तमिळनाडूत विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना गती आलीय. दिवंगत जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला यांनी नव्या पक्षाची स्थापना केल्याने विधानसभेच्या आखाड्यात आणखी एका पक्षाची भर पडली. दुसरीकडे भाजपनेही दक्षिणेतील या राज्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २८ फेब्रुवारीचा राज्याचा दौरा महत्त्वाचा ठरला. सत्तारूढ द्रमुक व काँग्रेस यांच्यात जागावाटप चर्चेला अधिकृत सुरुवात होण्याची प्रतीक्षा आहे . निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री व अण्णा द्रमुकमधून निलंबित केलेले ओ. पन्नीरसेल्वम यांनी द्रमुकमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना बळ मिळाले. राज्यात येत्या एप्रिल-मेमध्ये निवडणूक अपेक्षित आहे.
शशिकला थेट राजकारणात
अण्णा द्रमुकच्या एकेकाळच्या सर्वेसर्वा व राज्याच्या राजकारणावर अमीट छाप सोडून गेलेल्या जयललिता यांची मैत्रीण शशिकला नऊ वर्षांच्या (जयललिता यांचे निधन २०१६) राजकीय विजनवासानंतर पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. तीन दशके त्या पडद्यामागून हालचाली करत होत्या. मात्र आता थेट राजकीय रणांगणात त्यांनी उडी घेतल्याने राज्यातील समीकरणांचा विचार नव्याने सुरू झाला. अण्णा द्रमुकमधून निलंबनानंतर त्या संधीची वाट पहात होत्या. अखेर रामनाथपुरम जिल्ह्यात कोट्टायमेडू येथील कार्यक्रमात त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. पक्षाचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही, मात्र नव्या पक्षाचा ध्वज त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. ध्वजावर सी. एन. अण्णादुराई, एम. जी.रामचंद्रन तसेच जयललिता यांची छायाचित्रे आहेत. या तिघांच्या विचारानुसार पक्ष वाटचाल करेल अशी घोषणा शशिकला यांनी केली. शशिकला यांनी पत्रकार परिषदेत पलानीस्वामी यांचा नामोल्लेख टाळला.
शशिकला यांच्या निर्णयाने अण्णा द्रमुकच्या मतांचे विभाजन होणार हे निश्चित. हा नवा पक्ष अभिनेता विजय याच्या टीव्हीके पक्षाशी आघाडी करण्याची शक्यता वर्तवली जाते. तशी चर्चाही सुरू आहे. याखेरीज शशिकलांचे पुतणे टी. टी. व्ही. दिनकरन हे नव्या पक्षात येतील असा कयास बांधला जातोय. दिनकरन सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आहेत. अर्थात राज्यात द्रमुक व अण्णा द्रमुक आघाडीत सरळ सामना मानला जातो. शशिकला जरी राजकारणात उतरल्या असल्या तरी, राज्यातील एकाही मतदारसंघात त्यांना स्वबळावर विजय मिळवता येईल अशी स्थिती नाही.
पंतप्रधानांचा दौरा
दक्षिणेकडे कर्नाटक वगळता अन्य राज्यांत भाजपला फारसे यश मिळालेले नाही. तेलंगणात पक्षाने प्रयत्न केला, मात्र स्थानिक नेते भक्कम संघटना उभी करू शकले नाहीत. परिणामी नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन महापालिकांचा अपवाद वगळता भाजपला एकही नगरपालिका जिंकता आली नाही. भाजपने तमिळनाडूवर लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेस असो वा भाजप तमिळनाडूत राष्ट्रीय पक्षांना विशेष स्थान नाही. गेली सहा दशके द्रमुक-अण्णा द्रमुकभोवतीच येथील राजकारण फिरत आहे. भाजपने गेल्या वेळी अण्णा द्रमुकशी आघाडी करत चार जागा जिंकल्या होत्या. आता यात वाढ करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगामी दौरे महत्त्वाचा ठरतील.
