकोळ अपघातानंतरही हाड मोडते का?
स्नायूंच्या कमकुवतपणासह डॉ. वोरा यांनी हांडाच्या होणाऱ्या झीजकडेही लक्ष वेधले. वयोमानानुसार कालांतराने हाडांचे वजन आणि ताकद कमी होते. त्यामुळे हाडे नाजूक होतात. एखाद्या छोट्याश्या अपघातानंतर किंवा जखम झाल्यानंतर हाड फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. किंबहुना काहीवेळा हाड फ्रॅक्चरही होती. त्यावेळी हा आजार झाल्याचे लक्षात येते. डॉ. मनन वोरा म्हणाले, “तुमचे वय जसे वाढत जाते, तसे हाडांची झीज होणे सुरू होते. एखाद्या छोट्या, किरकोळ अपघातानंतर तुमचे हाड मोडते. त्यावेळी सारकोपेनियाबाबत तुम्हाला माहिती मिळते”, असे डॉ. वोरा म्हणाले. स्नायूंचा कमकुवतपणा व हाडांची झीज रोखण्यासाठी वेट लिफ्टिंग (वजन उचलणे) हा उत्तम पर्याय असल्याचे डॉ. वोरा यांनी सांगितले. रेझिस्टन्स एक्सरसाइज केल्याने तुमच्या मेटाबॉलिजम (चयापचय क्रिया), हाडांचे वस्तुमान यांचे संरक्षण होते. तुमच्या शारीरिक हालचाली दीर्घकाळ तुम्हाला करता येतात.
सारकोपेनिया टाळण्यासाठी काय करावे?
डॉ. मनन वोरा म्हणाले, “हाडांची झीज व स्नायूंचा कमकुवतपणा रोखण्यासाठी वेट लिफ्टिंग हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे तु्म्ही तुमची चयापचय क्रिया (मेटाबॉलिजम) तसेच हाडे मजबूत करू शकता. मेटाबॉलिजम म्हणजेच चयापचयाची एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे व्यक्ती जे खातो आणि पितो त्याचे उर्जेमध्ये रूपांतर होते. ही शरीरात घडणारी एक रासायनिक प्रक्रिया आहे. मेटाबॉलिजमवर परिणाम झाल्यास शरीराची ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता कमी होते. दरम्यान, वेट लिफ्टिंग केल्याने (वजन उचलून) जर फक्त हातांवर ताण येत असेल, तर ते काही कामाचे नाही. त्याने काही फायदा होणार नाही. वेट लिफ्टिंगने पूर्ण शरीरावर ताण आला पाहिजे, तेव्हाच ते फायद्याचे ठरते. ‘स्ट्रेन्थ ट्रेनिंग’ ही फक्त सुंदर दिसण्यासाठी नव्हे, तर तुमच्या शरीराने वयाच्या ५०, ६०, ७० वर्षांनंतरही शारीरिक हालचाली सुरू ठेवाव्यात, म्हणून करणे आवश्यक आहे.”
वयाच्या तिशीनंतर हाडांची झीज होण्यास सुरूवात?
वयाशी संबंधित असलेल्या सारकोपेनिया या प्रक्रियेमुळे वयाच्या तिशीनंतर हाडांची झीज होण्यास सुरूवात होते. हार्मोन्समध्ये बदल, शारीरिक हालचालींमध्ये घट तसेच प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन कमी झाल्याने ही प्रक्रिया होते. वयाच्या तिशीनंतर दर दहा वर्षांमध्ये ३ ते ५ टक्के घट मांसपेशीच्या वस्तुमानात होते. यामुळे शरीरावरील संतुलन कमी होणे, शारीरिक हालचालींत घट होणे, हाड मोडण्याची शक्यता वाढणे असे संभाव्य धोके निर्माण होतात, असे नवी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे अस्थिरोग शल्यचिकित्सक डॉ. राजू वैश्य यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
स्नायूंचा कमकुवतपणा आणि हाडांच्या वस्तुमानात काय संबंध?
डॉ. वैश्य म्हणाले, “हाडांचे वस्तुमान स्थिर किंवा वाढवण्यासाठी स्नायू हाडांना ऊर्जा पुरवतात. स्नायू कमकुवत झाल्यास हाडांना ऊर्जा मिळणे कमी होते. पर्यायाने हाडांची झीज होणे सुरू होते. त्यामुळे हाड फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. यावर उपाय म्हणून बॉडी-वेट एक्सरसाइज करणे आवश्यक आहे. त्यात प्रामुख्याने वॉल पुश-अप आणि लंजेस यांचा समावेश असावा. आहारात प्रोटीन व व्हिटामिन डी यांचे प्रमाण वाढवावे. तसेच नियमित व्यायाम व शारीरिक हालचालींवर भर द्यावा. यांमुळे हाडांची होणारी झीज थांबते, तसेच स्नायूदेखील मजबूत होतात.”, असे डॉ. वैश्य म्हणाले.
सारकोपेनियाची लक्षणे
-स्नायू कमकुवत झाल्यामुळे
-तग धरण्याची क्षमता कमी होणे.
-दैनंदिन व्यवहार करण्यात अडचण.
-हळू चालणे.
-पायऱ्या चढताना त्रास होतो.
-खराब संतुलन आणि पडणे.
-स्नायूंचा आकार कमी होणे.
मेटाबॉलिज्म मंदावल्याची लक्षणे
जर तुम्हाला बद्धकोष्ठता, सूज येणे किंवा इतर पाचन समस्या असतील तर हे तुमची मेटाबॉलिजम मंदावल्याची लक्षणे आहेत असे मुंबई येथील रेजुआ एनर्जी सेंटरचे नैसर्गिक चिकित्सक आणि एक्यूपंक्चर तज्ञ डॉ. संतोष पांडे यांनी सांगितले.