अलीकडच्या दौऱ्यात पंतप्रधान मदुराई येथील एम्स रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनासह अनेक सरकारी कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. कार्तिगाई दीपम वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तिरुपारंकुंड्रम मंदिराला भेट देऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सभेत मार्गदर्शन केले. येथील मंदिर वादाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण तमिळनाडूतील या शहरातील विधानसभेची जागा सोडावी अशी राज्यातील भाजप नेत्यांची भूमिका आहे. येथे हिंदू मतांचे ध्रुवीकरण होईल अशी पक्षाची रणनीती आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याने हा मुद्दा चर्चेत येईल, यातून द्रमुकच्या राजकारणाला लक्ष्य करण्याची भाजपची योजना आहे.
द्रमुक-काँग्रेसची चर्चेची प्रतीक्षा
राज्यात विधानसभेच्या २३४ तर लोकसभेच्या ३९ जागा आहेत. काँग्रेसला प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विधानसभेची एक जागा हवी आहे. त्या दृष्टीने ३५ ते ४० जागा पक्षाला हव्या आहेत. द्रमुक मात्र इतक्या जागा सोडण्यास तयार नाही. काँग्रेसने राज्यसभेच्या दोन जागा मागितल्याचे वृत्त आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस २५ जागांवर लढली होती. तसेच द्रमुक पुन्हा सत्तेत आल्यास काँग्रेस पक्षाला सरकारमध्येही स्थान मिळण्याची शक्यता नाही. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जागावाटपाची अनौपचारिक चर्चा सुरू असली तरी, राज्य पातळीवर तशी अधिकृत चर्चा सुरू झाली नाही.
काँग्रेसच्या एक-दोन नेत्यांनी टीव्हीकेशी आघाडी करावी अशी मागणी केली होती. मात्र राष्ट्रीय राजकारणात द्रमुकचे महत्त्व आणि त्या पक्षाचे सर्वेसर्वा व राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे भाजपविरोधी आघाडीतील स्थान ओळखून पक्षाने ही मागणी अमान्य केली. द्रमुकलाही मतविभागणी टाळण्यासाठी काँग्रेसला आघाडीत ठेवणे गरजेचे आहे. मात्र जागावाटपाचा घोळ घातला जाणार की तातडीने निर्णय होणार याची उत्सुकता आहे. माजी मुख्यमंत्री व बोडिनायंकनकूर मतदारसंघाचे आमदार ओ. पन्नीरसेल्वम यांनी द्रमुकमध्ये प्रवेश केला. तमिळनाडूच्या दक्षिण भागातील ज्येष्ठ नेते अशी त्यांची ओळख आहे. प्रभावी अशा थेवर समुदायातून ते येतात. अण्णा द्रमुकचे सर्वोसर्वा ई. के. पलानीस्वामी यांच्याशी संघर्षातून २०२२ मध्ये त्यांना निलंबित करण्यात आले होते. पन्नीरसेल्वम द्रमुक प्रवेशाने अण्णा द्रमुकला निश्चितच फटका बसेलच मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेही नुकसान आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र आता या साऱ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
दोघात तिसऱ्यापाठोपाठ नवे भिडू
द्रविडीयन विचारांचे सत्तारूढ द्रमुक आणि विरोधातील अण्णा द्रमुक हे पक्ष यंदाही केंद्रस्थानी आहेत. द्रमुक आघाडीत राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेससह डावे पक्ष, मुस्लीम लीग तसेच काही छोटे पक्ष आणि गट आहेत जे एखादी जागा लढवितात. विरोधातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत अण्णा द्रमुकशी भाजप तसेच पट्टल मक्कल काची पक्षातील एक गट याखेरीज स्थानिक पक्ष आहेत. याशिवाय अभिनेता विजयचा टीव्हीके पक्ष रिंगणात आहे. त्यामुळे विधानसभेचा सामना तिरंगी होईल. त्यात आता शशिकलांच्या पक्षाची भर पडली. यातून निवडणूक जशी जवळ येईल तसे पक्ष वाढत जातील. मात्र खऱ्या अर्थाने सामना तिरंगीच होणार. विजय याचा पक्ष पहिल्यांदाच उतरत असल्याने त्या पक्षाच्या कामगिरीवरच विधानसभेचा निकाल ठरेल.
